डिजिटल अर्काईव्ह

.

साने गुरुजींच्या सहृदयतेचे स्मरण

साने गुरुजींनी तुरुंगांतून लिहिलेली अनेक पत्रे उपलब्ध आहेत. त्यापैकी काही पत्रांत राजबंद्यांच्या परिवाराची विवंचना त्यांना लागल्याचे दिसून येते.

आपली हस्तलिखिते प्रकाशनार्थ बाहेर पाठवून, त्यांतून जे पैसे येतील ते कोणाच्या घरी कसे पोचते करावेत, त्याबद्दल त्यांत सूचना दिलेल्या आहेत.

राजबंद्यांच्या परिवाराची जबाबदारी समाजाने पत्करली पाहिजे, या त्यांच्या मनातील भावनेचेच ते द्योतक होय.

राजबंद्यांपैकी विनाचौकशी बेमुदत ज्यांना सध्या सरकारने डांबले आहे त्यांच्या परिवारांची जबाबदारी खरे तर सरकारनेच घ्यायला पाहिजे. विनोबांचेही तसे मत आहे.

देशातील आठ-दहा प्रदेशांची सरकारे या दृष्टीने थोडे फार करीतही आहेत. पण महाराष्ट्र सरकारने राजबंद्यांच्या परिवाराची एवढी कणव दाखवली नाही. राजबंद्यांबरोबर त्यांच्या परिवाराला सजा होत आहे याचे भान अद्याप महाराष्ट्र सरकारला झालेले दिसत नाही.

पण सरकारला कणव नाही म्हणून इतरांनी ती दाखवू नये असे थोडेच आहे? आपण सर्वांनी आपापल्या परी त्यांच्या प्रासंगिक आणि आवश्यक गरजांच्या वेळी तरी आपला सहकार्याचा हात पुढे केलाच पाहिजे.
साने गुरुजींच्या पुण्यस्मरणाचा तो आज यथोचित मार्ग ठरेल.

यासाठी साने गुरुजींच्या पुण्यतिथीपासून म्हणजे 11 जूनपासून पंधरवडा पाळावा आणि 26 जूनपर्यंत जमेल तो राजबंदी परिवार सहाय्यता ‘साधना ट्रस्ट’ या नावे, 431, शनिवार पेठ, पुणे 411030 या पत्त्यावर पाठवावी.

राजबंदी परिवार सहाय्यता निधीची 1 व 5 रुपयांची कुपने छापली आहेत. 10 रुपये देऊन 1 रुपयांच्या 10 कुपनांचे आणि 25 रुपये देऊन 5 रुपयांच्या 5 कुपनांचे अशी पुस्तके पैसे भरून नेता येतील व त्यावर निधी जमा करता येईल.

आपल्याही सहृदयतेला हे आवाहन आहे.

संपर्क : सेक्रेटरी, साधना ट्रस्ट, 431 शनिवार पेठ, पुणे 411 030

(11 जून ते 26 जून राजबंदी परिवार सहायता पंधरवडा पाळा.)

----------

विनोबांचा उपवासाचा संकल्प

गोहत्याबंदीचा निश्चय सरकारने 11 सप्टेंबर 1976 पर्यंत जाहीर न केल्यास आमरण उपवास करण्याचा संकल्प विनोबांनी जाहीर केला आहे. विनोबांचा 11 सप्टेंबर 1976 हा एक्याऐंशिवा वाढदिवस आहे.

त्यांच्या या वयातील या संकल्पाने सर्वांना आश्चर्य, चिंता आणि खेद वाटल्याखेरीज राहणार नाही.

या बाबतची प्रत्येकाची कारणे अर्थातच वेगवेगळी असणार आणि ते स्वाभाविकही आहे. 

विनोबांसारख्यांना जीवन दुःसह वाटावे अशी अनेक कारणे आज देशात आहेत.

पण उपवास हा अंतरात्म्याचा आक्रोश असल्याने त्याच्या कारणांबाबत चर्चा करून फायदा नसतो.

या आपल्या संकल्पासंबंधी विनोबांनी एक निवेदन केले, पण चीफ सेन्सॉरच्या हुकमावरून जनतेपासून ही वार्ता दडवून ठेवणे दैनिक वृत्तपत्रांना भाग पडले आहे!

विनोबांसारख्यांशी सरकारी तपासणी अधिकाऱ्यांचे एवढे उद्धट वर्तन होते, तिथे इतरांबाबत काय होत असेल त्याची कल्पनाच केलेली बरी.
आणीबाणीची ही अगाध लीला आहे की, देशातील एका ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सत्याग्रहीचे मनोगतदेखील त्याला इतरांपर्यंत पोचवण्याबाबत अडथळे निर्माण केले जातात!

विनोबांच्या आमरण उपवासाच्या निश्चयाबद्दल कोणाचे काहीही मत असो, पण त्याची वार्तादेखील खुलेपणाने देशाला समजू दिली जात नाही, याबद्दल निषेधाचे सूरच सर्वांच्या मनात निनादतील.

सप्तस्वातंत्र्यांचा एकदा अपहार झाला की त्यातून विनोबांसारख्यांचीदेखील सुटका होऊ शकत नाही हे यावरून स्पष्ट दिसते.

विनोबांचा हा आमरण उपवास एका अर्थी सरकारविरोधीच आहे, कारण गोहत्याबंदीचा निश्चय सरकारनेच जाहीर करावा, अशी त्यांची अपेक्षा आहे.

चित्तदेखील संघर्षमुक्त रहावे यासाठी साधना करणाऱ्यालाही आमरण उपवासाच्या संकल्पाशिवाय राहवत नाही, ही गोष्ट भारतीय सद्य:स्थितीवरचे एक विदारक भाष्य आहे.

विनोबांचा आमरण उपवास खरोखरच 11 सप्टेंबर 1976 रोजी सुरू झाला आणि सरकारचे असेच निर्बंध वर्तांवर राहिले तर सरकारचे निर्बंध मोडून ही बातमी लोकांपर्यंत पोचवण्याची व्यवस्था सहकारत्वाद्यांनाही करावीच लागेल.

अकरा सप्टेंबरकडे अनेकांचे लक्ष लागून राहील यात शंका नाही.

----------

प्रजावाणीची पंधरा वर्षे

पंधरा वर्षांपूर्वी नांदेडच्या तरुण समाजवादी मित्रांनी एक धाडसाचे पाऊल टाकले. प्रजावाणी हे एक लढाऊ नियतकालिक त्यांनी सुरु केले.

खिशात पुरेशा दमड्या नसताना असे साहस करणे फक्त तरुणाईलाच शक्य असते. तर हे नियतकालिक सुरू झाले आणि कार्यकर्त्यांच्या तळमळीने बाळसेदार बनत गेले. 

नांदेड आणि परभणी या दोन ठिकाणांहून एकाच वेळी प्रसिद्ध होण्याइतकी मजल त्याने मारली. व्यवहारकुशलता आणि लेखणीचे सामर्थ्य या जोरावर हा टप्पा गाठता आला. 

श्री सुधाकर डोयीफोडे आणि रामेश्वर बियाणी यांनी आपल्या मित्र व सहकाऱ्यांच्या मदतीने हे स्वप्न साकार केले.
सुधाकर डोयीफोडे यांच्या लेखनगुणांचा गौरव पत्रकार संघटनेने केला यात सगळे काही आले.

प्रजावाणीची पंधराव्या वर्षाची वाटचाल, इतर सर्व वृत्तपत्रांप्रमाणेच खडतर झाली तर नवल नाही. परिस्थितिवश त्यांना लेखणीचे सर्व गुण प्रकट करणे अवघड झाले आहे. पण अनुकूल काळाची वाट पहात सध्या पडते घेणे भाग आहे.

प्रजावाणीच्या पंधराव्या वाढदिवशी सध्याच्या अगतिक अवस्थेचा प्रत्यय प्रजावाणीच्या सर्वांना आल्याशिवाय राहिला नाही.

मुख्यमंत्री मुख्य पाहुणे आणि प्रसिद्धी राज्यमंत्री अध्यक्ष दोघांनी वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्याची महती गाइली आणि कोणत्याही शक्तीपुढे वृत्तपत्रांनी मान तुकवू नये असा महान संदेश ‘प्रजावाणी’कारांना आणि त्या निमित्ताने इतर पत्रकारांनाही दिला.

प्रा. कुरुंदकर नांदेडचे. ते यावेळी हजर राहिले आणि ‘’विविध विचारांची वृत्तपत्रे विकसित झाली पाहिजेत आणि ती एकमेकांच्या शेजारी निर्भयपणे नांदू शकली पाहिजेत. मतभिन्नतेचाही आदर झाला पाहिजे.’’ असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी