डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

'मेरे हिस्से की रोशनाई' : नूर जहीर. नूर जहीर ही सज्जाद जहीर या कम्युनिस्ट चळवळीत आयुष्य झोकून दिलेल्या कार्यकर्त्या लेखकाची धाकटी मुलगी. तिने आपल्या कुटुंबाच्या काही आठवणी दिल्या आहेत. सज्जाद जहीर यांच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष. याआधी त्यांच्यावर 'वसुधा' चा विशेषांकही आला आहे.

यारो, सितम अब न सहो, खोलो जुबां चूप न रहो । 
फिरका परस्तों से कहो, करते रहो मश्के सितम । 
हमने भी खायी है कसम, या तुम नहीं या हम नहीं ।

कैफी आजमींच्या या ओळी परवा एका कार्यक्रमप्रसंगी गणेश विसपुतेंनी मला आयत्या वेळी उपलब्ध करून दिल्या. आठवणीवर विसंबून त्या मिळाल्या असल्याने काही मागेपुढे असण्याची शक्यता आपण गृहीत धरू या. पण या घडीला त्यांचा आशय महत्त्वाचा आहे. मागील रोजनिशीत मी नर्मदा विस्थापितांच्या प्रश्नावर आमीर खान, अतुल कुलकर्णी यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले होते. घटनाक्रमाच्या मधल्या काळात आणखी पुढे गेलो आहे. गुजराथ राज्यात आमीर खानच्या चित्रपटांवर, जाहिरातीतील उत्पादनांवर बहिष्कार जाहीर झाला आहे. अर्थात इथेही जनतेचा संबंध कमी आणि मोदींच्या सरकारची अघोषित दहशत अधिक हे निखालस सत्य आहे. पुन्हा सरकार आपणच निवडून देतो. चांगला भाग म्हणजे आमीर खान आणि त्याचे सहकारी व्यावसायिक नफ्या-तोट्याची तमा न बाळगता आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांना पाठिंबाही वाढत आहे. त्यांची भूमिका आपणांसाठी अभिनंदनीय आहे. 

इतक्यात आणखी एक घटना घडली आहे. प्रमोद महाजन यांचा अकाली मृत्यू. त्यांच्या संदर्भात प्रसारमाध्यमांचा अतिरेक हा उघडच होता. हा अतिरेक लक्षात आणून देणारे मुकुंद टांकसाळे यांचे एक पत्र लोकसत्ता 8 मे 2006 मध्ये येताच त्यावर पुन्हा अकारण गदारोळ झाला आणि त्यांच्यावर अब्रनुकसानीचे खटले भरण्याच्या धमक्याही काही वाचकांनी दिल्या, म्हणजे आमच्या समाजाला आता नीतिमत्तेचेच वावडे झाले आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अर्थात आता प्रमोद महाजनांच्या मरणानंतर एका महिन्यातच परिस्थितीने आणखी केविलवाणी वळणे घेतली आहेत. एका परीने मुकुंद टांकसाळेंच्या विधानांची सत्यता पटवणारेच तपशील पुढे येत आहेत. त्यानंतर लोकसत्तेच्याच 12 मे च्या अंकात डॉ. विजया पाटील यांचा एक लेख आहे. तोही आपण अवश्य वाचावा.

आता राहुल महाजनांच्या 'कोकेन' चर्चेनंतर त्या लेखाचे महत्त्व अधिकच आहे. मुकुंद टांकसाळे साधारणत: आपले मतभेद तात्काळ लोकांसमोर आणतात. त्याआधी 29 जानेवारी 2006च्या लोकसत्तातच त्यांचा 'लाख चुका असतील केल्या... सो व्हॉट' असा एक लेख 'पेंग्विन'च्या मराठी प्रकाशनातल्या प्रवेशावर आला होता. खेद फक्त याचा की यावरची तातडीची प्रतिक्रिया निदान आमच्यासारख्या मित्रांची यायला हवी. ती माझ्या हातून तर झाली नाहीच. पण आत्ता ऐन जोशात असणाऱ्या आपल्या अनेक मित्रांकडूनही आली नाही. हे असे गप्प बसणे आमच्या चळवळीच्या काळात नक्कीच होत नव्हते. वातावरणातला हा बदल केवळ उदासी इतकाच नसावा. बदलत्या काळात ज्याची झळ थेट आपल्या कातडीपर्यंत पोचत नाही त्यावर प्रतिक्रिया देण्याचा प्रश्नच नाही, या भूमिकेशी संबंधित आहे. दहशती पसरवणारे संघटित आणि त्याखाली वावरणारे आपापल्या घरट्यात सुखनिद्रेत निवांत. हे वातावरण खेदजनक आहे. 

कैफी आजमींच्या ओळींना आपण यासाठी तरी उजाळा देऊ या. कैफी आजमी हे कम्युनिस्ट होते. मेंदूने आणि हृदयाने. हे मी आवर्जून सांगतो आहे. कारण मी त्याचे अनुभव गाठीशी बांधले आहेत. त्यांच्याविषयीच्या आठवणी त्यांची पत्नी शौकत आजमीने ग्रंथबद्ध केल्या आहेत. त्या मला अजून वाचता आलेल्या नाहीत. पण आशच आणखी एका कम्युनिस्ट माणसाविषयीच्या आठवणी आपल्यासमोर आल्या आहेत. माणूस मुंबईकरांच्या आधीच्या पिढीला कितीतरी आपला वाटणारा; कॉम्रेड जी. एल. रेड्डी. आठवणींचे पुस्तक आकाराने लहान आहे. तारा रेड्डी आपल्यात नाहीत.

जी. एल. ऊर्फ अण्णा आपल्यात आहेत, पण त्यांच्या काळाच्या आठवणी ग्रंथित कराव्यात इतके ते आज स्मृतीने सक्षम नाहीत. प्रकाश देशमुखने त्याच्या छोट्या 48 पानी चरित्रात चांगला प्रयत्न केला आहे. पण अजून खूप तपशिलात हा माणूस आणि त्याचे कम्युनिस्ट असणे तपासायला हवे. 'कॉम्रेड जी. एल. ऊर्फ लढाऊ अण्णा रेड्डी' या चरित्राला डॉ. रवी बापट या आम्हा सर्वांच्या डॉक्टर मित्राने प्रस्तावना लिहिली आहे. ती या संदर्भात खूप बोलकी आहे. आणि आत्ता डॉ. रवी बापट यांचेही आठवणींचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्याचा काही भाग प्रकाशनाआधीच वाचला आहे. आता पुस्तकच वाचायचे आहे. 

कम्युनिस्टांच्या जगण्याविषयी, त्यांच्या वैचारिक बांधिलकीविषयी, त्यांच्या आजच्या ऱ्हासकाळातल्या स्वच्छ चारित्र्याविषयी त्यांचे वैचारिक विरोधकही आदर व्यक्त करतात. कम्युनिस्टांना हे असे प्रतिकूल परिस्थितीतही ताठ कण्याने जगण्याचे बळ कोठून मिळते याचा आपण सगळ्यांनीच निरोगी मनाने विचार करावा. 

हे असे वाचत असतानाच बळवंत जेऊरकर या माझ्या तरुण कविमित्राने दिल्लीच्या जागतिक ग्रंथमेळ्यातून खास माझ्याकरता एक पुस्तक आणले. 'मेरे हिस्से की रोशनाई' : नूर जहीर. नूर जहीर ही सज्जाद जहीर या कम्युनिस्ट चळवळीत आयुष्य झोकून दिलेल्या कार्यकर्त्या लेखकाची धाकटी मुलगी. तिने आपल्या कुटुंबाच्या काही आठवणी दिल्या आहेत. सज्जाद जहीर यांच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष. याआधी त्यांच्यावर 'वसुधा' चा विशेषांकही आला आहे. कम्युनिस्टांच्या कुटुंबियांनाही सगळे अंगावर घेत सोसावे लागते. सज्जाद जहीर स्वत: श्रीमंत, खानदानी मुसलमान कुटुंबातले. एक भाऊ तर थेट उत्तर प्रदेश सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री. नूर जहीरच्या आठवणी मराठीत याव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्या लवकर याव्यात. या आठवणीत प्रसंगाची विविधता आहे. आप्तांचे वर्तन, पक्षातले संघर्ष, साहित्यिकांचे दंभ, वाट्याला येणाऱ्या विविध जबाबदाऱ्या, कुटुंबियांची पाहावी लागलेली यातायात आणि या सगळ्यात आपल्या वैचारिक निष्ठेचा विलक्षण आधार घेत हा माणूस आपले माणूसपण अबाधित ठेवत जगला. त्याला वाचायची संधी मराठी वाचकांना लवकर मिळो. ग्रंथप्रेम, ग्रंथ खरेदी आणि ग्रंथ सहवास या संदर्भातल्या नूर जहीरच्या आठवणी तर मला फारच भिडल्या. असो.

कैफी आजमीच्या ओळींची सोबत करत हे इतके आपल्यापर्यंत आणता आले. याचा आनंद आहे. आत्मचरित्र आणि आत्मचरित्राला जवळचे लेखन यातून तूर्तास तरी सुटका दिसत नाही. आत्मचरित्राला जवळ जाणारा एक काहीसा निराळा ग्रंथ या काळात हाताशी आला. 'अनुवाद, वर्णव्यवस्था आणि मी'. डॉ. सूर्यनारायण रणसुभे यांचा हा ग्रंथ एका अनुवादकाचे आत्मचरित्र असावे असाच आहे. डॉ. रणसुभेचे उपजीविकेच्या पलीकडचे आवडीचे कार्यक्षेत्र म्हणजे हिंदी-मराठी, मराठी-हिंदी अशा दुहेरी अनुवाद कृतींचे. या कृतींचा तटस्थ आणि विनम्र आढावा त्यांनी घेतला आहे. अनुवाद कृतींचा तांत्रिक विद्यापीठीय शिरस्तीत घेतलेला आढावा आपल्या ओळखीचा असतो. पण अनुवादकृती ही एक वेगळ्या अंगाने साहित्य व्यवहाराच्या भूमीवरची सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय लढाईही असते याचे वेगळे भान अधोरेखित करण्याचे काम डॉ. रणसुभेंच्या या ग्रंथाने केले आहे. 'अनुवाद, वर्णव्यवस्था आणि मी' हे ग्रंथनामच आपल्या परिचित विचारांना धक्का आणि छेद देणारे आहे. यामागचे खूप तपशील डॉ. रणसुभेच्या स्वानुभवाचा आधार घेऊन आपल्यासमोर आले आहेत. 

'अनुवाद आणि वर्णव्यवस्था अर्थात अनुवादाचे समाजशास्त्र', 'अनुवाद आणि संस्कृती' आणि 'अनुवाद : कशासाठी आणि का?' या पहिल्या तीन प्रकरणांत रणसुभे यांनी अनुवादासंदर्भात तीन प्रमेये मांडली आहेत. ती अशी; या देशात अनुवाद प्रक्रियेस वर्णव्यवस्थेमुळे खीळ बसली; वर्णव्यवस्था नाही तेथे अनुवाद भरपूर प्रमाणात होतात; वर्णव्यवस्थेच्या विरोधात बंडखोरी सुरू होते तेव्हा अनुवाद मोठ्या प्रमाणात होऊ लागतात. या तिन्ही प्रमेयांच्या सिद्धतेसाठी त्यांनी मराठी आणि भारतीय पातळीवरचा साहित्य व्यवहाराचा इतिहास तपासला आहे. अनुवाद करतानाचे त्यांचे विविध कष्टदायी अनुभवही अनुवाद करू पाहणाऱ्या कोणालाही त्याच्या जबाबदारीचे भान देतील. 

कर्नाटक सरकारच्या सांस्कृतिक विभागाने बसवेश्वरांच्या वचनांचा अनुवाद हिंदीतून प्रकाशित केला आहे. त्यामागची कर्नाटक सरकारची स्वभाषेतील साहित्याला भारतीय पातळीवर नेण्यामागची आच अधोरेखित करतानाच आपल्या महाराष्ट्र सरकारच्या अशा कामांची रणसुभे यांनी केलेली तपासणी आपण अवश्य पाहावी. 

वाचले आहेत आणि त्यांवर भरभरून बोलायला हवे असे काही कवितासंग्रह, काही कवितेवर ग्रंथ, काही अन्य भाषेतले वाचन हाताशी आहे. मित्र नवेनवे सुचवीत आहेत. त्या सगळ्याचा मेळ जमवणे तसे कठीणच आहे. तरीही आपण सगळ्यांवरचे प्रेम आणि आपण काही वाचत जावे यासाठी काम करतच आहे. तूर्तास इतकेच. आमेन.

Tags: वर्णव्यवस्था आत्मचरित्र कम्युनिझम अनुवाद वाचन Autobiography Kaifi Aami Communism Translation Reading weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके