डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

विद्याताई : परिवर्तनाच्या लढाईतलं स्त्रीत्व

‘मिळून साऱ्याजणी’च्या जोडीलाच  साथ-साथ, अक्षरस्पर्श, नारी समता मंच, स्त्री सखी मंडळ आणि पुरुष उवाच अशा संघटनांचा पैस त्यांनी उभारला. साथ-साथ ही तरुणांना विवाहासाठी चर्चा करणे, ओळख करून घेणे या उद्देशाने चाललेली संघटना आहे. अक्षरस्पर्श हे वाचनालय आहे. नारी समता मंच आणि स्त्री सखी मंडळ या स्त्रियांच्या संघटना आहेत, तर पुरुष उवाचमध्ये स्त्री-पुरुष समतेचं तत्त्व पुरुषांमध्ये- विशेषतः तरुणांमध्ये- रुजवण्याचे प्रयत्न आहेत. पुरुष उवाचला विद्याताई सहावं बोट म्हणत असत. या सर्वांच्या उद्देशाची साखळी परस्परपूरक आहे. निरनिराळ्या दिशेनं स्त्री-पुरुष समतेच्या प्रबोधनासाठी सुरू असलेलं हे काम आहे.

स्त्री-पुरुष समानतेच्या लढ्याबरोबरच इतरही आंदोलनांना त्यांचा पाठिंबा असायचा. नर्मदा बचाव आंदोलन, अंधश्रध्दा निर्मूलन समिती या त्यांच्या मित्र संघटनाच होत्या.

डोंबिवलीची भारती मोरे असेल, गोव्याची उज्ज्वला आचरेकर तर नगरची प्रज्ञा हेंद्रे असेल; अनेकांच्या मनात विद्याताई गेल्या म्हणजे घरचंच माणूस गेलं, अशी भावना आहे. खिडकीशी आपल्या जन्माच्या आधीपासून असलेलं झाड उन्मळून पडलं तर सगळं घर उजाड झालं, असं वाटतं. तीच उजाड संवेदना मनात आहे. उजेड निमाल्याचं दु:ख आहे. विद्याताई भेटल्या नाहीत तरी त्या आहेत, 25671321 या नंबरवर फोन केला तर ‘बोल काय म्हणतेस?’ असे शब्द स्नेहशील मृदु आवाजात ऐकू येतातच- असा विश्वास होता. पण आता ते संपलं, या वास्तवाची जाणीव होते आणि माझ्यासारख्या अनेकींचे डोळे भरून येतात.

विद्यातार्इंबद्दल स्नेहभाव आणि आदरभाव दोन्ही एकाच वेळी वाटायचे. ही किमया तपासताना स्मरणाचे धागे उलगडतात. अंदाजे 1966 मध्ये जेव्हा मी 10 वर्षांची होते, तेव्हा त्यांना पहिल्यांदा पाहिलं. या उंच-सडपातळ, हसऱ्या चेहऱ्याच्या बाई अवजड स्कूटर अगदी सहज स्टँडला लावत होत्या. पुण्यात सायकल चालवणाऱ्या खंडीभर होत्या, पण 50 च्या वेगाने जाणाऱ्या क्वचित होत्या. ‘या स्त्री मासिकाच्या संपादनाचं काम करतात’, असं आईनं मला तेव्हाच कानात  सांगितलं आणि माझे डोळे आणखीनच विस्फारले.

स्त्री मासिक आम्ही आवडीनं वाचायचो. त्यातल्या वाचकचर्चा गुंतवून ठेवणाऱ्या असायच्या. काही वर्षं गेली आणि एकदा मीही या चर्चेत भाग घेतला. मी लिहिलेलं चक्क छापून आलं. माझी कॉलर ताठ झाली. नंतर मी पुण्याला आल्यावर विद्याताई अधून-मधून दिसायला लागल्या. एका हातमाग कापडाच्या प्रदर्शनात मला त्या दिसल्या. त्या प्रदर्शन बघत होत्या आणि मी त्यांना बघत होते. त्यांचा ताठ-उंच बांधा, अजिबात पोक न काढता उभं राहणं, या ताठपणाला संतुलित करणारे त्यांच्या चेहऱ्यावरचे मृदू भाव माझी नजर बांधून ठेवत होते. माझी मैत्रीण शैला बापट हिच्यामुळे मला त्यांना जवळून पाहता आलं, त्यांच्याशी बोलता आलं. पण त्यांच्या निकट जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्याची सवड मला मिळाली नाही. तरीही दुरून का होईना, त्या काय करतायत याकडे लक्ष होतं. उबदार रंगीबेरंगी गोधडीचं चित्र असलेला पहिलावहिला ‘मिळून साऱ्याजणी’चा अंक अनेकांसारखा मी वाचला. पुढचे वाचत गेले. अंक पटकन वाचून संपतो, अशी माझी तक्रार होती. प्रतिक्रिया लिहिली, वाचकचर्चेत भाग घेतला तर अनपेक्षितपणे विद्यातार्इंचं लहानसं आणि नेमकं पत्र यायचं. उत्तेजन देणारं, लिहितं करणारं.

नंतर अनेक वर्षांनी पुण्यात आल्यावर मिळून साऱ्याजणीत काम करण्याचा अनुभव घेतल्यावर विद्यातार्इंच्या कामाचं मोल, त्यांचे अनेक आयाम माझ्या लक्षात येत गेले. जेव्हा स्थिरस्थावर झालेली अनेक मासिकं बंद पडत चालली होती, तेव्हा कसलं पाठबळ नसताना त्यांनी हे मासिक काढायचं धाडस केलं. स्त्रियांसाठी एक अवकाश बनवला. सर्वसामान्य स्त्रीला लिहितं केलं. बोलणं आणि लिहिणं यात फरक आहे. बोलणं उत्स्फूर्त धबधब्यासारखं असतं, तर लिहिताना त्या उत्स्फूर्ततेवर विचारांचे संस्कार होतात. आपल्या भावनांची रचना होते. ‘मिळून’च्या मुखपृष्ठावर लिहिलं जातं तसा आपला स्वतःशी नव्यानं संवाद होतो. किती तरी मुद्यांवर इथे स्त्रिया लिहित्या झाल्या. तुम्ही का शिकलात? लग्न का केलंत? नोकरी का करता? कोणता पोशाख घालता? का घालता? असे प्रश्न समोर ठेवले. किती साधे प्रश्न! पण मनाची दारं या प्रश्नांनी ठोठावली. विचारांच्या इंजिनानं गिअर टाकला. पहिल्यांदाच लिहिण्याचं धाडस करणाऱ्या त्यात कित्येक होत्या.

घराचा पत्ता नाही, हातात पैसा नाही, नोकरी नाही- अशा परिस्थितीत खचून न जाता स्वतःचं मासिक काढायचं स्वप्न विद्यातार्इंनी पाहिलं. प्रथमदर्शनी आक्रित वाटलं तरी या स्वप्नाची पायाभरणी आधी बराच काळ चालू होती. त्यांनी 1971 च्या सुमाराला ‘कमलाकी’ हे त्यांच्या आत्याबाईवर चरित्रात्मक पुस्तक लिहिलं. ते वाचल्यावर त्यांची मैत्रीण शैला म्हणाली, ‘तुमच्या लेखनात खूप पुढचा विचार आहे, पण तसा विचार तुमच्या वागण्यात दिसत नाही.’ ते ऐकल्यावर विद्याताई सावध झाल्या आणि विचार-कृतीमधलं अंतर कमीत कमी असावं, असा त्यांचा प्रयत्न सुरू झाला. हा प्रयत्न प्रामाणिक होता. गृहिणीपणाच्या बंदिस्त चौकटीतून बाहेर काढणारा होता.

तेव्हाच अरुण लिमये या तरुण युक्रांदियांशी त्यांची मैत्री झाली. शैलामुळे विचारांना दिशा मिळाली, तर अरुणमुळे त्या कार्यकर्ती झाल्या. Women, Men and Development या विषयावर इंग्लंडला ससेक्सला त्यांनी 1986 मध्ये प्रशिक्षण घेतलं. 85 साली नैरोबीला आंतरराष्ट्रीय महिला परिषद झाली, तिलाही विद्याताई गेल्या होत्या. या अनुभवातून त्यांच्यातल्या स्त्रीवादी विचारांचं भरण-पोषण होत होतं. मासिक सुरू करायची ऊर्मी तर होती, पण पैशांचं पाठबळ कसं मिळवायचं, हा प्रश्न होता. तेव्हा ग्रामीण भागात महिलांसाठी प्रोजेक्ट सुरू केला (growing together). त्यासाठी त्यांना फंडिंग मिळालं. हे काम करताना ग्रामीण महिलांकडून खूप काही शिकायची विद्यातार्इंना संधी मिळाली. आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलं.

‘मिळून साऱ्याजणी’ सुरू करताना शहरी आणि ग्रामीण स्त्रियांमध्ये सेतू बांधायचं त्यांच्या मनात पक्कं झालं. तसं करण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. मासिकात ग्रामीण स्त्रियांसाठी स्वतंत्र संपादकीय असायचं. मासिकाच्या सहाव्या वर्धापनदिनाला ग्रामीण मैत्रिणींना आवर्जून सामील केलं होतं. ‘माझ्या जाणिवेचा प्रवास’ या कार्यक्रमात या मैत्रिणींनी सभा जिंकलीच. दुसऱ्या दिवशी भँवरीदेवी या राजस्थानच्या साथीने आरोग्यसेवा देणाऱ्या सरकारी कार्यकर्तीला बोलावलं होतं. काम करताना गुर्जर समाजातल्या पुरुषांकडून ती स्वतः बलात्कारित होणं, त्याविरुध्द ती लढा करीत असणं विशेष होतं. या सर्व प्रयत्नांतून त्या मध्यमवर्गीय स्त्रियांच्या अनुभवाचा आणि आकलनाचा परिघ विस्तारत होत्या.

त्या आधी 1981-82 ला नारी समता मंचाची रुजवात झाली होती. त्याचं रजिस्ट्रेशन 87 मध्ये झालं. या मंचाच्या माध्यमातून विद्याताई कार्यकर्त्या म्हणून पुढे आल्या. तेव्हापासून समकालीन प्रश्नावर मंचानं आवाज उठवला आहे. कृती केली आहे. मंजुश्री सारडा आणि शैला लाटकर यांच्या हादरवून टाकणारा मृत्यूनं नारी समता मंचाला मैदानात आणलं. प्रदर्शन, मोर्चा, चर्चा, पथनाट्य अशा अनेक माध्यमांतून स्त्री-पुरुष विषमतेचे प्रश्न ऐरणीवर आले. सत्यरंजन साठे यांच्यासारखा विव्दान कायदेतज्ज्ञ मंचाचा आधार बनला. मंजुश्री सारडाच्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयापुढे रिव्ह्यू पिटिशन सादर करण्यासाठी मंचानं इतर संघटनांच्या मदतीनं 10 हजार सह्या गोळा केल्या. तो अर्ज देण्यासाठी विद्याताई आणि नीलम गोऱ्हे दिल्लीला जाऊन आल्या. अपराजितांची परिषद तसेच आत्मसन्मान परिषद झाली.

मंजुश्रीच्या निधनाला पाच वर्षे झाल्यावर रात्री प्रकाशफेरी काढण्यात आली. भ्रूणहत्येसंबंधात मोर्चा काढून परिसंवाद घेतला, पथनाट्ये झाली. ‘दोस्ती जिंदाबाद’ हा प्रकल्प राबवून मुलीकडून नकार पचवण्यासाठी, एकतर्फी हिंसक प्रेमापासून परावृत्त करण्यासाठी तरुणाचं प्रबोधन घेण्यात आलं. आमीर खान या लोकप्रिय अभिनेत्याशी तरुणांना संवाद साधता आला. शाळेतील मुलांसाठी लैंगिक शिक्षणाचे प्रयोग झाले. आधारगृहाची स्थापना झाली, कायदेशीर सल्ला देणारं केंद्र तयार झालं. यातले काही प्रयोग यशस्वी झाले नाहीत. पण या सगळ्यांतून विद्यातार्इंची शिकण्याची वृत्ती आणि संवाद साधण्याची हातोटी लक्षात आली. जमिनीशी थेट नातं सांगणारं विवेकी नेतृत्व पुढे आलं.

संवाद साधण्याचं त्यांचं कौशल्य वादातीत होतं. प्रत्येक व्यक्तीशी- मग ती कुणीही असो- त्या सूर जमवायच्या. त्या संवादातले वर्ज्य स्वर त्यांना लगेच समजायचे. पण त्या स्वरांच्या पट्‌ट्या ही संवादिनी उखडून टाकायची नाही. ऐकण्या-बोलण्याचा तोल सांभाळत आपल्या विचारांची समोरच्या व्यक्तीत त्या पेरणी करायच्या. याचं कारण मुळात माणूस त्यांना हवाहवासा होता. माणसांशी बोलताना त्यांची ऊर्जा उसळायची. माझा अनुभव सांगते : 2010 मध्ये महिलादिनाच्या कार्यक्रमासाठी त्या डोंबिवलीला आल्या. माझ्या सुदैवाने माझ्याच घरी उतरल्या. दुपारपासून रात्री 12 पर्यंत त्या सतत कुणाकुणाशी बोलत होत्या. लक्षपूर्वक भाषणं ऐकत होत्या. रात्रीच्या जेवणानंतर इच्छामरणाच्या संकल्पनेवर त्या सविस्तर बोलल्या. शेवटी बारा वाजता न राहवून मी त्यांच्या असीम ऊर्जेला मनःपूर्वक सलाम केला.

पहाटे आम्ही लवकरच उठलो. तेव्हा माझ्या आयुष्यात काय घडामोडी चालल्या आहेत, याची त्यांनी आस्थेने विचारपूस केली. माझ्या घराजवळच वृध्दांसाठी डे केअर सेंटर सुरू झालं होतं. हे सेंटर ज्योती पाटकर या उजव्या विचारांच्या कार्यकर्तीनं सुरू केलं होतं. त्या ते सेंटर बघायला आवर्जून गेल्या. आपल्या कामाच्या राजकीय आशयाचं भान त्यांना निश्चितच होतं. म्हणून कुणाचाच टिळा त्यांनी लावला नाही. मतभिन्नता असली तरी चर्चेसाठी त्यांची कायम तयारी असायची. संघीय विचारांची पार्श्वभूमी असलेल्या घरातून आलेल्या, जनसंघाच्या तिकिटावर निवडणूक लढवलेल्या विद्याताई विचारपूर्वक बदलल्या आणि हा बदल स्वतःपुरता न ठेवता या प्रक्रियेत त्यांनी अनेकानेकांना सामावून घेतलं. सुरुवातीलाच अनेकांना घरातला माणूस गेल्याचं दु:ख झाल्याचं मी म्हटलं आहे; सामावून घेण्याच्या त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांचीच ती परिणती आहे.

पुण्यात 2014 मध्ये आल्यावर मी मिळून साऱ्याजणीमध्ये दोन वर्षे होते. मिळून तेव्हा 25 वर्षांचं झालं होतं. त्या वर्षीच्या वर्धापनदिनाला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना बोलावलं होतं. त्यांना बोलतं केलं होतं. या दोन वर्षांत मला विद्यातार्इंना अधिक जवळून पाहण्याची संधी मिळाली. संध्याछाया त्यांना जाणवत होत्या, पण भिववत नव्हत्या. जोपासलेल्या वाढवलेल्या मिळून... पासून त्या संन्यस्त झाल्या होत्या. संपादनाची धुरा आता गीतालीताई सांभाळत होत्या. तरी विद्यातार्इंची नजर घारीसारखी ‘मिळून...’वर होतीच. प्रत्येक अंक त्या निगुतीनं वाचायच्या. आपलं मत नोंदवायच्या. मुद्रणदोष त्यांना व्यथित करायचे. महिन्यातून एकदा तरी सर्वांची मीटिंग हवी, असा त्यांचा आग्रह असायचा. मीटिंगची आम्हाला आठवण राहिली नाही तर त्या फुरंगटायच्या. ‘पुन्हा मी आठवण नाही करून देणार’ असं म्हणायच्या. त्यांची मतं, मार्गदर्शन आम्हाला मोलाचं होतं.

प्रत्येक अंकात त्यांचं मनोगत असायचं. साध्या पाठकोऱ्या कागदावर लिहिलेलं. त्यावर त्या आमची मतं अजमावायच्या. कोऱ्या कागदांची नासाडी केलेली त्यांना आवडायची नाही. माझा धांदरटपणा लक्षात घेऊन दारावर चिकटवलेल्या कागदाकडे माझं लक्ष त्यांनी वेधलं. (बाहेर पडताना) ‘दिवे, पंखे, संगणक, नळ बंद केले आहेत ना?’ असं त्यावर लिहिलं होतं. मला चिमटा तर बसला, पण मुळीच दुखलं नाही. महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे दिला जाणारा समाजकार्य जीवनगौरव सन्मान 2016 मध्ये त्यांना मिळाला. तेव्हा त्या जोशी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या. त्यांचं भाषण तिथेच रेकॉर्ड केलं गेलं. मी आणि मानसी त्यांच्या श्रोत्या होतो. रेकॉर्डेड भाषण नंतर सभागृहात ऐकताना त्यांची सदाहरित मनोवृत्ती जाणवत होती.

मिळून...ची घडी त्यांनी बसवली होती. महाराष्ट्रात आणि परदेशातही त्यांनी प्रतिनिधींचं जाळं उभारलं होतं. वर्धापनदिनाच्या कार्यक्रमानंतर प्रतिनिधींची बैठक व्हायची. त्यात विद्याताई आणि गीतालीताई आस्थेनं प्रतिनिधींशी संवाद साधायच्या. भाषण नाही, पण आपले विचार मांडायच्या. या प्रतिनिधींच्या मदतीने महाराष्ट्रात निरनिराळ्या ठिकाणी त्याचप्रमाणे दिल्ली, अहमदाबादला मिळून...च्या प्रकाशनाचे कार्यक्रम झाले. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचे यात प्रयत्न होते. या प्रयत्नांचा भाग म्हणून महिलादिन विशेषांक तीन भाषांमध्ये दोन वर्षं प्रकाशित झाला. एका अंकाचं प्रकाशन ताराबाई शिंदे-ज्यांचं तडाखेबंद लेखन आजही विचार प्रवृत्त करतं- त्यांच्या बुलढाण्याला झालं.

मिळून साऱ्याजणीच्या जोडीलाच साथ-साथ, अक्षरस्पर्श, नारी समता मंच, स्त्री सखी मंडळ आणि पुरुष उवाच अशा संघटनांचा पैस त्यांनी उभारला. साथ-साथ ही तरुणांना विवाहासाठी चर्चा करणे, ओळख करून घेणे या उद्देशाने चाललेली संघटना आहे. अक्षरस्पर्श हे वाचनालय आहे. नारी समता मंच आणि स्त्री सखी मंडळ या स्त्रियांच्या संघटना आहेत, तर पुरुष उवाचमध्ये स्त्री-पुरुष समतेचं तत्त्व पुरुषांमध्ये- विशेषतः तरुणांमध्ये- रुजवण्याचे प्रयत्न आहेत. पुरुष उवाचला विद्याताई सहावं बोट म्हणत असत. या सर्वांच्या उद्देशाची साखळी परस्परपूरक आहे. निरनिराळ्या दिशेनं स्त्री-पुरुष समतेच्या प्रबोधनासाठी सुरू असलेलं हे काम आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या लढ्याबरोबरच इतरही आंदोलनांना त्यांचा पाठिंबा असायचा. नर्मदा बचाव आंदोलन, अंधश्रद्धा निर्मूलन समिती या त्यांच्या मित्र संघटनाच होत्या.

मंदिरप्रवेशाच्या प्रश्नावर विद्यातार्इंनी 2014 नंतर न्यायालयात याचिका दाखल केली. जिंकली. शनी शिंगणापूरचं आंदोलन करणाऱ्या तृप्ती देसाईला त्यांनी भोंडे कॉलनीतल्या मिळून...च्या ऑफिसमध्ये बोलावलं, आमच्यासमोर तिच्याशी चर्चा केली. महिलांसाठी स्वच्छतागृहांचा संघर्ष चालूच होता. त्याच काळात विचारवेधतर्फे युट्यूबवर विचारवेचे प्रकाशित होत होते. तिथेही स्त्रियांना असलेला पुनरुज्जीवनवादाचा धोका यावर त्यांनी समर्पक नेमकं भाषण केलं. विचारवेच्यांच्या उद्‌घाटनात त्या अध्यक्ष म्हणून सामील झाल्या. अध्यक्षीय भाषणात संवादाचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं. वार्षिक संमेलनात प्रेक्षक म्हणून त्या आवर्जून उपस्थित होत्या. विचारवेधला त्यांनी भरभक्कम आर्थिक मदतही मिळवून दिली.

2019 च्या मिळून...च्या वर्धापनदिनाला विद्यातार्इंच्या उपस्थितीत माझ्या पहिल्या पुस्तकाचं (हमरस्ता नाकारताना) प्रकाशन झालं,  हा माझा मोठा भाग्ययोग होता. त्या दिवशी ‘इथून पुढे मी स्टेजवर नसेन, तर प्रेक्षकांत असेन’ असं त्या म्हणाल्या. मनात शंकेची पाल चुकचुकली. पण तशी शक्यता मन नाकारत होतं. त्यानंतर एका महिन्यात स्त्री सखी मंडळातर्फे त्यांच्याच सूचनेप्रमाणे या पुस्तकावर चर्चा आयोजित झाली. चर्चेमध्ये त्या स्वतः बोलल्या. या कार्यक्रमात माझ्या लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे, कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्या नीना भेडसगावकरची त्यांना काळजी वाटत होती. कारण तिची खुर्ची व्यासपीठाच्या कडेला होती. ती उगीच धडपडत तर नाही ना, असा प्रश्न त्यांना सतावत होता. माझ्या पुस्तकावर महाराष्ट्र टाइम्ससाठी त्यांनी परीक्षण लिहिलं. माझ्या अंदाजानं त्यांनी लिहिलेले हे शेवटचं परीक्षण असावं. आम्हा सर्वांबद्दल त्यांना अतिशय आपुलकी आणि वडिलधाऱ्यांना असते तशी काळजी होती. म्हणून तर विद्यातार्इंच्यामागे निराधार झाल्याची भावना आम्हा सर्वांच्या मनात आहे.

गेली अनेक वर्षे स्वेच्छामरणाबद्दल त्या सातत्यानं बोलत होत्या. स्वेच्छामरणाचा विचार हा समृध्द आणि स्वावलंबी जगण्याचा विचार आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. ‘दिसो लागे मृत्यू परि न भिववू तो मज शके’ ही त्यांच्या आजोबांनी (साहित्यसम्राट न.चिं.केळकर यांनी) लिहिलेली अखेरची कविता त्यांच्या मनावर कोरलेली होती. आपल्या विचारातलं आणि व्यवहारातलं अंतर कायमचं मिटवून टाकत 30 जानेवारीला त्या मृत्यूला सामोरे गेल्या.

एक विधान मी जबाबदारीनं करू इच्छिते. परिवर्तनाच्या लढाईतलं विद्याताई स्त्रीतत्त्व होत्या. नेतृत्वाची जाणीव त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होती. पण त्या जाणिवेची रेषा लोभस होती. अंगीभूत ऋजुतेमुळे त्या जाणिवेचं तेज कधीच जाचक झालं नाही.

आरती प्रभूंची कविता मला आठवते. विद्यातार्इंची मैत्रीण शैलू ही कविता छान गात असे....

संपूर्ण मी तरू की, आहे नगण्य पर्ण

सांगेल राख माझी गेल्यावरी जळून...

कोणा फुले दिली मी, माळून कोण गेले

शेल्यावारी कुणाच्या असतील स्पर्श ऊन....

विद्याताई संपूर्ण तरू होत्या.

या तरूचं लिंग स्त्री होतं याचा आम्हाला अभिमान आहे.

Tags: पुरुष उवाच स्त्री सखी मंडळ नारी समता मंच अक्षरस्पर्श साथ-साथ विद्याताई प्रज्ञा हेंद्र उज्ज्वला आचरेकर भारती मोरे डोंबिवली purush uwachs sri sakhi mandal nari samata manch aksharparsha sath-sath vidhhyatai pradnya hendra ujjwala acharekar bharti more dombiwali weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सरिता आवाड

लेखिका 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके