डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

.

साधना विश्वस्तांचे निवेदन

आज 15 ऑगस्ट 1997 रोजी साधना साप्ताहिक 50 व्या वर्षात पदार्पण करीत आहे, याचा आम्हांला आनंद होत आहे. वाचकांनाही तो होत असेल याची आम्हांस खात्री आहे. साधनाचे एक संपादक प्रा. ग. प्र. प्रधान गेली तीन वर्षे आपणास संपादकाच्या जबाबदारीतून मुक्त करावे अशी विनंती विश्वस्तांना करीत होते. पण साधनाची पन्नास वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यांनी संपादकपद सोडू नये आणि आहे ती स्थिती चालू ठेवण्यास संमती द्यावी अशी विनंती विश्वस्तांनी त्यांना केली होती. पण त्याबाबत त्यांचे म्हणणे असे की येत्या 26 ऑगस्टला त्यांच्या वयाची 75 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे ते सर्वच जबाबदारीच्या पदांतून मुक्त होत आहेत. त्यांची भावना व आग्रह यांचा आदर करून विश्वस्त मंडळाने अत्यंत नाखुषीने संपादकपदाचा त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. प्रा. प्रधान यांनी गेली कित्येक वर्षे साधनाचे लेखक, संपादक आणि विश्वस्त या नात्याने ट्रस्टची मोलाची सेवा केली आहे. त्याबद्दल विश्वस्त त्यांचे ऋणी आहेत. 

आपण संपादक नसलो तरी साधनाला आपले पूर्ण सहकार्य राहील असे आश्वासन त्यांनी दिले आहे. साधनाच्या विश्वस्त सचिव श्रीमती कुमुद करकरे यांच्या वैयक्तिक अडचणी असल्याने त्यांनी आपणास सचिवपदातून मोकळे करावे अशी विनंती विश्वस्तांकडे केली होती. त्यांची अडचण लक्षात घेऊन विश्वस्तांनी त्यांची विनंती मान्य केली आहे. त्यांनी अजूनपर्यंत दिलेल्या सहकार्याबद्दल विश्वस्त त्यांचे कृतज्ञ आहेत. यापुढे काही काल विश्वस्त सचिव म्हणून प्रा. ग. प्र. प्रधान यांनी जबाबदारी स्वीकारावी ही विश्वस्तांची विनंती प्रा. प्रधान यांनी मान्य केली आहे. प्रा. बापट यांच्या वयाला 75 वर्षे पूर्ण झाल्याने त्यांनीही संपादकीय जबाबदारीतून आपणास मोकळे केले जावे अशी इच्छा व्यक्त केली असली तरी साधनाची 50 वर्षे पूर्ण होईपर्यंत विश्वस्तांच्या विनंतीनुसार ते संपादकीय जबाबदारी सांभाळतील. 

आजच्या अंकापासून प्रा. वसंत बापट, कुमुद करकरे आणि सदानंद वर्दे यांचे संपादक मंडळ साधना साप्ताहिकाची धुरा वाहील, जबाबदारी सांभाळील, ही संक्रमण काळातील व्यवस्था असेल. पंधरा ऑगस्ट 1998 ला साधना साप्ताहिकारची 50 वर्षे पूर्ण होतील तेव्हा किंवा शक्य झाल्यास त्या अगोदरही साधना साप्ताहिकाची जबाबदारी पेलू शकतील अशा नव्या दमाच्या व्यक्तीचा वा व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची नियुक्ती संपादकपदी करावी असा निर्णय विश्वस्त मंडळाने शनिवार दि. 26 जुलै रोजी पुणे येथे झालेल्या बैठकीत घेतला आहे. साने गुरुजींनी 15 ऑगस्ट 1948  ला साधना साप्ताहिक सुरू केले. त्यांचा वसा चालू ठेवण्याचा साधना विश्वस्तांचा निर्धार आहे. साधनाचे वाचक, वर्गणीदार आणि हितचिंतक यांचे विश्वस्त मंडळाला पूर्वीप्रमाणेच सहकार्य मिळत राहील अशी विश्वस्ताना आशा आहे.

सदानंद वर्दे

कार्यकारी विश्वस्त (सर्व विश्वस्तांच्या वतीने)

----------

निरोप

प्रिय वाचकहो,

एका तपाहून अधिक काळ आपल्याबरोबर संवाद आणि सहचिंतन करण्याचे भाग्य मला लाभले. आपण मला माझ्या अपूर्णतेसह स्वीकारले याबद्दल मी आपले मनःपूर्वक आभार मानतो. 'साधने’ चे विश्वस्त, संपादक मंडळातील माझे सहकारी आणि साधना कार्यालयातील कर्मचारी यांच्या सहकार्यामुळेच ही जबाबदारी माझ्या कुवतीप्रमाणे पार पाडण्याचा मी प्रयत्न केला. मी त्या सर्वांचा ऋणी आहे. वयाची 75  वर्षे पूर्ण झाल्यानंतर सार्वजनिक जीवनातील जबाबदाऱ्या कमी करण्यासाठी मी अधिकार पदे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, 'साधने'च्या संपादकपदावरून मला मुक्त करावे अशी विनंती मी विश्वस्तांना केली आणि त्यांनी ती मान्य केली. मी माझ्या मनातील एक खंत व्यक्त करू इच्छितो. 

महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील क्रियाशील कार्यकर्त्याचे 'साधना' हे व्यासपीठ व्हावे, पुरोगामी विचारांचे आदानप्रदान तरुण कार्यकर्त्यांनी 'साधने' तून करावे अशी माझी इच्छा होती. परंतु माझे प्रयत्न कमी पडले. म्हणून गेली तीन-चार वर्षे माझ्या ऐवजी तरुण, तडफदार संपादकावर 'साधने’ ची जबाबदारी टाकावी अशी मी विश्वस्तांना विनंती करीत राहिलो. प्रयत्न करूनही असा सहकारी आम्ही मिळवू शकलो नाही. ही माझ्या मनातील खंत आहे. ही उणीव दूर व्हावी अशी आमची सर्वांचीच इच्छा आहे. संपादक पद सोडले असले तरी 'साधने' चे विश्वस्त व नवे संपादक मंडळ जे काम सांगेल ते मी करणार आहे. कारण 'साने गुरुजींची साधना' हे माझे श्रद्धास्थान आहे 

आपला स्नेहांकित 

ग. प्र. प्रधान

Tags: ग. प्र. प्रधान संपादक साने गुरुजी साने गुरुजी   प्रा. ग. प्र. प्रधान कुमुद करकरे प्रा. वसंत बापट सदानंद वर्दे Sane Guruji Prof. G.P. Pradhan Kumud Karakre Prof. Vasant Bapat Sadanand Varde weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके