डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कोणी तरी नानांना विचारलं, ‘‘काय म्हणतो मुलीचा संसार?’’ ...‘‘अगदी आनंदात आहे. सासर नांदतं आहे. आपल्या घरी कसलीच ददात नसल्यामुळे सासरच्या वैभवाचं काही नावीन्य वाटायचं कारण नाही. पोरीचा एक गुण मात्र वाखाणण्याजोगा आहे. काही करून आठ दिवसांतून येऊन आम्हाला भेटून जाते.’’ ...‘‘सुनेचा संसार काय म्हणतो?’’ ...‘‘अहो, तिचं काय विचारता? एवढ्या खात्या-पित्या घरात ती येऊन पडली आहे; तिला कसली कमी नाही. घरात काही कामधंदा करावा लागत नाही. फक्त तिचं एकच वाईट आहे. आठ दिवस झाले की, ती उठते आणि तिच्या आई-वडिलांना भेटून येते.’’ 

भाकरीला पीठ आणि भाजीला मीठ 


खेड्यातली एक माता आपल्या नवऱ्याच्या आकस्मिक निधनानंतर आपल्या एकुलत्या एका मुलाचा प्रतिपाळ करून त्याला उच्चशिक्षित करते. आता तो वयात आल्यामुळे त्याचं लग्न करायचं ठरवते. का कुणास ठाऊक; पण मुलगी मात्र शहरातीलच पाहिजे, असं तिनं पक्कं ठरवलेलं होतं. योगायोगाने अशी मुलगी सांगून येते. दुग्ध-शर्करायोग म्हणजे ती विज्ञान शाखेची पदवीधर असते. लग्न जमतं. मुहूर्त ठरतो. यथामुहूर्त विवाहही संपन्न होतो. विवाहानंतर नवपरिणीत वधूसह आपल्या खेडेगावात संध्याकाळचे दाखल होतात. सोबत अर्थात निकटचे पाच-पंचवीस नातेवाईकही असतात. 

रात्रीच्या जेवणाचा स्वयंपाक रांधायचा, म्हणून ती माता आपल्या सुनेला घेऊन स्वयंपाकाला लागते. सुनेला भाकरी करायला सांगून स्वत: कालवणाचं पाहायचं ठरवते. पिठाचा डबा, परात, पाणी सुनेला देते. जवळ-जवळच्या दोन्ही चुली पेटवते. एका सुनेने चुलीवर भाकरी रांधायच्या व दुसऱ्या चुलीवर स्वत: कालवणाचं आधण चढवायचं- असं नियोजन ती करते. सून परातीत एका भाकरीच्या मापाचं पीठ घेते. त्यात पाणी टाकते. पाणी जास्त झाल्यामुळे पुन्हा पीठ घेते. आता पीठ जास्त होतं, म्हणून पाणी घालते. पुन्हा पाणी वाढतं. पुन्हा पीठ. 

सासू अर्थातच सुनेच्या कामावर लक्ष ठेवून असते. सुनेचा पीठ-पाण्याचा खेळ तिच्या लक्षात येऊनही सुनेच्या लक्षात येणार नाही अशी काळजी घेत ती काम करत राहते. सून एका भाकरीसाठी एक गोळा घेऊन बाकीचं पीठ बाजूला सारते. भाकरी थापू लागते. तिला गोलाकार तर सोडाच, कुठलाच आकार-उकार प्राप्त होत नाही. 

दुष्काळातल्या जमिनीला भेगा पडतात, तशा भाकरीला भेगा पडतात. भाकर तव्यावर नेताना कित्येक तुकडे खाली पडतात. सून ते वेचून तव्यावर जोडू बघते. पण पाणी न फिरवल्यामुळे ते जुळत नाहीत. ती भाकरी उलथवते, तेव्हा तुकडे इतस्तत: विखुरतात. तव्यावरची भाकरी कुठे काळी पडते, कुठे करपते. दुसऱ्या बाजूचीही तीच गत होते. ती तुकड्या-तुकड्यांची भाकरी कशी तरी टोपलीत टाकते. एव्हाना सर्व भाकरी व्हायला पाहिजे होत्या. सासू न रागवता भाकरी रांधायला स्वत: बसते. सुनेने केलेल्या पिठाच्या गोळ्यातील एक प्रमाणशीर गोळा घेते. प्रमाणात पाणी घालून चांगला मळते. नंतर भाकरी थापते. सुरुवातीला एका हाताने, नंतर दोन्ही हातांचे अंगठे एकमेकांत गुंफून थुईथुई बोटं नाचवत सुंदर गोलाकार भाकरी करते. अलगद उचलून तव्यावर टाकते. भाकरीमुळे तवा गोलाकार वाटावा इतकी फिट्ट बसते. पाठपोट उत्तम भाजते. त्याच वेळी दुसरी भाकरी थापणे चालू असते. तव्यावरची भाकरी चुलीपुढे उभी करते. ती पूर्ण फुगते. सून आश्चर्यचकित होऊन पाहत राहते. 

सासू सुनेकडे मिठाचं मडकं देऊन कालवणाला मीठ टाकायला सांगते. सून मुठीत मीठ घेऊन अंदाजपंचे टाकते. मीठ जास्त झाल्याचं सासूच्या लक्षात येतं. सुनेला न रागावता सासू पळीत रसा घेऊन खाराअळणी कसा झाला, ते चाखून पाहायला सांगते. रसा खारा झाल्याचं सून म्हणते व शरमते. मघाची भाकरीची फजिती व मिठाचं बिघडलेलं प्रमाण यामुळे सासूला सून विचारते, ‘‘भाकरीला किती हीट दिली म्हणजे ती फुगते आणि भाजीला किती सोडियम क्लोराइड दिलं म्हणजे ती खारट होत नाही?’’ सासूबार्इंना सुनेचा प्रश्न परिभाषेविना कळला. सासूबाईने उत्तर दिले, ‘‘बाई, तुझं हिटफिट काही मला कळत नाही; कळतं ते हे की, ‘भाकरीला लागतं ते पीठ आणि कालवणाला लागतं मीठ!’’  
बाजीराव नाना
बाजीराव नाना फार हुशार माणूस. अत्यंत धोरणी. संसार कटबन करणारा. जेथे भरपूर बोलायला पाहिजे तिथे भरपूर बोलणार. जिथे अजिबात बोलायचे नाही, तिथे तोंडात गुळणी धरून बसणार. व्यवसाय शेतीचा, पण कधी औत धरलं नाही. कपडे कायम मसराईजचे. धोतर, शर्ट, टोपी- सर्व धवळफुल. चेहरा उजळ. नाक धारदार. डोळे शोधक. देहयष्टी उंच आणि प्रमाणबद्ध. शेतीचं काम गडीमाणूस करायचा. एका गडीमाणसाचं संपूर्ण आयुष्य त्यांच्याकडेच गेलं. आता त्या गडीमाणसाचा मुलगा काम करतो. प्रपंचाची घडी अशी बसवली की- कुठे उणे नाही, कुठे पातळ नाही. नानांना दोनच मुलं. एक मुलगा व एक मुलगी. वर्षाच्या अंतरानं झालेली. दोन्ही मुलांची लग्नं एकाच वर्षात थोड्या दिवसांच्या फरकाने उरकून घेतली. मुलाचं लग्न मुलीकडच्यांवर प्रभाव टाकून थाटामाटात करून घेतलं, तर मुलीचं लग्न मुलांकडच्या लोकांचा प्रभाव पडू न देता आपणापाशी असणाऱ्या सर्व सॉफ्ट व हार्ड स्किल्सचा वापर करून आपल्या अभिजात हिशोबीपणा पणाला लावत दिखाऊपणाचे सर्व सामाजिक उपक्रम राबवत पार पाडले. 

सहा-सात महिने झाले असतील दोन्ही लग्नांना! कोणी तरी नानांना विचारलं, ‘‘काय म्हणतो मुलीचा संसार?’’ ...‘‘अगदी आनंदात आहे. सासर नांदतं आहे. आपल्या घरी कसलीच ददात नसल्यामुळे सासरच्या वैभवाचं काही नावीन्य वाटायचं कारण नाही. पोरीचा एक गुण मात्र वाखाणण्याजोगा आहे. काही करून आठ दिवसांतून येऊन आम्हाला भेटून जाते.’’ ...‘‘सुनेचा संसार काय म्हणतो?’’ ...‘‘अहो, तिचं काय विचारता? एवढ्या खात्या-पित्या घरात ती येऊन पडली आहे; तिला कसली कमी नाही. घरात काही कामधंदा करावा लागत नाही. फक्त तिचं एकच वाईट आहे. आठ दिवस झाले की, ती उठते आणि तिच्या आई-वडिलांना भेटून येते.’’ 

बाजीराव नानांचे चेहऱ्यावरील कसलेले भाव विसंगतीची एखादी रेषा काय उमटू देतील!  

 
मुत्सद्दी नेता 

लोकसभेची निवडणूक लागलेली होती. गोष्ट तशी जुनी आहे. एक मोठे नेते हेलिकॉप्टरने फिरून प्रचार करत होते. दिवसाकाठी अनेक सभा घेत. इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या आधीचा काळ होता. त्यामुळे सभांना फारच महत्त्व होतं. प्रत्येक पक्षाचा नेता आपली धोरणं मांडून विकासाचे मुद्दे स्पष्ट करायचा. तालुक्याच्या गावी किंवा मध्यवर्ती असलेल्या मोठ्या गावांमध्ये सभांचं आयोजन केलं जायचं. पंचक्रोशीतील लोकांना सभेला जाणं सोईचं व्हायचं व पक्षांना गर्दी जमवणं आपसूक साधायचं. हेलिपॅड, उंच स्टेज, उघडी जीप असा थाटमाट असायचा. सत्ताधारी पक्षाच्या सभा याबाबतीत इम्प्रेसिव्ह होत. 

या सभांसाठी वर उल्लेख केलेले जे मोठे नेते फिरत होते, त्यांनी एका सभेत पक्षीय धोरणं, विकासाची मार्गी लावलेली कामं यांचा आढावा घेतला आणि समारोप करताना म्हणाले की- सुदैवाने तुमचे उमेदवार जुने, जाणते व अनुभवी आहेत. संसदेत तरुणांचं काम नाही, कारण त्यांच्यापाशी अनुभव नसतात, तेव्हा जुन्या उमेदवारालाच मत द्या. असं आवाहन करून ते पुढच्या सभेला गेले. पुढच्या सभेच्या स्टेजवर जाईपर्यंत कार्यकर्ते आपल्या वाहनांना वेगाने दामटवत तिथे पोचले. नेत्यांचं आधीच्या सभेतल्याप्रमाणे भाषण झालं. समारोप करताना उमेदवाराविषयी बोलले, ‘‘सुदैवाने तुमचे उमेदवार तरुण आहेत. संसदेत जुन्या लोकांची गरज नाही. नवे लोकच नव्या युगाच्या संकल्पना आणू शकतात. तेव्हा नव्या तरुण रक्ताला वाव द्या’’ असे आवाहन करून त्यांनी पुढच्या सभेला प्रस्थान ठेवलं. 

नेते स्टेजवर पोचेपर्यंत कार्यकर्ते पोचले. नेत्यांनी पूर्वीच्याच भाषणाची टेप ऐकवली. समारोप करताना म्हणाले, ‘‘सुदैवाने तुमचा उमेदवार महिला आहे. खस्ता खाऊन संसार निगुतीने चालवण्याचा महिलांमध्ये गुण असतो. तुमच्या मतदारसंघाचा विकास व्हावा. असं वाटत असेल; तर त्यांना भरभरून मतांनी विजयी करा’’ असं आवाहन करून नेते मुंबईला का दिल्लीला निघून गेले. झाडावरून पक्षी उडून जावेत तसे कार्यकर्तेही पांगले. वाटेत असलेल्या एकमेव ढाब्यावर वेगवेगळ्या गावांचे कार्यकर्ते- किमान शे-दोनशे तरी असतील ते- थांबले. 

जेवताना चर्चा भरात आली. नेत्याचा आदेश पाळायचा म्हणजे पाळायचा, असं ठरलं. कार्यकर्त्यांनी आपापल्या गावांमध्ये बैठका घेऊन सांगितलं, ‘‘आपला उमेदवार जुना आहे. पण नव्या रक्ताला वाव देण्याचं नेत्याचं आवाहन आहे, तर आपला उमेदवार पडला तरी चालेल; पण विरोधी पक्षातल्या तरुण उमेदवाराला निवडून द्यायचं.’’ ज्या गावांमध्ये पक्षाचा तरुण उमेदवार होता, तिथे विरोधी उमेदवार जुना होता. नेत्याच्या आदेशानुसार तिथे जुन्याला निवडून द्यायचं ठरलं. जिथे पक्षाच्या महिला उमेदवार होत्या, तिथे विरोधी पक्षाच्या उमेदवारही महिला होता; पण कष्टांच्या बाबतीत त्या सरस होत्या. म्हणून नेत्याच्या आवाहनाचे मर्म जाणून निगुतीने वैयक्तिक प्रपंच उभा करणाऱ्या विरोधी महिलेला निवडून द्यायचं कार्यकर्त्यांनी ठरवले. पक्षाचे अधिकृत तिन्ही उमेदवार पराभूत झाल्याचे निकालानंतर जाहीर झाले.     

Tags: सव्यसाची ह्रस्वकथा मुत्सद्दी नेता  भाकरीला पीठ आणि भाजीला मीठ  weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके