डिजिटल अर्काईव्ह

अभिव्यक्तीचे महत्त्व व गरज सांगताना माळी लिहितात, ‘शाळेत शिस्तीच्या आणि संस्काराच्या नावाखाली आवाज दडपण्याचे काम आम्ही सातत्याने करतो. शाळेतून अशी विनाआवाजाची पिढी बाहेर पडत असते. आवाज नसलेली पिढी अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकत नाही. म्हणून मुलांना अभिव्यक्त व्हायला शिकवू या. मुलांना त्यांचा आवाज देऊ या.’ ‘लेखनासाठी मशागत अनिवार्य आहे’ हा विचार या पुस्तकाचं केंद्रस्थान आहे.

‘चला लिहू या’ या पुस्तकासाठी नामदेव माळी यांना महाराष्ट्र राज्य शासनाचा ‘कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार’ जाहीर झाला आहे. नामदेव माळींनी सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात गटशिक्षणाधिकारी म्हणून काम करताना विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना लिहितं करणारा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमातच गौतम पाटील हा समडोळीतील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिकणारा विद्यार्थी लिहिता झाला. कवितेच्या गावात मनमुराद रमला.

‘गौतमच्या कविता’ हा त्याचा कवितासंग्रह गेल्यावर्षी सांगलीतील सृजन प्रकाशनाने प्रकाशित केला. आणि या कवितासंग्रहासाठी गौतमला महाराष्ट्र राज्य शासनाचा ‘बालकवी पुरस्कार’ नुकताच जाहीर झाला आहे. हे दोन्ही पुरस्कार नामदेव माळी यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून सुरू असलेल्या मुलांच्या लेखन चळवळीला बळ देणारे आहेत. व्यक्तिमत्त्व विकासात भाषा महत्त्वाची भूमिका बजावत असते. विचार करणं आणि व्यक्त होणं यासाठी भाषा हे एक उत्तम माध्यम आहे. म्हणूनच आपले विचार, अनुभव, भावना, कल्पना इत्यादी परिणामकारक रीतीने व्यक्त करण्यासाठी आवश्यक ते लेखनकौशल्य मुलांना प्राप्त व्हावं, हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट भाषा शिक्षणामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

हे उद्दिष्ट ध्यानात घेऊन आज महाराष्ट्रात अनेक शिक्षक आपापल्या शाळेत यासंबंधी उपक्रम घेत आहेत. मुलांच्या सर्जनशीलतेला रचनात्मक वाव मिळत आहे. उपक्रमशील गटशिक्षणाधिकारी आणि ललित लेखक म्हणून नामदेव माळी यांची ओळख आहे. मुलांनी लिहितं व्हावं म्हणून त्यांचे सतत प्रयत्न चालू आहेत. यातूनच त्यांनी मिरज (जि. सांगली) तालुक्यात गटशिक्षणाधिकारी म्हणून काम करताना शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी लेखनाचा उपक्रम हाती घेतला. त्यासाठी नियोजनपूर्वक कार्यक्रम आखला. आवश्यक अशा लेखन कार्यशाळा घेतल्या. त्यातून मुलांच्या कल्पनांना धुमारे फुटले. मोठ्यांनी चकित व्हावं असं लेखन मुलं करू लागली. कविता, गोष्ट, अनुभव लेखन, प्रसंग लेखन अशा रूपातलं मुलांचे हे लेखन मग पुस्तकरूपात प्रसिद्ध झालं. किलबिल गोष्टी, शाळकरी मुलांच्या कविता ही पुस्तके प्रसिद्ध झाली.

आता या मुलांची स्वतंत्र पुस्तके येत आहेत. सारिका पाटील, समृद्धी शेलार, तेजश्री पाटील, शिवानी चौगुले आणि गौतम पाटील या विद्यार्थ्यांचे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. मुलांना लिहिण्याचा लळा लागलाय. खेड्या-पाड्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांतील ही मुलं आहेत. त्याचं लेखन, त्यातून समोर येणारं त्यांचं भावविश्व आणि अभिव्यक्त होण्याची त्यांची शैली कसदार आहे. ही मुलं एकत्र येत ‘सब कुछ मुलं’ असणारी, विद्यार्थी साहित्य संमेलनं घेत आहेत.

‘चला लिहू या’ या पुस्तकात नामदेव माळी यांनी लेखनप्रक्रिया आणि लेखनरूपांनुसार विवेचन केले आहे. तसेच शिक्षकांचे आपल्या लेखनासंबंधी अनुभव मांडणारे परिशिष्ठ आहे. अभिव्यक्तीचे महत्त्व व गरज सांगताना माळी लिहितात, ‘शाळेत शिस्तीच्या आणि संस्काराच्या नावाखाली आवाज दडपण्याचे काम आम्ही सातत्याने करतो. शाळेतून अशी विनाआवाजाची पिढी बाहेर पडत असते. आवाज नसलेली पिढी अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकत नाही. म्हणून मुलांना अभिव्यक्त व्हायला शिकवू या. मुलांना त्यांचा आवाज देऊ या.’ ‘लेखनासाठी मशागत अनिवार्य आहे’ हा विचार या पुस्तकाचं केंद्रस्थान आहे. लिहिणं म्हणजे काय, त्यासाठी गरजेची पूर्वतयारी कोणती यासंबंधी येथे विवेचन आहे.

वाचनाचं महत्त्व, प्रत्यक्ष लिहावयाच्या अनुभवाची रचना, अनुभवी लेखकांशी संवाद, गटचर्चा इत्यादींसंबंधी यात विवेचन आहे. शालेय पातळीतील भाषा अभ्यासात निबंध ही महत्त्वाची गोष्ट आहे. निबंधलेखनातून मुलांना आपले विचार मुद्देसूदपणे मांडण्याची सवय लागते. त्यामुळे मुलांना निबंधलेखन देताना शिक्षक व पालकांनी विचार करायला हवा. मुलांना विषय देऊन मोकळे होऊ नये, तर विविध टप्प्यांवर मुलांना आधी बोलतं करायला हवं, लेखनाकडे वळण्यापूर्वी विविध पूरक कृती घ्यायल्या पाहिजेत, याची जाणीव हे पुस्तक करून देते. गोष्ट हा तर केवळ मुलांचा नव्हे तर मोठ्यांचाही आवडता विषय आहे.

मुलांना गोष्ट ऐकायला, सांगायला आणि लिहायला आवडत असते. गोष्ट लिहिताना मुलांच्या सर्जनशीलतेला खूप वाव मिळतो. या दृष्टीने विचार करून गोष्टलेखनाचे कौशल्य मुलांना अवगत होण्यासाठी लेखनाचे कोणते टप्पे शिक्षक आणि पालकांनी विचारात घेतले पाहिजेत, यासंबंधी ‘गोष्ट गोष्टीची’ या प्रकरणात केलेले विवेचन महत्त्वाचे आहे. ‘संवादाशिवाय जगातील कोणीही जगू शकत नाही’, या शब्दांत संवादाचे महत्त्व नमूद करत, मुलाखत घेण्यासंबंधी लेखकाने विवेचन केले आहे. स्वगत, नाट्यछटा, भूमिकानाट्य, आत्मकथा, नाट्यीकरण, नाटुकले यासंबंधी सविस्तर मांडणी केली आहे. सोबत मिरज तालुक्यातील विद्यार्थ्यांनी विविध मान्यवरांच्या घेतलेल्या मुलाखतींची उदाहरणे आहेत.

विद्यार्थ्यांच्या साहित्य संमेलनात सूत्रसंचालन, संमेलनाध्यक्ष, स्वागताध्यक्ष, मुलाखत अशा सर्व जबाबदाऱ्या मुलेच पेलवतात आणि यशस्वीपणे पार पाडतात. रोजच्या घडामोडी लिहिणे म्हणजे दैनंदिनी. पण आपण जेव्हा दैनंदिनी लिहितो तेव्हा स्वत:लाच काही सांगत असतो, विचार व्यक्त करत असतो; यातून स्वत:ला तपासून घेण्याची प्रक्रिया आपसूक घडत असते. म्हणून मुलांना दैनंदिनी लिहिण्याची सवय लावणं महत्त्वाचं आहे. मुलांना ही सवय लावताना शिक्षक व पालकांनी काय केले पाहिजे यासंबंधी लेखकाने आपली मते आणि अनुभव मांडले आहेत.

पत्रलेखन’ आणि ‘बातमी’ या लेखनप्रकारांचं महत्त्व नमूद केलं आहे. तसंच हे लेखनप्रकार मुलांना अवगत होण्यासाठी आवश्यक उपक्रम, पूरक कृतींविषयी विवेचन आहे. ‘कवितेच्या गावाला जाताना’ या प्रकरणात कविता समजून घेण्याची प्रक्रिया लेखकाने उलगडून दाखवली आहे. मुलांना कवितेची ओळख कशी करून द्यावी, त्यांना कवितेची आवड कशी लावावी आणि मग कवितालेखनाच्या वाटेवर त्यांना कसं आणावं याविषयी विवेचन केले आहे. मुलं गोष्ट लिहिण्यापेक्षा कविता लिहिणं अधिक पसंद करतात. कविता लिहिताना यमक जुळवणाऱ्या ओळी एकाखाली एक लिहिल्या की, कविता तयार झाली, असं त्यांना वाटतं. या टप्प्यावर मुलांना कवितेचे अंतरंग उलगडून दाखवणे अत्यंत आवश्यक असते.

यादृष्टीनं कवितेतील ताल, लय, प्रतिमा, प्रतिके, अलंकार, छंद, आशय, रचना यासंबंधाने लेखकाने येथे केलेले विवेचन विस्तृत आणि मोलाचे आहे. सोबत जागोजागी पाठ्यपुस्तकातील कवितांची उदाहरणं देत सोप्या शब्दात स्पष्टीकरण केले आहे. परिशिष्ठात दिलेले शिक्षकांचे लेख उद्‌बोधक आहेत. नवोदित लेखकांनी लिहिताना करावयाच्या मशागतीचा वस्तूपाठ यातून समजतो. पुस्तकातील लेखनशैली ओघवती व संवादी आहे. लेखनरुपांनुसार विषय, उपक्रम आणि अनुभव यांची सूत्रबद्ध मांडणी आहे. प्रशिक पाटील या शाळकरी मुलाने केलेले पुस्तकाचे मुखपृष्ठ बोलके आहे. शालेय वयातील मुलांना लेखनकौशल्य अवगत होण्यासाठी शिक्षक आणि पालकांची भूमिका अतिशय जबाबदारीची आहे याचं भान हे पुस्तक देतं.

चला लिहू या : नामदेव माळी 
सृजन प्रकाशन, सांगली.

Tags: संतोष जगताप मुलांसाठी लेखन पुस्तक परिचय चला लिहू या नामदेव माळी Santosh jagtap children chala lihu ya namdev mali book review weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी