डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

श्री. मोहन धारिया यांनी गेली अनेक वर्षे साधनाचे विश्वस्त म्हणून काम करताना साधनाच्या पुनर्रचनेत फार मोलाची कामगिरी केली आहे.

भारतीय राजकारणात दीर्घ काल महत्त्वाची भूमिका घेऊन प्रभावीपणे कार्य करणारे राजकीय नेते, भारताच्या नियोजन मंडळाचे माजी उपाध्यक्ष, 'वनराई' या विधायक चळवळीचे संस्थापक आणि नेते, महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेचे अध्यक्ष आणि ‘साधना’चे विश्वस्त श्री. मोहन धारिया यांनी रविवार दि. 14 फेब्रुवारीस 75 व्या वर्षात पदार्पण केले. विद्यार्थिदशेतच स्वातंत्र्यचळवळीत पडलेल्या मोहन धारिया यांनी जंजिरा संस्थान मुक्तिसंग्रामाचे एक नेते म्हणून साहसपूर्ण कामगिरी केली.

विद्यार्थिचळवळीत आणि समाजवादी पक्षात त्यांनी धडाडीने काम केले. 1961 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण, संस्थानिकांचे तनखे बंद करणे आदी प्रश्नांवर पुरोगामी भूमिका मांडली आणि ती काँग्रेसला मान्य करावी लागली. केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री असताना त्या वेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना विरोध करून त्यांनी राजीनामा दिला आणि आणीबाणीत दीड वर्षे कारावास भोगला. जनता पक्षाच्या राजवटीत ते केंद्रामध्ये वाणिज्यमंत्री होते.

चंद्रशेखर हे पंतप्रधान असताना ते नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष होते. सत्तेच्या राजकारणापासून दूर झाल्यावर 'वनराई' ही विधायक चळवळ त्यांनी महाराष्ट्रात सुरू केली. आता या त्यांच्या विधायक कार्याचा मोठा विस्तार झाला असून ग्रामीण भागात 'वनराई'स उत्स्फूर्त व व्यापक प्रतिसाद मिळत आहे. पडीक जमीन लागवडीखाली आणण्याच्या त्यांच्या सूचना आणि योजना केंद्र शासनाने स्वीकारल्या आहेत. अनेक सार्वजनिक संस्थांना मार्गदर्शन आणि साहाय्य करणाऱ्या श्री. मोहन धारिया यांनी गेली अनेक वर्षे साधनाचे विश्वस्त म्हणून काम करताना साधनाच्या पुनर्रचनेत फार मोलाची कामगिरी केली आहे. श्री. मोहन धारिया यांना प्रदीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य लाभो आणि तरुण कार्यकर्त्यांना त्यांचा आधार अक्षय मिळो हीच शुभेच्छा.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके