डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

“यशस्वी होण्याचा मार्ग एकच; आपण यशाच्या पाठीमागे न धावणं” - कमल देसाई

दिवाळी अंकांचा हा खास मराठी भाषेतला उत्सव मला महत्त्वाचा वाटतो. शिवाय दरवर्षी त्यात होणारी वाढ आणि एकूण प्रकाशित लेखनातला त्याचा गंभीर वाटा वाढतानाही दिसतो आहे. ‘साधना’चा मजकूर दोन अंकांत विभागला जावा इतक्या मेहनतीचा आहे. ‘चिन्ह’, ‘शब्द’, ‘मौज’या अंकांमध्ये अंतर्भूत असलेल्या अनेक चित्रकारांच्या कलाकृतींच्या आर्टप्लेटस्, ‘खेळ’, ‘दर्शन’, ‘चिन्ह’, ‘आशय’, ‘शब्द’, ‘वसा’या अंकांची मुखपृष्ठे हे सारे आपण डोळ्यात साठवावे असे आहे. ‘शब्द’च्या मुखपृष्ठासाठी प्रभाकर कोलते यांनी ‘तिचे रजत सिंहासन’ही जोगेन चौधरींची कलाकृती निवडली होती. ती बदलली आहे. बदलामागचा खुलासाही संपादकांनी दिला आहे; “बेलगाम आणि अकारण, निव्वळ धाडसासाठी धाडस हे कलाविचारात अप्रस्तुत ठरते असे आम्ही मानतो.”त्यांची ही भूमिका स्वीकारूनही या चित्रावर आपण अन्याय करत आहोत असे मला वाटते. आपण आपले मतही अवश्य कळवावे.

प्रश्न जनसामान्यांचा आहे. त्यांनी जागतिकीकरणाला निमंत्रण दिलेलं नाहीय, पण त्याला सामोरं जाणं या फार मोठ्या समूहाला भाग आहे. ते करताना आपली भाषा, संस्कृती, मूल्ये यांचाच त्यांना आधार आहे. आणखी वेगळा रस्ता त्यांना उपलब्ध नाहीय. इंग्रजीच्या पोटात शिरण्याची कुवत त्यांच्यात नाहीय. ते लिखित मराठीत शिकूनच मुळात एखाद-दोन पिढ्या झाल्यात. त्यापल्याड त्यांच्या कैक पटीने असेही लोक आहेत, जे लिखित मराठीतही अद्याप आलेले नाहीत. अशा अडाणी माणसांना टिकण्यासाठी, त्यांची इच्छा असो वा नसो; आपली भाषा, मूल्ये आणि संस्कृती यांचेच बळ वापरावे लागणार. ते तसं करतील. एका प्रकारे आपलं मराठीपण सांडलेल्या भद्र जनांना त्यांच्या मराठीपणाची जाणीवही हेच लोक देणार आहेत. आपलं मराठीपण टिकवणं व ते वापरून भद्रजनांना मराठी ठेवणं असं दुहेरी आव्हान गरीब मराठी भाषा लोकांपुढं आहे... प्रश्न लेखकांचा आहे.त्यांनी स्वत:ला कोणाशी जोडून घ्यायचं हा आहे. लेखकाचं नातं दुःखाशी, वेदनेशी असतं असं म्हणतात, तर स्वाभाविकच त्यानं या वर्गाशी स्वत:ला जोडलं पाहिजे.त्यांच्या जगण्याला त्यानं स्वर दिला पाहिजे... सजग आणि आस्थाशील चित्रण करणारा लेखकच मोठं काही निर्माण करू शकेल. तो आजच्या अशिक्षित, अल्पशिक्षित गटांमधून, स्त्रियांमधून, भटक्या-विमुक्तांमधूनच येईल. कारण आपल्या भाषा आणि संस्कृती यांचं अजून प्रकट न झालेलं केवढं तरी मोठं सुप्त संचित या गटांमध्ये निद्रिस्त आहे. आपल्याला आपलं मराठीपण टिकवावंच लागेल. कारण आणखी वेगळ्या रस्त्यानं हे शोषित समूह आपल्याला जाऊच देणार नाहीत.

- रंगनाथ पठारे 
‘मराठी साहित्याचे भवितव्य’सर्वधारा ४.

आपल्याला मांडायचे आहे आणि आपल्या मर्यादांनी ते मांडता येत नाही, असे काही आपल्या भोवतीच्या कोणी मांडले की मला मनापासून आनंद होतो. तसा आनंद मला या लेखाने दिला आहे. हे असे कवितेसंदर्भातही झाले आहे.आता अरुण काळेच्या ‘शब्द’दिवाळी अंकात आणि अन्यत्रही आलेल्या कविता मला असाच आपण लिहिल्याचा आनंद देतात. किंबहुना हे जरा अधिकच होते आणि मग आता जितके चांगले, जितक्या विपुल संख्येने मराठी कवी कविता लिहीतच आहेत, आपल्याच मनातले बोलत आहेत तर आपण नाही लिहिले तरी चालेल अशा विचाराने डोळे भरून येतात.असा सुपीक काळ आपल्या उतरत्या दिवसांत पाहताना बरेवाटते. अर्थात माझ्या तरुण मित्रांना हे आवडत नाही. ही सबब उलथवून मी लिहायला हवे हा त्यांचा आग्रह मीही आजवरच्या नम्रतेतून स्वीकारतो. असो. मुद्दा आहे. तो रंगनाथ पठारेचा हा लेख आपण आपलासा करावा.

असाच आणखी एक लेख आला आहे. ‘आजचा सुधारक’ च्या नोव्हेंबर ०७च्या अंकात. ‘मराठी साहित्य विश्व : एक विश्लेषण’- श्रीकांत कारंजेकर. खरे तर हे पुनर्मुद्रण आहे, ‘सत्याग्रही विचारधारा’च्या ऑगस्ट ०७ मधल्या लेखाचे. लेखक, प्रकाशक, वाचक अशा साहित्य व्यवहारातल्या तीन महत्त्वाच्या घटकांचा तपशीलवार उपलब्ध आकडेवारीनिशी केलेला विचार या लेखात आहे. (वितरक, प्रसारक, साहित्य संस्था, शासकीय मंडळे यांनाही या संदर्भात तपासायला हवे.) लेखाचे चांदीचे वाक्य आहे.“मराठी साहित्य विश्व एका अरिष्टात सापडले आहे. बहुतांश लेखनामध्ये कसदारपणा नाही आणि मोजक्याच चांगल्या साहित्याला वाचक नाहीत.”आणि लेखाचे भरतवाक्य आहे, ‘लेखकांनी कसदार साहित्यनिर्मिती करणे, प्रकाशकांची अनावश्यक मक्तेदारी मोडणे व वाचकांची अभिरुची घडवणे या महत्त्वाच्या तीन बाबींमध्ये मराठी साहित्याच्या उज्ज्वल भवितव्याची नांदी राहणार आहे.”आपण पहिल्या आणि तिसऱ्या बाबींसंदर्भात तरी आपला-आपला वाटा उचलावा. ही गरज मानायला हरकत नाही. आपण उपरोक्त दोन्ही लेख मात्र मिळवून वाचावेत इतके महत्त्वाचे नक्कीच आहेत.

‘पंचधारा’ (मराठी साहित्य परिषद, आंध्रप्रदेश, इसामिया बाजार, हैदराबाद ५०००२७) हे महाराष्ट्राबाहेर प्रसिद्ध होणारे त्रैमासिक : प्रकाशनातले सातत्य (वर्ष ५० वे) आणि अंक नेहमीच महत्त्वाचे साहित्य देणारे; ‘गजानन माधव मुक्तिबोध’, ‘गालिबची पत्रे’, ‘हैदराबाद शहर’असे कितीतरी महत्त्वाचे अंक, अनेक मराठी भाषांमधील साहित्याचे मराठीतील अनुवाद हे त्यांचे वैशिष्ट्य असते. आत्ताचा त्यांचा अंक (एप्रिल ते सप्टेंबर २००७) हा आहे, ‘आंतरभारती अनुवाद विशेषांक’- अतिथी संपादक - चंद्रकांत पाटील. चंद्रकांत पाटीलने त्यांच्या अनेक प्रकल्पांत त्यांना मोलाची मदत याआधीही केली आहे. आंतरभारती संकल्पनेचे शिल्पकार साने गुरुजी यांना हा अंक समर्पित करण्यात आला आहे. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या तिसऱ्या आंतरभारतीय साहित्य संवाद संमेलनावर हा विशेषांक आधारित आहे. अंकाला दोन संपादकीये आहेत. पहिले उषा जोशींचे ‘पंचधारा’च्या वतीने आणि दुसरे अतिथी संपादक चंद्रकांत पाटील यांचे प्रास्ताविक. दोन्हींचे मुळातून वाचणे आवश्यक आहे.

कवितेचा अनुवाद या विभागात विष्णु खरे यांची निशिकांत ठकार यांनी घेतलेली मुलाखत, विष्णु खरेंनी त्या प्रसंगी वाचलेल्या तीन कविता आणि नंतर ‘कोशिश- (स्वामीनाथके लिए)’ही त्यांची मूळ हिंदी कविता आणि त्याची आठ भारतीय भाषा आणि जपानी, जर्मनी, आणि इंग्रजी मिळून अकरा भाषांतली अनुवाद-रूपे. विष्णु खरे यांची ही मुलाखत आणि कवितांचे वाचन ज्यांनी पाहिले आणि ऐकले आहे, त्यांच्यासाठी तो साहित्यव्यवहारातल्या वावरातला अद्भुत दिवस होता. आता त्यावेळी हजर नसलेल्यांसाठी ‘पंचधारा’चा हा अंक तितकाच महत्त्वाचा. अंकात भाषांतराच्या संदर्भात अन्य कितीतरी मोलाच्या गोष्टी आहेतच.“कुकुऽऽऽच कुऽऽऽ”या दारिओ फो या नोबल पारितोषिक विजेत्या नाटककाराचे प्रवीण भोळे अनुवादित नाटक आणि शिवाय अन्य कितीतरी. विष्णु खरे यांनी याच मुलाखतीत मराठी अनुवादासाठी आपले कोणतेही लेखन विनाअट मोकळे ठेवल्याचे जाहीर केले आहे. ‘पंचधारा’चा हा अंक तर आपण मिळवावाच शिवाय त्यांना अन्य मदतही करावी आणि त्यांच्या मराठी भाषा-संगोपनासाठी चाललेल्याकामाला मदत द्यावी.

डिसेंबर २००७ रोजनिशीत काही दिवाळी अंकांसंदर्भातली निरीक्षणे नोंदविली होती. तोपर्यंत काही महत्त्वाचे अंक पाहता आले नाहीत. आजही तसे पाहणे आणि अंशत: वाचणे संपले आहे असे नाही. तरीही काही गोष्टी आपणांपर्यंत आणाव्यात आणि त्यापलीकडचे राहिलेले आपल्यावर सोपवावे अशा हेतूने काही बोलून घेतो.

दिवाळी अंकांचा हा खास मराठी भाषेतला उत्सव मला महत्त्वाचा वाटतो. शिवाय दरवर्षी त्यात होणारी वाढ आणि एकूण प्रकाशित लेखनातला त्याचा गंभीर वाटा वाढतानाही दिसतो आहे. ‘साधना’चा मजकूर दोन अंकांत विभागला जावा इतक्या मेहनतीचा आहे. ‘चिन्ह’, ‘शब्द’, ‘मौज’या अंकांमध्ये अंतर्भूत असलेल्या अनेक चित्रकारांच्या कलाकृतींच्या आर्टप्लेटस्, ‘खेळ’, ‘दर्शन’, ‘चिन्ह’, ‘आशय’, ‘शब्द’, ‘वसा’या अंकांची मुखपृष्ठे हे सारे आपण डोळ्यात साठवावे असे आहे. ‘शब्द’च्या मुखपृष्ठासाठी प्रभाकर कोलते यांनी ‘तिचे रजत सिंहासन’ही जोगेन चौधरींची कलाकृती निवडली होती. ती बदलली आहे. बदलामागचा खुलासाही संपादकांनी दिला आहे; “बेलगाम आणि अकारण, निव्वळ धाडसासाठी धाडस हे कलाविचारात अप्रस्तुत ठरते असे आम्ही मानतो.”त्यांची ही भूमिका स्वीकारूनही या चित्रावर आपण अन्याय करत आहोत असे मला वाटते. आपण आपले मतही अवश्य कळवावे. प्रभाकर कोलतेंच्या विश्लेषणानंतर तर ते अवश्यच अग्रभागी असायला हवे होते. अर्थात आताही ते मुखपृष्ठाच्या आतल्या अंगाला नीटपणे दिले आहे. हा लाभ आहेच. ‘खेळ’च्या अंकावर पिकासोचे चित्र आणि आत त्याची रेखाटने आहेत. पिकासोच्या कविताही ‘खेळ’च्या अंकात प्रथमच मराठीत आल्या आहेत. एका कवीच्या चित्रकृती किंवा एका चित्रकाराच्या कविता अशा दुहेरी वाटांनी त्या कविता, रेखाटने आणि चित्र यांकडे पाहता येईल. दिवाळी अंकांचे मुद्रण, मांडणी यांची कलात्मक जाण अशा अंकांतून पाहता येते.

‘शब्द’दिवाळी अंकात ‘मागे बळून बघताना’- असे काही लेख आहेत. त्यात उजवे-डावे करता येणे कठीण आहे. आता आपल्या आपल्या आवडी सोबत असतातच. त्यामुळे गणेश देवींचे हिमालयाकडे वळणे, नरेंद्र जाधवांचे भारतात परतणे, प्रभाकर कोलते यांचे ‘स्वेच्छानिवृत्त’ होणे किंवा कुमार केतकरांनी, “माझ्यासारखे अनेक ‘मार्क्सवादी’फ्रॉईडला आणि गांधीजींना जे कृष्णमूर्तीना आणि आइन्स्टाईनला, चे गव्हेराला आणि बीटल्सना, आपल्या व्यक्तिगत जीवनात ‘इंटिग्रेट’करू शकले आहेत. प्रत्येक मार्क्सवाद्याला हे जेव्हा उमगते की जीवन हे विचारसरणीपेक्षा विशाल आहे; पण ती विशालता समजण्यासाठी विचारसरणीची गरज आहे, तेव्हा त्याचा मार्क्सवाद आणि जीवन अधिक प्रकल्भ होत जाते.” असे म्हणणे हे खूप जवळचे वाटते. (फक्त यात बाबासाहेब आंबेडकरांनाही गुंतवले असते तर अधिक आवडले असते, असो. नामदेव ढसाळचे तर गद्य आणि कविताही खास त्याची आहे. पण या सगळ्यात जिव्हारी लागावे असे लेखन कमल देसाईंचे फक्त पानभर. त्यातले हे अर्काचे वाक्य; “यशस्वी होण्याचा मार्ग एकच; ‘आपण यशाच्या पाठीमागे न धावणं’.त्याशिवाय जीवन खूप मोठं आहे.”‘शब्द’च्या अंकातल्या अरुण काळे, प्रभा गणोरकर, मंगेश नारायणराव काळे आणि शिवाय नामदेव ढसाळ यांच्या कविताही आपण अवश्य वाचाव्यात. अरुण जाखडे, अतुल कुलकर्णी, मनस्विनी लता रवींद्र यांची आत्मकथनेही अंकाचे मोल वाढवणारी आहेत. एकूण ‘शब्द’च्या संपादकांची मेहनत मानायलाच हवी. फक्त येशू पाटील त्याची आर्थिक जोडाजोड कशी करतात, याचे कौतुकासहित आश्चर्य वाटते. कारण जाहिरातींचा वाटा नगण्य आहे.

‘संवेद’मधल्या विनोदकुमार शुक्लांच्या हिंदी मुलाखतीबद्दल मी आधीच बोललो होतो. आता ती मुलाखत, (अनुवाद : गणेश विसपुते) आणि त्यांच्या कविता (अनुवाद : प्रफुल्ल शिलेदार) ‘खेळ’च्या दिवाळी अंकात एकत्र आल्या आहेत. भुजंग मेश्रामची कविता ‘अरुण काळेसाठी ब्युटिफुल कृष्णविवर अर्थात म्होब्बस्से’ ही खासच आहे. नामदेव ढसाळ, भुजंग मेश्राम, अरुण काळे ही मराठी कवितेची खासियत आहे. भुजंग मेश्रामच्या अवेळी जाण्याने हा मधला दुवा निखळला आहे. आणि ही हानी तूर्तास तरी भरून येणारी नाही. सुरेश कदम आणि संतोष पद्माकर पवार यांच्याही चांगल्या कविता याच अंकात आहेत.

‘परिवर्तनाचा वाटसरू’ चा पूर्ण अंक कवितांचा आहे.तिथेही भुजंग मेश्राम आहेच. शिवाय आजचे अनेक महत्त्वाचे कवी आणि श्रीधर तिळवेची दीर्घ कविता. तिळवेच्या अन्य लेखनासारखाच काहीसा आनंददायी छळ इथेही आहेच.साहिल परवेज हा एक आजवर अनोळखी असलेला कवी इथे आहे. शिवाय अंकाच्या मुखपृष्ठावरच्या पॉल युलार्ड या फ्रेंच कवीच्या राजीव कालेलकर याने अनुवादित केलेल्या ओळी या अंकाच्या सुराशी जुळणाऱ्या. विष्णु खरेची आणखी एक मुलाखत ‘नवाक्षर दर्शन’च्या अंकात आहे. हेमंत कुकरेतीने घेतलेली ही हिंदीतली मुलाखत बलवंत जेऊरकरने अनुवादित केली आहे. ‘अनुभव’च्या अंकातले काही आधी वाचायचे राहिले होते. तर त्यातली ‘शेती पाहावी करून’ (श्रीनिवास पंडित) आणि ‘आणखी मोठ्या रेषेसाठी’ (संजय जोशी) ही आत्मकथने; ‘ललित मधला म.वा.धोंडांचा लेख ‘कुठली सीता, कुठला राघव! आणि कुठले रामराज्य’, ‘मौज’मधला ‘नेक्रोपोलिस’हा महेश एलकुंचवारांचा लेख हे आजवर वाचलेल्यातले अधोरेखित करावे असे लेखन.

म.वा.धोंडासारखे खास त्यांचेच असे लेखन आता पाहायला मिळणे दुर्लभच. श्री.पु.भागवतांविषयी अनेक ठिकाणी लेखन असणे अपरिहार्यच होते. ‘रुची’, ‘मौज’, ‘ललित’, ‘भाषा आणि जीवन’, ‘आशय’, ‘दर्शन’, अशा अनेक अंकांतून ते आले आहे. त्यांचे अप्रकाशित भाषणही ‘आशय’च्या अंकात आहे. थोड्याफार फरकाने सरोजिनी वैद्य यांच्याही आठवणी आल्या आहेत. श्री.पु.भावगतांची काही पत्रे ‘ललित’च्या अंकात आहेत.

अरुण जाखडेंच्या दिवाळी अंकातील सहभागाविषयी जरा वेगळे वाटते. यावर्षी त्यांनी तीन अंक आपल्याला दिले आहेत. ‘पद्मगंधा’, ‘उत्तम अनुवाद’आणि ‘आरोग्य दर्पण’.आजघडीला ‘पद्मगंधा प्रकाशन’हे मराठी प्रकाशनव्यवसायातले महत्त्वाचे नाव आहे. त्यांचा व्यवसायही वरकरणी बरा असावा असे वाटते. मात्र ते ज्या उत्साहात, उमेदीत आणि गांभीर्याने प्रकाशन व्यवसायात पावले टाकत आहेत त्याला दाद द्यायलाच हवी. त्यांचे दिवाळी अंक हा त्यांच्या प्रकाशन व्यवसायाच्या नियोजनाचा भाग आहे.काहीशी पूर्वतयारी, रियाझ आणि येत्या काळाचा मागोवा या सर्वांचा आढळ त्यांच्या अंकात पाहता येतो. र.धों.कर्वे यांच्याविषयीच्या येत्या काळातला सात खंडांचा प्रकाशन प्रकल्प हे धाडसी पाऊल. सामाजिक जबाबदारीचे भान आणि व्यवसायाचे गणित अशा अंगांनी त्याकडे पाहणे गरजेचे आहे.‘उत्तम अनुवाद’आणि ‘आरोग्य दर्पण’यांना मी अजून हात लावलेला नाही. ‘पद्मगंधा’मधले काही लेखन वाचले. त्यात ‘मोहनमाया आणि मी’हा रामदास भटकळांचा लेख आपल्याला ‘मोहन माया’या ग्रंथाकडे वळवायला पुरेसा आहे. पण त्यातली विलास सारंग यांची संजय आर्वीकर यांनी घेतलेली मुलाखत ही ‘पद्मगंधा’ची खास भेट आहे. संजय आर्वीकर हे अशा अभ्यासपूर्ण मुलाखतीसाठीच ओळखले जातात. ती ओळख त्यांनी इथे अधिकच घट्ट आणि पक्की केली आहे. संजय आर्वीकरांचे त्यासाठी अभिनंदन.

असे बोलता बोलता बोलणे नेहमीहून अधिक झाले.आपण नव्या वर्षात प्रवेश करीत आहोत. कसाही विचार केला तरी वर्षारंभाचा उत्साह असतोच. तो असावाही. तर आरंभीच्या रंगनाथ पठारेंच्या अवतरणाचा सन्मान करीत येत्या काळाला सामोरे जाण्यासाठी आपणा सर्वांना शुभेच्छा.

आमेन.

Tags: दर्शन आशय मौज रुची शब्द खेळ ललित मराठी साहित्य दिवाळी अंक सतीश काळसेकर वाचणाऱ्याची रोजनिशी vachnaryachi rojnishi satish kalsekar diwali ank weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके