डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आज 30 वर्षांनंतर तिआनमेन चौकातील ती हिंसक दृश्ये व त्या काळरात्रीच्या आठवणी पुसट झाल्या असल्या आणि त्या प्रसंगाचे वर्णन चिनी लोक आता केवळ एक राजकीय धुमश्चक्री असे करीत असले; तरी त्याचे दूरगामी परिणाम चिनी जनतेवर, प्रशासनावर व राजकारणावर झाले. या प्रसंगाने चीनमधील कम्युनिस्ट पक्ष विरोधी संघटित राजकीय चळवळ थंडावली. पक्षाला व सरकारला अजूनही विरोध होत असतोच; परंतु संघटित राजकीय बळ प्राप्त करून जोमाने एखादी चळवळ उभी राहावी असे होत नाही, किंबहुना होणारही नाही. राज्य व सरकारी यंत्रणा लष्करी बळाचा वापर करून राजकीय चळवळ कशी दडपून टाकू शकते, याचे ते एक प्रात्यक्षिक होते.

हु याओबांग यांच्या मृत्यूनंतर लोकशाही आणि स्वातंत्र्य या मागण्यांसाठी तिआनमेन चौकात विद्यार्थ्यांची जोरदार चळवळ सुरू झाली, त्याच वेळी 15 मे रोजी सोव्हिएत युनियनचे अध्यक्ष गोर्बाचेव्ह हे चीनमध्ये तीन दिवसांच्या भेटीवर येणार होते. ही भेट महत्त्वाची होती. चीन व रशिया यांच्यात गेली 25 वर्षे संघर्ष सुरू होता. चीन व अमेरिका यांच्यात 1972 मध्ये  संबंध प्रस्थापित झाल्यानंतर तर तो वाढला होता. गोर्बाचेव्ह यांच्या सुधारणावादी भूमिकेने रशिया व चीनमधील तीन दशकांतील तणाव समाप्त होत होता. रशियाने आपले सैन्य अफगाणिस्तानमधून परत घ्यावे, व्हिएतनामने कंबोडियामधून माघार घ्यावी, इत्यादी चीनच्या सर्व अटी मान्य होताना दिसत होत्या. डेंग यांच्या परदेश धोरणाचा हा विजयच होता. गोर्बाचेव्ह यांची बीजिंग भेट आंतरराष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाची असल्याने देशोदेशींचे पत्रकार बीजिंगमध्ये हजर होते. या भेटीचा प्रमुख समारंभ याच तिआनमेन चौकात होणार होता. या महत्त्वाच्या प्रसंगाला तिआनमेन चौकातील विद्यार्थ्यांच्या निदर्शनांचे गालबोट लागावे, हे काही योग्य नव्हते. 

दि. 4 मे रोजी झाओ यांच्या मवाळ व संवादी भाषणामुळे अनेक विद्यार्थी निदर्शने सोडून परतले; मात्र बीजिंगबाहेरून आलेले थोडे कडवे विद्यार्थी मात्र त्यांच्या निर्णयावर ठाम होते. अशा प्रसंगी काहीही झाले तरी विद्यार्थ्यांची निदर्शने व्हावयास नकोत, अशी डेंग यांची भूमिका होती. या उरलेल्या व बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांनी निदर्शनाचा एक भाग म्हणून आमरण उपोषण सुरू केले. वास्तविक पाहता, प्रत्यक्ष उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होती. तरीही या उपोषणामुळे निदर्शकांना व निदर्शनांना जनतेमधून मोठा पाठिंबा मिळू लागला होता. दि. 13 मे रोजी उपोषण सुरू झाले. पक्षाला हा एक धक्का होता. चीनमधील बुद्धिमंतांनी व विचारवंतांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. 

लोकशाहीची स्थापना ही हळूहळू क्रमवार होणारी गोष्ट आहे, अशी विद्यार्थ्यांची समजूत घालतानाच त्यांनी शासनावर कडक टीका केली; उलट विद्यार्थ्यांनी गोर्बाचेव्ह यांचा त्यांनी रशियामध्ये केलेल्या राजकीय सुधारणांचे कौतुक करीत, ‘लोकशाहीचे राजदूत’ असा गौरव केला. निदर्शकांबाबतच्या कार्यवाहीबाबत चर्चा करण्याचा मानस व्यक्त केला. डेंग यांनी झाओ यांच्याशी अशी चर्चा न करता दुपारी ठेवलेल्या पॉलिट ब्युरोच्या स्थायी समितीमध्येच चर्चा ठेवली. डेंग आणि झाओ यांच्यातील वाढता दुरावा अशा रीतीने छोट्या -छोट्या प्रसंगांतून व्यक्त होत होता. बैठकीत काय निर्णय व्हायला हवा याचा जणू डेंग यांनी संकेतच दिला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, म्हणून मार्शल लॉ लागू करून लष्कराला पाचारण करावे, असे मत या बैठकीत डेंग यांनी  दिले. बाकीच्या दोन्ही-तिन्ही सदस्यांनी त्याला पाठिंबा दिला व झाओ एकाकी पडले. मात्र तरीही झाओ झियांग मुळातच मवाळ असल्याने त्यांनी या कडक कारवाईस विरोध केला. आता त्यांच्यापुढे एकच पर्याय होता, सत्ता सोडण्याचा. 

दि. 17 मे रोजी सकाळी ते आपल्या सहकाऱ्यांसह तिआनमेन चौकात निदर्शकांना भेटायला गेले. त्यांनी परत एकदा निदर्शकांना निदर्शने बंद करण्याची विनंती केली. झाओ यांचे निदर्शकांपुढील भाषण जगभर प्रसिद्धीमाध्यमांतून दाखविले जात होते. झाओ यांचे हे अखेरचेच सार्वजनिक दर्शन होते. त्यानंतर त्यांना कुणीही कोणत्याही माध्यमात पाहिले नाही. परदेशस्थ मुलांशी व इतर कुटुंबीयांशी चर्चा व सल्ला-मसलत करून त्यांनी पदत्याग करण्याचा निर्णय घेतला होता. मार्शल लॉ लागू करण्याची कार्यवाही स्वतःहून करण्याचे मात्र त्यांनी नाकारले. राजीनामा दिला तर पक्षातील दुही चव्हाट्यावर येईल, म्हणून इतरांचा सल्ला ऐकून त्यांनी राजीनामा दिला नाही. झाओ झियांग यथावकाश केवळ बडतर्फच झाले नाहीत, तर त्यानंतर 2005 पर्यंत ते घरीच नजरकैदेत राहिले. त्यांना भेटणाऱ्या लोकांवरही भेटीची नियंत्रणे आली होती. या साऱ्या गडबडीत आता पक्षाच्या सेक्रेटरी जनरल पदावर कोणाला नेमायचे, याचाही विचार सुरू झाला. 

मार्शल लॉच्या अंमलबजावणीसाठी सीएमसीची (सेन्ट्रल मिलिटरी कमिशन) बैठक झाली आणि यांग शांगकेन यांनी मार्शल लॉची अंमलबजावणी करण्यासाठी 19 मे रोजी 50 हजार सैन्यदल तिआनमेन चौकात आणण्याचे आदेश दिले. गोर्बाचेव्ह दि. 18 मे रोजी  रशियाला परतले. मात्र मार्शल लॉचा अंमल सुरू होऊनही 22 मेपर्यंत निदर्शकांवर काहीही परिणाम झाला नाही. निदर्शने चालूच राहिली. सैन्यदलाची हालचाल तत्काळ सुरू झाली व रणगाड्यासह इतर दले बीजिंगकडे कूच करू लागली. मात्र कोणत्याही परिस्थितीत सैनिकांनी बळाचा वापर करू नये; विद्यार्थ्यांकडून, निदर्शकांकडून प्रक्षोभक व भडकावणाऱ्या शेरेबाजीकडे दुर्लक्ष करावे, असेही आदेश दिले गेले होते. सुरुवातीला निदर्शक घाबरले, मात्र पुढे निदर्शकांना साथ देणाऱ्या बीजिंगमधील सामान्य नागरिकांनी रस्त्यावर उतरून लष्कराचे रणगाडे अडविले, सैनिकांचा मार्ग रोखला व रेल्वे रुळावर ठिय्या देऊन रेल्वेगाड्या अडवल्या. पन्नास हजारांहून अधिक संख्येने असलेल्या सैन्यदलात बरेच सैनिक ग्रामीण भागातील युवक होते. ते यामुळे गोंधळून गेले. सैन्यदलाने माघार घेत बीजिंगबाहेर तळ ठोकला. निदर्शकांनी जल्लोष केला. मोठा इतिहास रचला जातोय असे सर्वसामान्य लोकांना वाटले. तर पक्षाची सत्तेवरील पकड सुटत असून चीनमध्ये अराजक माजेल अशी भीती डेंग व पक्षाच्या इतर वरिष्ठांना वाटू लागली. याच वेळी सैन्यदलाच्या आठ माजी जनरल्सनी अशा स्फोटक जनक्षोभाच्या वेळी सैन्यदलाचा वापर करणे टाळावे, असा सल्ला दिला. त्यामुळे वरिष्ठ नेते व डेंग यांनी पार्टीतील, शासनातील सर्व महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना परिस्थिती किती वाईट आहे आणि  सैन्यदलाचा वापर कसा अपरिहार्य झाला आहे, हे पटविण्याची धडक मोहीम सुरू केली. डेंग व झाओ यांचे महत्त्वाचे लोकशाही सुधारणावादी सहकारी वॅन ली अमेरिकेच्या दौऱ्यावरून परतत होते. ते पीपल्स काँग्रेसचे प्रमुख होते. प्रथम त्यांचा सैन्यदलाच्या वापराला विरोध होता. त्यांना बीजिंगला येऊ न देता परस्पर शांघायला नेण्यात आले आणि तिथे जियांग झेमिन व इतरांनी त्यांची योग्य समजून घातल्यानंतर आणि त्यांनी डेंग यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतरच त्यांना बीजिंगला जाऊ देण्यात आले.

विद्यार्थ्यांची निदर्शने सैन्यदलाचा वापर करून मोडून काढण्याची अशी तयारी सुरू असतानाच डेंग मात्र झाओ झियांग यांच्या जागी नव्या नेत्याची निवड करण्यात गुंतले होते. पार्टीचे नवे सेक्रेटरी जनरल व पॉलिट ब्युरोच्या स्टँडिंग कमिटीतील तीन नव्या सदस्यांची नेमणूक करण्यात आली. डेंग यांनी चेन युन व ली झियानिन या जुन्या वरिष्ठ नेत्यांच्या मदतीने शांघायमधील जियांग झेमिन यांची निवड पार्टीचे जनरल सेक्रेटरी म्हणून केली. जियांग झेमिन यांनी 1986 मध्ये शांघायमधील विद्यार्थ्यांची मोठी निदर्शने अतिशय कुशलतेने मोडून काढली होती. शिवाय पक्षातील मवाळ व इतर गटांचीही त्यांच्या नावाला सहमती मिळण्यासारखी होती. हु किली  (Hu Qili) यांच्या जागी ली रुईहुन (Li Ruihun) यांची पॉलिट ब्युरोच्या स्टँडींग कमिटीवर नेमणूक झाली. याशिवाय सॉग पिंग या हुषार व जाणत्या प्रशासकीय अधिकाऱ्याची नेमणूक झाली. पंतप्रधान ली पेंग व उपपंतप्रधान याओ यिलीन यांची समिती सदस्य म्हणून नेमणूक पूर्ववत्‌ राहिली.

तिकडे तिआनमेन चौकात विद्यार्थ्यांचा गोंधळ चालूच होता. आता तर त्यांनी अमेरिकेतील स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्यासारखा चिनी स्वातंत्र्यदेवतेचा एक पुतळा सेंट्रल ॲकॅडेमी ऑफ फाईन आटर्‌समधून तयार करून घेतला व तो निदर्शनाच्या ठिकाणी आणला. एव्हाना विद्यार्थ्यांच्या निदर्शनांचा जोर थोडा ओसरलेला वाटत होता, तरीही डेंग आपल्या निर्णयावर ठाम होते. सैन्यदलाचा वापर न करताही निदर्शक माघार घेणार असले, तरीही शासन यंत्रणेला गंभीर आव्हान दिले गेले होते. यावर निर्णायक बळाचा वापर झाला नसता तर सत्ता पक्षाच्या हातून निसटून गेली असती, हे ते जाणून होते. डेंग असे मानीत की काही राजकीय सुधारणा करणे व भ्रष्टाचारविरुद्ध पावले उचलणे आवश्यक आहे. मात्र समाजवादी विचारसरणीशी, पक्षाच्या हुकूमशाहीशी व मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट-माओवादी विचार-सरणीशी तडजोड करणे म्हणजे सत्ता घालविणे. 

एक लाख पन्नास हजार सैनिक विविध मार्गांनी, छोट्या-छोट्या गटाने, खासगी गाड्यांचा व ट्रकचा वापर करून शहरात शिरकाव करीत होते. तिआनमेन चौकाच्या आजूबाजूला सैन्याने घेरावच घातला. दि. 19 मे सामान्य माणसापुढे सैन्याला माघार घ्यावी लागली, ती पौर्णिमा होती. आज 3 जूनला अमावास्या असल्याने सैन्याची हालचाल फारशी दिसून येत नव्हती. दि. 2 जूनच्या रात्री जेव्हा सैन्यदलाच्या आर्मर्ड कोअरने शहरात प्रवेश केला, तेव्हा त्यांना लोकांकडून वा निदर्शकांकडून फारसा विरोध झाला. काही गाड्यांची जाळपोळ, सैनिकांवर हल्ले व हत्यारे पळविण्याचे प्रकार झाले. हे प्रकारदि. 3 जूनला संध्याकाळी  सुरू झाले व 4 जून सकाळपर्यंत सुरू राहिले. धुमश्चक्री सुरू झाली; मात्र सैन्यदलाने आता बेछूट गोळीबार करीत व गाड्या अडवणाऱ्या सामान्य माणसांची पर्वा न करता माणसे चिरडण्यास सुरुवात केली. लष्कराचा वापर करून हे आंदोलन चिरडून टाकल्याने मोठी मनुष्यहानी झाली. याबद्दल अनेक दावे केले गेले असून, त्यानुसार कमीत कमी 400 तर जास्तीत जास्त 2600 निदर्शक आणि काही सैनिक मारले गेले असावेत व काही हजार जखमी झाले. परंतु त्यातल्या त्यात 800 विद्यार्थी या आंदोलनात लष्कराकडून मारले गेले असावेत, असे समजले जाते. अनेक विद्यार्थिनेते, निदर्शक यांना अटक झाली. आंदोलन समाप्त झाल्यानंतर या आंदोलनाला मदत केल्याच्या आरोपावरून व संशयावरूनही अनेकांना अटक झाली. अनेक जण त्यानंतर 20-20 वर्षांपर्यंत तुरुंगात होते. काही तर अजूनही तुरुंगातच आहेत.

आज 30 वर्षांनंतर तिआनमेन चौकातील ती हिंसक दृश्ये व त्या काळरात्रीच्या आठवणी पुसट झाल्या असल्या आणि त्या प्रसंगाचे वर्णन चिनी लोक आता केवळ एक राजकीय धुमश्चक्री असे करीत असले; तरी त्याचे दूरगामी परिणाम चिनी जनतेवर, प्रशासनावर व राजकारणावर झाले. या प्रसंगाने चीनमधील कम्युनिस्ट पक्ष विरोधी संघटित राजकीय चळवळ थंडावली. पक्षाला व सरकारला अजूनही विरोध होत असतोच; परंतु संघटित राजकीय बळ प्राप्त करून जोमाने एखादी चळवळ उभी राहावी असे होत नाही, किंबहुना होणारही नाही. राज्य व सरकारी यंत्रणा लष्करी बळाचा वापर करून राजकीय चळवळ कशी दडपून टाकू शकते, याचे ते एक प्रात्यक्षिक होते. सन 1949 च्या क्रांतीत व कम्युनिस्ट पक्षात सामील झालेले विद्यार्थी हे तसे अनुभवी जाणते होते. त्या वेळी विद्यार्थ्यांच्या चळवळीला एक उद्दिष्ट, नेतृत्व व संघटन होते; आयडियॉलॉजी होती. 1960 व 1970 च्या दशकांतील सांस्कृतिक क्रांतीच्या दरम्यानही विद्यार्थी संघटनांमध्ये पक्षाच्या कडव्या सदस्यांची गुंडगिरी होती. परंतु संघटनेला व्यापक पाया व आयडियॉलॉजी होती, संघटना होती, नेतृत्वही होते. त्या मानाने 1989 मधील तिआनमेन चौकातील विद्यार्थी निदर्शकांना संघटन, निश्चित उद्दिष्ट वा नेतृत्व नव्हते. तेथील निदर्शक उत्स्फूर्तपणे चीनमधील विविध भागांतून, शहरांतून राजकीय बदलाची मागणी करण्यासाठी आले होते. ते पक्षातील विद्यार्थी निदर्शक नव्हते. त्यांच्या मागण्याही निश्चित नव्हत्या. भ्रष्टाचार, पार्टीची हडेलहप्पी, सामान्य माणसाचा अंतर्भाव नसलेल्या निर्णयप्रक्रिया, महागाई, बेकारी अशा अनेक प्रकारच्या अन्यायाविरुद्ध ते उभे होते. 

शिवाय लोकशाही व लोकशाही संस्थांची ते मागणी करीत होते. जनतेचा, बुद्धिमंतांचा सहभाग उत्स्फूर्त असला तरी दीर्घ काळ टिकणारा नव्हता. वास्तविक पाहता, न्यू लीप फॉरवर्ड आणि सांस्कृतिक क्रांती या काळातील हिंसा, क्रौर्य, दडपशाही व त्याच्या बळींची संख्या फार मोठी होती. मात्र 1950 वा 1970 च्या दशकात आंतरराष्ट्रीय टीव्ही नव्हता. 1989 मध्ये तिआनमेन चौकातील निदर्शने, चीनमधील घडामोडी व तेथील संघर्ष हे सारे पूर्णपणे टीव्हीवरून जगातील सर्व देशांमध्ये प्रसारित होत होते. जागतिक अनेक कीर्तीचे वृत्तपत्रकार या घटनांचे रिपोर्टिंग करण्यासाठी तिआनमेन चौकात ठिय्या देऊन बसले होते. शिवाय दहा वर्षांत 1978 नंतर अमेरिका व इतर पाश्चात्त्य देशांनी चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे शीत युद्धाच्या वातावरणात चीन-अमेरिका संबंध अनेक बाबतींत दृढ झाले होते. अमेरिकन जनतेच्या दृष्टीने तिआनमेन चौकातील हिंसा हा लोकशाही व उदारमतवाद यांच्यावरील हल्ला होता. त्यांच्या दृष्टीने कोणतीही हिंसा न करणाऱ्या व केवळ निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांविरूद्ध अशा रीतीने सैन्यदलाचा वापर करणे म्हणजे मूलभूत मानवी अधिकाराचे उल्लंघन होते. त्यामुळेच या प्रकाराने अमेरिका व चीन यातील दृढ संबंध दुरावले गेले आणि ते पुनःप्रस्थापित होण्यास वेळ लागला. 

परंतु महत्त्वाचा मुद्दा हा होता की, गेल्या दहा वर्षांत चीनने अधिक समृद्धीकडे वाटचाल केली असली तरी अनेक नवे प्रश्न निर्माण केले होते. खुला व्यापार, बाजारप्रणीत अर्थव्यवस्थेकडे टाकलेली दमदार पावले, उत्पादक व व्यापारी घटकांना दिलेले स्वातंत्र्य, हे सारे ठीक होते, परंतु बऱ्याच प्रमाणात या स्वातंत्र्याचा दुरुपयोग झाला होता, असमानता वाढली होती, भ्रष्टाचार वाढला होता. या पार्श्वभूमीवर सर्वच लोकांना बरोबर घेऊन जाईल, भ्रष्टाचार कमी असेल व खुल्या बाजारव्यवस्थेशी जमवून घेताना समाजातील दुर्बल घटकांचे जीवन थोडे अधिक सुसह्य होईल, अशा व्यवस्थेचा विचार होणे आवश्यक होते. त्यामुळे तिआनमेन प्रकरणाने पक्ष व सरकारमधील नेतृत्वापुढे एक नवे आव्हान उभे केले होते. त्या संदर्भात पुढील वाटचाल कशी करायची, याबद्दल गंभीर विचार होणे आवश्यक होते. तिआनमेन प्रकरण का घडले, हा प्रश्न महत्त्वाचा अशासाठी होता की, त्या प्रश्नाच्या उत्तरातूनच त्याने निर्माण केलेले प्रश्न पुढील काळात सोडवायचे होते. 

तिआनमेन प्रकरणावर बरेच उलट-सुलट लिखाण झाले आहे. डेंग यांनी 26 एप्रिल रोजी संपादकीय लेख लिहून निदर्शकांना जो निर्वाणीचा इशारा दिला, त्याने परिस्थिती चिघळली, असे म्हटले जाते. खरोखर ते आवश्यक होते का? थोडे सबुरीने घेऊन निदर्शकांशी संवाद करून हा प्रश्न सोडविला आला असता का? झाओ यांनी सुरुवातीपासूनच अनावश्यक मवाळपणा दाखविला का? त्यामुळे निदर्शकांना जास्त उत्तेजन दिले गेले का? ली पेंग यांचे टीकाकार म्हणतात की, त्यांनी अनावश्यक ताठरपणा दाखविला आणि वस्तुस्थिती आहे त्यापेक्षा खूप बिघडलेली आहे, असा अहवाल देऊन डेंग यांची दिशाभूल केली. असे अनेक प्रकारचे प्रश्न टीकाकार व अभ्यासक या संबंधात उपस्थित करतात. मात्र याबाबत साऱ्यांचे एकमत असते की- विद्यार्थी निदर्शक इतके गोंधळलेले, दिशाहीन व नेतृत्वहीन होते की, त्यांचे चळवळीवरील नियंत्रण पूर्णपणे सुटले होते. जगातली सर्व महत्त्वाची माध्यमे विद्यार्थ्यांच्या मागे लागून त्यांना सातत्याने केंद्रभागी ठेवण्याचा प्रयत्न करीत होती. त्यामुळे चळवळीतील तारतम्य नष्ट झाले, चळवळ भरकटली व परिस्थिती चिघळली. 

दहा वर्षांच्या सतत वेगवान व बदलत्या अर्थव्यवस्थेने साऱ्यांनाच अस्वस्थ केले होते. चलनवाढ, भाववाढ, भ्रष्टाचार व वाढती असमानता यांवर विद्यार्थी व सामान्य माणसाला काही तरी मार्ग शोधायचा होता. परंतु चिनी नेत्यांना व राज्यकर्त्यांना त्यावर मार्ग काढणे जमत नव्हते. भांडवलशाहीचे नवे मार्ग चोखाळले, परंतु मूळची साम्यवादाची जुनीच चौकट, विचार व कम्युनिस्ट पक्षाची एकाधिकारशाही तशीच राहिली. आर्थिक विकासासाठी थोडेसे कामचलाऊ स्वातंत्र्य दिले, परंतु राजकीय स्वातंत्र्याला मात्र विरोध झाला. आर्थिक सुधारणा हव्यात, मात्र राजकीय सुधारणा नकोत. आर्थिक प्रगती खूप हवी, त्यात सर्व लोकांना सामील करण्याची तयारीही होती; मात्र राजकारणात/प्रशासनात लोकांचा उत्स्फूर्त सहभाग नाकारायचा. भांडवलशाही मार्गाने लोकांचे राहणीमान वाढावे हे पक्षाला हवे होते; मात्र त्यासाठी आवश्यक असणारे किमान स्वातंत्र्य व राजकीय लोकशाही मात्र नको होती. या अनेक बाबींच्या विरोधाभासात एक तणाव होता. त्या तणावातून मोठा गोंधळ निर्माण झाला होता. डेंग यांना चीनमध्ये गोर्बाचेव्हच्या रशियाची पुनरावृत्ती नको होती. मात्र डेंग यांनी मार्शल लॉ पुकारून व प्रत्यक्ष सैन्यदल बीजिंगमध्ये उतरवूनही परिस्थिती बदलली नाही. विशेष म्हणजे, सामान्य जनताही लष्कराला भिडू पाहत होती व पक्षनेतृत्वाला आव्हान देत होती. इतर प्रांतांत व शहरांतही राजकीय अस्वस्थतेचे व निदर्शनांचे लोण पोहोचले होते. हे सर्व पाहता, 1989 मधील तिआनमेन प्रकरण अपरिहार्य झाले होते, हे मात्र खरे! 

चिनी राज्यकर्त्यांना व चिनी जनतेलाही तिआनमेनच्या त्रासदायक आठवणी नको असतात. त्याबद्दल कुठे चर्चाही कधी होत नाही. आधुनिक चीनच्या इतिहासात तिआनमेन प्रकरण, महत्त्वाचा टप्पा होता. आर्थिक सुधारणा करायच्या परंतु राजकीय सुधारणा करायच्या नाहीत, या भूमिकेतील तणावामुळे तिआनमेन घडले असे ढोबळ मानाने मान्य केले; तर या दोन धोरणांतील व भूमिकांतील तणाव कमी करणे, हे चिनी राज्यकर्त्यांच्या पुढे मोठे आव्हान होते. तिआनमेन प्रकरणाचे मोठे पडसाद 1990 च्या दशकात आंतरराष्ट्रीय राजकारणात उमटले. शिवाय चीनचे अंतर्गत राजकारण व अर्थकारणही कुंठित होऊ लागले. ही कोंडी फोडण्याचे आटोकाट प्रयत्न या दशकात चीनच्या नेतृत्वाने केले. मात्र, अर्थकारण व राजकारण यांतील तणाव कमी करण्यासाठी राज्यकर्त्यांनी काही प्रयत्न केले का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 

Tags: सतीश बगल चीन चीनी महासत्तेचा उदय satish bagal chini mahasattecha uday china revolution china weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. सतीश बागल,  नाशिक
bagals89@gmail.com

लेखक माजी सनदी अधिकारी आहेत. 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके