पाच वर्साचं धाकलं लेकरू कायमच मागं
डबे वाटायला येऊ द्या म्हणायचं
पुढच्या नळीवर बसायचं, कधी मागच्या सिटावर
एखादं दुसरा डबाही धरायचं हाती
1.
पोट भरायची मुश्किली झाल्ती
मुडकीतुडकी कोपटी हुती
मजुरी रोजच धरायची हुती
फाटक्या गोधडाची इस्टेट बापानं दिल्ती
नागूच नाव हुते
नावाला धरून नागवे जगणे झाल्ते
तालुक्याची वाट धरणं त्यातूनच आल्तं
बऱ्यामाठ्या वस्तीत राह्यसाठी जागा शोधलीती...
पाच वर्षाचं पोर नि बायको
2.
खानोळवाल्याची सायकल मिळालीती कामाला
दिसातून पंक्चर व्हायची दोन टायमाला
चिठ्ठ्या लावून लावून चाललीती सवारी....
भुकेल्या पोटाची चिंता त संपली
नि पोराला पण शाळेची वाट दावता आली
मुन्शीपालटीच्या शाळेत घातलंतं पोर
ठिकीठिकी चाल्लीती नागूच्या संसाराची गाडी
बायकू चपात्या लाटलाटू
नि नागू डबे वाटवाटू
थकून जायचा येरीच...
उपाशी राह्यनापरी हुती गोष्ट बरीच...
3.
डबे लावलेते लोक होते...
मोठमोठ्या नोकऱ्यातून
कुणी सरलोक, कुणी हपिसर
कुणी कारकून, कुणी म्हातारकोतारे
पोरंबाळं नसलेले...
तर कुणी घरची बाईल बाळंतपणात माहेरी गेलेले
साऱ्यांची भूक त्याची वाट पाहायची
रिकाम्या डब्यात उरायचे त्यांचे तृप्त ढेकर
ते रिकामे डबे घेऊन परतताना
आपलंच पोट भरल्यासारखं वाटायचं नागूला
4.
पाच वर्साचं धाकलं लेकरू कायमच मागं
डबे वाटायला येऊ द्या म्हणायचं
पुढच्या नळीवर बसायचं, कधी मागच्या सिटावर
एखादं दुसरा डबाही धरायचं हाती
त्याला वाटायची मजा
डबे वाहणाऱ्या बापाबरोबर फिरतानी
हमेशाच त्याची सोबत व्हायची नागूला
त्याचीही पाठ झाल्ती डब्याची लाईन
कुठल्या डब्यानंतर कुठला द्यायचा डबा...
5.
एका मोठ्या हवेलीत
नवीनच मिळालीती डब्याची डिलिव्हरी
पंधरा-वीस कामगार करून राहिलेते हवेलीत
कसलं तरी लाकडी सजावटीचं काम
मालक तिथंच वरती कुठं राहायचा
मोठा रुबाब होता त्याचा
दिस-रात तयार करून घेत होता वस्तू कारागिरांकडून
काहीबाही गुपित बांधकामही करून घेत असावा
मोठमोठ्या तिजोऱ्या, भिंतीत दरूजे आणिक तळघरात
काय काय
घडीत होता कुणास ठाव
कारागीर बाहेर पडू देत नव्हता
बाहेर राज्यातून आलेले कारागीर
आतूनच कोंडलेते त्यानी...
भली दांडगी कुत्री होती
त्याच्या परसात तीही कोंडलेली
आतून कुठेतरी गुहेत बसल्यासारखी ऐकू यायची गुरगुर
त्यांचा बडा खाना यायला उशीर झाला की
चवताळायची...
एक मुलाणी यायचा घेऊन त्यांना कच्च्या मांसाचे तुकडे
नि भिरकावयाचा पिंजऱ्यात...
मोठीच होती असामी
6.
असाच एकदा दुपारचा भर होता
नागू डबे घेऊन पोचलाता हवेलीवर
कुठकुठच्या खोल्यातून कारागीर होते काम करीत
तिथतिथे पोहोच व्हायचे त्याचे डबे नागूच्या हातून
सोबतच्या लेकराला बाहेर गेटाजवळ उभारून
नागू गेल्ता आतमधी डबे वाटायला
तेवढ्यात हवेलीतली पाच-सात दांडगी कुत्री सुटलीती
कशी नि काय...
कुत्री होती खूपच भुकेली
बहुधा मुलाणी आला नसावा चार-दोन रोज
त्यांचा बडा खाना घेऊन
नि कुत्र्यांच्या तावडीत घावलं
नागूचं कवळं पोर
आवाजही निघू न देता
मिनिटात त्या कुताड्यानी ते फाडलं होतं
आडवंतिडवं आणि करू लागलेते हिसकफिसक
डबे पोचून नागू उतरलाता हवेलीच्या खाली
नि कुताड्यांचा तो तमाशा बघून
छाती फोडून लागला वरडू...
झाली सारी शहरवस्ती जमा...
कुत्र्यांनी खाऊन फस्त केल्तं पोर
हवेलीत आरामात होती बडी असामी
आरोड ऐकून खाल्तीचा कूस वळवून झोपली असामी
7.
ममअसा कोणता गुन्हा असामीनं केला?
फफ प्रश्न विचारून राहिलाता नागूला
आता त्याचा वकील
पोलीस ठाण्यात होता विचारीत फौजदाराला
ममकोणतं लावाल साहेब याला कलम?
मुक्या जनावरावर कसा काय दाखल होऊ शकतो गुन्हा?
कुत्र्याचा मालक कसा काय होऊ शकतो जबाबदार?
भुकेच्या सपाट्यात पोर खाल्लं कुत्र्यांनी
त्याला मालक कसा ठरेल जिम्मेदार?
मालकानं नव्हती घातली कुत्री अंगावर...
नागू पहात होता
वकिलाकडं, त्याच्या ल्याहाल्याहा बोलणाऱ्या जिभंकडं...
लेकरू खाणारी कुत्ताडी पळालीती मनातून
वकिलाच्या रूपात दिसत होतं त्याला
लेकराचं रक्त जिभेला लागलेलं
आणखी एक कुत्रं
नि उतरत होतं त्याच्याही डोळ्यांत पाण्याच्या जागी रक्त
नागूचं लक्ष पुन्हा पुन्हा जात होतं
फौजदाराच्या कमरेच्या पिस्तुलावर...
(मागील वर्षभरात संतोष पवार यांच्या महिन्यातून दोन याप्रमाणे 22 कविता प्रसिद्ध झाल्या. प्रचंड वाचकप्रिय ठरलेले हे सदर आता संपले आहे, पण या सर्व कविता, पुढील महिन्यात पुस्तकरूपाने साधना प्रकाशनाकडून येत आहेतस संपादक)
Tags: भुकेली कुत्री कविता संतोष पद्माकर पवार नागू weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या