डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

महिलांना तीस टक्के राखीव जागा ठेवण्याच्या निर्णयावरही कुरकूर होत असताना इथे शंभर टक्के जागा महिलांना व त्याही बिनविरोध पद्धतीने देण्याचा निर्णय कसा घेण्यात आला?

खेडोपाडी बायकोचा उल्लेख ‘कारभारीण’ या अस्सल ग्रामीण ढंगाने होत असतो. तरीही घरच्या पैशाअडक्याचा व इतर महत्त्वाचा कारभार तिच्याकडे सोपविण्याचे धाडस तिथे कितीसे केले जाते ? त्यामुळेच ब्राह्मणघरसारख्या डोंगरी भागातील खेड्याने संपूर्ण ग्रामपंचायतीचा कारभार पूर्णपणे तेथील बायांच्या हातात राजीखुशीने, बिनविरोध निवडीने दिला: हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसणे अपरिहार्यच आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील या गावाने इतरांनी कित्ता गिरवावा, असे आदर्श पुरोगामी पाऊल टाकून खरे म्हणजे सर्वांनाच आश्चर्यचकित करून टाकले आहे. महिलांसाठी 30 टक्के जागा राखीव ठेवण्याच्या निर्णयावरच किती गहजब झाला होता ! आणि इथे शंभर टक्के जागा त्यांना देऊन गावकरी त्यांच्या कर्तृत्वावर केवढा विश्वास टाकत आहेत, याचे कोणालाही मनापासून कौतुकच वाटेल.

शहरी भागात स्त्री-मुक्तीच्या गप्पा मारणाऱ्यांपुढे तर हे बोलके उदाहरण म्हणून ठेवायला हवे . इथे चहाचा कप पुरुष नवीन महिला सदस्यांच्या हातात आणून देत होते. हे दृश्य तसे सध्या दुर्मीळच झाले आहे. "तुम्ही पुढे जा, आम्ही तुमच्या मागे आहोत." असे सर्व कारभारी आपल्या कारभारणीला म्हणतात आणि त्याही घरच्या कारभाराबरोबर गावच्या संसाराचा गाडाही हाकायचे ठरवतात, हा सर्व विलक्षण, वेगळा अनुभव आहे. गावच्या पुरुषवर्गाने जे प्रोत्साहन या स्त्रियांना दिले, त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा तर वाढलीच, पण त्यांचा आत्मविश्वास, काम करण्याची जिद्दही तितकीच वाढली. पुरुषाने मानसिक बळ दिले की, स्त्रीही त्याचे मनापासून स्वागत करते. गावातील पुरुषवर्गाने उत्स्फूर्तपणे प्रोत्साहन दिल्यामुळेच ब्राह्मणघर ग्रामपंचायतीवर सर्व महिला बिनविरोध निवडून येण्याचा चमत्कार घडून आला आहे. आपली सून सरपंच झाली म्हणून त्यांच्या सासऱ्याने तर सर्व गावाला पेढे वाटून आपला आनंद प्रदर्शित केला. "तुम्ही पुढे जा. आम्ही तुमच्या मागे आहोत.’’ अशी भावना सर्व गावकऱ्यांनी व्यक्त करून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला.

मी या डोंगरी भागातील छोटेखानी गावाला शनिवारी भेट दिली, त्या वेळी निवडून आलेल्या महिलांचा व त्यांना साथ देणाऱ्या पुरुषवर्गाचा अवर्णनीय उत्साह प्रत्यक्ष अनुभवता आला. या गावात प्रथमच ग्रामपंचायतीची निवडणूक होणार होती. पण निवडणूक न घेता एकमताने महिलांच्या हातात ग्रामपंचायत सोपवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी संघटितरीत्या घेतला. महिलांना तीस टक्के राखीव जागा ठेवण्याच्या निर्णयावरही कुरकूर होत असताना इथे शंभर टक्के जागा महिलांना व त्याही बिनविरोध पद्धतीने देण्याचा निर्णय कसा घेण्यात आला? मी अशी विचारणा गावकऱ्यांकडे उत्सुकतेपोटी केली. ‘‘गावात निवडणुकीचे राजकारण न खेळता एकमताने निवड करावयाची, हा निर्णय गावातील नव्या व जुन्या पिढीतील प्रतिनिधींनी एकत्र बसून एकमताने एक वर्षापूर्वीच घेतला होता. राजकारणाला, गावच्या कारभाराला आदर्श वळण द्यावे म्हणून सर्व महिलांनाच स्थान देण्याचे नंतर आम्ही ठरविले," गावकरी म्हणाले. त्यानुसार ज्यांना लिहिता-वाचता येते व ज्या बोलू शकतात, त्याच महिलांना स्थान देण्याचा निर्णय घेण्यात आला. महिलाही राजी झाल्या.

अपक्ष म्हणून त्यांना गावाने बिनविरोध निवडून दिले. गावात मागासवर्गीयांची तीन घरे आहेत. त्यातील एका महिलेला सहभागी करून घेण्याचे औचित्यही या गावाने दाखविले आहे. श्रमदानातून गावात दहा खोल्या, बाहेरगावाहून येणारे डॉक्टर, शासकीय अधिकारी यांच्यासाठी बांधलेल्या आहेत. अण्णा हजारे यांनी खेड्‌याच्या विकासाबाबत जो आदर्श घालून दिला, त्या मार्गावरून चालण्याचाही या गावाचा निर्धार आहे. आता सर्व ग्रामपंचायतच महिलांच्या ताब्यात दिल्याने त्या कशा कारभार करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Tags: गाव सीमा देशपांडे village sima deshpande weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके