डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

  • आधुनिक नेत्रपल्लवी
  • दुधात पशुऔषधी आढळली
  • प्रदूषणनिवारक उपकरण
  • अननसाच्या पानांपासून वस्त्रनिर्मिती
  • सौर ऊर्जेवरील दिवे

आधुनिक नेत्रपल्लवी 

नेत्रपल्लवी करून संदेश देणारे लोक अधूनमधून आपल्या पाहण्यात येतात. हे लोक केवळ छंद म्हणून नेत्रपल्लवी करतात तर काही वेळेस तिच्या साहाय्याने चार पैसेही कमवतात, पण आता केवळ डोळ्यांचा वापर करून संवाद कसा साधता येईल यासाठी वैज्ञानिकांनी एक उपकरण बनवले आहे. या उपकरणाला 'सायक्लॉप सिस्टीम' असे नावही देण्यात आले आहे.

डोळयांची ज्या वेळी हालचाल होते त्या वेळी सभोवतालच्या भागातील विद्युत्ऊर्जेत सूक्ष्म प्रमाणात बदल होतात. नेमका याच गोष्टीचा वापर सायक्लोप सिस्टीम विकसित करताना केला गेला. ठराविक आकारमान आणि खास गुणधर्म असलेल्या पदार्थापासून तयार केलेले इलेक्ट्रोड्स चष्म्यावर बसवून डोळ्यांभोवतालच्या जागेत होणारे विद्युऊर्जेमधील सूक्ष्म बदल नोंदता येतात. डोळ्यांतील बुबुळांची वेगवेगळ्या दिशांनी मुद्दाम हालचाल केली तर तयार होणाऱ्या विद्युत ऊर्जेतील बदलांच्या आधारावर संगणकाद्वारे अक्षरे लिहिली जाण्याची यंत्रणा सायक्लोपमध्ये आहे. डोळ्यांच्या खाली, वर, डावीकडे, उजवीकडे आणि त्यांमधील भागात अशा आठ दिशांनी हालचाल करून थोड्याशा सरावाने वाक्येच्या वाक्ये भराभर लिहिता येतात. अर्थात संगणकाची मदत ही असतेच.

ज्या व्यक्तीच्या स्वरयंत्रणेत बिघाड झाला आहे. किंवा ज्यांना बोलताच येत नाही अशा लोकांना सायक्लॉप सिस्टीम खूप उपयोगी पडेल हे लक्षात घेऊन फ्रान्समधल्या 'बायोजेस्टा' या कारखान्याने सायक्लॉप सिस्टीम मोठ्या प्रमाणावर तयार करुन विकण्याचे ठरवले आहे.

दुधात पशुऔषधी आढळली

दूध हे पूर्णान्न आहे असे नेहमीच म्हणतात. विशेषतः लहान मुलांना तर आपल्याकडे आवर्जून दूध दिले जाते. बाजारात मिळणारे दूध उकळले की ते पिण्यासाठी सुरक्षित होते असे बहुतेक भगिनींचे मत असते. पण या समजुतीला काही प्रमाणात धक्का बसावा अशी माहिती हैद्राबाद येथे केलेल्या एका पाहणीत नुकतीच आवळून आली आहे.

या पाहणीत विविध ठिकाणच्या दुधांचे नमुने प्रयोगशाळेत तपासण्यात आले. यासाठी हैद्राबाद आणि सभोवतालची खेडेगावे निवडण्यात आली होती. या तपासणीमध्ये काही ठिकाणच्या दुधात ऑक्सिटेट्रासायक्लीन हे पशुऔषध आढळून आले. या औषधाचे दुधात असणारे प्रमाणही प्रकृतीला हानिकारक ठरू शकेल इतके होते. म्हशीवरील रोगांवर औषधांचा अनिर्बंध वापर केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असावी असे तज्ञांचे मत आहे. असे दूध वापरणे हे धोक्याचे आहे हे वेगळे सांगायला नको.

दुग्धव्यवसायाला सध्या बऱ्याच सुविधा उपलब्ध आहेत. त्यामध्ये दुधाची तपासणी करून ज्यात नको असलेली रासायनिक द्रव्ये आहेत असे दूध बाजूला काढण्याची यंत्रणा अंतर्भूत केल्यास ते सर्वांच्याच दृष्टीने हिताचे ठरेल. शेतकरी बंधूंनीही पशुऔषधांचा जरुरीपुरताच वापर करण्याचा चंग बांधायला हवा हेही यातून स्पष्ट होते.

प्रदूषणनिवारक उपकरण

स्वयंचलित वाहनांच्या धुरामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालला आहे. विशेषकरून धुरामधील कार्बन मोनॉक्साइड आणि वापरल्या गेलेल्या इंधनातील हायड्रोकार्बन्सची वाफ या घटकांमुळे शरीरावर दुष्परिणाम होतात. काही वेळेला इंधनामध्ये शिसे या धातूची संयुगे घातलेली असतात. अशा वाहनांच्या धुरांमध्ये शिसे हे संयुगांच्या स्वरूपात असते आणि प्रदूषणाचा प्रश्न आणखीनच बिकट करते.

या समस्येचा मुकाबला करण्यासाठी वेगवेगळे उपाय आता पुढे येत आहेत. अनेक प्रयोगशाळांमधूनही यावर संशोधन सुरु आहे. नागपूरच्या 'नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनियरिंग रीसर्च इन्स्टिट्यूटने' अलीकडेच या प्रदूषणाचा सामना करण्यासाठी उपयुक्त असे एक उपकरण तयार केले आहे. ते वाहनांवर सोप्या पद्धतीने बसवता येते. या उपकरणात धुरातील कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोकार्बन्स या दोन प्रमुख घटकांचे उत्प्रेरकांच्या साहाय्याने ऑक्सिडीकरण केले जाते. ऑक्सिडीकरणामुळे त्यांचे रूपांतर कार्बन डायोक्साईड आणि पाण्याची वाफ या जवळजवळ बिनविषारी वायुत होते. त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाची तीव्रता खूप कमी होते.

प्रत्यक्ष बाजारात येण्यापूर्वी मात्र या उपकरणास काही कठीण कसोट्यांतून जावे लागणार आहे.

अननसाच्या पानांपासून वस्त्रनिर्मिती 

अननसाचा स्वाद बहुतेकांनी घेतला असेल, अननसाचे फळ जरी रुचकर आणि बाजारात खपणारे असले तरी त्याची पाने मात्र सध्या अगदी निरुपयोगी समजली जातात, अननसाला चांगली मागणी असल्याने भारतात जवळजवळ सत्याऐंशी हजार हेक्टर्स एवढी जमीन अननसाच्या लागवडीखाली आहे. या सर्व झाडांची पाने केवळ कचऱ्यात टाकणे इष्ट नव्हे. त्यांचा काही उपयोग करता येईल का या दृष्टीने सुरू झालेल्या संशोधनाला आता यश येऊ लागले आहे.

साऊथ इंडियन टेक्स्टाईल रिसर्च असोसिएशन या संस्थेने नुकतेच अननसाच्या पानांपासून धाग्याची आणि सुताची निर्मिती करण्यात यश मिळवले आहे. या धाग्यापासून विविध वस्त्रप्रावरणेही तयार करण्यात आली असून त्यामध्ये विजारीचे कापड, पलंगपोस, पंचे, पडदे, दोऱ्या इतकेव नहे तर वाहक पट्ट्यांच्या दोरांचाही समावेश होतो.

टाकाऊतून टिकाऊ पदार्थांची निर्मिती करावी असे नेहमी सांगितले जाते. अननसाच्या पानांपासून धाग्यांच्या निर्मितीचे हे संशोधन या संदर्भात टाकाऊतून विकाऊ असेच म्हणावे लागेल.

सौर ऊर्जेवरील दिवे

ऊर्जेचा प्रश्न हा दोन प्रकारांनी बिकट होत चालला आहे. एक तर ऊर्जेची निर्मिती करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींचा साठा कमी होत चालला आहे. दुसरे म्हणजे सध्या उपलब्ध असणाऱ्या ऊर्जेचा वापर करण्यासाठी मोजावी लागणारी किंमतही वाढते आहे. आपल्या घरातील विजेच्या किंवा पेट्रोलच्या खर्चावर नजर टाकली तर दुसऱ्या विधानाची प्रचीती येईल. अशा प्रसंगी आठवण होते ती सौर ऊर्जेची.

सौर ऊर्जा ही मुबलक आणि मोफत मिळणारी गोष्ट आहे. शिवाय आपल्या देशावर निसर्गाचीही या बाबतीत मेहेरनजर आहे. ज्यामुळे सध्याच्या काळात सौर ऊर्जा हाच एक पर्याय आपल्यापुढे आहे. सौर ऊर्जेचा वापरही थोड्याफार प्रमाणात सुरू झाला आहे. याच संशोधनात ‘भारत हेवी इलेक्ट्रिकल्स' ने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. त्यांनी सौर ऊर्जेवर चालनाऱ्या दिव्यांची निर्मिती करण्यात यश मिळवले आहे. या दिव्यांमध्ये अस्फटिकी सिलिकॉनचे प्रकाशविद्युत घर वापरले आहे. दिवसभर उन्हात ठेवले तर हे घर सौर उर्जा ग्रहण करते, आणि सूर्यास्तानंतर पाच ते सहा तासांपर्यंत या घरांवर दिवे प्रकाशमान होत राहतात असे दिसून आले आहे.

हे दिवे स्वस्तात कसे करता येतील आणि सर्वसामान्यांना परवडेल अशा किंमतीत कसे विकता येतील यावर संशोधन सुरू आहे.

Tags: ग्रंथ परिचय पुस्तक परीक्षण Science Book Review books #Weekly Sadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके