डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

दलवाईंची दृष्टी धर्माकडे पाहणारी नव्हती, धर्मापलीकडे पाहणारी होती!

दलवाईंचे सहकारी राहिलेले परंतु असगर अली इंजिनिअर यांना गुरू मानणारे मुकादम यांनी इस्लामचा अभ्यास केला आहे. धर्माकडे कसे पाहावे, धर्मातील वैश्विक मूल्ये, इस्लामचे न्याय व नीतिशास्त्र याविषयीचे त्यांचे चिंतन त्यांच्या ग्रंथांतून व्यक्त झाले आहे. पण कालबाह्य श्रद्धा बाळगणाऱ्या पारंपरिक समाजाला ऐहिक जीवनाचे महत्त्व सांगून त्यांना आधुनिक जगात नेण्याच्या प्रयत्नात काही अंतरापर्यंत धर्माचे बोट धरता येईल, त्यानंतर कुठे तरी धर्माचे बोट सोडण्याची तयारी सुधारकाला दाखवावी लागते. कारण धर्माच्या नावाने लोकांची दिशाभूल जाणून-बुजून करणाऱ्यांना गोडीगुलाबीने सांगून चालत नाही; तर त्यांच्यावर प्रहारच करायला हवा, हा दलवाईंचा दृष्टिकोन होता. मुकादम हे धर्माच्या चौकटीत विचार करणारे, तर दलवाई धर्मचौकटीबाहेरचा विचार मांडणारे होते; त्यामुळे मुकादम आरंभापासूनच द्विधा मन:स्थितीत अडकले असावेत.  

इस्लामचे अभ्यासक आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे माजी सचिव अब्दुल कादर मुकादम यांनी मुस्लिम ‘सत्यशोधक मंडळ : अर्धशतकी वाटचाल’ या विषयावर साधनाच्या मागील तीन अंकात (19 सप्टें., 26 सप्टें. व 3 ऑक्टो.) लिहिले आहे. आता वयाच्या नव्वदीत असलेल्या मुकादम यांनी या दीर्घ लेखात त्यांची निरीक्षणे, आक्षेप आणि अपेक्षा नोंदवल्या आहेत. मंडळाचा विद्यमान अध्यक्ष म्हणून या लेखांवर प्रतिक्रिया देण्यापूर्वी मुकादम यांना फोन केला तेव्हा समजले की, त्यांनी फेब्रुवारी-मार्च महिन्यांत मी लिहिलेले व साधनाने प्रकाशित केलेले ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळाची पन्नास वर्षे’ या विषयावरील पाच लेख वाचलेले नाहीत आणि मंडळाच्या सुवर्ण जयंतीनिमित्त काढलेला मुस्लिम सत्यशोधक पत्रिकेचा विशेषांकही त्यांच्या वाचनात आलेला नाही. त्यामुळे मंडळाविषयीची त्यांची निरीक्षणे एकांगी आहेत. पण तरीही मुकादम यांचे लेख साधनाने प्रकाशित केले याला महत्त्व आहे, याचे मी स्वागत करतो. 

मंडळाची स्थापना साधना कार्यालयात 1970 मध्ये झाली, त्या आधीपासून आतापर्यंत म्हणजे जवळपास 55 वर्षे साधनाने दलवाईंवरील लेख, दलवाईंचे लेख, त्यांचे अनुवादित लेख साप्ताहिकातून प्रसिद्ध केले. आणि नवी व आऊट ऑफ प्रिंट झालेली पुस्तके प्रकाशित करून नव्या पिढीसाठी अधिक चांगला दस्तऐवज उपलब्ध करून दिला. याशिवाय विशेषांक, चर्चासत्रे घडवून आणली आणि दलवाईंचे लेखन हिंदी, इंग्रजी व कन्नड भाषांमध्ये प्रकाशित करण्यासाठी प्रयत्न केले. आणखी बरेच काही सांगता येईल. यदुनाथ थत्ते, ना.ग.गोरे, ग.प्र. प्रधान, वसंत बापट, डॉ.नरेंद्र दाभोलकर आणि आता विनोद शिरसाठ या सर्व संपादकांच्या काळात साधनाने दलवाई आणि मंडळासाठी दिलेले योगदान सर्वश्रुत आहे. 

मुकादमांनी याआधी माझ्याकडे वेळोवेळी खंत व्यक्त केली होती की, साधना त्यांचा लेख छापणार नाही. आता त्यांचे तीन लेख छापल्यामुळे तो पूर्वग्रह दूर झाला असेल. वास्तविक, माझ्यासह मंडळातील अनेकांकडे त्यांनी या लेखांमध्ये मांडलेले आक्षेप व निरीक्षणे खासगी चर्चेत आणि सार्वजनिकरीत्या नोंदवली होती; तरीही त्यांचे समाधान झालेले दिसत नाही. मुकादमांच्या टीकेच्या केंद्रस्थानी हमीद दलवाई आहेत. शिवाय त्यांनी मंडळाचे उद्दिष्ट आणि कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवले आहेत. ते गांभीर्याने घेऊन ही प्रतिक्रिया मी देत आहे. दलवाई आणि माझी प्रत्यक्ष भेट झाली नसली तरी, दलवाईंवरील पीएच.डी.च्या निमित्ताने मी त्यांना बारकाईने समजून घेऊ शकलो. मुकादमांच्या लेखात काही निरीक्षणे असली तरी त्यात बरीच अपनिरीक्षणे आणि अनिरीक्षणेही आहेत. त्यामुळे त्या लेखांमध्ये काही तथ्य असले, तरी काही माहिती अर्धसत्य आणि असत्यावर आधारित असल्याचे आढळते. 

दलवाईंचे स्वतंत्र महत्त्व कमी करण्यासाठी त्यांचे मूल्यमापन करताना त्यांच्यावर अ.भि. शहा व नरहर कुरुंदकर यांचा प्रभाव होता आणि ते दलवाईंना गुरुस्थानी होते, अशी एक मांडणी केली आहे. परंतु दलवाई यांनी वयाच्या अठराव्या वर्षापासून कथालेखनाला सुरुवात केली. ‘लाट’ हा कथासंग्रह 1961 मध्ये आला. आणि 1965 मध्ये ‘इंधन’ ही कादंबरी प्रकाशित झाली. दलवाईंची वैचारिक दिशा या ललित साहित्यातही प्रतिबिंबित होते. याशिवाय 1963 ते 1968 या काळात त्यांनी आचार्य अत्रे यांच्या ‘दैनिक मराठा’मध्ये पत्रकारिता केली. त्याचदरम्यान भारतातील बुद्धिवंतांशी चर्चा करण्यासाठी अभ्यासदौरा केला आणि त्या संदर्भाची निरीक्षणे ‘मराठा’त क्रमशः प्रकाशित झाली. सात तलाकपीडित महिलांचा ऐतिहासिक ठरलेला मोर्चा 1966 मध्ये काढला. साधनाने प्रकाशित केलेले ‘मुस्लिम जातीयतेचे स्वरूप : कारणे व उपाय’ हे पुस्तक 1967 मध्ये आले, त्याचे पुढे विस्तारीत रूप म्हणजे ‘मुस्लिम पॉलिटिक्स इन इंडिया’ हे इंग्रजी पुस्तक आहे. 

वरील सर्व दलवाईंचे कार्य शहा-कुरुंदकरांच्या भेटीपूर्वीचे आहे. यानंतरच्या काळात शहा आणि दलवाईंनी इंडियन सेक्युलर सोसायटीची स्थापना केली. मंडळाच्या आरंभकाळातील या सोसायटीचे योगदान सर्वज्ञात आहे. शहा-कुरुंदकर यांच्याशी जमलेली दलवाईंची गट्टी आणि एकमेकांना केलेले सहकार्य हा प्रकार त्यांच्यातील प्रागतिक मानवतावादी, सेक्युलर व बुद्धिप्रामाण्यवादी साम्यस्थळांचा परिपाक आहे. मंडळाच्या स्थापनेनंतर दलवाईंना कार्य करण्यासाठी मोजून सात वर्षे मिळाली, त्यातील अखेरची दोन-तीन वर्षे गंभीर आजारपणाची होती. दि.3 मे 1977 रोजी दलवाईंचे निधन झाले. त्यानंतर चार वर्षांत शहा निवर्तले (11 ऑक्टो. 1981). नंतरच्या चार महिन्यांनी म्हणजे 10 फेब्रुवारी 1982 रोजी कुरुंदकर गेले. वरील तपशील लक्षात घ्यावे लागतील. 

दलवाईंच्या निखळ मानवतावादी व बुद्धिप्रामाण्यवादी भूमिकेमुळे त्यांच्याकडे धर्मापलीकडे पाहण्याची क्षमता आणि हट्टाग्रही परंपरावाद्यांशी निर्भीडपणे दोन हात करण्याची ऊर्जा होती, तशी त्यांच्या सर्वच समकालीन सहकाऱ्यांकडे नव्हती. त्यांच्या छायेत असलेल्या आणि स्तुतिगान करणाऱ्या काही कार्यकर्त्यांकडे स्वतःचा आवाका आणि निर्भीडपणा नव्हता. त्यामुळे त्यांची समाजप्रबोधनाची भूमिका खडतर, न परवडणारी वाटली आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपोटी त्यांतील काहींनी मंडळातून बाहेर पडण्याचा मार्ग स्वीकाराला. यु-टर्न घेऊन काही जण दलवाईंचे विरोधकही झाले, तर काहींनी कुंपणावर बसण्याची भूमिका घेतली. 

मंडळाच्या अर्धशतकी वाटचालीचा आढावा घेताना मुकादम यांनी दलवाईंच्या बौद्धिक मर्यादा दाखवण्याचा प्रयत्न करून त्यांचे स्वतंत्र व वेगळे अस्तित्व नाकारले आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दलवाईंनी धर्माकडे कसे पाहावे हा दृष्टिकोन दिला नाही, हे खरे आहे; कारण दलवाईंची दृष्टी धर्माकडे पाहण्याची नव्हती तर धर्मापलीकडे पाहणारी होती, हे वास्तव कधीच लपलेले नाही. दलवाईंचे सहकारी राहिलेले परंतु असगर अली इंजिनिअर यांना गुरू मानणारे मुकादम यांनी इस्लामचा अभ्यास केला आहे. धर्माकडे कसे पाहावे, धर्मातील वैश्विक मूल्ये, इस्लामचे न्याय व नीतिशास्त्र याविषयीचे त्यांचे चिंतन त्यांच्या ‘दास्तान’, ‘चंद्रकोरीच्या छायेखाली’ आणि ‘इस्लाम : ज्ञात आणि अज्ञात’ या ग्रंथांतून व्यक्त झाले आहे. धर्मसुधारणा आणि इस्लामविषयी पसरवण्यात आलेल्या गैरसमजांचे निराकरण करण्यासाठी त्या लेखनाचा नक्कीच उपयोग होईल. 

कालबाह्य श्रद्धा बाळगणाऱ्या पारंपरिक समाजाला ऐहिक जीवनाचे महत्त्व सांगून त्यांना आधुनिक जगात नेण्याच्या प्रयत्नात काही अंतरापर्यंत धर्माचे बोट धरता येईल, मात्र त्यानंतर कुठे तरी धर्माचे बोट सोडण्याची तयारी सुधारकाला दाखवावी लागते. कारण धर्माच्या नावाने लोकांची दिशाभूल जाणून-बुजून करणाऱ्यांना गोडीगुलाबीने सांगून चालत नाही; तर त्यांच्यावर प्रहारच करायला हवा, हा दलवाईंचा दृष्टिकोन होता. मुकादम हे धर्माच्या चौकटीत विचार करणारे, तर दलवाई धर्मचौकटीबाहेरचा विचार मांडणारे होते; त्यामुळे मुकादम आरंभापासूनच द्विधा मन:स्थितीत अडकले असावेत. 

इस्लामचा उदारमतवाद- त्याचे नवअर्थबोधन यासाठी अनेक जागतिक विद्वानांनी प्रयत्न केलेले आहेत. परंतु त्यांचा प्रभाव त्या-त्या देशात किती पडला, हे मुस्लिम जगतातील अद्ययावत घडामोडींकडे पाहिल्यास लक्षात येते. भारतातही सर सय्यद अहमद खान, महंमद इकबाल, मौलाना आझाद, असफ ए फैजी, असगर अली इंजिनिअर अशी एक नामावली आहे. या सर्वांनी उलेमा वर्गाला उघडे पाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे समाजसुधारणेच्या पारड्यात काय पडले? धर्माभ्यासक आणि धार्मिक मौलाना आझादांनी धर्माची सकारात्मक चिकित्सा केली. त्यांना किती यश आले? उलट आझादांना नाकारून निधर्मी आणि धर्मनिषिद्ध गोष्टी आचरणारे शियापंथीय जीना यांना मुस्लिम समाजाने जवळ केले. दलवाईंना धर्मचिकित्सेपेक्षा धर्मांध आणि धर्मवादी राजकारणाची चिकित्सा करणे महत्त्वाचे वाटले. धर्मसुधारकांच्या परंपरांची री ओढण्यात त्यांना स्वारस्य नव्हते, तरीही या धर्मसुधारकांवर टीका न करता धर्माच्या नावाखाली चाललेल्या वाईट-विद्रूप गोष्टी बदलण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यासाठी मुस्लिम समाजप्रबोधनाच्या स्वतंत्र बीजाचे रोपण केले आणि यातच मंडळाचे वेगळेपण आहे. 

मुकादम यांनी इतिहासाचा वेध घेताना स्वातंत्र्यपूर्व काळातील मुस्लिम प्रश्नांचे स्वरूप व कारणे, स्वातंत्र्योत्तर काळातील मुस्लिम मतांसाठी अनुनयाचे राजकारण आणि इस्लामी धर्मपंडितांनी निर्माण केलेली मुसलमानांची मानसिकता हे तीन पैलू मांडले आहेत. तसेच ते आझादांच्या विश्लेषणाचा संदर्भ देत ‘दीन आणि मामलात’चा उल्लेख करतात आणि त्याचे महत्त्व पटवून देतात. वास्तविक, या सर्व पैलूंचा ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळ - उद्देश व भूमिका’ यामध्ये समावेश आहे, तसेच या पुस्तकात ‘इबादत व आदत’ यासंबंधी स्वतंत्र प्रकरण आहे. मुकादमांच्या लेखामध्ये अशा अनेक विसंगती, अंतर्विरोध व इस्लामिक तत्त्वज्ञानाची पुनरावृत्ती दिसून येते. 

दलवाईंना महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही, त्यामुळे त्यांच्या जडण-घडणीवर आणि चळवळीच्या सर्वव्यापकतेवर परिणाम झाला, असे बाळबोध निरीक्षण मुकादम यांनी नोंदवले आहे. ईश्वराला निर्मिक संबोधणाऱ्या महात्मा फुलेंना महाविद्यालयीन शिक्षणाची संधी मिळाली नाही म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर किंवा कार्यावर काही मर्यादा पडल्या आहेत का? मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी सत्यशोधक महात्मा फुलेंना आदर होता, त्यांनी पैगंबरावर पोवाडा लिहिला, असे मुकादम यांनी लिहिले आहे. पण याचा अर्थ ते सर्वार्थाने महात्मा फुलेंचे प्रेरणास्थान कसे होतील? शिवाय शिवाजी महाराज, थॉमस पेन, जॉर्ज वॉशिंग्टन हेसुध्दा फुलेंच्या विचारांवर प्रभाव टाकणारे होते हे मुकादम नोंदवत नाहीत. 

दलवाईंच्या व्यक्तिमत्त्वातील मर्यादा दाखवण्यासाठी मुकादम यांनी अनिल अवचट यांच्या ‘हमीद’ या पुस्तकाचा आधार घेतला आहे. ‘दलवाईंचा स्वभाव आत्मकेंद्री होता, त्यांना अल्पकाळात लोकप्रियता मिळाली, त्यामुळे त्यांच्यात अहंगंडाची भावना निर्माण झाली’ असे मुकादम म्हणतात. असे आरोप करताना मुकादम दुखावले गेले असल्याची जाणीव होते, ज्याचा संदर्भ त्यांच्याच लेखाच्या शेवटच्या भागात येतो. मात्र ‘हमीद’चे लेखक अनिल अवचट यांनी स्वतःच्या पुस्तकाच्या मर्यादा वेळोवेळी सांगितल्या आहेत. विजय तेंडुलकरांनी प्रस्तावनेतही त्या पुस्तकाच्या मर्यादा दाखवून, ‘सदर पुस्तकाकडे कसे बघावे’, हेही सुचवले आहे. ते म्हणतात, ‘दलवाई यांच्याशी वैयक्तिक जवळीक प्रस्थापित करण्याच्या अट्टहासात दलवाई यांची नसलेली लकब त्यांना चिकटवण्यात आली आहे.’ या पुस्तकामुळे ज्यांना क्लेश होतील त्यांनी यानिमित्ताने दलवाईंवरील समग्र चरित्रग्रंथाचा संकल्प सोडावा, असे आवाहनही तेंडुलकरांनी केले आहे. दलवाईंचे विरोधक ‘हमीद’ या पुस्तकाचा दुरुपयोग करतील, असे दलवाईंच्या अनेक हितचिंतकांना वाटत होते, मात्र दलवाईंचे सहकारी राहिलेल्या मुकादमांनीच याचा वापर केला, याची आम्हाला खंत आहे. 

कुराण आणि हादीस अर्थात इस्लाम आणि पैगंबर परिपूर्ण आहेत, असे मुकादमांना वाटते. कारण साडेचौदाशे वर्षांच्या इतिहासानंतरही मुकादम त्याबद्दल मौन बाळगतात, इस्लामचा नवा अर्थ काढण्याचा आग्रह धरतात, तसेच मंडळालाही ते लक्ष्य करतात. दलवाई आणि चळवळीच्या मर्यादा नाहीत, असा दावाही कोणी केलेला नाही. माणसाची आणि चळवळीची जशी बलस्थाने असतात तशा मर्यादासुद्धा असतात. विज्ञान, इहवाद आणि आधुनिक मूल्यांवर आधारित सामाजिक सुधारणा घडवण्यासाठी  आणि लोकशाही, समता, व्यक्तिस्वातंत्र्य रुजवण्यासाठी मंडळ साडेचौदाशे वर्षांपूर्वीच्या धर्मग्रंथाकडे पाहण्याऐवजी भारतीय जनतेने शपथपूर्वक स्वीकारलेल्या संविधानाचा आधार घेते आणि धर्माकडे व्यक्तिगत श्रद्धेचा भाग म्हणून पाहते. 

दलवाईंनी त्यांच्या शेवटच्या काळात मंडळाचा उत्तराधिकारी नेमला नाही, असा एक आक्षेप मुकादम यांचा आहे. वास्तविक, दलवाईंनी आपले व्यक्तिगत जीवन व वैचारिक अधिष्ठान यात तफावत किंवा कोणतीही लपवालपवी केलेली नाही. विचार-वर्तन याबाबत स्वीकारलेली भूमिका ते शेवटपर्यंत जगले. मुस्लिम सत्यशोधक ही नास्तिक आणि निधर्मी कार्यकर्त्यांची चळवळ व्हावी, असे त्यांचे मत नव्हते. मृत्यूपूर्वी काही दिवस आधी त्यांनी मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना रामटेक येथे बोलावून चर्चा केली, तसेच मंडळाचा राजीनामाही दिला. आपला उत्तराधिकारी म्हणून त्यांनी कोणावरही जबाबदारी दिली नाही, याकडे दोष म्हणून न पाहता, ‘लोकशाही पद्धतीने सामूहिक जबाबदारी स्वीकारून मंडळ पुढे चालवण्याचे संकेत दिले’, असेच म्हणावे लागेल. 

इब्न सीनांवर शहा कशी अविवेकी, कठोर टीका करतात, हे दाखवण्यासाठी मुकादमांनी इंग्रजीतील वाक्य आणि त्याचा मराठी अनुवाद केलेले ‘इब्न सीनासारख्या तत्त्ववेत्त्याच्या लिखाणात गुंतागुंत झालेल्या जाळ्यासारखे तर्कशून्य घटक आढळावेत, ही अतिशय धक्कादायक बाब समजली पाहिजे’ हे विधान शहा यांच्या तोंडी घातले आहे. परंतु ते शहांनी म्हटले नसून एच.ए.आर.गिबने म्हटले आहे. येथे मुकादमांचा काही तरी गोंधळ झाल्याचे दिसते. तसेच अलगझालीबाबत शहांनी संदर्भासह लिहिलेला ‘इस्लाम आणि मानवतावाद’ हा लेख वाचल्यास शहा यांची भूमिका समजून घेता येईल. 

‘मुस्लिम सत्यशोधक मंडळामुळे सामान्य मुसलमानांवरील उलेमांची पकड घट्ट झाली’ असा हास्यास्पद निष्कर्ष मुकादम यांनी काढला आहे. वस्तुस्थिती उलट आहे, दलवाई व मंडळाच्या कार्यामुळे मुस्लिम समाजात इस्लामचा उदारमतवाद सांगणारे लोक/संघटना पुढे आल्या. अनेक महिलांनी उलेमांना आव्हान देण्याचेच नव्हे, तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याचे धाडस दाखवले. मंडळाने पहिल्या दोन दशकांनिमित्त प्रकाशित केलेल्या पुस्तिकेचा आधार घेत, पूर्वग्रह बाळगून आणि खातरजमा न करता ऐकीव माहितीवर मुकादमांनी आपले आक्षेप व निरीक्षणे सदर लेखात नोंदवल्याचे दिसून येते. 

शाहबानो प्रकरण, बाबरी मस्जिद विध्वंस, गुजरात हिंसाचार, मुंबई बॉम्बस्फोट, जागतिक दहशतवादी कारवाया, भारतातील वाढता हिंदुत्ववाद यांची दखल घेऊन मंडळाने (दलवाईंच्या मृत्यूनंतर) अनेक उपक्रम राबवले. दरम्यान मुस्लिमांना लक्ष्य करणाऱ्या घटना वाढून या समाजाचे अस्तित्व आणि सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण झाले. शिवाय हिंदुत्ववाद्यांकडून इस्लाम आणि मुसलमानांविषयी गैरसमज आणि द्वेष वाढवण्याचे प्रकार वाढले. यामुळे मंडळाने नवा जाहीरनामा तयार केला. हा सुधारित जाहीरनामा तयार करण्याच्या प्रक्रियेत खुद्द मुकादमांचा सहभाग होता. याशिवाय भारतीय मुस्लिम महिला आंदोलनासारख्या विविध प्रवाहांशी मंडळाने समन्वय साधला. या वेळी मुस्लिम सत्यशोधक मंडळ दलवाईद्रोह करत असल्याचे आक्षेपही काहींनी नोंदवले. बदलत्या परिस्थितीची नोंद घेऊन मंडळाचे उद्देश व भूमिका यात काही नव्या प्रकरणांचा समावेश करण्यात आला. मुस्लिम आरक्षणासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मंडळाच्या अशा अनेक उपक्रमांची माहिती सुवर्णजयंती विशेषांकात दिली आहे. ती वाचल्यास मंडळाची प्रगती आणि भवितव्य दिसून येईलच. 

याव्यतिरिक्त मंडळांतर्गत झालेले चढ-उतार, संघर्ष, माजी पदाधिकाऱ्यांच्या भूमिका आणि त्याचे परिणाम या संदर्भातील माहिती जाणकारांना आहेच. विविध प्रकारच्या प्रतिकूलतेला सामोरे जात मंडळ कार्यरत आहे. दलवाईंनी पेरलेले आधुनिक मूल्यांचे बीज त्यांच्याच पद्धतीने जोपासून ते वाढवण्याचा आमचा निर्धार आहे. मुकादमांच्या लेखातील योग्य आणि सकारात्मक अपेक्षांची मंडळ अवश्य नोंद घेईलच. 

(साधना साप्ताहिकाच्या या आधीच्या तीन अंकांत अब्दुल कादर मुकादम यांचा दीर्घ लेख क्रमश: प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्या लेखातील प्रमुख मुद्यांचा प्रतिवाद करणारा हा लेख प्रसिद्ध केला आहे. मुकादम यांचा लेख व तांबोळी यांचा प्रतिवाद यांच्या संदर्भात आलेल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे, मात्र त्या 100 ते 200 शब्द इतक्या मर्यादेत असाव्यात... संपादक)  

हेही वाचा :

मुस्लिम सत्यशोधक चळवळीची अर्धशतकी वाटचाल : अब्दुल कादर मुकादम

मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी यांनी मंडळाच्या अर्धशतकी वाटचालीचा घेतलेला मागोवा 

Tags: भारतातील वाढता हिंदुत्ववाद जागतिक दहशतवादी कारवाया मुंबई बॉम्बस्फोट गुजरात हिंसाचार बाबरी मस्जिद विध्वंस शाहबानो प्रकरण असगर अली इंजिनिअर असफ ए फैजी मौलाना आझाद महंमद इकबाल सर सय्यद अहमद खान इस्लामचा उदारमतवाद इस्लाम : ज्ञात आणि अज्ञात चंद्रकोरीच्या छायेखाली हमीद दलवाई मुस्लिम सत्यशोधक पत्रिका सत्यशोधक मंडळ : अर्धशतकी वाटचाल अब्दुल कादर मुकादम मुस्लिम सत्यशोधक मंडळ shamsuddin tamboli dalwai and abdul kadar mukadam sadhana msm vinod shirsath asgar ali engineer hamid dalwai muslim satyshodhak mandal abdul kadar mukadam weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

शमसुद्दीन तांबोळी,  पुणे
tambolimm@rediffmail.com

अध्यक्ष, मुस्लिम सत्यशोधक मंडळ


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके