डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

एका डॉक्टरची गोष्ट (खरीखरी)!

वडील आले. त्यांनी हंबरडा फोडला, 'शरीफा! तुझे यह क्या हुवा?' खरेच, त्यांची मुलगी वेडी झाली होती. नराधमाची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी. सत्यशोधकचे श्री.सय्यदभाई तळतळून सांगतात, अहो, त्या कोणाच्या तरी मुली आहेत! बहिणी आहेत!

हल्ली डॉक्टरकी करणारा परंतु पूर्वीचा पोस्टखात्यातला हा मनुष्य! वय अंदाजे 52 वर्षे. वैद्यकीय व्यवसायाचा परवाना मिळवून एका तालुका गावी छोटासा दवाखानाही यांनी थाटला. ग्रामीण भागात व्यवसाय. भरपूर पैसा मिळू लागला. पुण्यातील नानापेठेतील घर सोडून एक फ्लॅट खरेदी केला. तेथे या डॉक्टरची 45 वर्षे वयाची पत्नी आणि नऊ लहानमोठी मुले राहू लागली. डॉक्टरांना पैसा मिळू लागल्याने या वयातही त्यांना दुसरे लग्न करण्याची इच्छा झाली. त्यांचा विचार समजताच मुलांनी खूप विनविले, समजूत घातली. परंतु त्याचा उपयोग नाही असे पाहून अखेरीस 'दुसरे लग्न करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही हाणून पाडू' असेही बजावले!

डॉक्टरांनी अशा वेळी मशिदीतील पेशइमामकडे धाव घेऊन मनोदय सांगितला. पेशइमाम म्हणाले, 'आप साहैबे माल है! आपने अपने बीबी और बच्चों का हक पूरा किया। अब आपको दूसरी शादी करनेका मजहबी हक है। आपको कोई नहीं रोक सकता अल्लाह आपका मददगार है।' 

पेशइमामनी म्हटल्याप्रमाणे-अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन दिल्याने डॉक्टरसाहेब अधिकच चेकाळले. वर्तमानपत्रात पोस्ट-बॉक्सवर जाहिरात दिली, 'भरपूर उत्पन्न असलेल्या कार्यक्षम मुस्लिम डॉक्टरला वधू पाहिजे.' डॉक्टर स्थळ म्हटल्यावर काय, अनेक वधूपित्यांची पत्रे आली, परंतु घरातील विरोधामुळे पुण्यात लग्न करणे शक्यच नव्हते. त्यामुळे या स्थळांपैकी एक पसंत करून या मुलीकडील लोकांना चाकणलाच बोलावून घेतले. त्यांना सांगितले-मी एकटाच आहे. या दवाखान्याच्या मागेच रहावे लागेल. लग्न निकाह शरियतप्रमाणे म्हणजे घरातल्या घरात लावावे लागेल. मेहेर फक्त रु. 125 असेल. कारण का, तर मी सच्चा मुसलमान असून शरियतचा पालनकर्ता आहे. इस्लामने लग्न साधेपणाने करण्यास सांगून वायफळ खर्चास मनाई केली आहे. त्यामुळे मुलीकडील सर्व मंडळी एकदम खूष झाली. सच्चा मुसलमान खोटं बोलणारच नाही. त्यामुळे अधिक चौकशी न करताच एका आठवड्यात डॉक्टर निकाह लावून मोकळे झाले. जेमतेम महिनाभर दवाखान्याच्या मागील खोलीत संसार केला. डॉक्टर पुण्यास आले. येथे येताच, घरच्यांनी इतके दिवस कोठे होता? अशी विचारणा करताच, एक पेशंट सीरियस होता, त्याचेबरोबर रहावे लागले-असा खुलासा केला. यापुढेही एक दिवस आड तिथे राहावे लागेल. तुम्ही माझी काळजी करू नका, असे ते म्हणाले. चाकणला परत जाताच नवीन पत्नी झरीनाने काळजीने विचारले, 'काल रात्री तुम्ही कोठे होता?' त्यावर डॉक्टरांनी पुण्यातही एक 10 कॉटचा छोटा दवाखाना सुरू केला असून तिकडे एक दिवस आड जावे लागेल असे सांगितल्याने बिचारी गप्प बसली. काही दिवसांतच डॉक्टरांची बनवाबनवी तिच्या लक्षात आली व तिने माहेरच्या लोकांना तसे कळविले. माहेरचे लोक चिडले व त्यांनी डॉक्टरला जाब विचारताच तो त्यांचे अंगावर खेसकून म्हणाला, 'तुम्हाला काय त्रास होतोय? तुमच्या मुलीला खायला मिळतंय ना? मग ओरडताय कशाला? आपल्यात चार बायका करायची परवानगी आहे! मग पहिली पत्नी आहे हे सांगायचं काय कारण? उगाच खाजवून खरुज कशाला काढायची?' 

या उद्गारावर सर्व मंडळी आवासून पाहातच राहिली! त्यानंतर 'काही दिवसांसाठी तुमच्या मुलीला घरी घेऊन जा. मी न्यायला येईन,' असे सांगून सासऱ्याबरोबर पत्नीस पाठवून दिले. काही दिवसानंतर एकतर्फी तलाक पाठवून दिला. त्यात न सांगताच घरातून पळून गेल्याचा व जाताना दहा हजाराचे दागिने घेऊन गेल्याचा आरोप होता. अशा तऱ्हेने डॉक्टरसाहेब दुसरीस तलाक देऊन मोकळे झाले! जाहिरातीमुळे स्थळे खूप आली होती. त्यामुळे डॉक्टर तिसऱ्या व नव्या मुलीच्या शोधास लागले. त्यांना वाईचे एक स्थळ योग्य वाटल्याने ते स्वतः वाईस गेले. आपल्या मोठेपणाचा बडेजाव सांगून आपल्या शेवटल्या मुलीच्या वयाची अशा 18 वर्षे वयाच्या मुलीशी निकाह उरकून चाकणला आले. दरम्यान पहिल्या पत्नीस या सर्व प्रकारची कुणकुण लागून न राहवल्याने सर्व मुलांसह तिने चाकण गाठले. त्यामुळे तिथे एकच गोंधळ उडाला. वाईहून आलेली नववधू बिचारी अवाक् झाली. तिचे नाव शरिफाबी. तिचेही पहिले लग्न झाले होते, परंतु नवऱ्याने क्षुल्लक कारणावरून 6 महिन्यांत तिला तलाक देऊन घराबाहेर काढले होते. बाप बिचारा गरीब. 52 वर्षे वयाच्या म्हाताऱ्या डॉक्टरबरोबर त्याची मुलगी शोभेल, अशा मुलीचे केवळ पोटाची खळगी भरावी व जगाने नावे ठेवू नये म्हणून लग्न लावून दिले. डॉक्टरच्या अगोदरच्या दोन बायका व नऊ मुले आहेत, हे समजल्यावर शरिफाचे डोकेच बधिर झाले. तिला भविष्य अंधकारमय दिसू लागले. अगोदरच पहिल्या नवऱ्याने टाकलेली! त्यात आता हा पती तरी आपल्याला सांभाळणार का? का हाही तलाक देणार? वडील अत्यंत गरीब आहेत. त्यांना जर हे समजले तर ते आत्महत्याही करतील, असे ती प्रत्येकाजवळ बोलू लागली. डॉक्टरांनी वाईला तिच्या वडिलांना कळविले की, 'तुमची मुलगी वेडी आहे. ती जिवाचे काहीतरी बरे वाईट करून घेईल. त्याला मी जबाबदार नाही. तिला घेऊन जा.' मुलीचे वडील पत्र मिळताच धावत आले. मुलीला भेटताच हंबरडा फोडून, 'शरीफा, तुझे यह क्या हुआ?' ते म्हणाले. शरीफा आता खरोखरच वेडी झाली होती. ती सारखा एकच प्रश्न विचारी, 'वो मुझे तलाक तो नहीं देंगे? बाबा, उनको बोलो, मुझे तलाक नही देना!' 

डॉक्टरांनी आपल्याच वयाच्या सासऱ्याला बाजूस घेऊन त्यांच्या हातात एक बंद लिफाफा दिला व सांगितले यात वाईच्या डॉक्टरांना चिठ्ठी दिली आहे. त्यांना तिची प्रकृती दाखवा. काही दिवसांत तिला नेण्यास येतो. बिचारे सासरे तो लिफाफा घेऊन वाईस गेले. तेथे गेल्यावर लिफाफा उघडून पाहतात, तो त्यात तलाकनामा व मेहेरचे रु. 125 अधिक इद्दतचे रु. 75 मिळून रुपये 200 होते. 

तलाकनामा पाहताच शरिफाच्या वडिलांना चक्कर आली. इकडे शरीफा वेडाच्या भरात सारखी बडबडतच होती. तिचे वडील वाईच्या जमातीकडे गेले. पेशइमामना भेटले. गावातल्या अन्य पुढाऱ्यांना भेटले. परंतु सर्वांनी 'अल्लाहकी मर्जी यही थी!' असे म्हणून वाटेस लावले.   

'दवाखान्यात कामासाठी नर्स पाहिजे' अशी जाहिरात देऊन डॉक्टरने निराळ्या मार्गाने आपला हेतू साधण्याचा उद्योग परत सुरु केला. काही मुस्लिम मुलींचेही अर्ज आले, त्यांतील निवडून एकीला दवाखान्यात कामाला ठेवले. काही दिवसांनी डॉक्टर आपले चाळे करू लागला. हे त्या नर्स मुलीच्या लक्षात येताच तिने नोकरी व गाव सोडले. त्याचा डॉक्टरला फार राग आला व 'भावी पत्नी' पळून गेली असे त्या नर्स मुलीच्या नावे वर्तमानपत्रात जाहिरात दिली. शिवाय हिचेशी (त्या नर्सचे नाव शबनम शेख) कोणीही लग्न करू नये, असेही जाहीर केले. 

डॉक्टरने शबनमला अखेर एका खेड्यातून शोधून काढले व तिच्या आई-वडिलांना मोठी आमिषे दाखवून शेवटी शबनमशी दवाखान्यातच निकाह लावला व कोऱ्या कागदावर शबनाची सही घेतली. कारण विचारल्यावर डॉक्टर म्हणाला, 'दवाखाना तुझ्या नावाने करायचा नाहे मला!' डॉक्टरने दवाखान्याच्या मागच्या खोलीत आपला चौथा संसार थाटला. दरम्यान शबानाला दिवस गेले. शबाना सुखावली तर डॉक्टर काळजीत पडला. त्याला शबानाचे मूल नको होते. मुलाचे वाढीसाठी म्हणून डॉक्टरने शबानाला काही औषधं दिली. परिणामी डॉक्टरला यश आले. शबानाचा 'गर्भपात' झाला. झाले, डॉक्टर शबानावर उलटला. 'तुनेही मेरा बच्चा गिराया! अब तू मेरी काम की नहीं' असे म्हणाला. शेवटी डॉक्टरच्या थिअरीप्रमाणे शबानाला आठवडाभर विश्रांतीसाठी माहेरी पाठवली. बरोबर वडिलांना देण्यासाठी एक लखोटा बरोबर दिला. वडिलांनी लखोटा फोडला. त्यात शबानाची सही घेतलेल्या कागदावर 'खुला तलाक' (बायकोने मागण्याचा तलाक, कारण मुस्लिम कायद्यात स्त्रीला तलाक देण्याचा अधिकार नाही. पतीकडे तलाक मागता येतो. त्यावर पती तिला तलाक देतो. त्याला खुला तलाक म्हणतात.) लिहिला होता. तलाक पाहताच शबानाच्या वडिलांना घेरी झाली. त्यांनी वकिलांकडे धाव घेतली, मेरी बेटी की जिंदगी बरबाद हो गई- म्हणून हंबरडा फोडला.

वकीलसाहेब म्हणाले, काही करता येत नाही. कारण तुमच्या मुलीनेच तलाक मागितला आहे. कागदावर तिची सही आहे.

झालं, परत डॉक्टर नाता पाचवीच्या शोधात. या प्रकारे त्यांनी आलटून पालटून चौदा 'निका' लावले. परत कागदोपत्री सगळी जबाबदारी बायकांचीच, असे पुरावे अजूनही बाळगून आहे. 

मला तो एकदा म्हणाला, जगात माझ्यासारखा दुर्दैवी, दुःखी माणूस दुसरा नसेल. उपरोक्त सत्यकथेबाबत आपण बोलू शकतो. कहाणी ऐकून मन बधिर होते. बिचारी झरीना, शरीफा आणि शबाना काय, त्या कोणाच्या तरी भगिनी, मुली असणार. ज्याच्यावर प्रसंग गुदरतो त्याला त्याचे भयंकर चटके बसतात. परंतु समाजातील लब्धप्रतिष्ठित या डॉक्टरसारखे लोक धर्माची ढाल वापरून मानवी मूल्ये पायदळी तुडवितात आणि धर्माचा डांगोरा पिटून अन्यायाला वाचाही फुटू देत नाहीत. शासनही मतांच्या सौदेबाजीसाठी मुस्लिमांच्या व्यक्तिगत कायद्यात बदल केला जाणार नाही असे मोठ्या गौरवाने वारंवार घोषणा करीत असते! 

पुरुषाला असा एकतर्फी मन मानेल अशी परवानगी असलेला कायदा जोपर्यंत आहे तोपर्यंत मुस्लिम भगिनीला वापरायची वस्तुपलिकडे किंमत राहणार नाही. समतावादी समाजरचनेची गवाही ही धर्मनिरपेक्ष राज्यांत एक फसवणूक ठरेल. म्हणून मुस्लिम व्यक्तिगत कायद्यात बदल करून मुस्लिम स्त्रियांना समानतेचे हक्क द्यावेत.

Tags: मेहेर. निकाह तलाक मुस्लिम स्त्रिया सय्यद भाई Meher. #मुस्लीम व्यक्तीगत कायदा Nikah Talaq Muslim Women Sayyed Bhai #Muslim Personal Law weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सय्यदभाई

मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे माजी अध्यक्ष आणि दलवाईंच्या विचाराने अर्धशतकभर कार्यरत असलेले कार्यकर्ता 
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके