डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रातील राजकीय चिंतनात  प्रा. नरहर कुरुंदकर यांचे योगदान’ या विषयावर संशोधन करून तयार केलेला प्रबंध सविता भट यांनी राष्ट्रसंत तुकडोजीमहाराज विद्यापीठाला पीएच.डी.साठी सादर केला आहे. त्या प्रबंधाचा गाभा सांगणारा हा लेख, 15 जुलैला कुरुंदकरांची 81 वी जयंती साजरी झाली, त्या पार्श्वभूीवर प्रसिद्ध करीत आहोत. – संपादक

प्रा. नरहर कुरुंदकरांच्या तर्कशुद्ध, रोखठोक विचारांचे व आजवर प्रस्थापित असलेले सिद्धान्त आणि आनंदवनात व चंद्रपुरातील व्याख्यानमालांध्ये त्यांची भाषणे ऐकल्यापासूनच समाजाला धक्के देत आपले मूलगामी चिंतन मांडणाऱ्या शैलीदार वृक्षाचे गारुड मनावर होते. अधिकाधिक जिज्ञासेपोटी जसजशी त्यांनी लिहिलेली ‘जागर’ ‘शिवरात्र’, ‘अभयारण्य’, ‘भजन’ आदी पुस्तके वाचनात आली तसतसे राज्यशास्त्राच्या पदव्युत्तर परीक्षेत गुणवत्तायादीत स्थान मिळाले आणि सोबतच किंग एडवर्ड फेलोशिप या प्रतिष्ठित शिष्यवृत्तीचे मानकरी होता आले. एवढ्या तुटपुंज्या भांडवलावर आपल्याला राज्यशास्त्रातले फार कळते, हा माझा भ्रम फिटत गेला आणि प्रा. कुरुंदकरांच्या राजकीय विचारांचे सखोल अध्ययन करण्याचा निर्धार पक्का होत गेला. त्यांनी लिहिलेली पुस्तके, लेख, त्यांचा पत्रव्यवहार, त्यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके, त्यांच्यावरील मान्यवरांच्या प्रतिक्रिया, वृत्तपत्र कात्रणे, त्यांच्या स्नेहीजनांच्या व अभ्यासकांच्या मुलाखती यांचे वाचन, टिपणे काढणे, विचारांची क्रमवार संगती लावणे- या सर्व प्रक्रियेद्वारे हाती लागलेल्या कुरुंदकरांच्या विचारधनाची मौलिकता तर पटत गेलीच; शिवाय या सर्व चिंतनामागे असलेला प्रा. कुरुंदकरांचा मूल्याधिष्ठित दृष्टिकोन देशातील आजच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीत विपरीत वास्तव बदलण्यासाठी धडपडणाऱ्या सर्वच समाजधुरीणांसमोर, सामाजिक कार्यकर्त्यांसमोर अन्‌ विशेषतः युवक-युवतींसमोर मांडला जाणे अगत्याचे वाटू लागले.

न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारींनी प्रा. नरहर कुरुंदकरांच्या चिंतनामागचे नेमके सूत्र ओळखून त्यांचे वर्णन ‘खराखुरा सत्यशोधक’ असे केले आहे. प्रखर बुद्धिवादी या नात्याने ईश्वराचे अस्तित्व नाकारणाऱ्या कुरुंदकरांची ‘सत्य, शिव आणि सुंदर’ या चिरंतन मूल्यांवर नितांत श्रद्धा होती. भारतीय सामाजिक व राजकीय जीवनात या मूल्यांची स्थापना आणि जोपासना करण्यासाठी आपली बुद्धी, वाणी आणि लेखणी राबविणे हे त्यांच्या जीवनाचे प्रयोजन आणि विचारप्रक्रियेचे मुख्य सूत्र होते. प्रा. कुरुंदकर दैववादी नव्हते. प्रयत्नवादी आणि आशावादी दृष्टिकोन ठेवून मानवी जीवनातील सौंदर्याची राखण करण्यावर त्यांचा विश्वास होता. भारतातल्या अत्यंत जटिल आणि प्रसंगी निराशाजनक वाटणाऱ्या सामाजिक व राजकीय परिस्थितीतील कुरूपता, विषमता, अन्याय व भ्रष्टाचार मानवी प्रयत्न आणि लोकप्रबोधनाने नष्ट करण्याचे आव्हान त्यांनी आपल्या प्रखर बौद्धिक क्षमतेने, ढासळणाऱ्या शारीरिक क्षमतेची चिंता न करता स्वीकारले.

सत्य, शिव आणि सुंदर ही मूल्ये जोपासताना जग सुंदर बनविण्याचा ध्यास घ्यावा लागतो. मानवी जीवनावर कुरुंदकरांचे निस्सीम प्रेम होते. हे जीवन सुंदर आणि समृद्ध करणारे जे-जे काही असेल, ते टिकले आणि वाढले; तरच जीवन समृद्ध बनेल अन्यथा  जीवनातलं सगळं माधुर्यच संपेल म्हणून परंपरेत जे जीवन संवर्धक त्याचा स्वीकार आणि जे जीवनविरोधक असेल त्याचा विरोध- हे त्यांच्या विचारांचे कायमचे सूत्र राहिले. अत्यंत दरिद्री, वंचित आणि शोषितांनाही जिथे पोटभर अन्न, अंगभर वस्त्र मिळून माणूस म्हणून सन्मानाने आणि भयमुक्त होऊन जगता येईल, अशा सुंदर जगाचे स्वप्न कुरुंदकरांनी पाहिले. अशा जगाच्या उभारणीसाठी आपली बुद्धी व श्रम वेचणारे सर्वच राजकीय नेते आणि विचारवंतांबद्दल तसेच सामाजिक कार्यकर्त्यांबद्दल, प्रा. कुरुंदकरांनी कायम कृतज्ञता बाळगली. या स्वप्नाला अडथळा निर्माण करणारे धर्मपंडित, महत्त्वाकांक्षी सत्ताधीश आणि राजकारणी त्यांच्या सडेतोड व जहरी टीकेचे भक्ष्य ठरले.

जग सुंदर करण्यासाठी ‘शिव’ म्हणजे पावित्र्य या मूल्याची आराधना करावी लागते. सुंदरता निर्माण करण्याची साधनेही पवित्र आणि नैतिक असायला हवीत. साधनशुचिता नसेल तर ही आराधना अंततः कुरूपतेलाच जन्म देते. म्हणूनच चळवळीला नैतिक अधिष्ठान देणारे आणि साधनशुचिता जपणारे शिवाजीमहाराज आणि महात्मा गांधींना महामानवांचा प्रा. कुरुंदकर दर्जा देतात. स्वातंत्र्य व समता या नैतिक अधिष्ठानांकडे दुर्लक्ष करून केवळ शहरी कामगारांच्या आर्थिक प्रश्र्नांवर भर देणारा आणि रक्तरजित क्रांतीची भलावण करणारा मार्क्सवाद त्यांना अपुरा व कालबाह्य वाटतो. माणुसकी या मूल्यावर आधारलेल्या गांधीप्रणीत अंत्योदयाची आणि जयप्रकाशप्रणीत समग्र क्रांतीची जोड दिल्याखेरीज मार्क्सवादाला भवितव्य नसल्याचे ते मानतात.

‘पावित्र्य’ किंवा ‘शिव’ याबद्दलची प्रा. कुरुंदकरांची कल्पनाही धर्माधिष्ठित नसून जे सर्वांच्या हिताचे ते पवित्र, अशी आहे. शिवाची आराधना करणे म्हणजे धर्म, जात, वर्ण, रूढी आणि परंपरा यांनी दिलेल्या जन्मजात निष्ठांचा त्याग करून स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या मूल्यांवर आधारलेल्या भारताच्या संविधानाचा स्वीकार करणे- असे कुरुंदकर मानतात. जन्मजात निष्ठांनी आजवर विषमता, अन्याय्य व शोषणावर आधारलेली समाजव्यवस्था निर्माण केली आणि टिकवून ठेवली. भारतीय संविधानाने सर्वप्रथमच सर्व नागरिकांना स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेवर आधारित न्याय्य समाजव्यवस्था निर्माण करण्याची सुसंधी दिली आहे. तिचा योग्य लाभ घेण्यातच भारतातील सर्व राजकीय व सामाजिक प्रश्र्नांचे उत्तर निहित आहे, असा प्रा. कुरुंदकरांचा ठाम विश्वास होता. ‘शिवरात्र’च्या प्रारंभी दिलेल्या मनोगतात ते नमूद करतात की, माणसामधील चांगुलपणावर आणि भारताच्या उज्ज्वल भवितव्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. या ‘शिव’ श्रद्धांच्या आराधनेसाठीच त्यांनी अखंड जागरण, प्रबोधन आणि लेखन केले.

‘शिव’ या मूल्याची उपासना ‘सत्य’ या आणखी एका मूल्याच्या आराधनेने करायची असते. प्रा. कुरुंदकरांचे सर्व लिखाण म्हणजे सत्यशोधनाचा आणि सत्याची कठोर चिकित्सा करण्याचा एक भव्य प्रयत्न होता. सत्याची कठोर चिकित्सा व चिरफाड करूनच समाजात व मानवी मनात दडलेल्या परपरागत अंधश्रद्धा आणि भ्रामक कल्पना नष्ट करता येतात. ही जळमटे काढल्याशिवाय स्वच्छ दृष्टीने परिवर्तन व प्रगतीची वाटचाल करता येत नाही. अशी चिकित्सा करणारा स्वतः निर्भय, निःपक्षपाती आणि निःस्वार्थ असणे अत्यावश्यक आहे. त्यासोबतच ऐकणाऱ्यांध्येही समंजसपणा व सहिष्णुता असायला हवी. अन्यथा, दहशतीच्या बळावर सत्ताधाऱ्यांकडून आणि विरोधकांकडून पसरविली जाणारी असत्येच कालांतराने सत्य म्हणून कायम टिकतात. दडवून ठेवलेल्या सत्याचे भीषण परिणाम समोर आले की, समाजमनाला फार मोठा आणि दीर्घकाळ टिकणारा आघात सहन करावा लागतो, याचा दारुण प्रत्यय फाळणीच्या व चिनी आक्रमणाच्या वेळी भारतीय जनमानसाला आला आहे. सामाजिक आणि राजकीय वास्तवातच सत्य दडलेले असते. पण म्हणून ते सर्वांना माहीतच असते, असे समजणे भ्रामक आहे. जाणकारांनी आणि विचारवंतांनी प्रयत्नपूर्वक आणि परिश्रमपूर्वक सर्वसामान्य जनतेच्या लक्षात सत्य आणून द्यावे लागते. लोकशाहीच्या यशस्वितेसाठी लोकशिक्षण आणि जनप्रबोधन ही कधीही न संपणारी प्रक्रिया आहे आणि ती राबविण्याची जबाबदारी अर्थातच सुजाण व सुशिक्षित नागरिकांची आहे हे कुरुंदकरांनी जाणले.

याबाबतीत बर्ट्रांड रसेल हे कुरुंदकरांचे महान आदर्श होते. रसेलच्या ‘हे उघड आहे, हे स्पष्ट आहे, यात सांगण्यासारखे काय आहे? असे म्हणणे ही अचूकतेच्या मार्गातली सर्वांत मोठी धोंड असते.’ या बोधवचनाची यदुनाथ थत्तेंनी जाणीव करून दिल्यानंतर कुरुंदकरांचा पूर्ण विश्वास बसला. त्यामुळेच सर्वाधिक उघड व स्पष्ट असणाऱ्या गोष्टी भल्या- भल्या बुद्धिवंतांना कळत नाहीत, समजत नाहीत याचे त्यांना आश्चर्य वाटेनासे झाले आाणि सत्यकथनाची जबाबदारी त्यांनी सुज्ञपणे स्वतःकडे घेतली.

सत्याची कठोर चिकित्सा आणि निर्भेळ सत्याची प्रतिष्ठापना करायची असेल, तर सर्वप्रथम सत्याचा शोध घ्यावा लागतो. सत्य हे आपापल्या धर्मग्रंथांध्ये सांगितलेले असते, असे सर्वसामान्य लोक मानतात. सर्वच धर्मांतील धर्मपंडित आपल्या हितसंबंधांची आणि सत्तेची जपणूक करण्यासाठी आपापला धर्म ईश्वरदत्त, अपौरुषेय व सर्व धर्माज्ञा अपरिवर्तनीय आहेत, असे अनुयायांच्या मनावर वर्षानुवर्षे बिंबवत आले आहेत. समाजाला अंधश्रद्ध आणि अज्ञानी ठेवून आपले हितसंबंध जपण्याचा त्यांचा सततचा उद्योग असतो. धर्मविषयक या कल्पनेलाच प्रा. कुरुंदकरांनी हादरा दिला. त्यांच्या मते, धर्म ही एक सामाजिक घटना आहे. समाजजीवन सतत बदलते, त्यामुळे कालौघात अनेक धर्माज्ञा बाद होत जातात आणि ज्या अट्टहासाने कायम टिकविल्या जातात, त्यांना हटविण्याचे काम कठोर चिकित्सेद्वारा धर्मार्तंडांचे पाखंड उघडकीस आणूनच करावे लागते. प्रा. कुरुंदकरांनी हिंदू आणि इस्लाम या दोन्ही प्रमुख धर्मांच्या चिकित्सेचे हे काम जनरोषाची भीती न बाळगता निर्भीडपणे केले. धर्माच्या बाबतीत कुरुंदकरांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात आणून दिला. तो म्हणजे, धर्मग्रंथांमध्ये वर्णिलेले धर्माज्ञांचे उदार स्वरूप प्रत्यक्षात तसे नसते. धर्मविषयक सत्य धर्मग्रंथात नव्हे, तर त्या धर्माच्या प्रत्यक्ष आचरणात दडलेले असते. धर्माज्ञा जर धर्मार्तंडांनी केलेल्या धर्मभाष्याशी विसंगत असतील, तर त्या बाद ठरविल्या जातात. त्यामुळे त्या-त्या धर्मातील रूढी, परंपरा, प्रथा यांचा अभ्यास केल्याखेरीज त्याचे सत्य स्वरूप समजत नाही.

सत्य जसे धर्मग्रंथात नसते, तसेच ते सिद्धांतात किंवा तत्त्वज्ञानाच्या कोणत्या ग्रंथातही नसते. किंबहुना, ग्रंथातील तत्त्वज्ञान प्रत्यक्षात राबविताना त्याला मिळालेल्या स्वरूपातच सत्य दडलेले असते. राजकीय सिद्धान्त व तत्त्वज्ञाने स्थिर असतात. समाज व समाजमन मात्र त्याच्या तुलनेत वेगाने बदलत जाते. परिणामी, सिद्धान्त कालबाह्य आणि म्हणूनच सद्य:कालीन राजकीय जीवन समजून घेण्यास निरर्थक ठरतात. प्रा. कुरुंदकरांनी कोणत्याही राज्यशास्त्रीय संकल्पनेचे आणि तत्त्वज्ञानाचे पोथीनिष्ठ स्वरूप व त्यावर आधारलेले विवेचन ग्राह्य न मानता त्याला प्रत्यक्ष व्यवहाराची कसोटी लावली. दरिद्री कामगारांचे शोषण करून भांडवलदार ‘अतिरिक्त मूल्य’ कमावतील; त्यातून समाजाचे ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ असे विभाजन होऊन अंततः जागरूक कामगार भांडवलदारांविरुद्ध रक्तरंजित क्रांती करून वर्गविहीन समाजाची स्थापना करतील, हे मार्क्सचे तत्त्वज्ञान ग्रंथात वाचायला निर्दोष वाटत असले तरी सामाजिक सत्य वेगळे ठरले. भांडवलदारांना बाजारात उत्पादन खपल्याखेरीज ‘अतिरिक्त मूल्य’ मिळतच नाही. मग ते खपावे म्हणून भांडवलदार अनेक प्रलोभने आणि कल्याणकारी योजना राबवून कामगारांची क्रयशक्ती कायम टिकवितात. या योजनांमुळे सुखासीन झालेला कामगारांचा वर्ग प्रस्थापित होत जाऊन क्रांतीला निरुपयोगी ठरतो, हे कुरुंदकरांनी लक्षात आणून दिले.

धर्मग्रंथ आणि तत्त्वग्रंथात जसे सत्य नसते; तसेच राजकीय नेत्यांच्या भाषणांध्ये जे असते, त्याला सत्य मानणे चुकीचे आहे. राजकीय पुढाऱ्यांकडून व्यक्त होणारे विचार किंवा अभिप्राय सत्यकथन करण्यापेक्षा तत्कालीन राजकीय गरजा भागविण्यासाठी केले जातात, म्हणूनच या अभिप्रायांपेक्षा त्यांची कृतीच राज्यशास्त्रीय अभ्यासाच्या दृष्टीने निर्णायक ठरते. सत्तारूढ पक्षांचे नेते राज्यकारभाराच्या गोपनीयतेमुळे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातील शिष्टाचारांचे पालन   करावयाचे असल्याने सत्य सांगू शकत नाहीत. विरोधी पक्षांचे लोकही सत्ताकारणाच्या सोईसाठी सत्य जनतेसमोर येऊ देत नाहीत आणि सोईस्कर असल्याचाच धडाकेबाज प्रचार करतात, म्हणून राजकीय नेते काय बोलले यापेक्षा ते कसे वागले यावरून सत्याची पारख केली पाहिजे. नेत्यांच्या बोलण्यातील शब्दार्थापेक्षा त्यांतील गर्भितार्थाची संगती लावता आली, तरच सत्याच्या अधिक जवळ जाता येते, हेदेखील प्रा. कुरुंदकरांच्या सत्यशोधनाचे एक तंत्र आहे. सन 1949 मध्येच कम्युनिस्ट चीनला मान्यता देतानाच्या भाषणातच पंडित नेहरूंनी ‘भारताला प्रथमच 2500 मैलांची लष्करी सरहद्द प्राप्त झाली आहे; याचे परिणाम आपण नीट समजावून घेतले पाहिजेत, ते टाळण्याजोगे नाहीत’, असे मार्मिक वाक्य उच्चारून भारताला चीनच्या रूपात बलाढ्य शत्रू निर्माण झाल्याचा संकेत दिला होता आणि त्यानंतर शस्त्रास्त्रांचे कारखाने काढणे, सैन्यबळ वाढविणे हे काम शांतिदूत नेहरू सतत करीत राहिले. तरीही ‘चीनबाबत नेहरू गाफील राहिले’, असा प्रचार विरोधक करतात. हा कुरुंदकर सत्यापलापच मानतात. ज्यांना बहुसंख्य हिंदूंची 10 टक्के मतेही कधी मिळविता आली नाहीत, त्या पक्षांनी स्वतःला हिदूंचा पक्ष म्हणवून घेणे आणि ज्या काँग्रेस पक्षामागे 70 टक्के हिंदू जनता वर्षानुवर्षे जात राहिली, त्याला मुस्लिमधार्जिणा म्हणून हिणविणे, हे प्रा. कुरुंदकरांच्या मते विरोधकांनी पसरविलेले असेच राजकीय असत्य आहे. प्रत्यक्षात काँग्रेस हीच हिंदूंची सर्वांत मोठी संघटना आहे. पण दोन्ही पक्ष हे मान्य करणार नाहीत. कारण हिंदुत्ववाद्यांना हिंदूंची मते गमवायची नसतात आणि काँग्रेसला मुसलमानांना नाराज करणे परवडणारे नसते.

 राजकीय व सामाजिक सत्याचे स्वरूप कधीही एकांगी नसून नेहमीच विविधांगी असते. प्रत्येक समस्या त्या समाजात प्रचलित धार्मिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, तत्त्वज्ञानविषयक, भाषिक आणि साहित्यिक अशा विविध घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून ऐतिहासिक काळापासून सिद्ध होत निर्माण झालेली असते. त्यामुळे तिचे नीट आकलन करून घेण्यासाठी या सर्व घटकांचा एकत्रित विचार केल्यासच खरी कारणे हाती लागू शकतात. अन्यथा, सत्यशोधकांची अवस्था गोष्टीतल्या सात आंधळ्यांसारखी होऊन प्रत्येकाचे आकलन अपुरे व निरुपयोगी ठरते. प्रा. कुरुंदकरांनी स्वतः असा विविधांगी विचार करण्याची पद्धती अवलंबिली आणि लोकांनाही तसाच विचार करायला प्रवृत्त करून राष्ट्रीय एकात्मता, हिंदू-मुस्लिम ऐक्य, दलितांचे प्रश्र्न आदी महत्त्वाच्या समस्यांबद्दल दिशादर्शन केले.

सत्यशोधनाचा आणखी एक महत्त्वाचा निकष प्रा. कुरुंदकरांच्या विचारपद्धतीत समाविष्ट होता. तो म्हणजे, राजकीय संकल्पनांचे आणि राजकारण व समाजकारणातील महनीय व्यक्तींच्या कर्तृत्वाचे मूल्यमापन वरवर दिसणाऱ्या लोकप्रिय घटनांवरून न करता त्यांच्या अंतिम उद्दिष्टांनुसार होणे आवश्यक आहे. उदा.- समाजवादाचे लक्ष्य केवळ बहुसंख्य लोकांच्या प्राथमिक गरजांची पूर्तता करणे हे नसून स्वातंत्र्य, समता आणि न्यायावर आधारलेली जीवनव्यवस्था निर्माण करणे हे आहे; म्हणून समाजवादाचा अंतिम लढा आर्थिक नसून नैतिक ठरतो- मग भलेही मार्क्सने त्याला आर्थिक तत्त्वज्ञान मानलेले असो. शिवाजीसारख्या महामानवाच्या कर्तृत्वाचे मूल्यमापनही त्यांच्या जीवनातील अफजलखान वध, आगऱ्याहून सुटका यांसारख्या सातआठ रोमहर्षक प्रसंगांच्या आधारे न करता ज्या दक्षतेने, कुशलतेने व चिकाटीने त्यांनी विपरीत परिस्थितीत यशस्वी युद्धनियोजन आणि लोककल्याणकारी शासन व्यवस्थेची उभारणी केली, त्यानुसार केल्यासच अधिक वस्तुनिष्ठ ठरू शकते, हे प्रा. कुरुंदकरांनी पटवून दिले.

सत्यशोधनाच्या प्रक्रियेत एखाद्या घटनेचा ऐतिहासिक कालक्रम तुकड्या-तुकड्यांध्ये विभागून घेतल्यासही संपूर्ण सत्य हातचे निसटून जाते. त्याऐवजी त्या मोठ्या घटनेत अंतर्भूत असलेल्या छोट्या-छोट्या घटनांचा प्रवाह, त्या प्रवाहाची दिशा आणि सातत्य याचा माग काढता आला तर इतिहासातून क्रमाक्रमाने सिद्ध होत आज तो प्रवाह कुठे स्थिरावला आहे याचे सर्वांगाने दर्शन होते, असे कुरुंदकर मानतात. क्रांतिकारकांचे उठाव, टिळक युग, गांधी युग, देशाची फाळणी आणि अंततः मिळालेले स्वातंत्र्य- असा भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा विचार केल्यास अनेक महत्त्वाच्या घटना आणि मुख्य म्हणजे या स्वातंत्र्यलढ्याची दिशा दुर्लक्षित राहते. दादाभाई नौरोजींपासून स्वातंत्र्यलढ्याला मिळालेली समाजवादी दिशा देशातले दारिद्र्यनिवारण आणि आर्थिक प्रश्र्न महत्त्वाचे मानून टिळक, गांधींनी कशी कायम राखली आणि नेहरूंनी हा प्रवाह कसा पुष्ट करत पुढे नेला याचे प्रा. कुरुंदकरांनी मार्मिक विश्लेषण केले आहे.

‘लोकांनी, लोकांद्वारा, लोकांसाठी चालविलेले शासन म्हणजे लोकशाही’ ही अब्राहम लिंकनची लोकप्रिय व्याख्या कुरुंदकर भ्रामक ठरवितात. कारण बहुमताने निवडून येणारे जनतेच्या कल्याणासाठीच राज्य करेल याची खात्री नाही. अगदी मतदान न करणारे सोडून दिले तरी मतदान केलेल्यांचे  बहुमत त्यांना मिळाले आहे, असेही नाही. शिवाय शासनालाही बहुमताने वाटेल ते करण्याचा अधिकार लोकशाहीत नसतो. अल्पमतवाल्यांचेही काही हक्क मानलेच पाहिजेत. म्हणून बहुमत हे लोकशाहीचे तत्त्वज्ञान होऊ शकत नाही. लोकशाही या संकल्पनेच्या विकासात लॉक, मिल, मार्क्स आणि गांधी हे चार टप्पे कुरुंदकर महत्त्वाचे मानतात. कारण ते बहुमत हे मध्यवर्ती न मानणाऱ्या विचारवंतांचे टप्पे आहेत. माणसाचे निसर्गदत्त अधिकार जनतेच्या बहुमताने सत्तेवर आलेल्या शासनालाही कमी करता येत नाहीत; उलट त्यांच्या रक्षणासाठीच शासन असते हा महत्त्वाचा मुद्दा लॉकने मांडला. माणसाच्या स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठेची जपणूक व्हावी म्हणून कायद्याचे राज्य मिल मानतो. आर्थिक गुलामगिरीतून मुक्तता झाल्याखेरीज माणूस स्वतंत्र होत नाही, असे मार्क्स मानतो; तर सर्वात असंघटित, दरिद्री, अशिक्षित यांनाच विकासात अग्रहक्क मिळाला पाहिजे. कारण त्यांनाच स्वातंत्र्याची खरी गरज असते, हा गांधीजींचा आग्रह असे.

अशा प्रकारे धर्माच्या प्रत्यक्ष आचरणात, सिद्धान्त व तत्त्वज्ञानाच्या प्रत्यक्ष अंलबजावणीत आणि नेत्यांच्या प्रत्यक्ष कृतीत सत्य पडलेले असते. हे सगळे ‘प्रत्यक्ष’ म्हणजे वास्तव. या वास्तवाचे निर्दोष आकलन झाले, तरच समस्यांचे खरे स्वरूप लक्षात येऊन त्यांच्या निराकरणाचे मार्ग शोधता येतात. याउलट, वास्तवाचे आकलनच जर पूर्वग्रह, निष्ठा आणि श्रद्धांपायी नीट होऊ शकले नाही, तर सदोष आकलनानुसार केलेली उपाययोजनाही अपयशी ठरते. मार्क्सवादी आणि समाजवादी पक्ष भारतात अपयशी ठरले, कारण त्यांचे भारतीय वास्तवाचे आकलनच सदोष होते, असे कुरुंदकर मानत.

स्वातंत्र्य, समता आणि न्यायावर आधारलेल्या सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराधिष्ठित लोकशाहीतच सत्याचे असे निर्दोष आकलन शक्य आहे. इतर सर्व राजवटी दमन करणाऱ्या असतात. लोकशाही शासनव्यवस्थेधले दोषही लोकशाही मार्गांनीच दूर करता येतात. मतदानाच्या शांततामय मार्गाने भ्रष्ट सत्ताधाऱ्यांना भारतीय जनतेने अनेकदा धडा शिकविला आहे. म्हणून लोकशाही ही समता, न्याय आदी मूल्यांवर श्रद्धा असणारा नवा माणूस घडविण्याची प्रक्रिया आहे; ती एक जीवनदृष्टी आहे, असे वारंवार प्रतिपादन कुरुंदकर करत. आणीबाणीच्या काळात लोकशाही स्वातंत्र्यावर घाला पडताच त्यांनी प्राणपणाने त्याचा विरोध केला आणि लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी आपली बुद्धी व वक्तृत्व पणाला लावले. ‘‘लोकशाहीवर श्रद्धा असणाऱ्यांना ती नष्ट करणे सोपे असले तरी रुजविणे अत्यंत कठीण आहे आणि एकदा नष्ट झालेल्या मृत लोकशाहीची पुनःस्थापना करणे तर शतकानुशतके शक्य होत नाही, हा इतिहास नीट समजावून घेणे आवश्यक आहे; तरच सातत्याने जागरुक राहून हे लोकशाहीचे रोपटे तो जतन करतो. कारण ते आपोआप उगविणारे जंगली झाड नसून काळजीपूर्वक जोपासना करणे भाग असणारे संस्कृतीच्या उद्यानातले एक नाजूक आश्चर्य आहे’’ -अशा शब्दांत प्रा. कुरुंदकरांनी आपली लोकशाहीबद्दलची तळमळ व्यक्त केली आहे.

प्रा. कुरुंदकरांचा सत्यशोधन आणि सत्यप्रस्थापनेचा प्रयत्नच मुळी लोकशाहीचे प्राणतत्त्व असलेल्या ‘स्वातंत्र्य’ या सांस्कृतिक मूल्यावर अधिष्ठित होता. सत्याचा नैतिक वापर म्हणजे स्वातंत्र्य. सत्य म्हणजे वास्तवाचे निर्दोष आकलन या वास्तवाचे त्यांनी तीन भेद सांगितले. प्राकृतिक वास्तव म्हणजे निसर्ग, पंचमहाभूते व जीव या वास्तवावर संस्कार करून माणूस जगतो, स्वतः संस्कारित होतो आणि सामाजिक व सांस्कृतिक वास्तवाची निर्मिती करतो- जे त्याचे माणूसपण, आशा-आकांक्षा आणि भीतीलाही जन्म देते. ही तिन्ही वास्तवे (अर्थातच्‌ सत्य) जाणून घेऊन माणसाला भयमुक्त करणे व त्याच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करणे म्हणजे स्वातंत्र्य. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनीही आपल्या काव्यातून याच स्वातंत्र्याची आकांक्षा केली आहे. रवींद्रनाथ टागोर जिथे भयमुक्त वातावरणात सर्वांना उन्नत माथ्याने जगता येईल अशा स्वतंत्र भारताचा उदय होवो, अशी प्रार्थना करतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे-जे उत्तम, उदात्त, उन्नत आणि महन्मधूर आहे ते-ते सर्व स्वातंत्र्य या कल्पनेचे सहचारी मानले आहे. अशा स्वातंत्र्याच्या प्रस्थापनेचा ध्यास घेऊन महाराष्ट्राचा संचार करत आपली वाणी व लेखणी राबविणाऱ्या आणि हे कार्य करत असतानाच देह ठेवणाऱ्या प्रा. नरहर कुरुंदकरांची तुलना तर्कशुद्ध विचारांचे धडे देत अथेन्स शहरातून फिरणाऱ्या सॉक्रेटिसशीच होऊ शकेल.

Tags: लोकशाही प्रा. नरहर कुरुंदकर प्रा.सविता भट Democracy Pro. Narhar Kurundkar Pro. Sawita Bhat weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके