डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

शनिवारचं कॉलेज आटोपून गावी गेलो. एसटी स्टँडवरून मारुतीच्या देवळापुढून सरळ गल्लीने घराकडे जात होतो. गल्लीच्या मध्यावर माझ्या मित्राचं घर. त्याची आई दारातच बसली होती. जणू काही माझी वाटच पाहत बसली होती. मला पाहून तिनेच विचारले- कसं काय चाललंय वगैरे... मी माझ्या मित्राबद्दल तिला विचारताच ती म्हणाली- ‘बरं झालं. ये.’

अपशकुन-शकुन

आंदादादाचं सकाळी तर सोडाच, पण दिवसभरही कोणी तोंड पाहत नसे. का; तर आंदादादाचं तोंड पाहिल्यामुळे अपशकुन होतो, अशी लोकांची समजूत होती. आंदादादाचं तोंड पाहिल्यामुळे औताला जाणाऱ्या शेतकऱ्यांचं नांगराचं दांडकं तरी मोडायचं किंवा जू तरी मोडायचं. सोयरिकीसाठी बाहेर पडलेल्यांची सोयरिक जमायची नाही. असं बरंच काही. अपशकुन का व्हायचा? तर, आंदादादा निपुत्रिक होता. तरी त्यांना मुली होत्या, फक्त मुलगा नव्हता. जो-तो आपलं मुखावलोकन टाळतो, हे आंदादादाच्या लक्षात आलं होतं. हे दु:ख त्याला फारच डाचत होतं. यामुळे त्याचा स्वभाव फारच चिडचिडा झाला होता. चिडचिडेपणामुळे दादाच्या तथाकथित नष्टतेत भर पडली होती.

दादाला एक गोष्ट सुचली. त्याने एक वावर विकलं. बराच पैसा हाती आला. दादाने व्याजाने पैसे देण्याचं जाहीर केलं. गाव बहात्तरच्या दुष्काळापासून फारच पिचलं होतं. लोकांना पैशांची सक्त गरज होती. पण देणार कोण? दादाने गरज नसताना एका व्यापाऱ्याला वावर विकलं होतं. व्यापाऱ्यानेही गरज नसताना ते घेतलं होतं. कित्येक वर्षांत खरेदी-विक्रीचा झालेला तो एकमेव व्यवहार होता. आंदादादाने आपल्याला पैसे द्यावेत, असे सर्वांच्या मनात आले. आंदादादा भल्या सकाळीच शेतात निघून जाऊ लागला व अंधार पडल्यावर परत येऊ लागला. रात्री लक्ष्मी कोणी देत नाही, म्हणून रात्रीऐवजी लोक भल्या पहाटेच दादाच्या घरी जाऊ लागले. दादाच्या दाढीला हात लावून विनवण्या करून तो म्हणेल त्या व्याजदाराने लोक पैसे पदरात पाडून घेऊ लागले. दादाकडचे पैसे घेऊन त्यांचा तो दिवसच नव्हे, तर दिवसच्या दिवस व्याजासह शकुनाचे जाऊ लागले.

ठेच

शनिवारचं कॉलेज आटोपून गावी गेलो. एसटी स्टँडवरून मारुतीच्या देवळापुढून सरळ गल्लीने घराकडे जात होतो. गल्लीच्या मध्यावर माझ्या मित्राचं घर. त्याची आई दारातच बसली होती. जणू काही माझी वाटच पाहत बसली होती. मला पाहून तिनेच विचारले- कसं काय चाललंय वगैरे... मी माझ्या मित्राबद्दल तिला विचारताच ती म्हणाली- ‘बरं झालं. ये.’

मी घरात जाऊन पलंगावर बसलो. तिने आत जाऊन देव्हाऱ्यात ठेवलेलं पोस्टाचं कार्ड आणलं व माझ्या हाती देत म्हणाली, ‘त्याला पत्र लिहायचं होतं.’

मी पत्र घेतलं. पेन काढलं व म्हटलं, ‘पत्ता लिहिलेला तुझा तो नेहमीचा कागद दे.’

म्हणाली, ‘त्या कागदाचा आता उपयोग नाही.’

‘का?’

तर म्हणाली, ‘आता त्याची बदली धुळ्याहून जळगावला झाली. त्याने नवा पत्ता काही कळवला नाही. त्याला म्हण की, नवा पत्ता उलटटपाली पाठवून दे.’

मी म्हटलं की, पत्ता असल्याशिवाय हे पत्र पोचणार नाही.

ती मोठ्या आवाजात म्हणाली, ‘मग तुझा एवढं शिकून काय उपयोग? तुला पत्ता मागवता येत नाही?’  

बुडता हे जन...

लहान भावाला घेऊन महाशिवरात्रीच्या निमित्ताने कपालेश्वरला दर्शन व स्नानाला आई गेली होती. महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेतल्यावर भावाला घेऊन कुंडावर स्नानाला गेली. कपालेश्वरला महाशिवरात्रीची यात्रा भरते, म्हणून गर्दी होतीच. कुंडावरही स्नान करणाऱ्यांची गर्दी होती. स्त्री-पुरुष-मुलं सगळेच स्नान करत होते. ह.भ.प. रघुनाथमहाराजही स्नानासाठी आले होते. आईचे व भावाचे स्नान आटोपलेले होते. आई कपडे बदलून ओले कपडे पिळत होती. दरम्यान, रघुनाथमहाराजांचेही स्नान उरकले. त्यांनी कपडे बदलले.

त्या गर्दीत कोणाच्या तरी धक्क्यामुळे लहान भाऊ कुंडात पडला. पाणी बरंच होतं. आईला कळल्यावर तिने पाहिले आणि काय करावे, या विचारात असतानाच तो गटांगळ्या खायला लागल्यावर आईने आरडाओरड केली. रघुनाथमहाराजांना म्हणाली, ‘महाराज, पोराला वाचवा ना!’

ते म्हणाले, ‘माझे कपडे ओले होतील.’

तेवढ्यात दुसऱ्या एका माऊलीने उत्स्फूर्तपणे कुंडात उडी घेतली व भावाला कुंडाबाहेर काढले.

महाराजांनी मात्र संतोष प्रकट केला व म्हटले : ‘बुडता हे जन न देखवे डोळा। येतो कळवळा म्हणउनी।।’

हेव्या-दाव्याची गोष्ट

बाबा देशमुखांना दोन मुलं होती. एक हेवा आणि दुसरा दावा. दोघं मुलं जुळी होती. त्यांना वायलं ओळखणं फारच अवघड होतं. खुद्द आई-वडील चुकायचे. बाबा आपल्या या जुळ्यांवर फारच प्रेम करायचे. जय आणि विजय या स्वरूपात परमेश्वराचा हा प्रसाद प्राप्त झाला आहे, असे ते मोठ्या अभिमानाने सांगायचे. मुलांना जेवायला बाबा आपल्यासोबतच बसवायचे. दोघं दोन्ही बाजूंना व बाबा मध्यभागी. कपडेलत्ते सारखे, खेळणी सारखी. सर्व काही सारखंच घ्यायचे. मुलं जसजशी मोठी व्हायला लागली तसतसा फरक दृष्टोत्पत्तीस यायला लागला. विशेषत: बाबांना तो फरक लक्षात यायचा. एकाचा रंग किंचितसा उजळ उमटत होता व वजनही कणाकणाने वाढत होतं. तो हेवा.

एकदा ते नेहमीप्रमाणे जेवायला बसले. आईने तिघांना वाढले. बाबांच्या डावीकडे बसलेल्या दावाने उजवीकडे बसलेल्या हेवाच्या ताटाकडे पाहिले. नंतर आपल्या ताटाकडे पाहिले. पूर्वी असं कधी त्याने केलं नव्हतं. वाढण्यातही कधी डावं-उजवं झालेलं नव्हतं. एकदा बाबांनी दोघांना सारखेच सँडल्स आणले व आपल्या हाताने दोघांना एकेक जोड दिले. दोघांनी ते जोड बारकाईने पाहिले. हेवाने दावाचा सँडल्सचा जोड पाहायला मागितला आणि डाव्या पायाच्या सँडल्सची अदलाबदल केली. लहानपणी आई दोघांचा भांग सारखाच पाडून द्यायची. पुढे मोठे झाल्यावर ते आपल्या हातांनी भांगपट्टी करू लागले. हेवा डावीकडे भांग ठेवायचा, तर दावा उजवीकडे. जेवायला बसण्याच्या जागा कधी बदलल्या नव्हत्या, पण उजवीकडे बसणाऱ्या हेवाची जागा दावा पटकावू लागला.

बाबा काँग्रेसचे जुने नेते, स्वातंत्र्यसैनिक. म.गांधी, पं.नेहरू यांच्याशी पहेचान असलेले. संसदेत, विधीमंडळात राहिलेले. आता थकले होते. आपली गादी एखाद्या मुलाने राखावी म्हणून त्यांनी उजळ रंगाच्या व तुलनेने वजनदार हेवाला काँग्रेसचे तिकीट मिळवून दिले. दावाला हेवाचा हेवा वाटला. तो रुसला. अखेरीस तो देवाच्या विरुद्ध भाजपच्या तिकिटावर उभा राहिला व निवडून आला. बाबांना एकाच वेळी आपल्या अस्तित्वलोपाची व पुनर्जन्माची जाणीव झाली.

काळजाची भाषा

गोतमा लव्हारीणचा नारायण दारू पिऊन रोजच तमाशा करायचा. दारू पिऊन इतका लास व्हायचा की, त्याला खाण्या- पिण्याची शुद्ध रहायची नाही. चमत्कारिक गोष्ट म्हणजे दारूच्या नशेत तो आपलं डोकं दगडावर आपटून फोडून घ्यायचा. नारळ फुटल्यावर जसं पाणं वाहतं, तसं रक्त वाहायचं. गोतमा लव्हारीण जिवाला जखम होऊन पाखरासारखी तडफडायची. ती तशाही अवस्थेत घरातल्या हळदीने नारायणच्या डोक्याची जखम भरून रक्तप्रवाह थांबवण्याचा प्रयत्न करायची. घरात हळदीचा स्टॉक भरपूर असायचा, कारण नारायण हा खंडेरायाचा भगत. त्याच्या अंगात यायचं. घरातली हळद म्हणजे नारायणचा भंडारा असायचा.

गोतमाबाई वैतागली होती. पाच मुलं तिला. हा सर्वांत मोठा आणि असा अगुणकारी निघाला होता. बाकीची मुलं आपली  शिस्तीत कामधंदा करत होती. अखेरीस गोतमाबाईने समोरच्या चिंधाअप्पाकडे गहिरत केली. नाऱ्याला चांगलं कूट, असं विनवून म्हणाली. चिंधाअप्पाही शेर-आच्छेर झोकणारे. नाऱ्याचा तमाशा रात्री सुरू झाल्याबरोबर चिंधाअप्पाने ताज्या अंमलमध्ये त्याला बेदम मारले. गोतमाबाईला ते पाहवलं नाही. तिने तत्क्षणी चिंधाअप्पाला शिव्या दिल्या आणि सकाळी उठून पोलिसांत तक्रार नोंदवून आली.

दुपारी तीनच्या सुमारास पोलीस आले. चिंधाअप्पाला बोलावलं. चौकशी सुरू झाली. ‘काय रे, तू याला मारलं ना?’...

‘हो.साहेब.’...

‘का?’...

‘हा दारू पिऊन धिंगाणा घालतो म्हणून याच्या आईने सांगितलं होतं.’...

‘पण तू याला जबर मार दिलास’...

‘हो साहेब. याच्या आईनेच याला चांगलं कूट म्हणून सांगितलं होतं.’...

‘अरे, कोणी काही सांगितलं म्हणजे आपण ते करायचं का? तू हा मोठा गुन्हा केलास.’...

‘हो साहेब, गुन्हा कबूल आहे मला. मला त्याच्या आईची भाषा कळली, पण काळीज नाही कळलं.’...

‘दोन दिवस तुरुंगात ठेवतो तुला आम्ही’ असं म्हणून पोलीस चिंधाअप्पाला घेऊन गेले.

चिंधाअप्पा तुरुंगात, तर इकडे नारायणचा तोच तमाशा सुरू. गोतमाबाई म्हणते, ‘थांब, अप्पाला तुरुंगातून येऊ दे, तुला चांगलं कुटायला लावते.’

व्याजाचे आणि वादाचे पैसे

उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे रात्री विठ्ठलतात्या गल्लीत खाट टाकून झोपले होते. खेड्यात बहुतांश म्हातारी माणसं असंच करीत. तात्या सत्तरीच्या आसपास पोचलेले होते. विठ्ठलतात्याला एकुलता एक मुलगा. पुंडलिक त्याचं नाव. फार शिकला नाही. शेतीतही बिनकामाचा होता. दिवसभर चकाट्या मारणे, रोज दारू पिणे हाच त्याचा उद्योग. तोही चाळीस- बेचाळीस वर्षांचा झाला होता. पोरगं असं निकर्तृकं निघालं आणि शेती या वयात झेपणं शक्य नसल्यामुळे तात्यांनी थोडी सावकारी सुरू केली होती. व्याजाने पैसे देणे, अशी ती सावकारी होती.

दारूची लत लागलेला पुंडलिक रात्री उशिरा लास होऊन यायचा. खाटेवर निजलेल्या बापाला नाहक त्रास द्यायचा. त्यांची चकमक व्हायची. गल्लीतले लोक जागे होऊन गंमत पाहायचे. एका रात्री असाच त्रास द्यायला लागला. बापाला म्हणाला, ‘तुझ्याकडचे सर्व पैसे माझ्याकडे दे. तुझ्या दहाव्याला लागतील.’ विठ्ठलतात्या भडकून म्हणाले, ‘अरे भडव्या, मलाच तुझं दहावं करावं लागेल.’

नखातही रोग नसलेले विठ्ठलतात्या अचानक आजारी पडले. औषधोपचार झाले, पण गुण काही आला नाही व ते वारले.

इकडे त्याच वेळी पुंडलिक नदीकाठच्या हातभट्टीवर पहिल्या धारेची पिऊन अडखळत निघाला आणि नांगरट झालेल्या शेतातून झोकांड्या खात चालताना पडला. आठेक तासांनी कोणी तरी त्याला पडलेला पाहिला. जवळ जाऊन पाहिलं, तर तो गेलेला होता. दोघं गेलेले दोघांना कळले नाही. विठ्ठलतात्याच्या बायकोने म्हणजे पुंडलिकच्या आईने दोघांचे दहावे केले व त्यासाठी व्याजाचे पण वादाचे पैसे वापरले.

गरिबाहून गरीब कोण?

मार्गशीर्ष वद्य एकादशीला आमच्या गावी नदीच्या वाळवंटात यात्रा भरते. यात्रा पंधरा दिवस असते. त्यांतील आठ दिवस तर भरज्याक असते. थंडीचा कहर असतो. या यात्रेत रहाटपाळणे, मौत का कुआँ, तमाशे, भांड्यांची दुकानं, जिलेबी- भज्यांची हॉटेलं अशी एकच गर्दी असते. यात्रेची मजा लुटायला आजूबाजूच्या खेड्यांतील लहान-थोर सगळी मंडळी बैलगाड्यांनी येतात. लहान-थोरांमध्ये अर्थातच गोरगरीब यांचे प्रमाण सर्वाधिक असते. गोरगरीब अर्थातच पायी-पायी येतात. उघड्यावर मुक्काम ठोकतात व पायी-पायी परत जातात. यात्रा हाच त्यांचा खरा विरंगुळ्याचा काळ असतो.

यात्रेच्या काळात भिल्ल जमातीतील एक अत्यंत गरीब जोडपं यात्रा करून रात्री वाळवंटात मुक्कामाला होतं. थंडी मुलखाची. पांघरूण तर नाहीच, पण अंगावरचे कपडेही विरलेले. ते दोघं जीव हुडहुडी भरल्यामुळे एकमेकांच्या कुशीत शिरून उष्णतेची देवाण-घेवाण करीत होते. दातांवर दात आदळावेत अशा थंडीतही नवरा बायकोला म्हणतो, ‘आपली ही परिस्थिती, तर गरिबांचं काय होत असेल?’  

Tags: Katha Hevya Davyachi Gosht Kalajachi Bhasha Vyajache Vadache Paise Garibahun Garib Kon Thech Apashakun Shakun Marathi Short Story Stories Savyasahi लघुकथा कथा हेव्या दाव्याची गोष्ट काळजाची भाषा व्याजाचे आणि वादाचे पैसे गरिबाहून गरीब कोण ठेच अपशकुन शकुन ऱ्हस्वकथा सव्यसाची weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके