डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अमेरिकेसारख्या प्रगत देशात जर लेबल्सविषयी एवढी अनास्था असेल तर इतर विकसनशील राष्ट्रांत वेगळी परिस्थिती असणार नाही. यावर उपाय म्हणून नुकतीच अमेरिकेत बोलणारी लेबल्स तयार करण्यात आली आहेत.

आपल्या दररोजच्या जीवनात अनेकदा आपला रासायनिक द्रव्यांशी संबंध येत असतो. काही वेळा अशी द्रव्ये आपणाला सोडा, व्हिनेगार, स्पिरीट अशा स्वरूपात दिसतात तर काही वेळा ती औषधे, कीटकनिवारके किंवा सुगंधी द्रव्यांच्या रूपात भेटतात. अशा सर्व द्रव्यांच्या बाटल्यांवर लेबल असणे जगभर सक्तीचे आहे. बाटलीत कोणते द्रव्य आहे याची माहिती तर लेबलवर असतेच परंतु बाटलीतले द्रव्य जर 'विषारी या गटात मोडणारे असेल तर त्याच्या विषारी गुणधर्माबाबत लेबलवर माहिती दिलेली असते. केवळ इतकेच नव्हे तर प्रसंगी विषबाधा झाल्यास कोणती उपाययोजना करावी याचीही माहिती लेबलवर असणे आवश्यक असते. या सर्व गोष्टी करण्यामागचा हेतू अनवधानाने किंवा निष्काळजीपणाने अशा पदार्थांची हाताळणी होऊ नये हाच नसतो का? परंतु एवढी काळजी घेऊनही अनेक जणांना विषबाधा झाल्याच्या बातम्या आपण ऐकतच असतो.

अमेरिकेत नुकत्याच केल्या गेलेल्या एका पाहणीचे निष्कर्ष यासंबंधात महत्त्वाचे ठरतात. पाहणी करणाऱ्या संशोधकांनी कीटकनिवारके वापरणाऱ्या शेतकऱ्यांशी ते वापरत असणाऱ्या कीटकनिवारकांच्या गुणधर्माविषयी चर्चा केली. त्यांना असे दिसून आले की बऱ्याच शेतकऱ्यांनी बाटल्यांवरची लेबल्स साधी वाचलेलीसुद्धा नव्हती! अमेरिकेसारख्या प्रगत देशात जर लेबल्सविषयी एवढी अनास्था असेल तर इतर विकसनशील राष्ट्रांत वेगळी परिस्थिती असणार नाही. यावर उपाय म्हणून नुकतीच अमेरिकेत बोलणारी लेबल्स तयार करण्यात आली आहेत. मात्र त्यांचा सर्रास वापर अद्याप सुरू झालेला नाही. बाटलीचे बुच उघडताच इलेक्ट्रॉनिक मंडले उत्तेजित होऊन लेबलातून आवाज येऊ लागतो आणि बाटली तील द्रव्याच्या गुणधर्माविषयी माहिती जवळपासच्या लोकांना आपोआपच मिळते. अशी लेबल्स सर्वसामान्य लेबल्सपेक्षा जरी महाग असली तरी त्यांतून मिळणारा सुरक्षिततेचा संदेश फार मोलाचा आहे.

स्वस्त आणि मस्त चष्मे

आपल्या दृष्टीत असणारे साधे दोष आपल्या दैनंदिन व्यवहारात अडचणीचे ठरू नयेत म्हणून चष्मे वापरले जातात. डोळ्यांची तपासणी करून योग्य त्या आकाराची भिंगे जर चष्म्यात असतील तर आपल्याला अगदी छान आणि स्वच्छ दिसते. परंतु यासाठी चांगली किंमतही मोजावी लागते. शिवाय एकदा चष्मा बनवला तर कालांतराने तो निकामी होतो. अशाप्रसंगी डोळे तपासण्याच्या आणि चष्मा बनवण्याच्या प्रक्रियेला नव्याने सामोरे जावे लागते. त्यात वेळ आणि पैसा खर्ची घालावे लागतात. जे लोक या प्रक्रियेतून गेले असतील त्यांच्या मनात 'हे सर्व टाळता येणार नाही का, हा प्रश्न आल्यास नवल नाही. 

जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. जोगुआ सिल्व्हर यांनी यासाठी एक स्वस्त आणि मस्त चष्मा बनवला आहे. या चष्म्यात भिंगे नसतात. भिंगांऐवजी पारदर्शक पटलांच्या ठराविक आकाराच्या छोट्याशा पिशव्या या चष्म्यात बसवलेल्या आहेत. त्या पिशव्यांमध्ये स्वच्छ पाणी भरून 'भिंग’ तयार केले जाते. डोळ्यांना चष्मा लावून आपल्याला नीट दिसू लागेपर्यंत भिंगात पाणी भरले की झाला चष्मा तयार! शिवाय हवे तेव्हा पाणी कमी जास्ती करून भिंगाची शक्तीही बदलणे शक्य असते. जगातल्या गरीब देशांत अशा चष्म्यांचा वापर करण्याचा आरोग्य संघटनेचा इरादा आहे.

प्रदूषण नियंत्रक रस्ते

रस्त्यावरील प्रदूषण ही गोष्ट आता मुळीच नवी राहिलेली नाही. विविध वाहनांतून बाहेर टाकले जाणारे विषारी वायू कमी-अधिक प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास करतच असतात. मात्र यासाठी वाहनांचा वापर बंद करणे हा उपाय होऊ शकत नाही. म्हणूनच यासंबंधात आपल्या आणि जगातल्या बहुतेक सर्व प्रगत देशांत कडक कायदे आहेत. या कायद्यातील तरतुदींचा बारकाईने अभ्यास केला तर वाहनातून बाहेर पडणाऱ्या वायूंमधले विषारी वायूंचे प्रमाण कमी करणे हाच मुख्य उद्देश जाणवतो. प्रत्यक्ष बाहेर पडलेल्या धुराचे काय करायचे याची तजवीज कुठेच नाही. 

मित्सुबिशी या बहुराष्ट्रीय कंपनीने यावर उपाय मिळाल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते रस्त्यावर टिटॅनियम डायऑक्साईड असणाऱ्या काही पदार्थांचा थर दिला तर धुराचा प्रश्न सुटू शकेल. सूर्यप्रकाशातल्या अतिनील किरणांमुळे धुरातल्या विषारी वायूंचे विघटन होऊन ते पाण्यात विद्राव्य होतात आणि पावसाच्या किंवा अन्य कारणाने रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यात विरघळून बाजूला केले जातात. अशा प्रकारच्या आवरणाची जपानमध्ये चाचणी सुरू आहे. अशा अनेक चाचण्यांतून बाहेर पडल्यावरच त्याला मान्यता मिळेल. परंतु आपले संशोधन या कसोट्यांना उतरेल असा संशोधकांचा विश्वास आहे.

Tags: प्रदूषण कीटक नाशक लेबल्स अमेरिका डॉ. दत्तात्रय नाईक डॉ. सरिता पटवर्धन Pollution Pesticides Lalels America Dr. Dattatray Naik Dr. Sarita Patvardhan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके