आज जगभरात धर्माच्या नावाने अतिरेकी आणि दहशतवादी संघटना फोफावलेल्या आहेत. इसिस, तालिबान, बोको हराम, अल्कायदा आणि अशा अनेक नावांच्या संघटना इस्लामच्या नावावर हिंसाचार करतात, महिलांचे अपहरण करून त्यांना सेक्स स्लेव्ह करतात. आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यात येते. मानवाच्या शांततापूर्ण सहअस्तित्वात विघ्न निर्माण करतात. अशा वेळी धर्माने मला काय दिले? याबद्दल भाष्य न करता एवढे तरी म्हणता येईल की, जिथे-जिथे धर्म प्रगतीच्या आड येतो ते अडसर दूर करून मानवी कल्याण करण्यासाठी संघर्षाची प्रेरणा आणि प्रयोजन धर्माने दिले. अर्थात हे प्रयोजन प्रसंगी धर्मातील उदारमतवादी मार्गदर्शन घेऊन आणि अनेक वेळा धर्मापलीकडचा विचार करून साध्य करणे शक्य आहे.
धर्माने मला काय दिले? हा अभ्यासाचा आणि परीक्षणाचा विषय आहे. या बाबत नेमकेपणाने मांडणी करणे कठीण आहे. कारण माझ्या जीवनात लौकिक अर्थाने धर्माला गौण स्थान आहे. आधुनिक काळात प्राचीन धर्माकडून काही मिळवण्याची इच्छा मी बाळगली नाही. मुस्लिम समाजातील प्रबोधनवादी कार्यकर्ता म्हणून काम करताना आवश्यक तेवढा धर्माभ्यास केला असला तरी मी धर्माभिमानी नसल्याने या विषयाकडे आत्मीयतेपेक्षा थोडे गांभीर्याने पाहावे लागले. धर्म हा आधुनिक समाजाचा आधार ठरू शकत नाही, अशी माझी धारणा आहे. मात्र या विषयावर लिहिण्याची जबाबदारी घेतल्यामुळे थोडे विस्कळीत वाटेल असेच विवेचन होण्याची शक्यता आहे.
इस्लाम लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील दुसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे. जगावर प्रभाव टाकणारे जे महान लोक झाले- अशा शंभर व्यक्तींमध्ये ब्रिटिश इतिहासकार अर्नोल्ड टॉयनबी या विचारवंताने इस्लामचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांना फार वरचे स्थान दिले आहे. इस्लामची सैद्धांतिक बाजू आणि मुस्लिमांचे मानवी व्यवहार यांत विरोधाभास जास्त आहे. इस्लामचा पैगाम येताना पैगंबरांनी पाहिलेला पहिला शब्द ‘इकरा’ आहे. वाच- वाचन कर (पैगंबरांना स्वत: वाचता येत नव्हते); ‘इकरा’वरून ‘इल्म’ (ज्ञान-शिक्षण) शब्दाला महत्त्व आले. मात्र मुस्लिम समाजात इल्मच्या बाबतीत सर्वाधिक उदासीनता आहे. बोको हराम तर कुराणाशिवाय इतर ग्रंथांचे अध्ययन वर्ज्य मानते. इस्लामचा एक अर्थ ‘ईश्वरचरणी शरणागती’ असा आहे. मुस्लिम लोक अल्लाहपेक्षा मुल्लाला जास्त शरण जातात. इस्लाम म्हणजे शांतता; मात्र आपण पाहतो की जगात सर्वांत अशांत मुस्लिम देश आहेत. एका निरपराध्याची हत्या म्हणजे मानवतेचा संहार असा इस्लामचा उपदेश आहे. मात्र इस्लामच्या नावाने अस्तित्वात आलेल्या दहशतवादी संघटना मुस्लिमांचेच रक्त सांडत आहेत. हजाम आणि निजाम एका रांगेत नमाज अदा करू शकतात. मात्र मुस्लिम समाजात अनेक पंथ, उपपंथ आणि जाती अस्तित्वात आहेत.
अल्लाहला सर्वांत नापसंत गोष्ट तलाक आहे... मात्र पुरुषप्रधान मुस्लिम समाजात तलाक प्रथा पसंत आहेत... अशा कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत ज्या इस्लामच्या तत्त्वज्ञानात येतात, मात्र त्या मुस्लिमांच्या आचरणात नाहीत. तसेच इस्लाममधील कुफ्र, काफिर, जिहाद, जिझिया, दारूल इस्लाम आणि महिलांचे स्थान हे कायम वादविवादाचे विषय आहेत. इस्लामने तत्कालीन परिस्थितीत दिलेल्या या संकल्पना समता, स्वातंत्र्य, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, मानवी हक्क या आधुनिक मूल्यांच्या प्रसारात अडचणी निर्माण करतात. या निमित्ताने अनेक वेळा धर्मवाद्यांसोबत संघर्ष करावा लागतो. प्रबोधनासाठी धर्माचा आधार घेण्याचा विचार केला की अनेकदा निराशा पदरी येते. धर्मवर्चस्ववादी मनोभूमिका आधुनिक मानवी मूल्यांवर कसा घाला घालते, याचे ताजे उदाहरण म्हणजे तालिबान या मूलतत्त्ववादी संघटनेने अफगाणिस्तान पुन्हा आपल्या ताब्यात घेतले आहे. तालिबानी विचार काय आहेत हे सर्वज्ञात आहे. अशी स्थिती असताना धर्माने मला काय दिले? समाजाला आणि मानवाला काय दिले? याविषयी नेमकेपणाने मांडणी करताना पडणाऱ्या मर्यादा गृहीत धरून विवेचन करावे लागते आहे.
1952 मध्ये प्रकाशित झालेल्या ‘द माइंड दॅट अल कुराण बिल्ड्स’ या पुस्तकात लेखक सय्यद अब्दुल लतीफ म्हणतात, ‘‘हजारो वर्षांपूर्वी घालून दिलेल्या विचारप्रणालीने संपूर्ण मुस्लिम विचारांचा व इतिहासाचा क्रमच बिघडवला आहे... भूतकाळाच्या याच त्या वारसाला आज तोंड द्यायचे आहे. हदिसप्रमाणेच कुराणाच्या शब्दविन्यासाचे भाष्य करण्याच्या क्षेत्रातसुद्धा कुराणातील निव्वळ आनुषंगिक निर्देशने कोणती आणि बंधनकारक कोणती हे पाहण्यासाठी शास्त्रीय संशोधनाची आज मोठी गरज आहे.’’
आधुनिक काळात जन्माला आलेल्या मानवावर प्राचीन धर्मसंस्थेचा प्रभाव असतो. माझ्या बाबतीत म्हणाल तर मी मुस्लिम आहे, कारण मी मुस्लिम आईवडिलांच्या पोटी जन्माला आलो. माझे बालपण मुस्लिम कुटुंबात आणि गल्लीत गेले. येथे जेवढ्या प्रमाणात धर्म आणि संस्कृतीचे आकलन आणि आचरण झाले, तो माझा धर्मज्ञानाचा प्राथमिक आवाका आहे. पाच वेळा नमाज, रमजानचे रोजे, कुराण पठण आणि टिपिकल मुस्लिम आयडेंटिटी असणारे माझे वडील! रमजान आणि बकरी ईद या व्यतिरिक्त त्यांनी कोणत्याही धार्मिक सण किंवा उत्सवात रस घेतला नाही. एका अर्थाने तबलिगी- देवबंदी विचारांना प्रमाण मानणारे! याउलट साडी-चोळी घालणारी आई. आईने बुरखा घातलेला कधी पाहिले नाही. पीर-दर्गाह संस्कृती, तावीज, गंडे यांच्या प्रभावातील आई एका अर्थाने बरेलवी परंपरेतील. मी बारा-तेरा वर्षांचा होतो तेव्हा रमजान महिन्याचे सर्व रोजे करीत असे. पहाटे मस्जिदचा चबुतरा चढून आजान देत असे. इस्लाम, कुराण, हदिसचे ज्ञान नाही, मात्र धर्माने वर्णन केलेल्या जन्नतचे आकर्षण होते. एका मर्यादित परिघातील इस्लाम मला ज्ञात होता. मस्जिदमध्ये जाऊन आलिफ बे ते शिकण्याचा प्रयत्न केला; मात्र ते डोक्यात शिरत नव्हते.
पैगंबरांच्या निधनानंतर मुस्लिम समाजात शिया-सुन्नी हे दोन प्रमुख पंथ निर्माण झाले. या पंथांव्यतिरिक्त सुन्नींमध्ये हनफी, हनबली, मालिकी आणि शाफी असे पुन्हा उपपंथ किंवा विचारधारा निर्माण झाल्या. भारतीय सुन्नी समुदायात देवबंदी आणि बरेलवी असे दोन गट आहेत. माझ्यासारख्या अनेकांना वरीलपैकी आपण कोणत्या पंथ-उपपंथात आहोत याची कल्पना नसते. मुल्ला, मौलवी, उलेमा, काझी अशा पुरोहित वर्गाचा प्रभाव आणि मार्गदर्शन घेत धर्माचरण करणारे अधिक आहेत. हा वर्ग सांगेल तोच धर्म! माझा मुस्लिम असण्याचा अर्थ असा गोंधळलेला होता. वय, शिक्षण, अनुभव आणि अभ्यास वाढत गेला तसा धर्माचा अर्थ आणि आकलन बदलत गेले.
धर्म ही व्यापक आणि बहुअंगी संकल्पना आहे. समाजावर सर्वाधिक प्रभाव पाडणारी संस्था म्हणून धर्माकडे पाहता येईल. इस्लामकडे विधायकपणे पाहण्याचा विचार भारतात सर सय्यद अहमद खान, मोहम्मद इकबाल, मौलाना आझाद, प्रा. मुजीब, असफ ए फैजी, असगर अली इंजिनिअर यांसारख्या उदारमतवादी विचारवंतांनी दिला. मात्र तो किती प्रभावी होता? परंपरावाद्यांनी कसा प्रतिसाद दिला? याचा तपशील उपलब्ध आहे. मुस्लिम समाजात अंधश्रद्धांचा प्रसार आणि शोषण वाढवण्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे धर्माचा हातभार आहे. पारलौकिकता, आखिरत आणि धार्मिक कर्तव्यांचा प्रसार करणारी तबलीग जमात ऐहिक विकासाबद्दल उदासीन असते. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव हे या शिकवणुकीचे वैशिष्ट्य आहे. वास्तविक वैज्ञानिक दृष्टिकोनाशिवाय व्यक्ती आणि समाजाचा विकास हा एक भ्रम आहे. भारतीय संविधानाने वैज्ञानिक मनोभाव बाळगणे आणि प्रसारित करणे, हे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य असल्याचे नमूद केले आहे. मात्र या कर्तव्याचे पालन करताना धर्मश्रद्धा आणि धर्मविचार मर्यादा घालतात. अध्यात्म हा धर्माचा एक भाग आहे. स्वर्ग, जन्नत, हेवन, मोक्ष, आखिरत या संकल्पना विज्ञानाच्या निकषांवर अपयशी ठरतात. असे असतानाही धर्म आणि विज्ञान हे समांतर असतात, एकमेकांना पूरक असतात, असे प्रतिपादन करणारे अनेक आहेत. धर्मश्रद्धांना तडे जाऊ नयते, म्हणून विज्ञान शिक्षणाबद्दल उदासीनता बाळगली जात असल्याचे निरीक्षण आहे.
धर्माला कालसुसंगत करण्यासाठी त्याची चिकित्सा करणे आणि कालसापेक्ष उपक्रम निर्माण करणे, हे खरे तर धर्मसंकल्पनेचे उन्नयन आहे. या दृष्टीने समाजबदल घडवून आणण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी समाजातील धार्मिक सण-उत्सवांना पर्याय दिले. याच पद्धतीने मुस्लिम समाजात बकरी ईदनिमित्त प्राण्यांची कुर्बानी देण्यापेक्षा मानवता सुदृढ करण्यासाठी रक्तदान करण्याचा एक उपक्रम मुस्लिम सत्यशोधक मंडळाकडून राबवण्यात येतो. मात्र धर्मनिष्ठांना असे उपक्रम धर्मबुडवे वाटतात. मानवाचे कल्याण आणि विवेकवादी समाज निर्माण करण्यासाठी कार्यरत चळवळींमधील समन्वय उपयुक्त ठरतो. समाजात धर्मांतर्गत अशा काही परंपरावादी, उदारमतवादी आणि सुधारणावादी विचार-प्रसाराचे कार्य करणारे प्रवाह आहेत. ते आपापल्या क्षमतेनुसार समाजाची धारणा करतात. मात्र भाषा, भोजन, वेषभूषा आणि स्वतंत्र अस्तित्वाच्या अट्टाहासातून अलगतावाद जोपासला जातो. हातावर पोट असणारे मजूर, कामगार, छोटे व्यवसाय करणारे गरीब लोक आपले ठरलेले चाकोरीबद्ध आयुष्य जगतात. धार्मिक परंपरा, सण-उत्सव त्यांना अधूनमधून आनंद आणि उत्साह देतात. अनेक वेळा त्यांच्यावर अन्याय होतो. त्यातून दु:ख होते. यास
प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे धर्म कारणीभूत असतो; पण ते धर्मापेक्षा नशिबाला दोष देतात. अनेक महिला धर्मकर्तव्याचे पालन करताना अंधश्रद्धा आणि शोषणाच्या बळी पडतात, मात्र त्या धर्माला दोष देत नाहीत. सामान्य लोकांत धार्मिक अस्मिता आणि अलगतावाद जोपासून धर्मवादी राजकारण केले जाते. प्रसंगी धार्मिक दंगली होतात. निष्पाप मारले जातात. आज जगभरात धर्माच्या नावाने अतिरेकी आणि दहशतवादी संघटना फोफावलेल्या आहेत. इसिस, तालिबान, बोको हराम, अल्कायदा आणि अशा अनेक नावांच्या संघटना इस्लामच्या नावावर हिंसाचार करतात, महिलांचे अपहरण करून त्यांना सेक्स स्लेव्ह करतात. आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यात येते. मानवाच्या शांततापूर्ण सहअस्तित्वात विघ्न निर्माण करतात. अशा वेळी धर्माने मला काय दिले? याबद्दल भाष्य न करता एवढे तरी म्हणता येईल की, जिथे-जिथे धर्म प्रगतीच्या आड येतो ते अडसर दूर करून मानवी कल्याण करण्यासाठी संघर्षाची प्रेरणा आणि प्रयोजन धर्माने दिले. अर्थात हे प्रयोजन प्रसंगी धर्मातील उदारमतवादी मार्गदर्शन घेऊन आणि अनेक वेळा धर्मापलीकडचा विचार करून साध्य करणे शक्य आहे.
इस्लामचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांना आपल्या काळातील गरजांची जाणीव झाली. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, सावकारशाही, लूटमार, नैतिक नैराश्य आणि अधःपतनात बुडालेल्या समाजाकडे अंतर्दृष्टीने आणि विशाल दृष्टिकोनातून पाहिले. या समाजाच्या कल्याणासाठी आचारसंहिता निर्माण केली. इस्लामच्या शिकवणुकीत काही कायम, तर काही आकस्मित उपदेश आहेत. हे उपदेश आणि शिफारशी तत्कालीन परिस्थितीत कशा महत्त्वाच्या होत्या आणि आजच्या परिस्थितीत त्याचे स्वरूप कसे राहील?
सातव्या शतकातील इस्लाम आणि 21व्या शतकातील इस्लाम वेगळा असेल, याची कल्पना खुद्द पैगंबरांना होती. तेव्हा पैगंबरांना काय अपेक्षित होते या संदर्भात अभ्यासक सय्यद अमीर अली आपल्या ‘दि स्पिरिट ऑफ इस्लाम’ ग्रंथात म्हणतात, ‘‘त्यांनी घोषित केले की, तुम्ही अशा काळात आहात की, आदेशातील 9/10 भाग जरी तुम्ही सोडून द्याल तरी तुमचा नाश होईल. यानंतर एक काळ असा येईल की, जो कोणी आता सांगितलेल्यापैकी 1/10 भागाचे जरी पालन करील, त्याची मुक्तता होईल.’’ याचा अर्थ असा की आजच्या काळात इस्लामचा 9/10 भाग सोडला तरी मुस्लिमांची मुक्तता होणार आहे. मोहम्मद पैगंबर स्वतः म्हणतात, ‘‘मी मानवापेक्षा अधिक कोणी नाही; जेव्हा मी धर्मासंबंधी एखादी आज्ञा करतो, तेव्हा तिचा स्वीकार करा; आणि जेव्हा ऐहिक बाबींसंबधी आज्ञा करतो, तेव्हा मी मानवापेक्षा थोडासुद्धा निराळा नसतो.’’
ऐहिक जीवन कालसुसंगत करण्यासाठी इस्लाममध्ये इज्मा-इस्तेहाद आणि कियास (जाणकारांचे विश्लेषण आणि सदसद्विवेक) या तरतुदींचा समावेश आहे. मात्र नंतरच्या काळात असुरक्षितेतून इस्लामच्या तथाकथित रखवालदारांनी या तरतुदींना विरोध केला. इस्लामच्या प्रगतीचे आणि प्रवाहशीलतेचे दरवाजे बंद केले. इस्लामच्या अनुयायांना सन्मार्गापासून रोखले. श्रद्धावान मुस्लीम, कुराणच्या आदेशानुसार दररोज किंवा दिवसातून पाच वेळा नमाज किंवा फातिहा पढताना, अल्लाहने आम्हांस सन्मार्ग दाखवावा, अशी अल्लाहकडे विनंती करतात. मुस्लिम धर्मगुरू मात्र हा अंतिम सन्मार्ग दाखवून झाला; असा दावा करीत परिवर्तनास विरोध करतात. आजही बहुसंख्य मुस्लिम कालबाह्य संकल्पना आणि कालविपर्यायी सामाजिक परंपरा, रीतिरिवाजांत गर्क आहेत. ही स्थिती कायम राहिली तर मुस्लिम समाज भारतीय समाजाच्या सर्वांत खाली जाणार आहे. मुस्लिम समाजाची झालेली ही घसरगुंडी न्या. राजेंद्र सच्चर समितीच्या अहवालातून स्पष्ट झाली आहे.
इस्लामला अद्ययावत बनवण्याची वेळ केव्हाच निघून गेली आहे. आजही इस्लामचे आधुनिकीकरण किंवा इस्लामचे भारतीयीकरण करण्याऐवजी इस्लामचे अरबीकरण करण्याचा मुस्लिम मूलतत्त्ववादी प्रयत्न करीत आहेत. मुस्लिम समाजसुद्धा या प्रक्रियेला तथाकथित अस्मितेच्या नावाने आनंद घेत प्रतिसाद देत आहे.
कुराण आणि हदिसच्या शिकवणीतील मर्यादा आणि अपूर्णता पैगंबरानी केवळ मान्यच केली नाही, तर त्यातील उणिवा भरून काढण्यासाठी व्यक्तिगत निर्णयाचे स्वातंत्र्य दिले आहे. अर्थात हा इस्लामचा उदारमतवादी अर्थ लावण्याचा प्रयास आहे. हा आधुनिक आणि उदारमतवादी अर्थ मुस्लिमांच्या गळी उतरवणे किती अवघड आहे हे जाणकार समजू शकतात.
सेक्युलॅरिझम ही लोकशाहीची पूर्वअट आहे. धर्मनिरपेक्ष लोकशाही असणारा एकात्म समाज निर्माण करताना अनेकदा धर्म हा अडथळा ठरतो. आधुनिक मूल्यांची योग्य-अयोग्यता प्राचीन ग्रंथांत शोधण्याची खोड सोडून ती आज तरी संविधानात्मक नैतिकतेशी जोडली पाहिजे. हमीद दलवाई म्हणायचे तसे मलाही वाटते की, मी सर्वप्रथम माणूस आहे. त्यानंतर भारतीय आहे आणि त्यानंतर मी मुस्लिम आहे. मानवतेला प्रथम प्राधान्य, देशाचा नागरिक म्हणून भारतीयत्वाला दुसरे स्थान आणि शेवटी ज्या धर्मसमूहात जन्म घेतला ती ओळख! यात सर्वप्रथम मानवता येते. मानवाच्या उन्नतीसाठी धर्मसंस्था निर्माण झाल्या. त्यासाठी धर्मग्रंथ अस्तित्वात आले. आज या प्राचीन धर्मग्रंथांची उपयुक्तता आधुनिक संविधानात्मक निकषांवर तपासली पाहिजे. या तपासणीत धर्माच्या मर्यादा दिसून आल्या, की धर्मापलीकडचा विचार केला पाहिजे. असा आधुनिक मूल्यांवर आधारित मानवतावादी समाज निर्माण करण्याचे प्रयोजन निर्माण करण्यात धर्म हे एक कारण नक्की आहे.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या