डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सुरुवातीला कारखान्याच्या व्यवस्थापकांच्या मनात स्त्रियांविषयी काही गैरसमज होते. उदा. स्त्रिया महत्त्वाकांक्षी नसतात, त्यांना यंत्रे नीट हाताळता येत नाहीत, त्या दिलेली वेळ पाळत नाहीत वगैरे... परंतु युद्धाच्या शेवटच्या दिवसांत पर्यवेक्षकाच्या हुद्यावर बऱ्याच स्त्रिया होत्या. महत्त्वाकांक्षी असल्याशिवाय ह्या पदावर त्या पोहोचल्या नव्हत्या.

पहिल्या महायुद्धाचा काळ. इंग्लंडमध्ये 1918 च्या सुमारास एक दशलक्ष लोक युद्धसाहित्याच्या उद्योगात काम करीत होते. रासायनिक उद्योग बाल्यावस्थेत होता. मोठ्या प्रमाणावर दारुगोळा तयार करण्याची त्याची क्षमता नव्हती. त्यामुळे ब्रिटिश सरकारने ब्रिटनमध्ये 12-15 ठिकाणी युद्धसामग्री तयार करण्यासाठी कारखाने सुरू केले. त्यांतील एक ग्रेटना ह्या गावी होता. हा कारखाना सर्वात मोठा होता आणि त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात प्रामुख्याने स्त्रिया होत्या. जवळजवळ 70 टक्के स्त्रिया तेथे काम करीत होत्या. 1915 च्या उन्हाळ्यात कारखाना उभारण्याचा निर्णय झाला. प्रत्यक्ष उभारणीला नोव्हेंबर 1915 मध्ये सुरुवात झाली, तर ऑगस्ट 1916 ला उत्पादनाला सुरुवातदेखील झाली. जरी 70 टक्के  स्त्रिया काम करत होत्या तरी उच्च पदांवर कुणाही स्त्रीची नेमणूक केली गेली नव्हती. 

कारखान्यासाठी स्कॉटलंडमध्ये अशी जागा निवडलेली होती. की समुद्रावरून किंवा आकाशातून जरी शत्रूचा हल्ला झाला तरी ती सुरक्षित राहावी. लोकवस्ती जास्त नसावी. रेल्वेची सोय असावी. ग्रेटनाची जागा ह्या सर्व दृष्टीने अनुकूल होती, येथील काही जमिनीत शेती होती तर काही भाग दलदलीचा होता. बॉम्ब व बंदुकीच्या गोळ्यांमध्ये वापरले जाणारे ‘कॉर्डाईट’ हे स्फोटक मुख्यत्वे ग्रेटनाच्या कारखान्यात तयार केले जात असे. त्यासाठी लागणारी नैट्रोकापूस व नैट्रोग्लिसरीन ही धोक्याची रसायनेही ह्या कारखान्यातच तयार होत असत. हे दोन्हीही स्फोटक पदार्थ अत्यंत काळजीपूर्वक हाताळावे लागत. जोराचा धक्का लागला तरी स्फोट होण्याची भीती! ग्लिसरीनची तीव्र नैट्रिक आम्ल व डायसल्फ्युरिक आम्लाशी विक्रिया करून नैट्रोग्लिसरीन तयार केले जाई. 

तर कारखान्यात वाया गेलेले तुकडे सुती धागे व इतर सुतीमालात तीव्र नैट्रिक व सल्फ्युरिक आम्ले घालून नैट्रोकापूस बनवीत असत. नैट्रोम्डिसरीन व नैट्रोकापसावे मिश्रण दाबयंत्रातून काढल्यावर ते दोरीच्या आकाराचे दिसते म्हणून हा स्फोटकाला 'कॉर्डाईट' हे नाव मिळाले. ब्रिटनमधील इतर कोणत्याही कारखान्यापेक्षा ग्रेटनाच्या कारखान्यात सर्वांत जास्त म्हणजे आठवड्याला 1000 टन कॉर्डाईट तयार होत असे. एकूण 30 किलोमीटर क्षेत्रामध्ये ह्या कारखान्याचा विस्तार होता. त्यात आम्लविभाग, नैट्रोकापूस विभाग, नैट्रोग्डिसरीन विभाग व कॉडाईट विभाग असे चार विभाग होते. कारखान्याच्या परिसरात बऱ्याच कामगारांना घरे, तसेच दवाखाना, सिनेमा व दुकानांची सोय होती. ज्यांना घरे नव्हती, त्यांना ठिकठिकाणांहून आणण्यासाठी खास रेल्वेची सोय होती. निरनिराळ्या ब्रिटिश बेटांवरून स्त्री कामगार ग्रेटनाला येत. 

ह्या स्त्रियांमध्ये शोडषवर्षीय युवतीपासून साठीला आलेल्या आजीबाईपर्यंत सर्व वयाच्या स्त्रियांचा समावेश होता. ग्रेटनाला येण्याआधी त्यांतील काही बायका घरगुती कामे करायच्या. काही दुकानांत तर काही इतर कारखाऱ्यांत काम करावयाच्या. घरातून प्रथमच कामाला घराबाहेर पडलेल्यांची संख्याही बरीच होती. एकूण स्त्रियांपैकी 20 टक्के स्त्रिया विवाहित होत्या. ग्रेटना कारखान्याच्या सुरवातीच्या काळात कामाचे तास संपले की लोक बाहेर पळायचे. करमणुकीची काहीच साधने नव्हती. ही गळती रोखण्यासाठी रात्रीची उशीराची आगगाडी प्रथम रह करण्यात आली. हळूहळू कारखान्याच्या परिसरात लायब्ररी, खेळ, शिवणकाम, विणकाम, पोहोण्याया तलाव, इतर कला, प्रथमोचार, नाच, गायन अशा अनेक गोष्टी सुरू करण्यात आल्या. महिला मंडळाचीही स्थापना झाली. कारखान्यात काम करताना स्त्रियांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागे. 

नैट्रोकापूस तयार करण्याचे काम फार धोक्याचे होते. दगडाच्या काहिलींमध्ये तीव्र सल्फ्ल्यूरिक व नैट्रिक आम्लांचे मिश्रण भरून त्यात सूत बुडविले जाई. त्यासाठी अॅल्युमिनिअमच्या दांड्यांचा वापर करीत असत. हे काम करताना तीव्र आम्लांच्या वाफा नाकातोडांत, घशात, डोळ्यांत जाऊन आग होत असे. अनेक वेळा आम्लाचे थेंब चेहऱ्यावर, हातावर उडून चेहरा व हात भाजावयाचे. डाग पडायचे. कपड्यांवर आम्ल पडून कपडे फाटत असत. आम्लांमध्ये भिजलेले सूत प्रथम उकळत्या पाण्यात टाकून थुतले जाई व नंतर राहिलेल्या आम्लाचे उदासीनीकरण करण्यासाठी ते खडूची भुकटी टाकलेल्या पाण्यात टाकले जाई. पुढे ते वेगाने गोलाकार फिरणाऱ्या केंद्रोत्सारक ड्रममध्ये घालून सुकवावे लागे. ही सुकविण्याची क्रिया करताना नैट्रोकापसाचा स्फोट होण्याचा धोका असे. 

त्यामुळे ह्या कामासाठी इतर इमारतींपासून लांब अंतरावर एक स्वतंत्र इमारत बांधलेली होती. नेट्रोग्लिसरीन तयार करणे हीदेखील एक धोकादायक प्रक्रिया होती. साबणाच्या कारखान्यातून आलेल्या ग्लिसरीनमध्ये नैट्रिक व सल्फ्युरिक आम्ले मिसळून, ते ढवळून निवळण्यासाठी ठेवले जाई. ह्यासाठी शिशाची उभट भांडी वापरली जात. निवळल्यावर वर आलेले नैट्रोग्लिसरीन काढून घेऊन ते शिश्याच्या पत्र्यांनी आच्छादलेल्या गटारातून पेस्ट तयार करण्यासाठी दुसऱ्या इमारतीत पाठविले जाई तेथे नैट्रोकापूस व नैट्रोम्डिसरीन ठराविक प्रमाणात एकत्र करून ते मिश्रण कणीक मळावी त्याप्रमाणे टेबलावर मळले जाई. नंतर त्याचे गोळे रबरी पिशव्यांत भरले जात. एकदा सर ऑर्थर कॉनन डॉईल यांनी ग्रेटनाच्या कारखान्यास भेट दिली. 

तेव्हा कणकेत पाणी घालून मळावे त्याप्रमाणे नैट्रोकापसामध्ये नैट्रोग्लीसरीन घालून ते मिश्रण हातानी मळले जात असल्याचे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. 'सैतानाची कणीक तुम्ही मळता आहात, असे भीतियुक्त उद्गार त्यांच्या तोंडून बाहेर पडले. ही सैतानाची कणीक किंवा कॉर्डाईट पेस्ट घेऊन एक वाफेवर चालणारी आगगाडी कॉर्डाईट विभागात जात असे. ह्या गाडीच्या इंजिनात जाळ करून वाफ तयार करणे धोक्याचे असे (केव्हा स्फोट होईल सांगणे कठीण). त्यामुळे वाफ तयार करणाऱ्या संयंत्रातून वाफ गाडीच्या इंजिनात भरावी लागे. कॉर्डाईट विभाग तीन कि.मी. लांब व दीड कि.मी. रुंदीचा होता व त्यात 165 कि मी. लांबीच्या बंद नळातून वाफ खेळवून त्याचे तपमान कायम ठेवले जात असे. 

ह्या संयंत्रातून कॉर्डाईटची पेस्ट अल्कोहोल, ईथर व कॅसलीन एकत्र मिसळल्यावर तयार होणाऱ्या गोळ्यांची, दाबयंत्रे असलेल्या दालनात रवानगी होत असे. तेथे पाच पाच बायकांचे बारा गट असायचे. लहान छिद्रे असलेल्या दाबयंत्रात घालून जोराने दाबल्यावर शेवया पडाव्यात त्याप्रमाणे या गोळ्यांच्या दोऱ्या बाहेर पडायच्या. त्यांचे लहान तुकडे करून ते ट्रेमध्ये भरून 6-7 दिवस वाळवत ठेवायचे. शेवटी ते पॅक करून युद्धसामग्रीच्या कारखान्यात पाठवले जायचे. कॉर्डाईटच्या तुकड्यांनी भरलेले ट्रे मैलभर लांब असलेल्या वाळवणाच्या जागी ट्रकमधून ढकलत नेले जायचे. दोन मुली एक ट्रक ढकलायच्या. रात्रीच्या वेळीही ट्रक ढकलत न्यावे लागायचे. अंधार, कमालीची थंडी, पाऊस, कधी उंदीर, घुशी पायांमधून पळायच्या, अशा परिस्थितीत ट्रक उकलत न्यावा लागे. 

ह्या धोक्याच्या कामाचा मनावर विलक्षण ताण असे. कॉर्डाईट विभागात अल्कोहोल असायचे. ते पिऊन काही मुली तर असायच्या, त्यांची रवानगी दवाखान्यात करावी लागे. घड्याळाच्या काट्याप्रमाणे कारखान्याचे काम चालत असे. आठ तासाच्या पाळ्या असत. बायका कामावर आल्या की त्यांच्यापाशी काही धातूच्या वस्तू (केसाच्या पिना, विणकामाच्या सुया वगैरे) आहेत का, याची तपासणी होत असे. अशा वस्तु आत न्यायला मनाई होती. धातूमुळे स्थिरविद्युत तयार होऊन स्फोट होऊ नये म्हणून ही खबरदारी घेतली जात असे. कारखान्यात स्त्रियांच्या सुरक्षिततेकडे लक्ष देण्यासाठी स्त्री-पोलीस असत. त्या शिकलेल्या असायच्या. स्त्रियांची उत्पादनक्षमता पुरुषांपेक्षा कमी असल्याचे समजले जाई. त्यामुळे युद्धकाळात आयुधांशी निगडित सर्वच कारखान्यांत स्त्रियांना पुरुषांपेक्षा बरेच कमी वेतन मिळत असे. 

सुरुवातीला कारखान्याच्या व्यवस्थापकांच्या मनात स्त्रियांविषयी काही गैरसमज होते. उदा. स्त्रिया महत्त्वाकांक्षी नसतात, त्यांना यंत्रे नीट हाताळता येत नाहीत, त्या दिलेली वेळ पाळत नाहीत वगैरे... परंतु युद्धाच्या शेवटच्या दिवसांत पर्यवेक्षकाच्या हुद्यावर बऱ्याच स्त्रिया होत्या. महत्त्वाकांक्षी असल्याशिवाय ह्या पदावर त्या पोहोचल्या नव्हत्या. कारखान्याच्या व्यवस्थापकांना हेही कबूल करावे लागले की स्त्रिया आपले काम जास्त निष्ठेने करणाच्या असतात. त्यामुळेच अपघाताचे प्रमाण खूप कमी राहिले. एक वरिष्ठ अधिकारी म्हणतो "ह्या स्त्रियांचा विशेष गुण म्हणजे एकाच प्रकारचे काम जरी असले तरी पुरुषांपेक्षा त्या असे काम न कंटाळात, तेवढ्याच सफाईने, चिकाटीने, कामाची प्रत बिधडू न देता सतत करू शकतात." स्त्रियांच्या ह्या गुणांमुळेच, अत्यंत धोक्याचे काम असूनही कारखान्याच्या एकूण कारकिर्दीत फक्त सातच मृत्यू नोंदले गेले. 

एकदा कित्येक टन नैट्रोग्लीसरीन असलेल्या इमारतीला आग लागली व सबंध इमारत भस्मसात झाली. सुदैवाने अपघाताचा अंदाज आधी आलेला होता. रॉबर्टा रॉबर्टसन ही एक महिला मृत्युमुखी पडली व काही जखमी झाल्या. इमारतीची देखरेख करण्याचे काम रॉबर्टाकडे होते. आग लागल्यावर स्वतः इमारतीत थांबून इतरांना बाहेर पडण्यास तिने मदत केली व सर्वजणी बाहेर पडल्याची खात्री करून बाहेर येताना तिला मृत्यूला सामोरे जावे लागले. त्या वेळी तेथील व्यवस्थापकांच्या नजरेस आलेली कौतुकमिश्रित आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढी मोठी आग लागली तरी कुठेही गबडबड गोंधळ, पळापळ झाली नाही. शिस्तीने सर्व बायका बाहेर पडल्या. टी.एन.टी. हा आरोग्याला अत्यंत धोकादायक स्फोटक पदार्थ समजला जातो. हा पदार्थ हाताळणाऱ्या बायका ‘कॅनरी गर्लस्’ म्हणून ओळखल्या जायच्या. 

त्वचेमधून टी.एन.टी.चे शरीरात शोषण झाल्यामुळे त्यांची त्वचा फिकट पिवळी पडलेली होती व त्यांचे केसही हिरवट रंगाचे झाले होते. त्यांना विविध प्रकारच्या आजारांना तोंड द्यावे लागले. बऱ्याचजणी त्यात मरण पावल्या. तीव्र आम्लाच्या वाफांमुळे बऱ्याच स्त्रियांच्या फुफ्फुसावर विपरीत परिणाम झाला होता. काहींना आपले दात काढावेच लागले. कॉर्डाईट विभागात काम करणाऱ्या स्त्रियांना सतत ईथरच्या वाफेमध्ये वावरावे लागले. त्यामुळे त्यांना डोकेदुखी, फीटस् येणे असे आजार होत. ह्याच विभागातली अॅनी कॅरीन आपली आठवण सांगताना म्हणते, वाळवणाच्या शेडच्या बाहेर नेहमी एक दोन बायका बेशुद्धावस्थेत पडलेल्या असायच्या. तर लिली ट्रुफ्ट सांगते, कॉर्डाईटमध्ये नैट्रोग्लिसरीन हा पदार्थ गोड असल्याने ते चवीला गोड असे. 

त्यामुळे कॉर्डाईटसारखा भयानक पदार्थ खाण्याचा बऱ्याच बायकांना मोह होत असे. त्याचा हृदयावर परिणाम होतो. ग्रेटनाच्या कारखान्यातली चांगली गोष्ट म्हणजे तेथील कॅन्टिनमध्ये बायकांना पौष्टिक आहार दिला जाई. 1919 साल उजाडले पहिले महायुद्ध थांबले. कामगार निघून गेले. युद्धकाळातील स्फोटक पदार्थांच्या कारखान्यातील सयंत्राचा शांततेच्या काळातील उद्योगात फारसा उपयोग होण्यासारखा नाही म्हणून ग्रेटनाच्या कारखान्यातील संयंत्रे पाडून टाकण्यात आली. काही निवासी घरे शिल्लक आहेत. ग्रेटनाचे जीवन हे रासायनिक उद्योगातील एका वेगळ्याच युगातील जीवन होते. 

सर्व धोक्याची कामे स्त्रियांना हातांनी करावी लागत. भयानक रसायनांच्या परिणामांना त्यांना तोंड द्यावे लागे. परंतु जास्तीत जास्त उत्पादन घेण्याच्या इर्ष्येपुढे ह्या समस्या दुय्यम ठरविल्या जात. तरीदेखील सर्व स्त्रियांनी मिळून कारखाना यशस्वीपणे चालविला. परंतु दुर्दैव असे की युद्ध संपल्यानंतर कालांतराने हा कारखाना व तेथील स्त्रिया विस्मृतीच्या पडद्याआड गेल्या. त्या वेळची एक कवयित्री म्हणते- स्वबांधवा संरक्षण देण्यासी ग्रेटना स्त्री करिते कर्तव्यासी जागवुनी त्या भगिनींची स्मृती सुजनहो, गाऊ त्यांना आरती.

Tags: रॉबर्टा रॉबर्टसन पहिले महायुद्ध ग्रेटना डॉ. दत्तात्रय नाईक डॉ. सरिता पटवर्धन First world War Robart Robartson Gretana Dr. Dattatray Naik Dr. Satita Patwardhan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके