डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2025)

सुर्व्यांच्या क्रांतिकारक जाणिवा आणि अनुभवांच्या भट्टीतून तावून-सुलाखून निघालेला जीवनविषयक दृष्टिकोन अतिशय स्वाभाविकपणे स्त्रीविषयक जाणिवांमध्ये व्यक्त झाला आहे. विशुद्ध माणुसकीला केंद्रस्थानी ठेवणारा त्यांचा दृष्टिकोन ‘तेव्हा एक कर!’ या कवितेत आहे. आपल्या परंपरेत पत्नी ही जन्मोजन्मी माझीच, असं पुरुषाला वाटतं; पण आपल्या मागे पत्नीनं काय करावं, हे सुर्व्यांनी ‘तेव्हा एक कर’ या कवितेत सांगितलं आहे. कविता चकित करणारीच आहे.

‘हे माझ्या देशा, 
सूर्यकुलाचे आपण सभासद म्हणून म्हणतोय, 
स्त्री केवळ एक मादक आणि उत्तेजक पदार्थ 
हाच आजच्या कुलीनांच्या नजरेला अर्थ 
ती फुलवाल्याकडील एक पुडी 
एक कुडी, एक गुडिया आहे 
हे देशा, मी शरमेनं दबून चाललोय.’ 

नारायण सुर्वे यांच्या ‘माझ्या देशाच्या नोंदबुकात माझा अभिप्राय’ या दीर्घ कवितेतल्या या ओळी. अर्थ स्वच्छ आहे. एका बाजूनं कामगारवर्गाशी जुळलेली नाळ, तर दुसऱ्या बाजूनं शब्दांशी केलेली सोयरिक असं विलक्षण रसायन सुर्व्यांच्या रूपाने मराठी कवितेला लाभलं. वास्तवाचं वर्णन करता-करता नवंच वास्तव या कवीनं उभं केलं. तळपती तलवार असलेल्या या कामगारानं जो गुन्हा केला, त्यासाठी मराठी सारस्वतात त्याला कायमच मानानं स्थान आहे. 

त्यांच्याबद्दल लिहिण्यासारखं खूप आहे, खूप लिहिलं गेलं आहे; पण इथं त्यांच्या कवितेत आढळणारं स्त्री-रूप आणि त्या निमित्तानं त्यांच्यामधल्या पुरुषाचं दर्शन हा विषय आहे.नारायण सुर्व्यांचं काव्य समजून घेताना त्यांचं बालपण, जडण-घडण समजून घेणं अपरिहार्य ठरतं. सुर्वे अनाथ म्हणून जन्माला आले, पण कामगार वस्तीतल्या गंगाराम सुर्वे यांनी आणि त्यांच्या पत्नीने त्यांना लहानाचं मोठं केलं. त्यांना सोडून गेलेल्या जन्मदात्रीबद्दल सुर्व्यांना राग नाही, त्यांना माया देणाऱ्या त्यांच्या आईबद्दल मात्र अपार माया आहे. ही माया त्यांच्या स्त्रीविषयक जाणिवांचा गाभा आहे. या आईनं, वडिलांनी त्यांची नाळ कामगारवर्गाशी जोडली. कामगारवस्तीनं त्यांना घडवलं, त्यांना प्रेम दिलं. मार्क्सवाद-लेनीनवादाचा तिसरा डोळा त्यांना लाभला. या डोळ्याने त्यांनी नव्या जगाचं स्वप्नं पाहिलं. त्या नव्या जगाच्या स्वप्नाचा स्त्री हा अविभाज्य घटक होती. नव्या जगाचं वर्णन करताना ते म्हणतात- 
‘लोंढा आजच्यासारखाच वळेल कारखान्यांकडे 
मात्र आजच्यासारखा धाक नसेल 
उदंड उत्साह असेल 
नवा माणूस जन्मा घालणाऱ्या नवेलीला 
बसमधून नेताना ड्रायव्हरही वळणावळणावरून सावकाश गाडी वळवीत असेल’ 

कामगार असलेली त्यांची आई दिवसभर गिरणीत काम करायची. ती कामगार होती आणि आईसुद्धा. तिचं वर्णन करताना माझी आई या कवितेत म्हणतात... 
‘झपाझपा उचलीत पाय 
मागे वळून बघीत जाय 
ममतेनं जाई सांगत 
नका बसू कुणाशी भांडत.’ 

अशी आई दसऱ्याच्या आदल्या दिवशी जेव्हा त्यांना गिरणीत घेऊन जायची, तेव्हाची मजा सांगताना ‘शब्दसाठे झालेत पंगू’ असे ते म्हणतात. अशी आई अचानक काळाच्या पडद्याआड जाते, तेव्हा आईची जोडीदारीण साळू त्यांना जवळ घेते. हा संस्कार एकीकडून दाट मायेचा आहे, त्याचबरोबर कामगारवर्गाच्या धगधगत्या वास्तवाचाही आहे. 

त्यांच्या चाळीतलीच कृष्णा त्यांची आयुष्यभराची सावली बनली. पण तिला सावली तरी कसं म्हणावं? एकीकडे सावलीसारखं मागं-मागं राहून तिनं त्यांना सावली दिली. पत्नीबद्दलचं प्रेम सुर्व्यांच्या कवितेत अतिशय नव्हाळीनं व्यक्त होतं. त्यांची ‘गलबलून जातो तेव्हा’ ही माझी आवडती कविता आहे. 
गलबलून जातो तेव्हा, तुझ्याच पवित्र कुशीत शिरतो, 
तुझ्या मखमली कवेत स्वत:स अश्रूंसह झाकून घेतो. 

दिवसभर थकलेली पत्नी ‘चैत्र पालवी’ होणं, कढ उतू जाणाऱ्या दुधावर ‘स्नेहमयी साय’ होणं ही प्रतीकं हृद्य तर आहेतच. पती-पत्नींच्या नात्यातील पूरकता आणि एकमयता दाखवणारीही आहेत; पण अशा पत्नीचा त्यांना धाकही आहे. ‘पहारा’ या कवितेत ते म्हणतात 
‘तुझ्या पापण्यांचा पहारा माझ्या शब्दांवर असतो 
म्हणून माझ्या पद्यपंक्तीत व्यभिचाराचा अंश नसतो 
सदैव माझ्या कवितेत सत्याचा सहवास असतो.’ 

अशी पत्नी त्यांच्या क्रांतिकारक जाणिवांचाही एक भाग आहे. ते म्हणतात 
‘कालच्या सभेत गायलेले मी गीत 
ज्यात तुझ्या-माझ्या आशांचे खजिने होते.’ 

‘मास्तरांची सावली’ हे पुस्तक वाचताना कृष्णाबार्इंच्या अफाट कष्टांची जाणीव होते; पण या सहजीवनाला लाभलेलं पतीच्या प्रेमाचं मृदु अस्तरही जाणवत राहतंच. कुटुंबाची फारशी जबाबदारी त्यांनी घेतली नाही, पण मुलांवर माया होतीच. ‘असा कसा दगड झालो’ या कवितेत मुलांना मारल्यानंतर वाटणारा पश्चात्ताप आहे. 
‘असा कसा दगड झालो 
बाप असून काळ वाटलो त्यांना.’ 

‘बाप’पणाच्या मुखवट्यात माणूस गुदमरतो, ते गुदमरणं या कवितेत आहे. पुरुषभानाचं विश्लेषण करताना पुरुषपणाचं ओझं होतं, असा मुद्दा येतो. या कवितेमुळे हा मुद्दा मनाला भिडतो. 

स्त्री-पुरुष संबंधांप्रमाणेच मित्रांशी असलेल्या संबंधांचंही काही कवितांमध्ये वर्णन आहे. त्यातही उच्च-नीचता, समाजमान्यता अशा गोष्टी पूर्ण वजा करून निखळ मानवी संबंधांचं वर्णन आहे. मित्राला सावरण्याचा अहंकार नाही, तर परस्परांना सावरण्याची माणुसकी आहे. 
‘असेच एकमेका सावरीत 
जगायचे आहे जगात 
जेव्हा मी तडफडेन- 
माझा आत्मा तुझ्या कुडीत ठेव.’ 

देहाचा बाजार मांडणारी वेश्या मराठी काव्यसृष्टीला अपरिचित नाही; पण तिच्यातल्या माणसाचा वेध घेणारे कवी मात्र विरळाच. माणसं वाचणाऱ्या सुर्व्यांनी वेश्यांनाही वाचलं. तिचे शब्द त्यांचे झाले. त्यात तिला तिच्या कुटुंबाबद्दल, मुलांबद्दल वाटणारी माया आली; तशीच स्त्री-पुरुष संबंधांतल्या बेगडी नीतिमत्तेला मारलेली सणसणीत चपराकही आली. 
‘मागं याक गिऱ्हाईक आलं, 
हितं ऱ्हान्यापरिस 
बाईल व्हशील का?’ म्हनलं. 
‘आता हाय की मी शेजंला तुमच्या’ 
म्या म्हनलं, तवा ते तरपाटलं 
अख्ख्या पुरुष जातीचं मला हसू आलं.’ 

जन्मलेल्या मुलाची नोंदणी करायला आलेली वेश्या नोंदणीमास्तरांना म्हणते- ‘मास्तर, लिवा-तुमचंच नाव लिवा.’ ती पुढं म्हणते- 
‘जात नगा इच्यारू 
आवं, आमी कुना एकाची का 
बायली हावंत मास्तर, 
घरोठ्यातल्या बाया नव्हंत आमी.. 
तेवढं कुठलं नशिबाला.’ 

खरोखरच स्वत:चं घरटं स्वत:चा मुलगा-वडीलवारस ही सगळी साखळी या वेश्येच्या बाबतीत किती निरर्थक बनते, हे विदारक सत्य ठणठणीत दिसतं. मघाशीच उल्लेख केला तसा सत्याचा सुर्व्यांच्या कवितेतला सहवास जाणवतो. सुर्व्यांनी त्यांच्याच शब्दांत ‘शब्दांशी ओळख होऊ लागण्याच्या’ काळात लिहिलेल्या लोकगीताचा उल्लेख करणं अपरिहार्य आहे. या गीतानं सुर्व्यांना कवितेची नस सापडली. कवितेत कष्टाची व्यथा तर यावीच; परंतु ती खऱ्या, सच्च्या व आत्यंतिक आत्मीयतेनं यावी, हे महत्त्वाचं सूत्र सापडलं. हे खूप गाजलेलं गाणं म्हणजे ‘डोंगरी शेत माझं गं, मी बेणु किती’ हे गीत इतकं लोकप्रिय झालं की, लोकांना कवीचा विसरच पडला. स्त्रीच्या सार्वत्रिक दु:खाला वाचा फोडणारं हे गीत सर्व स्त्रियांना आपलंसं वाटलं. सुर्व्यांच्या क्रांतिकारक जाणिवा आणि अनुभवांच्या भट्टीतून तावून-सुलाखून निघालेला जीवनविषयक दृष्टिकोन अतिशय स्वाभाविकपणे स्त्रीविषयक जाणिवांमध्ये व्यक्त झाला आहे. विशुद्ध माणुसकीला केंद्रस्थानी ठेवणारा त्यांचा दृष्टिकोन ‘तेव्हा एक कर.’ या कवितेत आहे. आपल्या परंपरेत पत्नी ही जन्मोजन्मी माझीच, असं पुरुषाला वाटतं; पण आपल्या मागे पत्नीनं काय करावं, हे सुर्व्यांनी ‘तेव्हा एक कर’ या कवितेत सांगितलं आहे. कविता चकित करणारीच आहे. 

‘उतू जाणारे हुंदके आवर 
कढ आवर, नवे हिरवे चुडे भर 
उगीच चिरवेदनेच्या नादी लागू नकोस! 
खुशाल, खुशाल तुला आवडेल असे एक 
नवे घर कर. 
मला स्मरून कर,
 हवे तर, मला विस्मरून कर.’ 

असे हे नारायण सुर्वे. एक बाळगलेला मुलगा म्हणून कामगारवस्तीत घडलेले. जात, धर्म ह्यापैकी सांगण्यासारखे काहीच नसल्यानं माणूस ही एकच जात ओळखायला लागतो. कवी म्हणून काव्यपरंपरेचा अभिमान त्यांना होताच; पण आपला रंग वेगळा का आणि कसा, याचंही त्यांना भान होतं. म्हणून तर ‘मर्ढेकरांशी बातचित’ या कवितेत ते लिहितात..

‘अशाश्वत तर बदलतेच, 
पण शाश्वतही बदलत असते मर्ढेकर! 
म्हणजे हे मी तुम्हाला सांगायला पाहिजे असे नव्हे. 
परंतु माझ्या रोजच्या लढाईत हेच मला प्रत्ययाला येते 
तुमचा माणूसच पुसला 
तर, नंतर काय हो उरते?’ 

निखळपणे जाती-धर्माच्या अस्मिता सोडून सुर्व्यांनी माणूस वाचला. मला वाटतं, त्यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण स्थानामुळेच अवतीभवती बघताना एक अलिप्तताही त्यांना आली. ‘गुंतुनी गुंत्यात साऱ्या, पाया माझा माकुळा.’ अशा स्वरूपाची. ती त्यांच्या काव्याला पोषकच ठरली. अशी सुर्व्यांची कविता. रोटी प्यारी खरी; आणखी काही हवं आहे, असं म्हणणारी. आई, पत्नी, वेश्या अशा निरनिराळ्या रूपांत स्त्रीप्रतिमा त्यांच्या कवितेत आहेत, ज्या त्यांच्या जीवनदृष्टीशी सुसंगतच आहेत. याआधी या मालिकेतल्या मंगेश पाडगांवकर यांच्यावर लिहिलेल्या लेखात आनंद करंदीकर म्हणतात. ‘भांडवलशाही पितृसत्ताक व्यक्तिकेंद्री व्यवस्था पूर्णत: स्वाभाविक म्हणून स्वीकारलेल्या कवीच्या प्रतिभेत तो कितीही प्रतिभावान असला तरी, माणूसपणाकडचा प्रवास फारसा पुढे जाऊ शकत नाही.’ मला वाटतं, सुर्व्यांच्या कवितेतल्या माणूसपणाकडे जाणाऱ्या प्रवासाचं इंगित याच वाक्यात आहे. 

Tags: कविता सरिता आवाड नारायण सुर्वे Narayan surve Marathi poetry sarita awad मराठी कवितेतील पुरुष weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी