डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

निःस्वार्थी, त्यागी लालजी

लालजींची सायकल म्हणजे अजब नमुना! संपूर्ण पायडल फिरवावे म्हणजे फ्रिव्हीलचे दाते बसत. सायकलचे सीट म्हणजे खाच- खळगे. परंतु लालजी आरामात त्यावर निघाले. शेवटी मी, दादा बोरकर आदी मंडळींनी सातारपर्यंत मैल वाटून घेऊन सदर सायकलच्या तडाख्यातून लालजींची सुटका केली.

"लालजी" हे नाव नुसते कोणी सहजगत्या बोलले तर 1946 पासूनचे चित्र अनेक प्रकारे डोळ्यांसमोर उभे राहते. सेवादलातील काही व्यक्तींच्या कधीही न विसरता येणाऱ्या आठवणी आहेत. माझे-लालजींचे कधीही पटले नाही. परंतु लालजींशिवाय माझी कोणती कामेही झाली नाहीत. अगदी कडाडून भांडलो तरी पुन्हा दुसऱ्या दिवशी एकत्रित आहोतच. अगदी जुनी आठवण म्हणजे वरवंड येथे सेवा दलाचे शिबिर होते. त्यावेळी 'अपना भंडार' हे सदाशिव पेठेत एक स्टोअर्स मी सेवा दलाचे म्हणून चालवत होतो. सदर स्टोअर्स कोणीही पाहील परंतु मला शिबिराला जाऊ देण्याविषयी मी आग्रही होतो. माझ्या वतीने श्री नारायण तोलाट यांनी खूपच गळ घातली. परंतु नाही म्हणजे नाही.

दुसरा प्रसंग. 75 सैनिकांची टोळी सातारा मेळाव्यास सायकलवर जाण्यासाठी निघाली. 1947 साली. लालजी त्यांचे प्रमुख. मेळाव्यास जायचे म्हणून आम्ही अगदी कोऱ्या करकरीत सायकली भाड्याने घेतल्या. लालजींची सायकल म्हणजे अजब नमुना! संपूर्ण पायडल फिरवावे म्हणजे फ्रिव्हीलचे दाते बसत. सायकलचे सीट म्हणजे खाच- खळगे. परंतु लालजी आरामात त्यावर निघाले. शेवटी मी, दादा बोरकर आदी मंडळींनी सातारपर्यंत मैल वाटून घेऊन सदर सायकलच्या तडाख्यातून लालजींची सुटका केली. 

त्यानंतरचे अनेक प्रसंग असे आहेत की लालजींनी तत्त्व केव्हाही सोडले नाही. त्यासाठी वडीलधारे यांच्या दडपणाला महत्व दिले नाही. लोक त्यांना हेकट म्हणत, परंतु लालजींची जी भावना होती ती जर लक्षात घेतली तर त्यामागे त्यांचा नेमका काय आग्रह होता हे कळत असे. त्यांच्या हाताखाली ते सेवादलाचे शहर जिल्हा- संघटक असताना काम करण्याची संधी मला मिळाली व कमी खर्चात, शक्यतो बिना पैशात कामे संघटनेसाठी कशी करावी हे शिकावयास मिळाले. मग ते सभेचे असो-लाउडस्पीकरचे लाईटचे अगर बैठकीची सजावट असो.

सेवादलात मिळाले, त्यानंतर प्रजा समाजवादी पक्षात मिळाले, त्यानंतर संयुक्त समाजवादी पक्षात मिळाले. परंतु प्रत्येक वेळी लालजींचे मार्गदर्शन असे. लालजींच्या अवती-भोवती तरुण मुलांचा घोळका कचेरीत असे. त्यामुळे अनेक तरुण मुलांना समजावून सांगणे- त्यांचा राग घालवणे- त्यांच्याकडून अयोग्य वर्तन घडू न देणे याचा पाठ देण्याचे लालजींचे काम चालू असे. विशेष म्हणजे आमची मुले त्यांचेकडे पोहणे शिकल्याचे विसरणार नाहीत. कारण माझा मुलगा शिकावयास गेला. त्याने सोबत मित्रांना नेले. मित्रांनी त्यांच्या मित्रांना नेले. परंतु कर्मयोग्याप्रमाणे या सर्वांना पोहण्याचा पाठ देण्याचे काम लालजींनी शेवटपर्यंत केले.

लालजींचा सत्काराचा कार्यक्रम हा अगदी आठवणीत राहाण्यासारखा आहे. आपल्या घरातच तो समारंभ आहे अशा भावनेने असंख्य कार्यकर्ते आले होते. आणि तीच दृष्ट खरे तर लालजींना लागली असावी.

काकाकुवा मॅन्शन हे त्यांचे खरे स्मारक आहे. वास्तविक ते तेथले सर्व काही असून जनता पक्ष स्थापनेनंतर तेथे काहीच राहिले नव्हते. एक अडगळ म्हणून त्यांच्याकडे तेथे पाहिले जाई. लालजींनी ही परिस्थिती जाणून व्हरांड्यात  आपल्यासाठी सोय करून घेतली. ही जाणीव कायमची टोचणारी आहे. आज रस्त्याने जाताना कोणी चष्मा- जाकीट- टोपीवाला दिसला की सायकलवरील लालजी लक्षात येतात आणि मागील 30-32 वर्षांच्या आठवणी जाग्या होतात.

लालजींच्या आठवणी लिहावयाच्या म्हटल्यावर प्रत्येक दिवसाच्या लिहाव्या लागतील. परंतु त्या उत्तम तऱ्हेने लिहिणारे असंख्य चहाते आहेत. सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना खरा आधार लालजींचा होता. आम्ही रागावलो किंवा कचेरीवर जाईनासे झालो की लालजींनाही करमत नसे. ते घरी येऊन माहिती घेऊन समाधान झाल्यावरच परतत असत. अशी जवळीक असणारे- आम्हास जाणून घेण्याचा प्रयत्न करणारी जी काही मंडळी आहेत, त्यांत लालजी एक होते. ते गेल्यामुळे एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे व ती भरून निघणे अवघड आहे. लालजींची आठवण मनात ठेवून जे काही काम करता येणे शक्य आहे ते करणे एवढीच लालजींना श्रद्धांजली!

Tags: काकाकुवा मॅन्शन सदाशिव पेठ सातारा राष्ट्र सेवा दल लालजी कुलकर्णी Kakakuwa Mansion Sadashiv Peth Satara Rashtra Seva Dal Lalji Kulkarni weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके