डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

.

अभिनंदन! अभिनंदन!

श्री. सुनील देशमुख यांनी मराठी साहित्य, लोकजीवन आणि महाराष्ट्रातील लक्षणीय विचारप्रवर्तन या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना आणि संस्थांना भरघोस पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वित केली आहे, हे सर्वश्रुत आहे. या वर्षीच्या पुरस्कार विजेत्यांत आमचे परममित्र कविवर्य विंदा करंदीकर यांना श्रेष्ठ साहित्यसेवेसाठी योजिलेला सव्वादोन लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात आला आहे. सर्व साधना परिवार त्यांचे सप्रेम अभिनंदन करीत आहे. सर्वश्री वसंत पळशीकर, रवि भागवत, लीला पाटील, विजय नारकर प्रभृती मित्रांचाही फाउंडेशनने गौरव केला आहे, याचा आम्हांला निरतिशय आनंद वाटतो.

सर्व प्राप्तपुरस्कार सुहृदांचे अभिनंदन. या पुरस्कारांबरोबरच महाराष्ट्र फाउंडेशनने पुण्यातील कागद-काच-पत्रा कष्टकरी संघटनेला तीन लाख रुपयांचा पुरस्कार दिला आहे. फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचे त्याबद्दल खास अभिनंदन केले पाहिजे. कष्टकरी संघटनेने श्री. मोहन ननावरे यांच्या नेतृत्वाखाली आणि डॉ. बाबा आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली आपले कार्य विलक्षण जिद्दीने चालवले आहे. त्यांच्या अखंड परिश्रमांना या पुरस्काराने खूप प्रोत्साहन मिळेल. आपण नेहमी अंत्योदयाचा निर्धार व्यक्त करतो. महाराष्ट्र फाउंडेशनने या अंत्योदयी कार्यक्रमाला एवढी प्रोत्साहनकारक मान्यता दिली या घटनेची प्रशंसा करावी तेवढी थोडी आहे.

----------

एकेक पान गळावया....

स्वातंत्र्यसैनिक आणि थोर समाजसेवक बाबूमिया बँडवाले

श्रीगोंदा (जि. अहमदनगर) येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारक बाबूमिया बँडवाले यांचे 93 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. बाबूमिया यांनी 1930 च्या सत्याग्रह आंदोलनात सहा महिने आणि 1942  च्या चलेजाव आंदोलनात पावणेदोन वर्षे कारावास सोसला. स्वातंत्र्य चळवळीनंतर राजकारणापासून दूर होऊन ते सामाजिक कार्य करीत राहिले. हिंदू आणि मुस्लिम समाजांत एकोपा राहाण्यासाठी ते सतत झटले. हमीद दलवाई यांनी मुस्लिम सत्यशोधक समाज स्थापन केल्यानंतर ते त्या संस्थेचे काम धडाडीने करू लागले. त्यांना धमक्या देण्यात आल्या, त्यांच्यावर हल्लेही झाले, परंतु ते डगमगले नाहीत. मुस्लिम महिलांना प्रतिष्ठा मिळाली पाहिजे यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले.

हमीद दलवाई आणि प्रा. अ. भि. शहा यांचे ते निकटचे मित्र होते. बाबूमिया मुस्लिम सत्यशोधक समाजाचे काही वर्षे अध्यक्षही होते. ते उत्तम क्लॅरिओनेट वाजवीत. तरुणपणी त्यांचा बँड होता आणि तेव्हापासून त्यांचे नाव बँडवाले पडले. ते तरुणपणी नाटकातही कामे करीत असत. स्वातंत्र्यचळवळीत असताना रावसाहेब पटवर्धन यांच्याबरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. बाबूमिया बँडवाले आनंदी आणि प्रेमळ स्वभावाचे होते. त्यांच्या निधनामुळे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व थोर समाजसेवक हरपला आहे. बाबुमिया बँडवाले यांच्या त्यागी आणि निर्भय जीवनास विनम्र प्रणाम.

----------

प्रभाकर सिद्ध

प्रभाकर सिद्ध यांचे कॅन्सरने गेल्या आठवडघात 68 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी राष्ट्रसेवादलात काम केले. साधनेमध्ये त्यांनी वीस वर्षे काम केले. त्यांचा नाट्यक्षेत्राशीही संबंध होता. सिद्ध यांच्या कुटुंबीय मंडळींच्या दुःखात साधना सहभागी आहे.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके