डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अतिथी संपादकाचे मनोगत...एक वर्तुळ पूर्ण झाले…

सातव्या मजल्यावरील कॉमन रूममध्ये बसून (मला अजिबातच न आवडणारी) हिंदी कॉमेंटरी ऐकत क्रिकेट मॅच पाहणे हा एक भन्नाट प्रकार होता. तिथे अफगाण, बांगलादेशी, नेपाळी मुले असायची. (भूतान, श्रीलंका, पाकिस्तान आणि मालदीवच्या मुलांची संख्या मुळातच फार कमी होती.) त्यांच्यापैकी अनेकांना भारतीय संघाचा पराभव- विशेषतः श्रीलंका, पाकिस्तान किंवा बांगलादेशकडून झाला तर फार आनंद व्हायचा.

१ - सार्क युनिव्हर्सिटीतील माझ्या एकूण अनुभवांवर लिहिणे हा एका स्वतंत्र व दीर्घ लेखाचा विषय आहे. त्यामुळे या मनोगतात विशेषांकातील इतर लेखांना पूरक माहिती देता- देता काही वेगळे अनुभव मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. सार्क युनिव्हर्सिटीमध्ये निवड झाल्याचे कळले, तोपर्यंत माझे पुणे विद्यापीठाचे बी.ए.चे निकालही आले नव्हते. दोन दिवसांनी सहज त्यांची वेबसाईट चेक करताना कळले की, माझी निवड तिथल्या ‘प्रेसिडेंट स्कॉलरशिप’साठीही झाली आहे.

पुण्यातील तीन वर्षांच्या वास्तव्यात माझा अक्षरशः पुनर्जन्मच झाला होता. त्यामुळे आपण फर्ग्युसनमध्ये राहून पुण्यात वावरलो तसे सार्क युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून दिल्लीत वावरायचे अशी अपेक्षा उराशी बाळगून मी जुलै २०१२ मध्ये पुणे सोडले. सार्क युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतल्यावर मात्र एकापाठोपाठ एक धक्के बसायला लागले. आपल्या डोक्यात युनिव्हर्सिटी म्हटल्यावर जे चित्र समोर येते, त्याच्याशी अगदी विसंगत असे चित्र तिथे होते. संपूर्ण युनिव्हर्सिटी म्हणजे एक दहा मजली ‘ङ’ आकाराची इमारत होती. तिच्यात पहिल्या मजल्यावर मेस, दुसऱ्या आणि तिसऱ्यावर क्लासरूम्स आणि शिक्षकांच्या खोल्या, तर चौथ्यावर युनिव्हर्सिटीची प्रशासकीय कार्यालये होती. पाच, सहा आणि सातवर होस्टेल होते. आठव्यावर डागडुजीचे काम चालू होते. नववा आणि दहावा मजला म्हणजे ‘अनिवासी भारतीय कार्य मंत्रालया’ची ऑफिसेस.

आम्हाला दिलेल्या खोल्यांमध्ये नवे कोरे बेड्‌स, गाद्या आणि कपाटे होती. प्रत्येक खोलीत तीन जण असणार होते. माझा रूम नंबर ७२३ होता. फर्ग्युसनमधलाच एक अफगाण मित्र सार्क युनिव्हर्सिटीसाठी सिलेक्ट झाला होता. मी त्यालाच रूममेट म्हणून मागवून घेतले. दुसरा मुलगा ‘अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी’तला होता. पूर्वाश्रमीच्या अकबर हॉटेलचे रूपांतर एका विद्यापीठात होत होते. तिथे आम्हाला जा-ये करायला जुनी लिफ्ट होती. प्यायला पाणी मिळावे म्हणून प्रत्येक मजल्यावर ॲक्वागार्डचे मशीन होते आणि कपडे धुवायला कॉमन अशी तीन वॉशिंग मशिन्स होती. पाचव्या मजल्यावर मुलींचे होस्टेल असल्याने तिथे जाणे निषिद्ध होते.

आमच्या आधीच्या बॅचच्या मुलांची सोय विमानतळाजवळच्या पंचतारांकित सेंटॉर हॉटेलमध्ये केलेली होती. पण तिथे जाण्या-येण्यास त्रास होतो आणि अभ्यास होत नाही, अशी कारणे देऊन मुलांनी ‘आम्हाला अकबर भवनमध्येच अर्धवट तयार होस्टेल्समध्ये ठेवा,’ असा तगादा लावला होता. त्यामुळे आमची सुरुवात सेंटॉरपासून न होता थेट अकबर भवनमध्येच झाली. माझी International Relations (IR) ची बॅच २७ जणांची होती, त्यांपैकी सहा जण पहिल्या वर्षभरात वेगवेगळ्या कारणांनी सोडून गेले. त्या वर्गात मी स्वतःहून CR  होण्याची जबाबदारी स्वीकारली होती.

पण खरे सांगायचे तर, आमच्या वर्गातील आणि होस्टेलमधील एकूण पब्लिक पाहून माझा उत्साह वाढण्याऐवजी कमीच झाला होता. कारण फर्ग्युसनमध्ये असताना मला दक्षिण आफ्रिका, सुदान, इराक, इराण, कंबोडिया, फ्रान्स वगैरे ११३ देशांच्या मुलांना पाहण्याची सवय होती. त्यामुळे इथे येताच मला वाटले की, सार्क युनिव्हर्सिटीतले हे विश्व  फारच छोटे आहे. माझ्या बाकीच्या वर्गमित्रांना आणि होस्टेलवाल्यांना भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका आणि मालदीव या आठ देशांची मुले आजूबाजूस बघणे कठीण जात होते; कारण त्यांना सवय फक्त भारतीय मुले बघण्याची, हिंदी किंवा आपली प्रादेशिक भाषा ऐकण्याची होती. माझे उलटे होते. मला इथे सुरुवातीला हिंदी बोलणेसुद्धा जीवावर येई; वाटे, कुठे ते फर्ग्युसन आणि कुठे ही सार्क युनिव्हर्सिटी!

पहिल्या सेमिस्टरमध्येच आमचा लंबक प्रचंड आशावादाकडून निराशावादाकडे झुकला होता. अर्थात याचा अर्थ असा नाही की, सार्क युनिव्हर्सिटीत वाईट दिवस जात होते. मेसमधले जेवण घशाखाली उतरत नसे आणि कोर्ससाठी नेमलेले वाचन करण्यात दिवसाचा सर्व वेळ निघून जाई; हे सोडले तर बाकी एन्जॉय कराव्यात अशा अनेक गोष्टी होत्या. आमचा तिथे एक मस्त ग्रुप तयार झाला होता, त्यात मी सोडून बाकीचे सर्व सिनिअर्स होते. त्यामुळे मला माझे वर्गमित्र आपला मानत नसत, तर अनेकांना वाटे की, हा कोण आगंतुक उठसूट सिनिअर्समध्ये असतो? आमच्या त्या ग्रुपमुळेच केवळ डिसेंबर २०१२ मध्ये मी श्रीलंकेला जाऊन येऊ शकलो.

मी सार्क युनिव्हर्सिटीमध्ये असतानाच दोन टी-ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप झाले. दोन्ही वर्ल्ड कप दक्षिण आशियाई देशांत झाले. ऑक्टोबर २०१२ मध्ये श्रीलंकेत तर मार्च २०१४ मध्ये बांगलादेशात. सातव्या मजल्यावरील कॉमन रूममध्ये बसून (मला अजिबातच न आवडणारी) हिंदी कॉमेंटरी ऐकत क्रिकेट मॅच पाहणे हा एक भन्नाट प्रकार होता. तिथे अफगाण, बांगलादेशी, नेपाळी मुले असायची. (भूतान, श्रीलंका, पाकिस्तान आणि मालदीवच्या मुलांची संख्या मुळातच फार कमी होती.) त्यांच्यापैकी अनेकांना भारतीय संघाचा पराभव- विशेषतः श्रीलंका, पाकिस्तान किंवा बांगलादेशकडून- झाला तर फार आनंद व्हायचा. सार्कमधील देशांचे अंतर्गत आणि बाह्य प्रश्न एकमेकांत इतके विचित्र तऱ्हेने गुंतलेले होते- अजूनही आहेत- की इच्छा असो वा नसो…

वर्गातील, मेसमधील, होस्टेलमधील चर्चा नकळतपणे भारतावर यायची. (अर्थात, प्रत्येकच चर्चा अशी व्हायची असे नव्हे.) त्यात भारताची भीती आणि भारताकडून अपेक्षा अशा दोन्ही भावना असायच्या. भारताने मदत केली तर तो अंतर्गत राजकारणातील हस्तक्षेप आणि नाही केली तर ‘भारत जबाबदारी टाळतो आहे’ असा आक्षेप असायचा. आम्ही एम.ए. करत असताना सार्क देश आणि भारत एका स्थित्यंतरातून जात होते. त्याच काळात सर्व सार्क देशांत राष्ट्रीय निवडणुका झाल्या. अफझल गुरू आणि कसाबची फाशी, श्रीलंकेतील युद्धात लष्कराकडून झालेले मानवाधिकारांचे उल्लंघन, बांगलादेशातील निवडणूकपूर्व अस्वस्थता आणि हिंसाचार, नेपाळमध्ये राज्यघटना बनवण्यात येत असलेल्या अडचणी, भूतानला भारताकडून मिळणारी मदत तात्पुरती (निवडणुकीच्या तोंडावर) बंद करणे, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील युद्धे, दहशतवादी हल्ले वगैरे वगैरे... असे अनेक मुद्दे होते, ज्यांवर घणाघाती चर्चा होत असत.

युनिव्हर्सिटी म्हणजे केवळ मेस, होस्टेल, लायब्ररी, रीडिंग रूम, विद्यार्थी- शिक्षक, प्रशासन नव्हे; पण या सर्व गोष्टींचा युनिव्हर्सिटी कशी आहे यांवर खूप प्रभाव पडतो. सार्क नवी युनिव्हर्सिटी आहे, यामुळे अनेक बाबतींत टीका करताना थोडीशी सहानुभूती बाळगली जायला हवी, असे आम्हाला वाटत असे. पण बाहेरच्या देशांतील मुले, दिल्लीत असणारी ही युनिव्हर्सिटी आंतरराष्ट्रीय दर्जाचीच असणार असे गृहीत धरून येत असत. त्यामुळे टीका करावी, असे अनेक मुद्दे त्यांना समोर दिसत असत.

मला वाटते, इतर युनिव्हर्सिटींसमोर असतात तसे प्रश्न सार्क युनिव्हर्सिटीसमोर आहेतच, पण स्वतःची अशी काही खास आव्हाने आहेत. उदा. शैक्षणिक गुणवत्ता आणि राष्ट्रीय प्रतिनिधित्व यांचा मेळ घालणे, हे सर्वांत मोठे आव्हान आहे. कारण सर्व सार्क देशांतून उत्तम टॅलेंट (शिक्षक आणि विद्यार्थी) मिळवणे आणि ते टिकवणे हे काम वाटते तेवढे सोपे नाही. सध्या अशी परिस्थिती आहे की, भारतीय आणि इतर देशांतल्या विद्यार्थ्यांचे प्रवेशपरीक्षेतले मार्क्स यांत खूप मोठा फरक आहे. तो फरक कमी करत जाण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, सार्क युनिव्हर्सिटीतील सर्व कोर्सेसमध्ये खास ‘दक्षिण आशियाई’ म्हणता येईल असा  दृष्टिकोन घेऊन शिकवणे शक्य आहे का? प्रत्येकच ठिकाणी दक्षिण आशिया आणता येणे शक्य नाही आणि योग्यही नाही. परंतु सार्क युनिव्हर्सिटी आहे म्हटल्यावर प्रत्येक ठिकाणी दक्षिण आशियाचे प्रतिबिंब पडायला हवे, असा आग्रह धरताना अनेक महत्त्वाच्या घटकांना केवळ ते दक्षिण आशियाशी संबंधित नाहीत, म्हणून बाजूस सारणे योग्य नाही. तसेच प्रत्येक वेळी ओढून-ताणून दक्षिण आशिया आणण्याचीसुद्धा गरज नाही.

तिसरा मुद्दा म्हणजे, कोणत्या कोर्सेसना कोणाला प्रवेश द्यायचा याबाबत काही बंधने घालण्याची किंवा प्रवेशपरीक्षेमध्ये काही सुधारणा करण्याची गरज आहे. उदा. मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेली मुले सोशिऑलॉजी शिकायला जातात आणि ‘आम्हाला विषय समजत नाही’ अशी ओरड करतात. त्यालाच जोडून आणखी एक छोटा मुद्दा असा की, सार्क देशांतल्या विद्यापीठांतील अभ्यासक्रमांमध्ये आणि सार्क युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमात सुसूत्रता आणण्याची गरज आहे. कारण त्या-त्या देशात शिकलेल्यांना सार्क युनिव्हर्सिटीचा मास्टर्सचा अभ्यासक्रम हेवी वाटायला लागतो. सुसूत्रतेचा हाच मुद्दा थोडा पुढे ओढून ॲकॅडमिक कॅलेंडरबाबतही लागू करता येईल. उदा. नेपाळमध्ये मुलांचे रिझल्ट्‌स येतात ऑक्टोबरमध्ये आणि तोपर्यंत सार्क युनिव्हर्सिटीच्या पहिल्या सेमिस्टरचा अर्धा भाग संपलेला असतो. असे अनेक मुद्दे आहेत, पण त्याविषयी पुढे कधी तरी…

२ - साधनाच्या युवा दिवाळी अंकाचे काम शेवटच्या टप्प्यात चालू असताना (ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात) संपादकांनी मला सांगितले की, ‘‘आपल्याला ‘सार्क युनिव्हर्सिटी’वर युवकदिनाच्या निमित्ताने (१२ जानेवारी २०१५) विशेषांक काढायचा आहे.’’ त्या कल्पनेचे मी माझ्या नेहमीच्या उत्साहात  स्वागतच केले होते. परंतु जेव्हा मी त्या अंकाचा अतिथी संपादक म्हणून काम करावे असे मला सरांनी सांगितले आणि साधनाच्या मुख्य दिवाळी अंकातील संपादकीयातून तसे जाहीर केले, तेव्हा मात्र मी थोडा सावध झालो. माझ्या स्वागताचा असा परिणाम होईल हे आधी माहीत असते, तर कदाचित मी त्या कल्पनेचे इतक्या उत्साहाने स्वागतच केले नसते! त्यानंतर ‘आता मात्र माघार घेणे नाही’, असे म्हणून मी कामाला लागलो.

पहिलाच महत्त्वाचा मुद्दा हा होता की, लेखकांना काय लिहायला सांगायचे? त्यासाठी ड्राफ्ट केलेले पत्र वाचून संपादक खूश झाले आणि माझा जीव भांड्यात पडला. ते पत्र असे,

Dear All,
Thanks for accepting our invitation to write in Weekly Sadhana's special issue, about your experiences in South Asian University (SAU). Purpose of this e-mail is to highlight certain broad points around which you can structure your write-ups.
 1. Word Limit- About 1300-1500 words.
2. Date for submission- Let's say around 15th November, 2014.
3. In this special issue, we are going to publish write ups from SAU students drawn from eight countries. Surangika (Srilanka), Damber (Nepal), Pallavi (Bhutan), Fatima (Pakistan), Thattu (Maldives), Rubaiyat (Bangladesh), Iram (India) and Omer (Afghanistan) have agreed to share their experiences.
4. Basic Information about Weekly Sadhana- Weekly Sadhana was founded in 1948 and since then it has been at the forefront of Marathi intellectual circles for the last 60 years. Published articles in Sadhana are mainly focused on social-political-cultural-educational and literary aspects. It has a readership of about 40,000 spread across all regions of Maharashtra. These readers are from the class which is generally categorized as 'opinion maker'. Readers are conscious about what is happening around and they take active interest in it. In this project, our basic idea is to make them aware about a novel educational experience, hitherto unknown, in India happening through SAU.
5. About write-ups- Overall focus should be 'Your life in SAU'. Write-ups should give readers a brief idea about your background (family-education-work experience), what you expected when you joined SAU, how was hostel life, life in Delhi, interesting things about India-places you visited, overall adjustments to make (language- food) etc. Mention interesting experiences, how SAU has changed you, what you have gained by staying here. Provide attention to (even small but) general details which we feel unimportant so not to mention like say sharing rooms with people from different countries, their peculiar habits, your perception about that country,etc. How do you view future of SAU, what are its prospects, what needs to change (I know, we all want to give a very long answer to this, but highlight very important points only).
6. Write up should not be too technical as target audience is not expert about specific subjects. If necessary, make 2-3 drafts but try to write simple yet as interesting as possible.
7. You have a month to ponder over memories of SAU. I think, after staying here in SAU for so long, we would be able to think objectively about our stay here.
8. Don't bother about political correctness. Write as frankly as possible.
9. Every single sentence/ observation will be new and novel for our readers back home. So, choose appropriately what you want to write yet don't get yourself pressurized.
10. In case write to me for clarifications.
Best,
Sankalp Gurjar     

त्यापुढचा मुद्दा होता लेखकांची निवड करणे. त्याबाबतचे पूर्ण स्वातंत्र्य मला दिलेले होते. अर्थात, या स्वातंत्र्याबरोबर जबाबदारी येते, हे वेगळे सांगण्याची गरज नव्हती. मी कोणाला निवडणार त्यावर अंकाचे यशापयश ठरणार, हे उघडच होते. माझे सार्क देशांतले अनेक मित्र होते, परंतु इथे मुद्दा कंटेंटचा होता. त्यामुळे चांगला कंटेंट मिळण्याची खात्री असेल त्यांनाच लिहायला सांगायचे, हे उघडच होते. परंतु तसे करताना, मला तो अंक माझ्या मित्र परिवाराचा किंवा सार्क युनिव्हर्सिटीतील IR डिपार्टमेंटचा होऊ द्यायचा नव्हता. तरीदेखील अंकात मी सोडून ओमर, पल्लवी, डंबर आणि सुरंगिका हे चौघे IR चे आहेत. इरम, रुबाईयत आणि थाटू हे तिघे लॉचे आहेत; तर फातिमा सोशिओची आहे. या आठपैकी डंबर, रुबाईयत आणि सुरंगिका हे तिघे माझ्या मित्र-परिवारातील म्हणता येतील. ओमर, इरम आणि पल्लवीशी कामानिमित्ताने बोलणे होत असे. मात्र थाटू आणि फातिमाशी मी या अंकाच्या निमित्ताने पहिल्यांदाच बोललो.

लेखक निवडताना आणखी एक प्रयत्न असा होता की, युनिव्हर्सिटीच्या पहिल्या चार वर्षांचे एक चित्र समोर यावे. त्या दृष्टीने पाहता, ओमर आमच्या आधीच्या बॅचचा आहे आणि थाटू व फातिमा या दोघीही आम्हाला एक बॅच ज्युनिअर (२०१३-२०१५) आहेत. बाकीचे पाच जण २०१२-१४ या काळात युनिव्हर्सिटीमध्ये होते. या सर्व लेखकांपैकी ओमर आणि इरम त्यांच्या मास्टर्सनंतर (माझ्यासारखेच!) सार्क युनिव्हर्सिटीमध्येच पीएच.डी. करीत आहेत. ते दोघेही युनिव्हर्सिटीला अभिमान वाटावा असे प्रामाणिक आणि अभ्यासू विद्यार्थी आहेत. रुबाईयत तर युनिव्हर्सिटीचा पोस्टरबॉयच होता. बाकीचे सर्व लेखकही असेच अभ्यासू आणि सिन्सिअर आहेत.

पल्लवी, फातिमा आणि थाटू या तिघी वगळता इतर पाच जणांना मी १५ ऑक्टोबरलाच मेल लिहिला होता आणि १५ नोव्हेंबरची डेडलाईन दिली होती. पण प्रत्येक जण आपल्या कामात बिझी असावा, कारण १५ नोव्हेंबरला माझ्या हातात फक्त सुरंगिकाचा लेख होता. २२ नोव्हेंबरला डंबरचा लेख आला. ओमरचा लेखही आला होता, पण त्याला मी त्याचे पुनर्लेखन करायला सांगितले होते. त्यामुळे १० डिसेंबरपर्यंत हातात दोनच लेख होते. त्यानंतरच्या दोन दिवसांत ओमर आणि इरमचे लेख आले. थाटू आणि रुबाईयतचे लेख तर १८ डिसेंबरला हातात आले. थाटूची आई बंगळुरूमधील हॉस्पिटलमध्ये असताना तिने हा लेख लिहिला आहे. आणि रुबाईयातने अमेरिकेत परीक्षा चालू असताना वेळात वेळ काढून त्याचा लेख दिला आहे. पल्लवीला काही निमित्ताने थायलंडला जायचे असल्याने तिची फोनवर मुलाखत रेकॉर्ड करून त्याचे शब्दांकन आणि अनुवाद केला आहे.

इंग्रजी आवृत्तीमध्ये मात्र ती स्वतः लेख लिहिणार आहे. फातिमाचा लेख सर्वांत शेवटी आला आहे. ती सध्या तिच्या खेडेगावात सुट्टीसाठी गेलेली असल्याने आणि तिथे इंटरनेटचा ॲक्सेस नसल्याने अगदी शेवटच्या क्षणी तिचा लेख पोचला. इथे मला आवर्जून सांगितले पाहिजे की, फातिमाच्या लेखातील सुरुवातीचा भाग वाचून मी अक्षरश: हेलावलो. ...आणि आता अंक तर वाचकांच्या समोर आहे. जाता-जाता एवढेच सांगावेसे वाटते की, १२ जानेवारी २०१० चा साधनाचा अंक युवा-अभिव्यक्ती विशेषांक म्हणून प्रसिद्ध झाला होता. त्या अंकात मी ‘२ ऑक्टोबर’ या शीर्षकाचा लेख लिहिला होता. त्याच अंकापासून साधनेत खऱ्या अर्थाने माझा प्रवास सुरू झाला आणि आता या युवा अभिव्यक्ती अंकाचा अतिथी संपादक झालो आहे. त्यामुळे पाच वर्षांत एक वर्तुळ पूर्ण झाले आहे, असे म्हणायला हरकत नाही!

Tags: सार्क विद्यापीठ संकल्प गुर्जर एक वर्तुळ पूर्ण झाले अतिथी संपादक ek vartul purna zale atithi sampadak Guest editor saarc university Sankalpa gurjar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

संकल्प गुर्जर
Sankalp.gurjar@gmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके