डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

चीनमधील विज्ञान व तंत्रज्ञानातील संशोधनासाठी व उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी हे घातक आहे. त्यामुळेच सध्या जिनपिंग यांना राष्ट्रवाद महत्त्वाचा वाटतो का? भारताशी संघर्ष, दक्षिण चीन समुद्रातील हालचाली, अमेरिकेशी तणावपूर्ण स्पर्धा या साऱ्या बाबी म्हणजे माओंच्या पठडीतील राष्ट्रवादाची तार छेडून पक्षावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न आहे का? माओंचे राजकारण वरवर आयडियॉजिकल वाटले, तरी प्रत्यक्षात त्यांना तिसऱ्या जगाचे नेतृत्व करायचे होते. त्यांचे वारस शोभणारे क्षी यांना तर पुढे जाऊन सर्व जगाचे नेतृत्व करायचे आहे. मात्र क्षी यांच्या सत्तेच्या केंद्रीकरणामुळे चीनच्या मर्यादाही यथावकाश अधोरेखित होत जातील अशी परिस्थिती आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेला 2021 या वर्षात 100 वर्षे पूर्ण होतील. या महत्त्वाच्या टप्प्यावर चीनचे स्वप्न साकार करण्यासाठी क्षी काय करतील, हे पाहणे उद्‌बोधक ठरेल.  

समकालीन चीनच्या अभ्यासकांना जाणवणारी महत्त्वाची बाब म्हणजे क्षी जिनपिंग यांचे माओंबद्दलचे आकर्षण आणि त्यांच्या काळात माओंचे होत असणारे पुनरुज्जीवन! माओंचा मृत्यू 1976 मध्ये झाला. मृत्यूपूर्वी माओंनी पक्षात वरिष्ठ असलेले सुधारणावादी डेंग झिओपेंग यांना डावलले आणि आपल्या मर्जीतील हुआ गुओफेंग यांच्याकडे सत्ता सुपूर्द केली होती. डेंग झिओपेंग यांनी हुआ गुओफेंग यांच्याशी अंतर्गत राजकीय संघर्ष करून 1978 मध्ये सत्ता संपादन केली. हा सत्तासंघर्ष अहिंसक आणि मुख्यत: वैचारिक होता. कडव्या व जहाल माओंवाद्यांचा विचार आणि डेंग झिओपेंग व सुधारणावाद्यांचा विचार यांच्यातील हा संघर्ष होता. काहीही झाले तरी माओंनी जी काही कडवी डावी धोरणे अंगीकारली व ज्या काही सूचना दिल्या; त्याप्रमाणेच चालले पाहिजे, ही माओंवाद्यांची भूमिका! तर, अनुभव ही कसोटी मानून त्याप्रमाणे थोडी लवचिक भूमिका घेऊन प्रगती साधत राहणे, ही सुधारणावाद्यांची भूमिका होती. दोन भिन्न विचारसरणींतला हा संघर्ष असला, तरीही या दोन्ही विचारपद्धती मार्क्स-लेनिन-माओं यांच्या ढोबळ वैचारिक चौकटीतल्या होत्या. चीनने 1978 पासून नेत्रदीपक प्रगती केली असली, तरी या सर्व काळात पक्षाने ढोबळमानाने आणि तात्त्विक दृष्ट्या मार्क्स-लेनिन-माओं यांच्या विचाराला फारकत दिली नाही. 

डेंग यांची विचारसरणी लवचिक होती. जलद आर्थिक विकास करून लोकांचे राहणीमान उंचवावे यासाठी ही लवचिकता आवश्यक होती. चिनी राज्यकर्त्यांनी 1978 पासून ते क्षी जिनपिंग सत्तेत येईपर्यंतच्या 30-35 वर्षांत या सैद्धांतिक विचाराच्या आधारेच त्यांच्या पुढील आर्थिक, सामाजिक व राजकीय आव्हानांना तोंड देण्याची सिद्धता केली. त्यामुळे धोरणनिश्चिती करताना सर्वसामान्य लोकांचा प्राधान्याने विचार करण्याचे एक बंधनही पक्षावर व पक्षातील नेत्यांवर आले. 

प्रचंड मोठी परकीय खासगी भांडवल गुंतवणूक, मोठे औद्योगिकीकरण, वाढता जागतिक व्यापार आणि प्रगत विज्ञान व तंत्रज्ञान ही भांडवलशाहीची सर्व वैशिष्ट्ये चिनी आर्थिक विकासात ठळक दिसत असतानाही चीनने 1990-2010 या वीस वर्षांत 50 कोटींहून अधिक लोकांना जाचक व अमानुष गरिबीतून बाहेर काढले आणि त्यांना सन्मानाने जीवन जगण्यास मदत केली. म्हणूनच भांडवलशाहीतील कार्यक्षमता वाढविणारी वैशिष्ट्ये व समाजवादातील नैतिक भूमिका या दोघांनाही आपलेसे करण्याची कसरत डेंग व त्यानंतरच्या नेत्यांनी केली. हे त्यांना अर्थातच पूर्णपणे जमले नाही. उत्पादकता व उच्च आर्थिक विकास यांना महत्त्व दिल्यानंतर समाजातील जे विभाग व देशातील जे भाग मुळातच प्रगतिपथावर होते, ते अधिक विकसित झाले. बाकीचे मागे राहिले. शिवाय पुढे उद्योजक व व्यापाऱ्यांना पक्षात प्रवेशही दिला. यातून असमानता, अधिक भ्रष्टाचार, विकासातील असमतोल इत्यादी प्रश्न निर्माण झाले, हे खरे; परंतु तरीही आर्थिक विकासाचे फायदे गरीब वर्गापर्यंत पोहोचविण्याचे काम पक्षाने कसेबसे केलेच. अशा पद्धतीने समाजवाद व भांडवलशाही या दोन्ही पद्धतींचा अवलंब करून एक हायब्रीड अर्थव्यवस्था (मिश्र अर्थव्यवस्था) निर्माण झाली. 

या आव्हानाच्या संदर्भात मूळ मार्क्स, लेनिन आणि माओंच्या विचारांचा बदलत्या परिस्थितीत अर्थ लावून प्रश्न सोडविण्यासाठी वैचारिक बळ प्राप्त करून घेण्याची लवचिकता (किंवा Pragmatism) हे चीनच्या प्रगतीचे एक महत्त्वाचे पण फारशी चर्चा न झालेले कारण आहे. ही लवचिकता चीनच्या प्रगतीचा मोठा आधार आहे. तसेच, या विचारांची चौकट हा नैतिकतेचा स्रोत्र असून तिचाच वापर करून डेंग व त्यांच्यानंतर आलेल्या नेत्यांनी चीनची मोठी भौतिक प्रगती सध्या केली. डेंग, जियांग झेमिन आणि हु जिंताव यांना भ्रष्टाचाराचे, असमानतेचे, असमतोल विकासाचे, नागरीकरण व शहरांचे महत्त्वाचे प्रश्न सोडविता आले नाहीत. त्यांनी आर्थिक विकासाकडे जास्त लक्ष देऊन इतर प्रश्न पुढे ढकलले, असेही म्हणता येईल. 

लोकशाही, वैयक्तिक स्वातंत्र्य, उदारमतवाद आणि खुली अर्थव्यवस्था यांची सॉफिस्टिकेटेड चर्चा सातत्याने करणाऱ्यांना ही चौकट थोडी हास्यास्पद व ओढून-ताणून आणलेली व्यवस्था वाटेल. ती तशी आहेही. परंतु त्यात चीनचे यशही आहे. यात माओंप्रति मूकपणे आदर व्यक्त करीत, त्यांच्या विचारांवर फारसे भाष्य न करता सैद्धांतिक दृष्ट्या पारंपरिक कम्युनिझमचा लवचिकपणे अर्थ लावीत डेंग, जियांग झेमिन आणि हु जिंताव यांनी भांडवलशाही व समाजवाद या दोन्हींमध्ये संतुलन साधत प्रगती केली. प्रत्यक्षात अनेक तडजोडी करीत पक्षातील अनेक गटांना सांभाळून त्यांनाही सत्तेत वाटा दिला. या 1978 नंतरच्या लवचिक (Pragmatism) धोरणामुळे चीनचे राजकारण 1978 पूर्वीच्या म्हणजे माओंच्या राजकारणापासून बरेच दूर गेले. त्याचा फायदा असा झाला की, चीनचे आंतरराष्ट्रीय अर्थकारणात व राजकारणात बऱ्यापैकी सामीलीकरण झाले. 

या काळात चीनने आणि जगभरातील देशांनी काही राजकीय स्थैर्य आणि आर्थिक भरभराट अनुभवली. या काळात चीनचे परराष्ट्र धोरणही सबुरीचे आणि बऱ्यापैकी समजूतदारपणाचे होते. प्रचंड आर्थिक सामर्थ्य असलेल्या चीनचे जागतिक मंचावर शांततापूर्ण आगमन होत होते, हे सारे पाहत होते. डेंग झिओपेंग यांच्या लवचिक धोरणाचे (Pragmatism) हे फळ होते. मात्र याच वेळी पक्ष सामान्य माणसापासून लांब गेला, भ्रष्टाचार वाढला, असमानता वाढू लागली. 

चीनचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न क्षी जिनपिंग करीत आहेत. मात्र त्यांनी अनेक तडजोडी नाकारीत सर्व सत्ता स्वतःच्या हातात एकवटली, सर्वसहमतीने सत्ता राबविण्याची पद्धत संपुष्टात आणली. डेंग यांनी जोपासलेला झीरसारींळीा क्षी जिनपिंग संपवीत आहेत का? क्षी यांची स्वतःचे व्यक्तिस्तोम माजविण्याची तंत्रे, प्रचाराचा रोख, सत्तेवर आल्यानंतर भ्रष्टाचारनिर्मूलन मोहिमेचा त्यांनी विरोधकांना संपविण्यासाठी केलेला वापर- हे सारे पाहता, माओंप्रमाणेच त्यांचीही पावले हुकूमशाहीकडे पडत आहेत का, अशी शंका येऊ लागते. क्षी यांनी त्यांच्या वागण्यातून, प्रचारातून, प्रतीकांमधून स्वतःची एक प्रतिमा तयार केली आहे. त्यांची कार्यशैली पाहता, ते डेंग यांचे नव्हे तर माओंचे वारस आहेत, असे अनेकांना वाटते. क्षी यांच्या पुढील वाटचालीत, ते भविष्यात काय करतील, करू शकतील याचा अंदाज घेण्यासाठी हा मुद्दा महत्त्वाचा आहे. 

क्षी यांच्या सत्तेच्या केंद्रीकरणाला पूरक असणाऱ्या काही गोष्टी त्यांच्या प्रेरणेने घडत आहेत. पहिले असे की- चीनमध्ये माओंचे आणि माओंच्या विचारांचे मर्यादित प्रमाणात/स्वरूपात पुनरुज्जीवन होते आहे. चीनमधील राजकारणामध्ये डाव्या विचारसरणीचे काही शक्तिशाली गट अद्यापही अस्तित्वात आहेत. त्यांचा भांडवलशाही पद्धतीच्या मोठ्या सुधारणांना विरोध असतो. आर्थिक वा राजकीय प्रश्न निर्माण झाले की, हे गट सक्रिय होतात. तिआनमेन प्रकरणानंतर 1989 मध्ये हे गट व त्यांचे नेते इतके सक्रिय झाले की, त्यानंतर डेंग यांना तीन वर्षे नमते घ्यावे लागले होते. क्षी जिनपिंग 2012-13 मध्ये सत्तेवर येत असतानाही हे गट सक्रिय होते. या गटांचे महत्त्वाचे नेते आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे बो झिलाय हे क्षी यांचे सत्तास्पर्धेतील स्पर्धक होते, लोकप्रिय होते. त्यांची लोकप्रियता आणि माओंबद्दलचे आकर्षण पाहून पक्षश्रेष्ठींनी धसका घेतला आणि शांत व लो प्रोफाईल असणारे क्षी जिनपिंग यांच्यामागे सारे उभे राहिले. आता क्षी हेच माओंचे पुनरुज्जीवन करताना दिसतात. 

चीनमधील आर्थिक विकासातील अंतर्विरोध जसजसे स्पष्ट होऊ लागले तसेतसे डावे आणि माओंचे विचारही परतू लागले. आर्थिक असमानता, ग्रामीण व नागरी भागातील विषमता, पर्यावरणविषयक प्रश्न, प्रादेशिक असमतोल, सरकारी उद्योगांच्या पुनर्रचनेमुळे निर्माण झाली बेकारी- अशा अनेक प्रश्नांमुळे माओंचे विचार हळूहळू परत एकदा केंद्रस्थानी येऊ लागले. त्यामुळेच क्षी जिनपिंग यांना या माओंवादी गटालाही चुचकारणे आवश्यक वाटते. क्षी यांच्या विचारात आर्थिक सुधारणा व इतर मुद्दे याबरोबर माओंच्या विचाराला खास स्थान आहे. क्षी यांच्या समग्र विचारांत 1978 पूर्वीची पक्षाची भूमिका व 1978 नंतरची भूमिका या दोन्हींना एका सूत्रात बांधता येईल असे सूत्र आहे. या सैद्धांतिक भूमिकेमुळे त्यांना डावे व माओंवादी या दोघांचे समर्थन प्राप्त करता येते. 

वास्तविक पाहता, क्षी जिनपिंग यांनी झिजियांग प्रांतात काम करताना तैवान व इतर देशांतून गुंतवणूक आकर्षित करण्याचे काम केले. अनेक कंपन्यांना झिजियांगमध्ये उद्योग स्थापन करण्यास उत्तेजन दिले. अमेरिकेत दर वर्षी झिजियांग वीक साजरा करण्याचा प्रकल्प साकारला. त्या प्रांतातील अनेक चिनी कंपन्यांना परदेशी उद्योग स्थापन करण्यासही उत्तेजन दिले. भांडवलशाही संस्थांशी इतकी जवळीक असणाऱ्या राजकारण्याला माओंबद्दल आकर्षण असावे, हे जरा विशेषच! क्षी सुरुवातीला फारच नेमस्त वाटत. वृत्तपत्रांना मुलाखतीही देत नसत. त्यांनी 2000 मध्ये केव्हा तरी एक मुलाखत दिली होती आणि त्यात ते राजकारण फारच गंभीरपणे घेतात, हे स्पष्ट केले. म्हणूनच त्यांची माओंशी जवळीक हा कुतूहलाचा विषय झाला आहे. 

क्षी जिनपिंग अनेक बाबतींत माओंना आदर्श मानतात. वास्तविक पाहता, त्यांना वैयक्तिक जीवनात माओंमुळे त्रास सहन करावा लागला. ते लहान असतानाच त्यांच्या वडिलांना त्यांच्या हातून झालेल्या चुकीची फार मोठी शिक्षा मिळाली होती. त्यामुळे त्यांचे बालपणच जणू हिरावून घेतले गेले. क्षी 16 वर्षांचे असताना माओंच्या सांस्कृतिक क्रांतीत होरपळले गेले. शिक्षण व बीजिंगमधील घर सोडून त्यांना अनेक वर्षे खेडे गावात हलाखीच्या परिस्थितीत जीवन काढावे लागले. आई-वडिलांशी ताटातूट झाली. असे असले, तरीही माओंच्या बाबतीत क्षी यांनी कधीही अनादर व्यक्त केला नाही; नापसंती व्यक्त केली नाही. उलट त्यांच्या वागण्या-बोलण्यात माओंबद्दल सातत्याने आदर व्यक्त होतो. माओंच्या विरोधात डेंग बोलत नसत. मात्र सांस्कृतिक क्रांतीबाबत, त्यामुळे झालेल्या पडझडीबाबत, झालेल्या नुकसानीबाबत ते कडवटपणे बोलत. क्षी मात्र आजही माओंबद्दल निष्ठेने आणि आदराने बोलतात. 

क्षी यांचे माओप्रेम बरेच खोल आहे. सन 1930 च्या दशकातील ध्येयवादाने आणि आदर्शवादाने भारलेले माओंचे विचार त्यांना आदर्श वाटतात. भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत ते अनेकदा माओंचे नैतिक वर्तन व विचाराचा उल्लेख करतात. लाल सेनेच्या जवानांनी कसे वागावे याचे माओंनी घालून दिलेले नियम सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या सर्वच अधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी पाळले पाहिजेत, असे ते म्हणतात. 2013 मध्ये माओंच्या 120 व्या जन्मशताब्दी निमित्ताने केलेल्या भाषणात त्यांनी माओंचे विचारच या देशाला ऊर्जा व उज्ज्वल भविष्य देतील, असे गौरवोद्गार काढले. 

चीनच्या इतिहासातून दाखले देऊन इतिहासाचा सतत गौरव करीत राहणे (आणि लोकांना राष्ट्रवादाच्या धूसरतेत ठेवणे) क्षी यांना आवडते. सांस्कृतिक क्रांतीदरम्यान 1960च्या दशकात माओ व त्यांचे पाठीराखे ली फेंग या चिनी सैनिकाच्या बहादुरीची कथा लोकांपुढे आदर्श म्हणून सतत ठेवीत असत. अतिशय वाईट परिस्थितीत जन्मलेला व कष्टी जीवन जगलेला हा तरुण सैनिक 1962 मध्ये एका अपघातात कामी आला. त्याला माओंबद्दल व कम्युनिस्ट पक्षाबद्दल नितांत आदर होता. प्रामाणिकपणा, निष्ठा आणि देशभक्ती याचे तो लवकरच प्रतीक बनला. माओंनीही ली फेंगबद्दल गौरवोद्गार काढले आणि 5 मार्च हा त्याची स्मृती जागविणारा दिवस झाला. मार्च 2014 मध्ये लष्करातील एका समारंभात भाषण करताना क्षी जिनपिंग यांनी ली फेंगला श्रद्धांजली वाहून त्याची आठवण काढली. क्षी यांना अशा पद्धतीने लोकांपुढे इतिहासातील व वर्तमानातील अनेक आदर्श ठेवणे आवडते. लोकांनी तसे वागावे- विशेषतः राष्ट्राप्रति व नेत्यांविषयी सतत आदर व्यक्त करावा, अशी अपेक्षाही व्यक्त करतात. 

त्यांनी 2013 मध्ये दोन नव्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या. तिआनमेन चौकातील 1949 मधील क्रांतीत शहीद झालेल्या शूर सैनिकांना मानवंदना देण्यासाठी आणि 1937 मधील नानजिंगमधील कत्तलीत ठार झालेल्या चिनी नागरिकांची आठवण जागविण्यासाठी या सुट्ट्या होत्या. अशी अनेक उदाहरणे देता येतील. 

एका बाजूला माओंचे असे गौरवीकरण करीत असताना चीनच्या परंपरांमधून, इतिहासामधूनही क्षी प्रेरणा घेत असतात. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे कन्फ्युशिअसचे तत्त्वज्ञान! स्वतः माओंना कन्फ्युशिअसबद्दल चीड होती. माओंच्या काळात आपल्या शत्रूंचे व पुनरुज्जीवनवाद्यांचे (रिव्हिजनिस्ट) वर्णन माओं अनेकदा कन्फ्युशिअस असे करीत असत, कारण कन्फ्युशिअस परंपरेचे आणि म्हणून प्रतिगामित्वाचे प्रतीक होते. जियांग झेमिन आणि हु जिंताव यांच्या काळापासून कन्फ्युशिअसचे तत्वज्ञान चीनमध्ये महत्त्वाचे मानले जाऊ लागले. पक्षप्रमुखपद स्वतःकडे आल्यानंतर क्षी यांनी पूर्व चीनमधील कन्फ्युशिअसच्या जन्मगावी कुफू येथे भेट दिली. सप्टेंबर 2014 मध्ये कन्फ्युशिअसच्या 2565 व्या जन्मतिथीच्या निमित्ताने झालेल्या सोहळ्याला त्यांनी हजेरी लावली. कन्फ्युशिअस आंतरराष्ट्रीय असोसिएशनच्या पाचव्या काँग्रेसलाही हजेरी लावली. 

एके काळी चीनमध्ये सर्वांना माओंचे रेड बुक सक्तीचे असे; आता कन्फ्युशिअसची तत्त्वे सक्तीची झाली आहेत. कन्फ्युशिअस इन्स्टिट्यूट 2004 पासून चीनचे प्रतिनिधित्व करणारी आंतरराष्ट्रीय दर्जाची सांस्कृतिक संस्था झाली आहे. चिनी वैशिष्ट्ये असणाऱ्या समाजवादाला कन्फ्युशिअसचे तत्त्वज्ञान सामाजिक स्वास्थ्य आणि स्थैर्यासाठी पूरक असल्याने मार्क्सबरोबरच क्षी यांना कन्फ्युशिअसही आवश्यक वाटतो. देशप्रेम, शिस्त, जनसेवा, विज्ञान, कार्यक्षमता, कर्तव्यपालन आणि सामाजिक सुसंवाद ही सर्व कन्फ्युशियन मूल्ये असल्याने क्षी यांच्या राजकीय कार्यक्रमाचा कन्फ्युशिअस हा आवश्यक भाग आहे. चीनमधील भ्रष्टाचार, वाढती असमानता, मंदावणारा आर्थिक विकास या सर्वांच्या पार्श्वभूमीवर मार्क्सबरोबर कन्फ्युशिअसची मोट बांधणे क्षी यांना आवश्यक वाटते. 

महत्त्वाकांक्षी बेल्ट अँड रोड प्रकल्प सदर करताना ते पंधराव्या शतकातील प्रसिद्ध चिनी नाविक झेंग हे याची आठवण काढतात. कारण त्या निमित्ताने जगभर वाढणाऱ्या चीनच्या प्रभावाला ऐतिहासिक परिमाण देऊन चीनचा उदय शांततापूर्ण पद्धतीने कसा होतो आहे, हे सांगता येते. साऊथ सीमधील अनेक ठिकाणी आपला हक्क सांगत असतानाही ते इतिहासातील दाखले देतात. 

माओंनी 1960 च्या दशकापासून आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट चळवळीच्या निमित्ताने रशियावर सातत्याने टीका करून तिसऱ्या जगाचे नेतृत्व करण्याचा मानस 1973 मधील युनोच्या आमसभेतील भाषणातून जाहीर केला होता. फर्स्ट वर्ल्ड, सेकंड वर्ल्ड, थर्ड वर्ल्ड या शब्दांचा प्रथमच वापर असणारे भाषण डेंग यांनी युनोच्या आमसभेपुढे दिले असले, तरी ते भाषण माओंनी लिहिले होते. क्षी यांनी तिसऱ्या जगाचे नेतृत्व करण्याची माओंची संकल्पना पुढे नेत बेल्ट अँड रोड प्रकल्पांतर्गत या देशांना मोठ्या खर्चिक पायाभूत सुविधांसाठी अर्थसाह्य देऊन त्यांना चीनकडे ओढून घेतले. डेंग यांचे परराष्ट्र धोरण सबुरीचे व नेमस्त होते. डेंग यांनी हाँगकाँगसाठी वेगळी अधिक उदारमतवादी घटना तयार करून जगातील इतर देशांचा विश्वास संपादन केला. क्षी यांना हाँगकाँगवर हुकूमत  गाजवायची आहे. डेंग यांची धोरणे मोडीत काढून त्यांना माओंचा वारसा चालवायचा आहे का? 

क्षी जिनपिंग सत्तेवर आल्यापासून चीनमध्ये 1989 पासून अस्तित्वात असलेली राष्ट्रवादाची भावना अधिक फुलून आली आहे. इतिहासाचे अवाजवी गौरवीकरणही सुरू आहे. जपानशी 1941 मध्ये लढताना माउंट लांग्या येथील लढाईत पाच चिनी वीर शहीद झाले, त्यांची शौर्यगाथा चीनमध्ये परिचित आहे. या पाच शिपायांच्या बलिदानामुळे त्यांची सर्व बटालियन वाचली. या कथेबद्दल हाँग झेन्कुई या इतिहासकाराने दोन लेख लिहून काही मुद्दे उपस्थित केले, तर कोर्टाने त्याच्या विरोधात उभ्या राहिलेल्या खटल्यात अशा भूमिकेने राष्ट्राचा व त्याच्या नायकांचा अपमान झाला आहे, असा निकाल देऊन त्याला व त्याच्या संपादकाला जाहीर माफी मागावयास लावली. माओंचे रेड बुक, कन्फ्युशिअस, चिनी परंपरेतील क्लासिक्स, चिनी इतिहासातील दाखले अशी मोठी सरमिसळ क्षी यांच्या काळात दिसून येते. चीनचे स्वप्न साकार करीत असताना परंपरेत व इतिहासात जिथे जिथे म्हणून काही आदर्श दिसतात, त्यांचा संबंध वर्तमानाशी लावतात आणि त्यातून सामजिक आदर्श निर्माण करतात. अशा प्रत्येक आदर्श चित्रामागे क्षी यांची धूसर प्रतिमा दिसत राहते. 

क्षी जिनपिंग सत्तेचे स्वतःकडे केंद्रीकरण का करीत आहेत? ते सत्तेत आले तेव्हा चीनमध्ये भ्रष्टाचार, वाढती राजकीय अस्थिरता, सिव्हिल सोसायटीची चळवळ या प्रश्नांनी गंभीर स्वरूप धारण केले होते. त्यांनी भ्रष्टाचारविरोधी मोहीम जोरदारपणे चालविली. त्यांना पक्षातून काहींचा विरोध होताच. त्यामुळे जोरदार मोहीम, त्यातून निर्माण होणारी अस्वस्थता व विरोध आणि ती दडपण्यासाठी सत्तेचे केंद्रीकरण- असे चक्र सुरू झाले. दुसरे म्हणजे, चिनी नेत्यांना राजकीय सुधारणांची फार भीती वाटते. क्षी सत्तेवर येत असताना सुधारणांची मागणी जोर धरीत होती. 

या संदर्भात एक किस्सा सांगण्यासारखा आहे. वँग किशान हे क्षी यांचे विश्वासू सहकारी आणि चीनच्या भ्रष्टाचारविरोधी काम करणाऱ्या संस्थेचे प्रमुख. त्यांनी फ्रेंच विचारवंत अलेक्सिस टॉक्विलचा 1856 मधील ‘दी ओल्ड रेजिम अँड दी रेव्होल्युशन’ हा ग्रंथ वाचला. त्यानंतर त्यांच्या प्रेरणेने तो ग्रंथ चीनमधील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांत व अधिकाऱ्यांतही मोठ्या प्रमाणावर वाचला गेला. फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये 16 व्या लुईची राजवट नष्ट झाली, तेव्हा फ्रान्समध्ये वाईट असे काही फार नव्हते. लोकांची परिस्थिती सुधारत होती आणि 16 व्या लुईने स्वतः अनेक प्रकारच्या राजकीय व प्रशासकीय सुधारणा हाती घेतल्या होत्या. मात्र तरीही श्रीमंत व तुलनेने गरीब यांच्यातील असमानता, सुधारणा करणारा तुलनेने मवाळ राजा, अतिशय महत्त्वाकांक्षी सुधारणांचा आग्रह आणि त्यामुळे निर्माण होणारा मोठा दबाव यामुळे सुधारणा हळूहळू न होता फ्रेंच राज्यक्रांतीच अपरिहार्य झाली. चीनमध्ये सर्वत्र आर्थिक परिस्थिती सुधारते आहे, मात्र असमानता वाढते आहे; मोठा सुशिक्षित व सधन मध्यम वर्ग अस्तित्वात आहे, मात्र त्या वर्गाच्या आशा-आकांक्षा वाढलेल्या आहेत. चिनी राज्यकर्त्यांना व पक्षाच्या नेत्यांना या परिस्थितीची फार भीती वाटते. क्षी यांच्या सत्तेचे केंद्रीकरण करण्यामागे ही असुरक्षितता आहे का?

राजकीय सुधारणांचा विषय निघाला की, चिनी राज्यकर्त्यांपुढे रशियाचे उदाहरण असते. रशियाने राजकीय सुधारणांना प्राधान्य दिले व आर्थिक सुधारणा दुय्यम ठरविल्या. गोर्बाचेव्ह यांनी राजकीय सुधारणा करताना त्या जणू काही पाश्चात्त्य देशांना खूश करण्यासाठी, त्यांच्या दबावाखाली केल्या असे दिसले. त्यामुळे रशियामधील कम्युनिस्ट पक्ष कमकुवत झाला. आर्थिक सुधारणाही अमेरिकेच्या सल्ल्यानुसार व स्थानिक परिस्थितीचा अंदाज न घेता घाईघाईने केल्या. त्या फसल्या. फारसा विचार न करता खासगीकरणासारखे प्रयोग केल्याने अर्थव्यवस्था कोसळली. 

चीनला याची फार भीती वाटते. चीनचा पवित्रा रशियापेक्षा वेगळा होता. चीनमधील कम्युनिस्ट पक्षाची एकहाती सत्ता असणे पक्ष व नेत्यांच्या दृष्टीने आवश्यक होते. अधिक आर्थिक विकास व लोकांचे राहणीमान उंचावणे यातूनच या सत्तेचे नैतिक समर्थन येणार होते. त्यामुळे चीनने प्रथम आर्थिक सुधारणा काळजीपूर्वक केल्या आणि लोकांचे राहणीमान उंचावले. राजकीय सुधारणा जमतील तशा मागाहून करू, असे चिनी नेत्यांचे म्हणणे होते. आता तर क्षी यांना त्या करायच्याच नाहीत. 

डेंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चीनमधील सर्वोच्च पदासाठी 10 वर्षे व दोन सत्रे यांची जी कायदेशीर मर्यादा घातली होती, ती 2018 मध्ये क्षी जिनपिंग यांनी काढून टाकली आहे आणि 2022 नंतरही चीनचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या पदावर आपण राहू शकतो, असे स्पष्ट केले आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या परंपरेमध्ये क्षी यांना ‘कोअर लीडर’ असे संबोधिले जाते. कोअर लीडर म्हणजे पक्षाला महत्त्वाचा विचार देऊन, मोठे व्हिजन देऊन राष्ट्राला गौरवशाली भविष्याकडे नेणारा मार्गदर्शक नेता. असा मान यापूर्वी फक्त माओंना प्राप्त झाला होता, परंतु हा बहुमान मिळविण्यासाठी त्यांना अनेक दशके लागली. क्षी जिनपिंग यांनी हा बहुमान स्वतःच स्वतःला सहा-सात वर्षांतच बहाल केला. कोविडच्या 2019-20 या वर्षात त्यांचे चीनचे स्वप्न आणि चिनी वैशिष्ट्ये असणारा समाजवाद याविषयीचे विचार व तत्त्वज्ञान कॉलेज व विद्यापीठात सक्तीने शिकविले जाऊ लागले आहेत, हे विशेष. 

क्षी यांच्या राजवटीत सर्व अधिकार ते स्वतःकडे केंद्रित करीत आहेत, हे खरे आहे. मात्र चीनमध्ये ते खरोखरच इतके शक्तिशाली आहेत का? आणि असतील, तर त्यांची ही ताकद निश्चितपणे कशात आहे? याचे उत्तर असे आहे की, क्षी हे स्वतःच कम्युनिस्ट पक्षाचे अपत्य आहेत. चीनमध्ये कम्युनिस्ट पक्ष हाच केंद्रस्थानी आहे. सर्वांत बलवान व शक्तिमान संस्था म्हणजे हा पक्ष. क्षी सध्या त्या पक्षाचे सर्वेसर्वा आहेत, हे खरे. मात्र त्यांची सत्ता पक्षाच्या पारंपरिक पद्धतीनेच त्यांना वापरावी लागणार आहे. 1992 पासून दोन दशकांहून अधिक काळ- ते सत्तेत येईपर्यंत चीनमध्ये वार्षिक आर्थिक विकासदर सातत्याने 10 टक्क्यांपेक्षा जास्त राहिला आहे. 

अलीकडच्या काळात जागतिक अर्थव्यवस्था धीम्या गतीने वाटचाल करीत असताना चीनमध्येही विकासदर घसरतोय. चीन व अमेरिकेतील व्यापारयुद्धाचाही चीनच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. कम्युनिस्ट पक्षाला एक कळते की, जेव्हा जेव्हा आर्थिक विकासदर कमी होतो, अर्थव्यवस्था मंदावते, तेव्हा तेव्हा सामाजिक अस्वस्थता वाढते आणि सरकारविरोधातील विविध गटांचा विरोध वाढतो. लोकांमधील वाढती सुबत्ता व राहणीमानातील सुधारणा कम्युनिस्ट पक्षाला सत्तेचा नैतिक अधिकार, लेजिटमसी देतात. म्हणूनच क्षी यांच्या सत्तेच्या केंद्रीकरणाला काही मर्यादा आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे त्यांचे बलस्थान कम्युनिस्ट पक्ष आहे हे जितके खरे, तितकेच हा पक्षच त्यांची मर्यादा आहे, हेही खरे. हे समजावून घेतले म्हणजे त्यांच्या राजकारणाचा, धोरणांचा व त्यांच्या अजेंड्याचा मागोवा घेता येईल. 

सत्तेचे इतके मोठे केंद्रीकरण करून चीनमधील गुंतागुंतीच्या, प्रगत व आधुनिक अर्थव्यवस्थेचे व विकासाचे प्रश्न चीनला सोडविता येतील का? सर्वसाधारणपणे अनुभव असा आहे की- गुंतागुंतीची आणि मोठी अर्थव्यवस्था कार्यक्षमतेने चालवायची, तर लोकांना थोडे स्वातंत्र्य हवे आणि सत्तेचे थोडे विकेंद्रीकरण असयला हवे. सत्तेच्या केंद्रीकरणामुळे कार्यक्षमता काही काळापुरती प्राप्त करता येते. मात्र दीर्घ पल्ल्याच्या विकासासाठी विकेंद्रीकरण आवश्यक असते. क्षी यांच्या भ्रष्टाचारनिर्मूलन मोहिमेमुळे व त्यातील जाचक तरतुदींमुळे नव्या गुंतवणुकींचा वेग थोडा ओसरला आहे. सत्तेच्या केंद्रीकरणामुळे चीनच्या आर्थिक प्रगतीवर विपरीत परिणाम झाला आहे. 

चीनमध्ये ज्या गुंतवणूकदारांनी व देशांनी गुंतवणुका केल्या आहेत, त्यांच्याही काही तक्रारी आहेत. या बऱ्याच तक्रारी आयपीआर वा मार्केट नियमन या संदर्भात आहेत. ज्या समाजात सत्तेचे मोठे केंद्रीकरण होते आहे तिथे कायद्याचे राज्य प्रस्थापित करणे अवघड होते. क्षी यांनी इंटरनेटवर कडक नियंत्रण ठेवून माहितीचा प्रवाह व माहितीची देवाण-घेवाणही थांबवली आहे. चीनमधील विज्ञान व तंत्रज्ञानातील संशोधनासाठी व उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी हे घातक आहे. त्यामुळेच सध्या त्यांना राष्ट्रवाद महत्त्वाचा वाटतो का? भारताशी संघर्ष, दक्षिण चीन समुद्रातील हालचाली, अमेरिकेशी तणावपूर्ण स्पर्धा या साऱ्या बाबी म्हणजे माओंच्या पठडीतील राष्ट्रवादाची तर छेडून पक्षावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न आहे का? 

माओंचे राजकारण वरवर आयडियॉजिकल वाटले, तरी प्रत्यक्षात त्यांना तिसऱ्या जगाचे नेतृत्व करायचे होते. त्यांचे वारस शोभणारे क्षी जिनपिंग यांना तर पुढे जाऊन सर्व जगाचे नेतृत्व करायचे आहे. मात्र क्षी यांच्या सत्तेच्या केंद्रीकरणामुळे चीनच्या मर्यादाही यथावकाश अधोरेखित होत जातील, अशी परिस्थिती आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेला 2021 या वर्षांत 100 वर्षे पूर्ण होतील. या महत्त्वाच्या टप्प्यावर चीनचे स्वप्न साकार करण्यासाठी क्षी काय करतील, हे पाहणे उद्‌बोधक ठरेल. 

Tags: क्षी जिनपिंग डेंग सतीश बागल चिनी कम्युनिस्ट पक्ष माओ चीन china communist party deng and jinping china and world xi jinping mao Satish bagal China weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. सतीश बागल,  नाशिक
bagals89@gmail.com

लेखक माजी सनदी अधिकारी आहेत. 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात