डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आदर्श सर्वोदयी सेवक : जयवंत मठकर

आजच्या झगझगीत चंगळवादी समाजात पणतीच्या तेजाने, पण अखंडपणे प्रकाश देणारे मठकरांसारखे कार्यकर्ते असणे हेच मोठे आश्वासक असते.

10 मे या यदुनाथजींच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांच्या नावाने दिला जाणरा प्रथम पुरस्कार श्री. जयवंत मठकर यांना मिळत आहे. ही निवड अगदी यथार्थ मानावयास हवी. अतिशय निरलसपणे निरंतर कार्य कसे करावे याचा आदर्श वस्तुपाठ श्री. जयवंत मठकर यांच्या रूपाने जणू उभा आहे. सुरुवातीच्या काळात मठकर यांनी कोकणात भूदान यज्ञ आंदोलनाचे व दक्षिण महाराष्ट्रात खादी ग्रामोद्योग निर्मिती प्रचार व प्रसाराचे कार्य केले. आता तर मठकर यांच्या कामाचा आलेख खूपच विस्तारला आहे. सर्वोदय, खादी ग्रामोद्योग, आचार्य कुल, गांधी लोकसेवा संघ, साने गुरुजी कथामाला, गीताई प्रचार, पंचायती राज्य प्रशिक्षण, नशाबंदी मंडळ, गांधीमार्ग मीमांसा मासिक, गोपुरी आश्रम (कणकवली), निसर्गोपचार आश्रम (सासवड), शांतीबन (पनवेल), चर्मालय (देवरूख) या व अशा अनेक संघटना-संस्थांशी त्यांचे अत्यंत घनिष्ट व कार्यतत्पर संबंध आहेत. या सर्व कामामध्ये आकंठ बुडून जाणे हा मठकरांचा स्वभावधर्म आहे. परंतु तरीही शांत, सौम्य, मृदू राहण्याची किमया मठकरच करू जाणोत.

सौजन्य, ऋजुता, पारदर्शी प्रामाणिकपणा, अखंड सेवावृत्ती यांमुळे या सर्व धावपळीतही ते अनेकांचे जिवाभावाचे स्नेही होतात. त्यांच्या साध्या अकृत्रिम बोलण्या-वागण्याचा ठसा कोणावरही लगेच उमटतो. आजच्या झगझगीत चंगळवादी समाजात पणतीच्या तेजाने, पण अखंडपणे प्रकाश देणारे मठकरांसारखे कार्यकर्ते असणे हेच मोठे आश्वासक असते. यदुनाथजींच्या नावाने त्यांना मिळणारा पुरस्कार हा समसमा संयोग मानावयास हवा. जयवंत मठकरांच्या भावी कार्यकर्तृत्वास हार्दिक शुभेच्छा!

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके