डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मराठी साहित्याचा ‘शेतकरी संघटनेशी शोधलेला अनुबंध’

मराठी ग्रामीण कादंबरीचा इतिहास शेतकरी संघटनेच्या सूत्राशी जोडणाऱ्या या कादंबऱ्या मोजक्याच असल्या तरी त्यांचे स्थान या शोधाने अधोरेखित केले आहे. अभ्यासाची विशिष्ट चौकट काही लेखक, कवींना नव्याने प्रकाशात आणते. वरील कादंबऱ्यांची सूत्रे पाहता ही गोष्ट प्रत्ययाला येते. एकूणच डॉ. ज्ञानदेव राऊत यांनी ग्रामीण साहित्य व शेतकरी संघटनेच्या संघर्ष व लढ्याची सूत्रे मांडणाऱ्या कलाकृतींचा शोध घेऊन त्यांना चर्चेत आणून त्याच त्या प्रकारच्या ग्रामीण धाटणीच्या साहित्य-चित्रणाला छेद देणारे लेखक व त्यांच्या साहित्यकृती समोर आणल्या आहेत असे म्हणावे लागते. शेतकरी संघटना व तिच्या निमित्ताने परिवर्तनाचे सूत्र आकाराला आणणे शक्य आहे असा विश्वास वाटतो. बहुतांश मराठी साहित्याने दुर्लक्षित केलेला हा आशयप्रदेश शेतकरी लढ्याच्या सूत्रातून आगामी काळात मध्यवर्ती चर्चेत आला तर ते या संशोधनाचे फलित राहील.

डॉ. ज्ञानदेव राऊत यांचा संशोधन प्रबंधावरील ग्रंथ येत आहे म्हटल्यावर प्राध्यापक आणि त्यांचे संशोधन लेखन आणि त्याचेही परत पुस्तक, हे मामले काहीसे गोलमाल स्वरूपाचे असतात- असले पूर्वग्रह डोक्यात होते. मात्र पुस्तक हाती पडले आणि ते केवळ चाळल्यावर पुढे त्याचे वाचन करण्याची उत्सुकता निर्माण झाली.

‘शेतकरी संघटना आणि मराठी साहित्याचे अनुबंध’ हा ग्रंथ शेतकरी संघटनेच्या वाढविकासासोबत उभ्या राहिलेल्या मराठीतील कथा, कविता, कादंबरी या बाबतचा शोध यांचे परिशीलन करणारा आहे.  पुस्तकाची रचना सुटसुटीत अशा छोट्या व आटोपशीर प्रकरणांची आहे. अर्पणपत्रिका, अनुक्रमणिका यानंतर शरद जोशी यांनी उद्‌धृत केलेले संत नामदेवांचे ‘आम्ही लटिके न बोलू’ या  सुप्रसिद्ध वचनाने समारोप होणारे सोळा ओळींचे एक कथन आहे, जे खरे तर या एकूणच ग्रंथाची आणि पर्यायाने मराठी साहित्याकडून शरद जोशी यांनी शेतकरी चित्रणाबाबत अपेक्षिलेल्या कार्याची उद्देशपत्रिकाच आहे. ते म्हणतात,

‘‘शहरात गेलेली शेतकऱ्यांची पोरं शहरात रमली. त्यात लिहिण्याचे कसब असणाऱ्यांनी गावाविषयी लिहिले; हरामखोरांनो! तुम्ही माझे गाव लुटले. या पापाचा झाडा तुम्हांला द्यावा लागेल. हा टाहो कोणी फोडला नाही. उलट आपल्या ग्रामीण जन्मामुळे साहित्यात आपल्याला काही राखीव जागा असावी असा आक्रोश करणारी एक साहित्यिक आघाडी उभी झाली. शेतकऱ्यांच्या दुःखाचं भांडवल करून त्यावर साहित्यात स्थानाचा जोगवा ही मंडळी मागू लागली. ग्रामीण साहित्यिक शहरी विद्वानांची जीभ लावतात, पुढारी मुंबईची जीभ लावतात. अगदी सोसायटीचा सेक्रेटरीसुद्धा तालुक्याची जीभ लावून बोलतो.

‘‘शेतकऱ्यांच्या जिभेने कोणीच बोलत नाही. आम्ही बोललेलं जगात ऐकलं जाईल अशी साधने आमच्याकडे नसतील. शेती लुटून औद्यागिकीकरण करणारी व्यवस्था संपेपर्यंत ती साधने आमच्याकडे येणारही नाहीत; पण तोपर्यंत आमची जीभ तोंडात ठेवली पाहिजे. शब्द कसेही येवोत- अशुद्ध, बोबडे, वेडेवाकडे, तालहीन-सुरहीन, सौंदर्यहीन पण त्यातला अर्थ हा आमच्या अनुभूतीचा प्रमाणिकपणा टिकवणारा पाहिजे. साहित्याला बाजारी ‘मुंगी व्याली शेळी झाली’. वाङ्‌मयाला उठाव असला तरी निदान आमच्या आमच्यात तरी आमचा निश्चय ‘आम्ही लटिके न बोलू.’ ’’ हे खोट्या, दांभिक आणि कृतक शेतकरी वर्णनात गुंतून पडलेल्या मराठी साहित्यिकांना परभणी येथील कार्यशाळेत शरद जोशींनी सुनावले होते. ज्यावर अनेकांची त्यांनी नाराजी ओढवून घेतली होती.

शरद जोशी यांनी 1971 ला आयएएस दर्जाची नोकरी त्यागून चाकण येथे येऊन शेती करणे सुरू केले आणि ती कशी आतबट्‌ट्याची आहे याचा अनुभव घेतला. कांद्याच्या भावासाठी त्यांनी नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कांदे ओतून आमरण उपोषण करण्याचा मार्ग पत्करला. त्यांची घणाघाती भाषणे ऐकून 1978 ते 1990 पर्यंत संघटनेचा आलेख चढता राहिला. त्या आंदोलनाची धग मराठी साहित्यात कितपत उतरली हा शोध घेणे तसे जिकिरीचे काम!

त्या काळी डॉ. शेषराव मोहिते यांचा अपवाद वगळता कोणी प्रत्यक्ष लिहिणारा कार्यकर्ता चळवळीकडे होता की नाही हा प्रश्नच होता. तरीही चळवळीत न येता ती साक्षीभावाने अनुभवलेले साहित्यिक पुढील काळात निर्माण झाले. लेखक, कवींना संघटनेने विविध प्रसंगी बोलावून त्यांच्यात जाणीव जागृती निर्माण करण्याचे काम केले. यातून पुढे कविता, कथा, कादंबरीतील शेतकरी संघटना व तिच्या आंदोलक रूपसंघर्षाचे साहित्यचित्रण मराठीत निर्माण झाले. त्याचा शोध राऊत यांना घ्यावयाचा होता आणि त्यासाठी त्यांनी 2012 पर्यंत केलेला अभ्यास या ठिकाणी ग्रथित झाला आहे.

वरील शरद जोशी उद्‌धृतानंतर असलेला डॉ. शेषराव मोहिते यांचा सात पानी प्रस्तावना लेख शेतकरी संघटना आणि मराठी साहित्य या बाबतचा एक उत्तम आढावा घेतो. त्यांचा संघटनेतील सक्रिय सहभाग आणि त्यांनी केलेली एकूण चिकित्सा वाचण्याजोगी आहे. या ग्रंथातील प्रकरणे म्हणजे  शेतकरी संघटना : उदय, प्रेरणा व वाटचाल/ शेतकरी संघटना आणि मराठी कथा / शेतकरी संघटना आणि मराठी कविता / शेतकरी संघटना आणि मराठी कादंबरी अशी होत शेवटी संदर्भ ग्रंथसूची आहे. प्रबंधविषयानुसार शेतकरी संघटना आणि मराठी कथा, कविता, कादंबरीतील तिचे चित्रण, प्रत्यय, प्रभाव, अनुबंध दर्शविणारे लेखन शोधून त्याची चिकित्सा करण्याचे काम राऊत यांना करावयाचे होते.

शेतकरी संघटना : उदय, प्रेरणा आणि वाटचाल

या प्रकरणात डॉ. ज्ञानदेव राऊत हे शेतकरी संघटनेचा उदय, प्रेरणा आणि वाटचाल यांचा ऊहापोह करतात. ‘भीक नको हवे घामाचे दाम’ अशी गर्जना करत  महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारा एक प्रभावी दबावगट म्हणून शेतकरी संघटना पुढे आली. शेतीमालाला उत्पादनखर्चावर आधारित रास्त भावाच्या मागणीसाठी लढे उभारले गेले. शरद जोशी यांनी शेतकऱ्यांचा स्वाभिमान जागृत करण्याचे काम केले. केवळ ‘गरिबी हटाव’च्या घोषणा उपयोगाच्या नसून शेतीमालाला योग्य भावाची मागणी मान्य झाली पाहिजे, अशी संघटनेने मागणी केली. शेतकऱ्याच्या शेतीमालाला रास्त भाव मिळाल्यास शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या कष्टकरी, शेतमजूर, कारागिराच्या मजुरीचा प्रश्नही सुटण्यास मदत होईल म्हणून संघटनेच्या आंदोलनात शेतकरी व मजूरवर्गही मोठ्या प्रमाणात उतरला. महिलांचे प्रश्नही मोठ्या प्रमाणावर हाती घेऊन त्यांचाही मोठा पाठिंबा शेतकरी संघटनेला मिळाला.

शेतकरी संघटनेचे नेतृत्व, शेतकरी संघटनेच्या आंदोलनचे स्वरूप, आंदोलनातील क्रांतिकारी हुतात्मे,  आंदोलनाने भयगंडाला ठोकर, आंदोलनात गनिमी तंत्राचा अमल, भीक नको हवे घामाचे दाम, संघटनेचा एककलमी कार्यक्रम, संघटनेचा इंडिया सिद्धान्त, संघटनेचा स्त्री सबलीकरणाचा विचार, लक्ष्मीमुक्ती कार्यक्रम, संघटनेचे खुल्या व्यवस्थेसंबंधीचे विचार, प्रगत राष्ट्राच्या खुल्या स्पर्धेत भारतीय शेतकरी टिकेल काय?, खुलीकरणाच्या मर्यादांचे खंडन, शेतकरी संघटनेची शोकात्म वाटचाल या उपमुद्द्यांद्वारा राऊत यांनी शेतकरी संघटनेचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला आहे. खरे तर या प्रकरणाची पुस्तिका केली तर तिलाही चांगला प्रतिसाद मिळू शकेल. शेतकरी संघटनेबद्दल अधिक महत्त्वाची माहिती या प्रकरणात मिळते. यातील संघटना विचार हाच मराठी ग्रामीण  साहित्यात कसा पाझरला आहे हे पुढील प्रकरणात नमूद केले आहे.

शेतकरी संघटना व मराठी कथा

शेतकरी संघटना व मराठी कथा यांचा शोध घेताना राऊत यांनी भास्कर चंदनशिव यांच्या ‘अंगारमाती’ कथासंग्रहातील ‘हिशोब’, ‘मेखमारो’, ‘नवी हत्यारं’,  ‘तोडणी’, ‘इस्कुटा’, ‘कोळसा’, ‘विळखा’, ‘लढत’, ‘खोडा’, ‘काळी आई’, ‘काळजाचा तुकडा’, ‘लाल चिखल’ यांचा अभ्यास केला आहे. चंदनशिव यांच्या या कथांबाबत राऊत म्हणतात, ‘‘या कथांमधून ग्रामजीवनात धुमसत असलेला असंतोष विद्रोहाच्या अंगाने साकार होतो. पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेली लुटीची व्यवस्था उलथून टाकण्याची भाषा कथानायकाच्या मनोगतातून प्रतिध्वनित होते. शोषणकर्त्याचा चेहरा शोधण्यात ही कथा रममाण होते.’’ बहुचर्चित ‘लाल चिखल’ या कथेतील बालकाच्या भावविश्वाचे प्रसंग चित्रण करताना त्याला राऊत शेतकरी संघटनेच्या तत्त्वज्ञानाची डूब देतात. म्हणजेच ते कथावाचनातून सिद्धांतनाकडे प्रवास करतात. महात्मा फुले, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुख, डॉ. एन. डी. पाटील ते शरद जोशी अशी त्या सिद्धांतनाची वाट आहे. शरद जोशी यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यास अवगत केलेल्या इंडिया-भारत या विषमतामूलक सूत्राचा परिचय एकूणच शेतकऱ्यांच्या म्हणवल्या जाणाऱ्या साहित्यातून त्याच्या अभावग्रस्तता आणि शोषणाच्या निमित्ताने वारंवार प्रत्ययाला येत असल्याचे राऊत दाखवून देतात. तसेच या संपूर्ण कथांबाबत ते ‘शेतकरी चळवळीच्या अधिक-उण्याचा साक्षेपी लेखाजोखा चंदनशिव यांच्या बहुतांश साहित्यकृतीमध्ये आढळून येतो. ‘भीक नको हवे घामाचे दाम’ ही शेतकऱ्यांची मागणी त्यांच्या साहित्यात आग्रहीपणे आणि प्रखरपणे उमटली आहे. महात्मा फुल्यांच्या विचारांनी प्रेरित झालेले आणि शेतकरी संघटनेचा वैचारिक वारसा चालविणारे चंदनशिव आपल्या साहित्यातून श्रमशोषकांचा इतिहास तर मांडतातच. परंतु, क्रांतीचा उद्‌घोष करणाऱ्या शेतकऱ्याला ते स्वाभिमानी बाण्याचा सच्चा भूमिपुत्र मानतात.’ हा मथु सावंत यांचा संदर्भ नेमकेपणाने पुढे आणतात. एकूणच चंदनशिव यांच्या लेखनातील विद्रोहाचे सूत्र राऊत उलगडून दाखवितात.

रा.रं. बोराडे यांच्या ‘कणसं आणि कडबा’ या कथासंग्रहाचे विवेचन केले आहे. शेतकरी आंदोलनाचा साक्षीभाव असलेली ही कथा असल्याचे राऊत म्हणतात. स्वतः बोराडे यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेचा धागा पकडून राऊत त्यांची शेतकरी संघटनेबाबत सजग झालेली ग्रामसमूहाची मानसिकता बोराडे यांच्या कथांमध्ये असल्याचे दाखवून देतात. ‘कणसं आणि कडबा’- दुष्काळाची प्रखर दाहकता व चारापाण्याची भीषण टंचाई, ‘कर्जमुक्ती’, ‘वेढा’ - नोकरदार, अधिकारी करत असलेली कष्टाळू माणसांची पिळवणूक व त्यास शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेच्या अस्तित्वाने आलेल्या आत्मभानातून लढून विजय मिळविणारा शेतकरी चित्रित केल्याचे दिसते. या ठिकाणी त्या-त्या कथाकारांचे सामर्थ्य राऊत नोंदवितात.

नव्वदोत्तरी काळातले एक महत्त्वपूर्ण लेखक सदानंद देशमुख आणि आसाराम लोमटे यांच्या कथा संदर्भाने पुढे भाष्य आले आहे. त्यातील देशमुखांच्या ‘महालूट’ या कथासंग्रहाबद्दल राऊत लिहितात. देशमुखांच्या ‘लचांड’, ‘उठावण’ या एकूण कथाआधारावर राऊत भाष्य करून देशमुख हेही आपल्या कथेत विद्रोहाची वाट धरत असल्याचे सांगतात. हा विद्रोह शेतकरी आंदोलनातून आलेला असल्याचे ते दाखवून देतात.

आसाराम लोमटे हेही ‘इडा पीडा टळो’ या कथासंग्रहाने संपूर्ण वाचकांसमोर आले. त्यांच्या कथेत शेतकरी संघटना व त्यातील आंदोलन यांचे ठळक संदर्भ आहेत, किंबहुना शेतकरी संघटनाच त्यांच्या लेखनाचे प्रेरणास्थान असल्याने ते साहजिक होते. या कथांमधील दीर्घ लय व कथानकाची वीण ही अस्सल मराठवाडी आहे. शेतकरी संघटनेचे आंदोलन पोलिसांकडून कसे चिरडून काढण्याचा प्रयत्न झाला हे त्यातील विदारक असे अत्याचार लोमटे चित्रित करतात. या बाबत ते म्हणतात, ‘‘आसाराम लोमटे यांच्या कथेचे स्वरूप दीर्घ असले तरी कथानकाच्या मांडणीतील पकड मजबूत आहे. ही कथा अस्सल देशी जाणीव व्यक्त करीत शेतकऱ्यांच्या भलेपणाचे चिंतन करणारी आहे. म्हणून, या कथेची उंची आकाशाएवढी विशाल आहे.’’ हे निरीक्षण लोमटे यांच्या कथेचे मूल्यमापन करते.

या कथाविभागात राऊत जाता जाता जगदीश कदम (‘आखर’, ‘मुक्कामाला फुटले पाय’), बा. ग. केसकर (‘गुऱ्हाळ’), प्रभाकर हरकळ (‘भूमिया’), श्रीराम गुंदेकर (‘उचल’), बाबाराव मुसळे, (‘मोहरलेला चंद्र’), आप्पासाहेब खोत (‘माती आणि कागुद’) तसेच रामचंद्र पठारे यांच्या ‘इस्क्रू’ कथेचा उल्लेख केला आहे.

शेतकरी संघटनेचा कवितेवरील प्रभाव

शेतकरी संघटनेचा मराठी कवितेशी असलेला अनुबंध कविता शोधताना संशोधक राऊतांना अनेक कवी आणि त्यांची कविता सामोरी आलेली दिसते. अर्थात शेतकरी संघटनेच्या साहित्यावरील प्रभावाला ऐंशीच्याच दशकात सुरुवात झाली. कोणत्याही नव्या बदलाचे चित्रण कविता या साहित्यप्रकारातून तुलनेने लवकर येते. आधीच्या पिढीतली ग्रामीण कविता ही शहरी मध्यमवर्गीय पांढरपेशा वर्गाला आवडेल अशी लिहिली गेली. तिच्यातून ग्रामवास्तव चितारण्याचा हेतू नसल्याचे राऊत स्पष्ट करतात ना. धों. महानोर यांचा उल्लेख करून त्यांची आधीची कविता शृंगारिक असल्याचे ते दाखवतात, शेतकरी संघटना व तिचे आंदोलन आकाराला आल्यानंतर महानोरांची कविताही ‘रानातल्या कविता’कडून ‘प्रार्थना दयाघना’, ‘पानझड’ अशी बदलत असल्याचे राऊत दाखवून देतात. त्यांची कलावादी ते वास्तववादी भूमिका संघटनेच्या पार्श्वभूमीवर बदलली असल्याचे दिसून येते. अपेक्षेप्रमाणे विठ्ठल वाघ यांची पहिली दखल राऊत घेतात. वीज तोडल्यानंतर चिलगव्हाणच्या साहेबराव पाटलांनी केलेली आत्महत्या ही विदर्भातली पहिली शेतकरी आत्महत्या होती. त्यावर विठ्ठल वाघांनी लिहिलेली कविता अतिशय भेदक अशा शब्दांचा मारा करणारी होती. मराठी कवितेकडे आणि ग्रामीण वास्तवाकडे मनोरंजन म्हणून बघणाऱ्या पांढरपेशी नजरांना जाब विचारणारी होती. त्यातले प्रखर ग्रामवास्तव स्पष्ट दिसत होते. ही शेतकरी संघटनेच्या संघर्षाची शेतकऱ्याच्याच जिभेने बोलणारी कविता होती. ‘खापराचे दिवे’ या कवितेत असलेल्या ‘आमी जलमलो मातीत किती होणार गा माती’ या ओळी वाघांच्या कवितेतील आक्रोश व विद्रोह प्रकट करणाऱ्या होत्या. त्याची यथायोग्य दखल घेऊन त्यांचे या बाबतीतले पहिले स्थानही राऊत स्पष्ट करतात.

फ. म. शहाजिंदे - एरवी ज्या फ. म. शहाजिंद्यांचा उल्लेख केवळ मुस्लीम कवी म्हणून होतो ते शेतकरी संघटनेचे अव्वल कवी असल्याचे राऊत वाचकांसमोर मांडतात. ‘शेतकरी’ या खंडकाव्यातून शेतकरी जीवनाचा वैफल्यग्रस्त आत्मोद्‌गार बारकाव्यांसह अधोरेखित केला आहे. शेतकरी संघटनेच्या आंदोलन व विचारकार्याशी असलेली जवळीकता व प्रामाणिकता हे खंडकाव्य आस्वादन करताना पानोपानी दिसते. शेतकरी चळवळीमुळे त्यांचा शेतकऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही परिवर्तनवादी, आशावादी राहिला आहे. ‘खेड्याकडे चला’ ही कवीची प्रांजळ भावना सकारात्मकता दर्शविते; अशी ‘शेतकरी’ या खंडकाव्याची योग्य नोंद करून डॉ. ज्ञानदेव राऊत जाता जाता एक बॉम्बही टाकून देतात. या खंडकाव्याला प्रस्तावना - त्या काळी शरद जोशींची प्रस्तावना घेण्यासाठी काही पत्रव्यवहार शहाजिंदे यांनी केला होता. या बाबतची माहिती ‘शेतकरी’ खंडकाव्यात शहाजिंदे यांनी लिहिली आहे. त्या आधारे राऊत म्हणतात, ‘‘शेतकरी संघटनेच्या विचाराचे वहन करणारे हे पुस्तक शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांना प्रस्तावना न लिहिण्याच्या लायकीचे किंवा प्रसिद्ध करावयाच्या दर्जाचे नसलेले का वाटावे? हे एक आश्चर्यच वाटते.’’  या बाबतचा आवश्यक तो संदर्भ पुष्ट्यर्थ्य न जोडल्याने शरद जोशींच्या भूमिकेबद्दल संभ्रम निर्माण होतो. अर्थात पत्राच्या शेवटी शरद जोशी यांनी भलेही कवीची भलावण केली असेल ते इथे महत्त्वाचे नसून ते पुस्तक ‘शरद जोशी यांना प्रस्तावना न लिहिण्याच्या लायकीचे किंवा प्रसिद्ध करावयाच्या दर्जाचे नसलेले का वाटावे?’ या उद्गाराने मनात एक वैचित्र्य निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. (हा मुद्दा प्रत्यक्ष शहाजिंदे यांच्याकडून हा ग्रंथ वाचत असताना समजून घेतला आहे. ते म्हणतात की, त्या पत्रात शरद जोशी यांनी या कवितेत कवितेचे असावे असे सौंदर्य आढळून येत नाही. कविता जरा सजविली पाहिजे. याचाच अर्थ जोशी यांची काव्यशास्त्राची भूमिका अतिपारंपरिक होती.) राऊत मात्र शहाजिंदे यांच्या कवितेचे महत्त्व ओळखून त्यांचा अग्रक्रमाने परिचय देतात. यामागे संघटना आणि शरद जोशी यांची शहाजिंदे यांच्याविषयीची झालेली चूक राजकीय दुरुस्ती म्हणून करण्याचा राऊतांचा तर हा प्रयत्न नाही? असे वाटते; आणि जर ते तसे असेल तर हा प्रकार राऊत यांचे उमदेपण स्पष्ट करणारा आहे.

इंद्रजित भालेराव यांच्या कवितेने स्वत:ला सुरुवातीपासून शेतकरी संघटनेशी जोडून घेतलेले. त्यांची गाणी हा शेतकरी संघटनेचा अजेंडा सांगणारीच होती. तुलनेने त्यांची भरपूर आणि उपयुक्त असलेली चिकित्सा राऊत यांनी येथे केली आहे जी आवश्यक अशा स्वरूपाची होती. श्रीकांत देशमुख, केशव सखाराम देशमुख, शंकर वाडेवाले, नारायण सुमंत, लक्ष्मण महाडिक, प्रकाश किनगावकर, अशोक कौतिक कोळी, नामदेव वाबळे, गंगाधर मुटे अशा वेगवेगळ्या प्रदेशांतील कवींचा धांडोळा घेत असतानाच ‘शेतकरी संघटनेच्या मुखपत्रातील काव्याविष्कार’ राऊत यांनी संशोधनात आणला आहे. ‘संघटनेचा विचार ललित साहित्याच्या अंगाने शेतकऱ्यांना आकलनास सोपा जाईल म्हणून इतर चळवळींप्रमाणे संघटनेला तिचे लेखक, कवी व शाहीर शोधण्याची गरज निर्माण झाली. कारण महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारकार्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सत्यशोधकी जलसे, आंबेडकरी जलसे निर्माण झालेले दिसतात. याचाच एक भाग म्हणून शेतकरी संघटनेने विनय हर्डीकर यांच्या संपादनाखाली 26 जुलै 1985 रोजीे ‘शेतकरी संघटक’चा ‘ग्रामीण साहित्य अनुभूती विशेषांक’ काढला. तसेच शेतकरी संघटनेने 5 व 6 जून 1998 रोजी इस्लामपूर येथे संख्येने भास्कर चंदनशिव यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन केले. त्या दृष्टीने विचार करता शेतकरी संघटनेच्या मुखातून कथा, कविता, शाहिरी गीते क्रमशः प्रकाशित झालेली दिसतात. या साहित्यनिर्मितीत शेतकरी संघटनेच्या विचारांचा उघड प्रचार करणारा कथाशय बराच असला तरी साहित्यनिर्मितीत व्यक्त होणारा अनुभूतीतील सच्चेपणा महत्त्वाचा ठरतो.’ याच विशेषांकातून शरद जोशी यांनी ‘आम्ही लटिके न बोलू’ ही भूमिका मांडली होती. खरे तर त्यातील साहित्यावर जास्त भर देऊन हा शोध उभा करायला हवा होता पण तेवढ्या संख्येने कविता तिथे सापडली नसती ही अडचण असावी. त्यातील बाबा घोडे, प्रभाकर कोलखेडे, शेषराव मोहिते, मिर्झा रफी अहमद बेग, विद्या खैरनार, भारतकुमार लाढे, अजय अनमोल यांचा उदाहरणासह उल्लेख करून ‘एकूणच शेतकरी संघटनेच्या विचाराचा प्रचार करण्याच्या हेतूने उपरोक्त कवींनी काव्यलेखन केलेले दिसते.’ हे मत ‘शेतकरी संघटक’मध्ये छापून येणाऱ्या कवींबाबत व्यक्त करतात; शिवाय आपली अभ्यास जाणून ज्यांचे उल्लेख विषयांच्या मांडणीत यायचे राहिले त्याबद्दल आपली मर्यादादेखील मान्य करतात. या प्रकरणाच्या शेवटी राऊत महत्त्वपूर्ण चिंतन करताना म्हणतात,

‘‘मराठी ग्रामीण कवितेचा विचार करू जाता कवितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली; पण सकस कवितांचा दुष्काळ जाणवतो. यातील बऱ्याच कविता अनुकरणाच्या, वर्तनाच्या पातळीवरच अडकलेल्या दिसतात. संतांनी रचलेल्या अभंगरचनेचे अनुकरण कवितेत फॅशन होऊ पाहते. मंचीय कवितेच्या हव्यासामुळे अस्सल जीवन-जाणिवांपेक्षा कल्पनात्मकतेचा दर्प अधिक जाणवतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भातील वरवरचे चिंतन, भाष्य नेमक्या कारणांच्या खोलीपर्यंत जात नाही. त्यामुळे तळातल्या अनुभवाचा दुष्काळ कवितेत विशेषत्वाने जाणवतो. अधिक नेमकेपणाचे सूचन ही कविता अजूनही करीत नाही. सकस साहित्यनिर्मिती करण्याचा पिंड असूनही व्यासपीठाच्या प्रलोभनाने व ‘मागणी तसा पुरवठा’ करण्याच्या हव्यासाने अलीकडे कविता दर्जात्मक पातळीवरून घसरत चाललेली दिसते. मराठीतील चांगल्या कवितेला हे ग्रहण लागल्याचे दिसून येते. याचे भान संबंधितांनी वेळीच ओळखायला हवे. जेणेकरून मराठी कवितेची सकसता चिरकाल टिकून राहील.’’

हे निरीक्षण केवळ ग्रामीणच नव्हे तर सबंध मराठी कवितेबाबत भाष्य करून जाते. एकूणच ग्रामीण कवितेला शेतकरी संघटनेचे चिकित्सा विज्ञान लावले तर फार थोडीच कविता खाली शिल्लक उरते हे वास्तव अस्वस्थ करते.

शेतकरी संघटनेच्या प्रभावातील कादंबरी

या भागात पुन्हा एकदा कथनात्मक साहित्य म्हणून कादंबरी हा वाड्‌मयप्रकार राऊत पुढे आणताना त्यात ‘शेतकरी संघटनेच्या प्रभावातील कादंबरी’ असा आपला झोत ठेवतात. एकूणच मराठी कादंबऱ्यांचा थोडक्यात धांडोळा घेतल्यानंतर राऊत शेती, शेतकरी आणि शेतकरी संघटना हा परिप्रेक्ष्य लाभलेल्या कादंबऱ्यांची निवड अभ्यासासाठी करतात. कारण ती त्यांची अभ्यासमर्यादा आहे. रा.रं. बोराडे (‘चारापाणी’)- दुष्काळासह कोरडवाहू-बागायतदार शेतकरी संघर्ष व संघटनेच्या एकूणच मर्यादा दाखविणारे सूत्र, विश्वास पाटील (‘पांगिरा’) - एकूणच शेती, शेतमाल, बाजारभाव, संघर्ष, शेतकरी संघटना, शरद जोशी यांच्या जीवनसमरूप चरित्राची मांडणी करणारी कादंबरी, शेषराव मोहिते (‘असं जगणं तोलाचं’ आणि ‘धूळपेरणी’)- कुटुंबासह शासनकर्ते, व्यापारी, दलाल, अडते, सावकार, बँकवाले, नोकरदार, धर्ममार्तंड, फिरस्ते असा सर्व बाजूंनी शोषण होणारा शेतकरी हा आत्महत्येची वाट चालू लागणे, शेतीतले प्रश्न कळण्यातले अडाणीपण असणारी यंत्रणा, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांचा खुजेपणा यात संवेदनशील तरुणाची होरपळ- अशी सूत्रे या दोन कादंबऱ्यांत येतात. सदानंद देशमुख (‘बारोमास’) - नोकरी न मिळाल्याने उद्‌ध्वस्त झालेल्या तरुणाची शोकांतिका आणि त्या निमित्ताने त्याने घेतलेला शेती व ग्रामीण व्यवस्था यांच्या  भणंगतेच्या सनातन वास्तवाचा शोध हे सूत्र. भारत काळे (‘ऐसे कुणबी भूपाळ’)- अस्थिर शेतीव्यवस्थेमुळे मोडून पडलेली ग्रामीण कुटुंबे आणि त्यांचे दारिद्र्य व हलाखी यांचे सूत्र. भीमराव वाघचौरे (‘गराडा’)- कृषी ग्रामीण व्यवस्थेतल्या सरकारी धोरणांनी शेतकऱ्यांच्या भोवती उभा केलेला समस्या आणि ताणांचा ‘गराडा’, मोहन पाटील (साखरफेरा)- ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या व सहकारसम्राटांचे स्वार्थी राजकारण व शेतकरी संघटनेचे अभिनव आंदोलन यांचे चित्रण, सुरेंद्र पाटील (चिखलवाटा)- शेतीतल्या समस्येतून लढा देत शेतकऱ्यांचा स्वाभिमान जागृत करणाऱ्या शेतकरी संघटनेचा उंच गेलेला आलेख झुकतानाचा लेखाजोखा मांडणारी कादंबरी वाचकाला सामोरी येते.

मराठी ग्रामीण कादंबरीचा इतिहास शेतकरी संघटनेच्या सूत्राशी जोडणाऱ्या या कादंबऱ्या मोजक्याच असल्या तरी त्यांचे स्थान या शोधाने अधोरेखित केले आहे. अभ्यासाची विशिष्ट चौकट काही लेखक, कवींना नव्याने प्रकाशात आणते. वरील कादंबऱ्यांची सूत्रे पाहता ही गोष्ट प्रत्ययाला येते. एकूणच डॉ. ज्ञानदेव राऊत यांनी ग्रामीण साहित्य व शेतकरी संघटनेच्या संघर्ष व लढ्याची सूत्रे मांडणाऱ्या कलाकृतींचा शोध घेऊन त्यांना चर्चेत आणून त्याच त्या प्रकारच्या ग्रामीण धाटणीच्या साहित्य-चित्रणाला छेद देणारे लेखक व त्यांच्या साहित्यकृती समोर आणल्या आहेत असे म्हणावे लागते. शेतकरी संघटना व तिच्या निमित्ताने परिवर्तनाचे सूत्र आकाराला आणणे शक्य आहे असा विश्वास वाटतो. बहुतांश मराठी साहित्याने दुर्लक्षित केलेला हा आशयप्रदेश शेतकरी लढ्याच्या सूत्रातून आगामी काळात मध्यवर्ती चर्चेत आला तर ते या संशोधनाचे फलित राहील. या निमित्ताने मराठी साहित्याची मांडामांड व क्रम बदलला तरी पुरेसे आहे. शेतकरी संघटनेच्या अस्तित्वाने आलेले चैतन्य या संशोधनाने मराठी साहित्यात निर्माण झाले तर आजवरचा तोच तोपणाचा इतिहास बदलण्यास मदत होईल. कार्यकर्ते व अभ्यासकांना उपयुक्त ठरणारा हा ग्रंथ आहे.

शेतकरी संघटना आणि मराठी साहित्याचे अनुबंध
डॉ. ज्ञानदेव राऊत
प्रकाशक : गणगोत प्रकाशन, देगलूर
Mob. 96656  82528 
पृष्ठे 188, किंमत 250 रुपये

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

संतोष पद्माकर पवार
santoshpawar365@gmail.com

कवी


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके