डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

या गुलमोहोराच्या फुलाच्या लाल-केशरी पाकळ्या काय सुंदर दिसतात! आणि प्रत्येक फुलामध्ये एक राजाची पाकळी असतेच. लाल कडा असलेली. पांढऱ्या रंगाची. मधेच लाल- केशरी पट्टे आणि प्रत्येक फुलात एकच. पावसाळ्यात या पाकळ्यांचा छान सडाच पडतो आणि झाडंसुद्धा लालेलाल दिसतात... त्या कळ्याही भारीच. त्यांच्या आत ते घोडे असतात. गडद लाल रंगाचे. त्यांनी आम्ही तासाच्या मध्ये खेळतो. दोघाजणांनी एक-एक घोडा हातात धरायचा. त्यांची मुंडकी एकमेकांत अडकवायची आणि खेचायचं. ज्या घोड्याचं मुंडकं तुटेल तो हरला... आणि त्या कळीच्या पाकळ्या वेगळ्या काढल्या की नखाला चिकटवून नखं मोठी झाल्याची फालतूगिरीसुद्धा करता येते... तेवढ्यात घंटा झाली, मधली सुट्टी संपल्याची. मी ते गुलमोहोराचं फूल खिशात घातलं आणि वर्गात गेलो. 

आज इतिहासाच्या सरांनी तासाला आम्हाला सांगितलं, ‘‘तुमच्या आयुष्यात कुणाचा तरी ‘आदर्श’ पाहिजे.’’ मग सगळेच एक दुसऱ्याला एकमेकांचे ‘आदर्श’ विचारायला लागले. मधल्या सुट्टीत चैतन्यने मला विचारलंच की, ‘‘तुझा आदर्श कोण?’’

मी काहीतरी उत्तर देणार होतो. ‘शिवाजी महाराज’, ‘भगतसिंग’ किंवा मग ‘गांधीजी’. पण मी उलट त्यालाच विचारलं, ‘‘तुझं कोणय आदर्श?’’ तर तो म्हणाला, ‘भगतसिंग. तेविसाव्या वर्षी देशासाठी प्राण द्यायचे म्हणजे महानच. केवढा मोठा त्याग. मी भगतसिंगसारखीच देशाची सेवा करणार...’ मग तो भगतसिंगांविषयी काय काय सांगत बसला.

मी डबा खाल्ला आणि हात धुवायला नळापाशी आलो; तर तिथे विपुल आणि रोहन बोलत होते. पुन्हा ‘आदर्शा’बद्दलच. विपुल म्हणाला, ‘‘माझे ‘आदर्श’ आमचे शाखेचे सर. सगळं आयुष्य त्यांनी देशासाठीच वाहिलंय. घर वगैरे सोडून ते कायम शाखेच्या कार्यालयातच राहतात.’’  

मी हात धुवून ग्राऊंडकडे आलो आणि नेहमीच्या गुलमोहोराच्या झाडाच्या कट्‌ट्यावर जाऊन बसलो आणि ‘माझा आदर्श कोण?’ याचा विचार करायला लागलो... शिवाजी महाराज... सोळाव्या वर्षी गड जिंकला. म्हणजे माझ्यापेक्षा सहा-सात वर्षांनी मोठे असताना हे एवढे शूर म्हणजे महानच. गांधीजींचंसुद्धा चांगलं आहे... सत्य, अहिंसा.

कोण सांगायचा आपला ‘आदर्श?’ आपलं तर काय क्रिकेटसुद्धा चांगलं नाही. नाहीतर सचिन, द्रविड काहीतरी सांगितलं असतं. ते पण देशासाठीच खेळतात ना... की सरळ ‘भगतसिंग’ सांगू?.... 

या गुलमोहोराच्या फुलाच्या लाल-केशरी पाकळ्या काय सुंदर दिसतात! आणि प्रत्येक फुलामध्ये एक राजाची पाकळी असतेच. लाल कडा असलेली. पांढऱ्या रंगाची. मधेच लाल- केशरी पट्टे आणि प्रत्येक फुलात एकच. पावसाळ्यात या पाकळ्यांचा छान सडाच पडतो आणि झाडंसुद्धा लालेलाल दिसतात... त्या कळ्याही भारीच. त्यांच्या आत ते घोडे असतात. गडद लाल रंगाचे. त्यांनी आम्ही तासाच्या मध्ये खेळतो. दोघाजणांनी एक-एक घोडा हातात धरायचा. त्यांची मुंडकी एकमेकांत अडकवायची आणि खेचायचं. ज्या घोड्याचं मुंडकं तुटेल तो हरला... आणि त्या कळीच्या पाकळ्या वेगळ्या काढल्या की नखाला चिकटवून नखं मोठी झाल्याची फालतूगिरीसुद्धा करता येते... तेवढ्यात घंटा झाली, मधली सुट्टी संपल्याची. मी ते गुलमोहोराचं फूल खिशात घातलं आणि वर्गात गेलो. 

ते ‘आदर्शा’चं काही ठरवणं झालंच नाही. पुढचा तास सुरू झाला. मी त्या गुलमोहोराच्या फुलाच्या पाकळ्या काढल्या. एक राजाची, दुसऱ्या साध्या आणि वहीत ठेवून दिल्या. असेच तास गेले. शाळा सुटली. आज शनिवार म्हणजे शाळा सुटल्यावर ग्राऊंडवर क्रिकेट होणार. मीसुद्धा थांबतो बऱ्याच वेळा. फिल्डिंग वगैरे करतो. म्हणून मग मी गुलमोहोराच्या कट्‌ट्यावर दप्तर ठेवून बसून राहिलो. थोड्या वेळाने स्टंप वगैरे लावून झाल्यावर सगळ्यांचं क्रिकेट सुरू झालं. 

मी नुसताच कट्‌ट्यावर बसून राहिलो. ते ‘आदर्शा’चं काही सुचत नव्हतं... ...या पाकळ्या मात्र कमालीच्या सुंदर दिसतात. हे झाडच खूप सुंदर आहे. आयला हो, हे गुलमोहोराचं झाडच माझा ‘आदर्श’ आहे... इथे एका कोपऱ्यात उभं असतं. आवाज करत नाही. ग्राऊंडवरच्या भयानक उन्हात एवढी सावली देतं. कट्‌ट्यावर बसायला मिळते. फांदीच्या काठ्यासुद्धा ‘भुतकांडी’ खेळायला उपयोगी येतात. फुलंसुद्धा किती सुंदर! आणि प्रत्येक फुलामध्ये एकच राजाची पाकळी. भारीच... ठरलंच. आपला आदर्श- उपयोगी पडणारं आणि शांत राहणारं- ‘गुलमोहोराचं झाड.’ 

मग मी लगेच दप्तर घेऊन घरी गेलो.... रविवार गेला... सोमवारी परत शाळा. मी आज माझा ‘आदर्श’ ठरवून आलो होतो. तास सुरू झाले. संपले. मधली सुट्टी झाली. पुढचे तास झाले. शाळा सुटली. आज काही ‘आदर्शां’ची वगैरे चर्चाच झाली नाही आणि आज इतिहासाचाही तास नव्हता. मी थोडा उदास झालो. आता मी ‘आदर्श’ ठरवून आलो, तर कोणीच विचारलं नाही.

मग घरी जायला निघालो. तर दिसलंच गुलमोहोराचं झाड. ते आपलं कोपऱ्यात उभं होतं. शांतपणे. माझा ‘आदर्श’.  मी कट्‌ट्यावर जाऊन बसलो. ....आज इतिहासाचा तास नाही म्हणून ‘आदर्शां’ची चर्चा नाही. जसे काही ‘आदर्श’च इतिहास बनल्यासारखे. मग मला जरा बरं वाटू लागलं. माझा ‘आदर्श’ मला रोज दिसणार होता. येता-जाता, वर्गाच्या खिडकीतून, कुठल्याही तासाला. मग मला आनंदच झाला. ....आणि मी घराकडे चालायला लागलो. माझ्या ‘आदर्शा’सारखाच... शांतपणे. 

साधना : 12 जानेवारी 2008 (बालसाधना) 

Tags: महात्मा गांधी शिवाजी महाराज आदर्श भगतसिंग फुलं गुलमोहोराचं झाड Mahatma Gandhi Shivaji Maharaj Adarsh Bhagat Singh flowers Gulmohora tree weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अवधूत डोंगरे
dongareavadhoot@gmail.com

अवधूत डोंगरे हे लेखक- अनुवादक आहेत. ते एक रेघ नावाचा ब्लॉग लिहितात. त्यांना 2014चा साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळाला आहे. एक आझाद इसम (अनुवादित, लेखक - अमन सेठी), नेहरू व बोस (अनुवादित, लेखक - रुद्रांग्शू मुखर्जी), राजीव गांधी हत्या एक अंतर्गत कट (अनुवादित), कहाणी माहिती अधिकाराची (अनुवादित, लेखक- अरुणा रॉय) पान, पाणी नि प्रवाह, एका लेखकाचे तीन संदर्भ, स्वतःला फालतू समजण्याची गोष्ट या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. 
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके