डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

तुझी नणंद भवानी 
तुझी गाये रडगाणी
उद्या तिच्याबी नशिबा 
बोल लाविलच कोणी

1 :

सर घातला गळ्यात 
त्याचे बनलं सासर 
नथ नाकातली झाली 
हिर्व्या पेंढीचं गाजर

पायातल्या जोडव्यांना 
म्हणं बाईचा रुबाब 
कैद्यावाणी ठोकलेत 
दोन पायी दोन खांब

जित्राबाच्या गळी घंटा 
चाहूलीस बांधतात 
तसे तुझे दोन्ही हात 
कांकणांत कोंबतात

मनी-मंगळाचे सुत्र 
तुझे करीतं वाटोळ 
गळ्यातल्या देव्हाऱ्यात 
जसं सापाचे येटोळं

कानातल्या कुडकांना 
आला अहेवाचा मान 
गुंजभर सोन्यासाठी 
बाई जल्माची गहाण

हाती पायी बेड्या तिच्या 
नाकी कानी टोचतात 
संसाराचे रखवाले 
जीवावर उठतात

2 :

बाईपणाच्या जातीला घोर लागलेला शाप 
दूध तिचंच पिऊन कसे बनतात साप
तिच्या जलमाची नोंद नाही कुठे दप्तरात 
तिच्या मरणाची वर्दी नाही कुण्या कचेरीत
घाण कचरा काढला तिनं जिनगाणीभर 
अवकळ्या जगण्याला तिच्या घामाची झालर
तिला डोहाळे मातीचे खाई निवडून खडे 
देते मातीला कसाया तिच्या आतले रुपडे
तिचं जगणं मरण तिच्या राबणाऱ्या हाती 
कुणी नसतं रडत भाकडल्या गायीसाठी
तिर्न जलम घेऊन काय मोठे केलं पाप 
पाण्यावाणी रुजताना मेली होऊनिया वाफ

3 :

बाई रोजच्या घागरी 
कशापायी झिरपशी 
तुझी आसवं पुसाया 
नाही येळ कुणापाशी

तुझा नवरा-भवरा 
गोडबोल्या घोटंसोल्या 
अशा माणसांनी बाई 
नारी सोलल्या मारल्या

तुझी सासू कशी द्वाड 
करी सूईची मुसळ 
लोणी नाहीच येणार 
तिची मायाच पातळ

तुझा देर भडभुंज्या 
लाहीवाणी तडकीतो 
त्याची वालीबी येईन 
यहिवाट दाखवितो

तुझी नणंद भवानी 
तुझी गाये रडगाणी
उद्या तिच्याबी नशिबा 
बोल लाविलच कोणी

तुझा सासरा कसला 
भात डोळ्यावं बांधितो 
कोल्हे कुईला रोजच्या 
मुंडी मुक्यानं हालितो

जीव नको देऊ बाई 
पाकोळीच्या मौतीवाणी 
तुझा होईल बोभाटा 
तुच होती इद्यावाणी

4 :

पहिलटकरणी गं सोड बाई तुझा हेका 
माझा आनभाव मोठा तुझ्या वयाच्या इतका
येता मला अशी वर्दी पान जेवतं टाकते 
अडलेल्पा बाईसाठी देवा करुणा भाकते
अशी बनले मी दाई करी मोकळीच बाई 
वासराची गाय तशी तिची बनते मी आई
माझ्या हातून तुटतो नाळ बाळाचा गं बाई 
त्याचे आपल्याशी नाते काळ जोडितो गं बाई
वारा कलीचा लागतो येत्या बाहेर बाळाला 
म्यान जगावे येऊन बाळ लागे रडायाला
काढ थोडी कळ काढ येणा सुखाच्या येऊ दे 
तुझ्या बाईपणाचा गं मान जगात होऊ दे

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

संतोष पद्माकर पवार
santoshpawar365@gmail.com

कवी
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके