एका ख्यातनाम उद्योजकांनी श्री. ना. ग. गोरे यांना लिहिलेल्या पत्रातील भाग सादर करीत आहोत. 'भ्रष्टाचार बोकाळल्याची तक्रार आपण सर्वच करतो (आणि अर्जावर 'वजन' ठेऊन काम करून घेऊन मोकळेही होतो)! निकोप, निर्मळ सार्वजनिक व्यवहारात लाच अपरिहार्यच आहे काय? लेखकाचा अनुभव वेगळा आहे. वाचकांनी, विशेषत: उद्योजकांनी आपले अनुभव कळविल्यास इतरांना ते उपयोगी पडतील. (लेखन संक्षिप्त असावे).
आज सर्वत्र चाललेल्या लाचलुचपतीबद्दल विवेचन करण्याची जरूरच नाही. आमचा कारखाना मी गेली साडेतीन वर्षे महाव्यवस्थापक म्हणून चालवत आहे. फॅक्टरी इन्स्पेक्टर, सें.एक्साईज, पोलिस, कामगार संघटना, प्रदूषण नियंत्रण आणि इतर अनेक सरकारी व निम अथवा बिनसरकारी विभागांशी आमचा कायमचा संबंध असतो. मी कोणालाही, काम कितीही महत्वाचे व निकडीचे असले तरीही, काहीही लाच न देता कारखाना चालवत आहे. वेळी-प्रसंगी लंच किंवा डिनर, व दिवाळीला आमच्या मुख्य कंपनीच्या उत्पादनाची एखादी छोटी भेट ही माझी लक्ष्मणरेषा आहे. ती ओलांडावयाला कारखान्यांतील हाताखालच्या कोणालाही, कोणत्याही परिस्थितीत परवानगी नाही. माझा अनुभव असा आहे की, असे करूनही कारखाना चालतो. कामं नीट होतात, इतकंच नव्हे, तर या शिस्तीमुळे कारखाना अधिक चांगला चालतो, कामं अधिक व्यवस्थित होतात. मोठ्या कंपन्यांना हे असं करणं सहज शक्य आहे. पण मोठ्या कंपन्यातील मोठे अधिकारीच काम लवकर करून घेण्याच्या नावाखाली बचतीचे व्यवहार अधिक करतात व छोट्या कंपन्यांना व व्यक्तींना तसं करायला दिशा दाखवून भाग पाडतात. आज व्यावसायिक व्यवस्थापक-प्रोफेशनल मॅनेजर्स-कारखाने चालवतात, मालक नाही तरीही असं होतं.
पत्राला कारण की, तुमच्या मार्गदर्शनाखाली व पुढाकाराने (निदान सुरुवातीला तरी) व्यवस्थापकांना एकत्र आणून न लाच देणारांची एखादी फळी उभारता येईल काय? तुम्ही यात पुढाकार घ्याल काय? तुमची इच्छा व तयारी असल्यास मी याबाबत तुम्हाला पुण्याला येऊन भेटू शकेन. कळावे.
Tags: संघटना. कारखाने ना.ग.गोरे सर्वोत्तम ठाकूर Organization. #लाच Factories N.G.Gore Sarvottam Thakur #Bribe weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या