डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

वाचनातील सामूहिकता पहिल्यासारखी राहिली नाही!

वाचनातील सामूहिकता पहिल्यासारखी राहिली नाही. आम्हा सगळ्या मित्रांच्या एकूण वाचनाचा परस्परांना होणारा लाभ कमी झाला. पाहता पाहता आम्ही प्रस्थापित झालो नसतो, तरी साहित्यव्यवहाराच्या मुख्य धारेत आमचा छोटा-मोठा सहभाग सुरू झाला. साहित्यव्यवहाराशी संबंधित संस्थांत कामाच्या जबाबदाऱ्या आल्या. प्रस्थापित होण्याचा स्वभाव नसला तरी काही गोष्टी अंगावर आल्या.

एकटा माणूस वाचून वाचून किती वाचणार, त्याच्या वाचनावर वेळेची मर्यादा तर येणारच. ती आहेच. माझ्या एका जवळच्या मित्राची यावरील प्रतिक्रिया महत्त्वाची. आपण एकूण अ' इतके वाचले. तर अ' वगळता बाकीचे वाचायचे राहून गेले. हे तसे सहज आणि बरोबरही आहे. पण आता इतक्या वर्षांच्या वाचनानंतर आपल्या आधीच्या वाचनाकडे मागे वळून पहावे तर आणखीही काही गोष्टी जाणवतात.

आपल्या अवतीभोवतीच्या परिसरात, आपल्या जवळच्या मित्रांत वाचाणारांची संख्या बऱ्यापैकी असली तर त्यांनी वाचलेल्या ग्रंथांचा आपल्या वाचनासाठी उपयोग होतो. मग अशा अनेकांनी मिळून वाचलेल्या एकूण अचा विस्तार मोठा होतो. आता या पातळीवर मी माझ्या पूर्वायुष्याकडे वळतो, तेव्हा त्या काळातले मित्र आठवतात. वाचनाचा पहिला टप्पा वयाच्या विशीपासून साधारण चाळिशीपर्यंतचा. काळ साधारण 1960 65 ते 1980 पर्यंतचा. या काळात आम्हा मित्रांत वाचनावर चर्चा व्हायच्या. परस्परांत पुस्तकांची देवघेव व्हायची. प्रसंगी परस्परांच्या मदतीने पुस्तके विकतही घेतली जायची. ग्रंथसंग्रहाचा तो आरंभीचा काळ खरेदी केलेल्या ग्रंथांच्या वाचनाचाही असायचा. शिवाय वाचनालयातून बसून ग्रंथ वाचण्याचाही तो काळ होता. मराठी वाचन अधिक होते; पण इंग्रजी आणि हिंदी याही भाषांवर नजर होती. मित्रांत इंग्रजी आणि हिंदी जाणणारे मित्र होते. या दोन्ही भाषांच्या माध्यमातून भारतातील अन्य भाषा आणि विदेशी भाषांतील साहित्याशी परिचय होत होता. सोव्हिएत प्रकाशनातून रशियन साहित्य खडबडीत मराठीत का होईना, पण हाताशी येत होते.

1980 नंतर पहिल्या वळणावरचे काही मित्र वेगवेगळ्या कारणांनी दूर झाले. संपर्क इतका उरला नाही. पण या दुसऱ्या वळणावर काही नवे मित्र जोडता आले. काही आधीचे होतेच. याही काळात मित्र होण्यात आणि मित्र म्हणून टिकून राहण्यात वाचन हा घटक सर्वाधिक नसला तरी खूपच महत्त्वाचा घटक होता, असे आता इतक्या वर्षांनी मागे वळून पाहताना प्रकर्षाने जाणवते. नावे सगळी तुमच्यासमोर ठेवत नाही. पण एक अशा मित्रांची यादी मी स्वतःसाठी तयार केली. ती जवळपास वीसचा तरी आकडा ओलांडणारी निघाली. आता इतके वाचणारे निकट असणे ही मोलाचीच गोष्ट झाली. यात पुन्हा हे सगळे केवळ ग्रंथ वाचून हातावेगळे करणारे नव्हते. ते त्यांच्या त्यांच्या परीने ग्रंथसंग्रहातही गुंतलेले होते. आम्हा सगळ्यांनाच परस्परांच्या वाचनाचा लाभ घेता येत होता. रात्री बेरात्री, भल्या पहाटे मित्रांना झोपेतून उठवून वाचलेल्या ग्रंथाचा आनंद वाटून घेता येत होता. तोवर घरात दूरध्वनी आला होता. भेट नंतर व्हायची, पण उत्कट संवाद भेटीआधी दूरध्वनीवरून व्हायचा, मित्रांचे भेटणेही जवळपास दैनंदिन व्हायचे. संध्याकाळी एकत्र जायच्या आणि त्याही वेळेत वाचन चर्चेत अग्रक्रमाने असावचे. मित्र असण्याची एक अट आणि खूण वाचन हीच असावी, अशा त्या काळात वाचनाला वेगही आला होता. उपजीविकेची साधने स्थिर होती.

आर्थिक स्तर पहिल्याहून वरा आला होता. ग्रंथखरेदी आणि ग्रंथवाचन याचा सपाटा या काळात झपाटल्यासारखा होता. काही मित्र मुंबईपासून दूर होते, ते भेटत नसत, पण भेट व्हायची तेव्हा चर्चा आणि देवाणघेवाण वाचनाच्या संदर्भातच अधिक असायची. हा काळ जवळपास वीस वर्षांचा म्हणजे 2000च्या आसपास थांबतो. या काळाच्या अखेरच्या टप्प्यावर दोन ग्रंथसंग्राहक मित्र आमच्यातून निघून गेले. त्यांच्या मरणाचा धक्का सहन करण्यापलीकडचा होता. काही काळ पुस्तकांच्या, दुकानांच्या भेटीही थांबल्या. वाचनावर रात्रीच्या जागरणांवर, संध्याकाळच्या भेटींवर, त्या भेटीत होणाऱ्या प्रदीर्घ चर्चांवर मर्यादा आल्या. काही आपल्या शरीराच्या तर काही भोवतालच्या परिस्थितीच्या होत्या.

आता यानंतरच्या काळात वाचनातील सामूहिकता पहिल्यासारखी राहिली नाही. आम्हा सगळ्या मित्रांच्या एकूण वाचनाचा परस्परांना होणारा लाभ कमी झाला. पाहता पाहता आम्ही प्रस्थापित झालो नसतो, तरी साहित्यव्यवहाराच्या मुख्य धारेत आमचा छोटा-मोठा सहभाग सुरू झाला. साहित्यव्यवहाराशी संबंधित संस्थांत कामाच्या जबाबदाऱ्या आल्या. प्रस्थापित होण्याचा स्वभाव नसला तरी काही गोष्टी अंगावर आल्या. हे लहानमोठ्या प्रमाणात सगळ्याच मित्रांचे झाले. वाचलेल्यावर उत्स्फूर्त प्रतिसाद यावा हे पहिल्यासारखे सोपे राहिले नाही. आपल्या प्रतिसादांची काय प्रतिक्रिया येईल वाचा विचार सुरू झाला. याचा परिणाम संवादावर होणे साहजिकच होते. आणि अशा अडखळत चाललेल्या संवादाचा वाचनावर निदानपक्षी मराठी साहित्याच्या वाचनावर.

एकट्याचे वाचन हे आता क्रमाक्रमाने एकट्याचेच होत जाण्याच्या या प्रक्रियेत काही वाचायचे हुकते. तर असे हुकलेल्या वाचनातले एक आहे सुमा करंदीकरांचे 'रास' हे विंदा करंदीकरांसोबतच्या सहजीवनाच्या आठवणींचे पुस्तक. ज्ञानपीठ पुरस्काराच्या निमित्ताने अनेकजण करंदीकरांच्या पुस्तकाकडे वळले. हेही पुरस्काराचे एक फलितच. तर अशाच एका मित्राने 'रास' वाचायला दिले. विंदांना समजून घेण्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे. काहीसे लक्ष्मीबाई टिककांच्या आठवणीतून रेव्हरंड ना. वा. टिळकांना समजून घ्यावे तसे. प्रांजळ आणि फटकळ आठवणी. पुस्तक आपण अगदी अवश्य वाचा. आजवर वाचले नसते तर. मला मात्र वेगळ्या प्रश्नाने आणखी छळले आहे. आपल्या हातून या पुस्तकाचे वाचन का हुकले? एक कारण आपण मनात घट्ट केलेली गृहितके.

आधी आहे मनोहर तरी हे पु. ल. देशपांडेंसोबतच्या सहजीवनाशी संबंधित पुस्तक आले. चांगले चर्चेत राहिले. विद्याधर पुंडलिक, मंगेश पाडगावकर यांच्या सहजीवनाशी संबंधित पुस्तके, का कोण जाणे याचनात मला काही गुंतता आले नाही. तसेच 'रास’ चे झाले. पण आता खूप उशीराने का होईना ते वाचनात आले. 'वाचना'तल्या मित्र परिवाराबाहेरच्या मित्रांकडून, सुमा करंदीकर आयुष्यातल्या अनेक प्रसंगावर प्रांजळ आणि सहज बोलतात. विंदांची आणि त्यांची वैचारिक बैठक पार निराळी आणि तरीही संसार आहेच. वाचता वाचता मला माझाही संसार आठवत होता. जगण्यातले अंतर्विरोध कळत होते. तुम्हांला सांगावेसे वाटते की हे पुस्तक अवश्य वाचा. प्रसंग तर त्यात अनेक आहेत. 'चमत्कारा'वरचे विंदांचे भाष्य आहे. आणि घरात स्वीकारलेल्या मोलकरणीला कुष्ठरोग आहे हे कळल्यानंतरच्या वागण्यावरचा कबुलीजवाब आहे. तसेच चिं. त्र्यं. खानोलकरांची रत्नागिरीतील समुद्रावरची भेट आणि त्यावरील विंदांची प्रतिक्रिया, त्यानंतर एकदा विंदांच्या तुझ्या या वागण्याने मला क्षय होईल' या उद्गारानंतरची तिखट प्रतिक्रिया तसेच तिचा उत्तरार्ध है सारेच तुम्ही मुळातून वाचा. खरे तर विंदांना ज्ञानपीठ मिळाल्यावर यातील खांडेकरांच्या ज्ञानपीठ पुरस्काराच्या बातमीवरची आठवण कुणीतरी प्रसिद्ध करायला हवी होती. कोणी प्रसिद्ध केली असली तर ती माझ्या वाचनातून हुकली असे समजून मला माफ करा.

आता एक हुकलेला लेखक, उत्तम कांबळे. त्याची आता एकाच दमात चार पुस्तके वाचली. 'वाट तुडवताना', ‘कुंभमेळ्यात भैरू', 'निवडणुकीत भैरू’ आणि 'जागतिकीकरणात माझी कविता’, उत्तम कांबळे सकाळच्या नाशिक आवृत्तीचा संपादक, चळवळीतला कार्यकर्ता म्हणून त्याची ओळख होती. लेखक-प्रकाशक अशा नात्यानेही त्याचा संबंध आला होता. 'वाट तुडवताना' मे 2003 मधले प्रकाशित आत्मकथन आता जवळपास तीन वर्षानंतर हाती यावे, हे काही खरे नाही. शिवाय यातला मजकूर त्याआधीच 'ग्रंथपरिवार' या मासिकात 'माझे वाचन माझे जीवन यात सदर लेखन म्हणून आला होता. तोही पाहण्यात आला नाही. आपल्या वाचनाचे काही खरे नाही असे मला कळवळून सांगावे असे वाटत आहे. निदान मनावरचा भार हलका करण्यासाठी. 'वाचणाऱ्याचे' हे सलग आत्मकथन आपण अवश्य वाचा.

कविता आतवर रिचवायला जरा अधिकच वेळ लागतो. त्यामुळे ‘जागतिकीकरणात माझी कविता' पुन्हा थांबून थांबूनच वाचायला हवी. उरलेली दोन पुस्तके ही त्याच्या व्यवसायाशी संबंधित सदर लेखनाथी आहेत. कुंभमेळा आणि मागील सार्वत्रिक निवडणूक, तिथेही उत्तम कांबळेचा त्या सदरासाठीचा अभ्यास, त्याची निरीक्षणे, त्याचे निदान हे पाहण्यासारखे आहे. पण खास आहेत तो त्याचा नायक-निवेदक वेश, हा सर्वसाधारण मध्यमवर्गीय माणूस. आर. के. लक्ष्मणच्या कॉमन मॅनच्या जातीचा. भैस, त्याची पत्नी आणि मुलगा यांच्यातले संवाद हा उत्तम कांबळेचा खास निर्मितीप्रदेश, 'जादूचा राक्षस' आणि 'शनिमहात्म्या'पासून वाचनाला आरंभ करीत उत्तम कांबळे 30 एप्रिल 1994 रोजी सकाळच्या नाशिक आवृत्तीचा संपादक झाला. इथंपर्यंतचा त्याचा वाचनप्रवास 'वाट तुडवताना’ या वाचकाच्या आत्मकथनात आला आहे. ग्रंथाच्या आरंभीची अर्पणपत्रिका अशी आहे... मी निघालो आहे वाट तुडवत... या वाटेवर मला कधी आई-वडिलांच्या, कधी शिक्षकांच्या. कधी मिश्रांच्या तर कधी तत्त्ववेत्त्याच्या रूपात भेटलेल्या असंख्य ग्रंथांना, हा छोटासा ग्रंथ अर्पण करतो आहे...' ग्रंथ माणसांना घडवतातच असा ठाम विश्वास बाळगून आणि त्या कथनाची नांदी आहे... “ज्या व्यवस्थेनं इतिहास दिलेला नसतो. भूगोल दिलेला नसतो. चालण्यासाठी चांगला वर्तमानही दिलेला नसतो, अशा माणसांना ग्रंथ उपयोगी पडतात... माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मी ग्रंथांच्या गावात गेलो नसतो तर गावगाड्यातच राहिलो असतो." आणि आत्मकथनाचे भरतवाक्य आहे. "माझ्या जगण्यात ग्रंथांचा वाटा प्रचंड मोठा... मोजता येणार नाही इतका मोठा, माझ्यावर सावलीही ग्रंथांची आणि माझे हातही ग्रंथांच्याच हातात... मोठ्या विश्वासानं गुंतलेले. मला वाचवण्यासाठी अजून वाचायचे आहे."

उत्तम कांबळेच्या आत्मकथनात खूप गोष्टी आल्या आहेत. 'सकाळ पर्यंतच्या प्रवासात कितीतरी विष त्याने पचवले आहे. आणि तरीही आपल्या भूमिकेवर ठाम राहूनही त्याने समाजाच्या बऱ्या-वाईट वर्तनाकडे कमालीच्या समंजसपणाने आणि अंतरीच्या कळवळ्याने पाहिले आहे. त्या सगळ्याला न्याय द्यावा, असा माझ्या लेखनाला उपलब्ध अवकाश नाही आणि माझा तो हेतूही नाही. आपण तो ग्रंथ वाचावा आणि माझ्यासारखेच अस्वस्थ व्हावे.

'रास’ आणि विशेषतः 'वाट तुडवताना' या दोन्ही ग्रंथांच्या वाचनाने मी माझ्याकडे, माझ्या बालपणाकडे, पत्नीबरोबरच्या सहजीवनाकडे आणि माझ्या भोवतालकडे, आधीहून अधिकच डोळस होऊन पाहू शकलो हा माझा मोटाच लाभ झाला, वाचनाकडून मी आणखी वेगळे काय मागत असतो? आमेन!"

Tags: वाचनातील सामुहीकता वाचक व्यवहार मराठी वाचक Literature Reading Marathi Books Reading weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके