डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

माझे ‘वझ्झर मॉडेल’ पूर्णत्वास आले आहे!

आज 25 वर्षांनंतर माझे ‘वझ्झर मॉडेल’ पूर्णत्वास आले आहे. माझ्या संस्थेचा मालक मी नाही. माझ्यासोबत असलेली सव्वाशे मुले-मुली ही संस्था चालवतात. 25 एकरात या मुलांनी 15 हजार झाडांचे सुंदर जंगल तयार केले आहे. त्यातून मिळणारे वनौपज, त्याद्वारे तयार होणाऱ्या औषधी, हा सारा व्याप मुलेच सांभाळतात. मुलांनाच सारी कामे वाटून दिली आहेत. आपल्या अपंगत्वाचा अजिबात बाऊ न करता ते सर्व कामे करतात. या मुलांना मी केवळ आत्मनिर्भरच केले नाही; तर त्यांचे संसार कसे उभे राहतील, याचीही काळजी घेतली.

वय ७5 वर्षे व सव्वाशे मुलांचा बाप, अशी ओळख जेव्हा लोक करून देतात तेव्हा माझेच मला हसू येते. आता आयुष्याची उतरंड सुरू झाली आहे. मात्र माझ्यातला उत्साह मला शांत बसू देत नाही. कोण होतो मी आणि हे काय करून बसलो, असा प्रश्न मला अनेकदा पडू लागतो. थंड हवेचे ठिकाण असलेल्या चिखलदऱ्याच्या पायथ्याशी असलेल्या परतवाडा शहरात गेलेले माझे बालपण आठवते. याच परतवाड्यापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या वझ्झरला मी 125 अंध, अपंग, बेवारस मुलांच्या गोतावळ्यात सध्या राहतो. आता वार्ध्यक्य आले तरी आपला प्रवास केवळ परतवाडा ते वझ्झर, असा काही अंतराचाच कसा, असा प्रश्नही मनाला स्पर्शून जातो.

माझे वडील पुंडलिक पापळकर. व्यवसाय धोब्याचा. लोकांच्या घरचे कपडे धुणे, त्याला इस्त्री करणे. लहान असतानाच वडिलांनी मला या व्यवसायात जुंपले. आमच्या शेजारी मारवाडी व ब्राह्मण कुटुंबे रहायची. त्यामुळे कपडे धूत होतो तरी शेजाऱ्यांमुळे संस्कार छान झाले. याच मारवाडी कुटुंबांपैकी एक होते नथमल सोनी. ते आचार्य रजनिशांचे मामा. त्यांच्यामुळे रजनिशांची पुस्तके वाचण्याची गोडी लागली. सोनींसोबत अनेकदा पुण्याला जाऊन रजनिशांना भेटू लागलो. त्यांच्या प्रभावात गेलो. 25 वर्षांचा असताना एकदा रजनिशांनी स्पष्टच सांगितले, ‘साधना करणे हा काही तुझा स्वभाव नाही. त्यापेक्षा तू सेवा कर.’ झाले, तिथून आयुष्याला नवे वळण लागले.

वऱ्हाडात घराघरात प्रभाव असणारे गाडगेबाबा आमच्याच समाजाचे. सेवाच करायची आहे, तर गाडगेबाबांच्या विचारांचा प्रसार का नाही करायचा, असा प्रश्न मनात डोकावला आणि लगेच हालचाली सुरू झाल्या. गाडगेबाबांच्या कार्याला समोर नेणारे ‘देवकीनंदन गोपाला’ हे मासिक सुरू केले. या मासिकाच्या विक्रीसाठी राज्यभर फिरू लागलो. ही धुंदी एवढी की, त्यात घर कधी सुटले ते कळलेच नाही. वडिलांनी मात्र मला घर, संसार यात बांधून ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्यांना दुखवायचे नव्हते. त्यामुळे त्यांचे ऐकून संसार उभा केला, पण त्यात कधीच रमलो नाही.

मासिकाच्या निमित्ताने माझा मुक्काम पुण्या- मुंबईत जास्त असायचा. तिथेच अनेक पत्रकार, संपादकांशी ओळखी झाल्या. माझा बोलघेवडा स्वभाव त्यासाठी पूरक ठरला. मुंबईत असताना ‘लोकसत्ता प्रेस’ ही माझी हक्काची जागा होती. विद्याधर गोखले, माधव गडकरी यांच्यासोबतची मैत्री याच काळातली. लोकसत्ताचे मालक रामनाथ गोएंका अनेकदा प्रेसमध्ये आले की, त्यांना भेटायचो. माझ्या फकिरी वृत्तीने मासिक विकण्याच्या  प्रकाराचे ते कौतुक करायचे.

याच भटकंतीत एक गोष्ट सातत्याने मला अस्वस्थ करून जायची. जिथे कुठे जायचो तिथे अंध, अपंग, अनाथ मुले भीक मागताना दिसायची. त्यांच्याकडे बघून मन कळवळायचे. आपण काही करू शकतो का, असा विचार मनात यायचा; पण खिशात दमडी नाही, स्वत:चा ठिकाणा नाही, हे वास्तव पुढे पाऊल टाकू द्यायचे नाही. अखेर एक दिवस ठरवले. पुस्तक विकणे हे आपले आयुष्य नाही. भटकंतीमुळे अनेक ठिकाणची मुले मला चेहऱ्याने ठाऊक होतीच. त्यातल्या ओळखीच्या चौघांना सोबत घेतले व परतवाड्यात एका खोलीत बालगृह सुरू केले. जवळ फारसे पैसे नाही. कुणाला काहीही मागायचे नाही, सरकारची मदत अजिबात घ्यायची नाही, ही खूणगाठ मनात पक्की बांधलेली. बालगृह कसे चालणार, ही चिंता होती. इच्छा असेल तिथे मार्ग सापडतो, असे म्हणतात. त्यामुळे खचून न जाता मुलांना गोळा करणे सुरू केले. अनेकदा मुलांसाठी जेवण तयार करायला किराणा नसायचा. ओळखीचे लोक बघायचे, सहानुभूती व्यक्त करायचे आणि पाठ फिरवायचे.

1991 मध्ये अमरावतीच्या प्रसिद्ध हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रमुख प्रभाकर वैद्य यांना कुणीतरी माझ्याविषयी सांगितले. ते स्वत: आले. त्यांनी काम बघितले व लगेच स्वत:च्या वडिलांच्या नावाने एक संस्था स्थापून दिली. वझ्झरजवळ 25 एकर जागा घेऊन दिली. मुलांची आबाळ होऊ नये म्हणून त्यांच्या खाण्या-पिण्याची जबाबदारी अंगावर घेतली. आजही त्यांच्या मदतीने संस्था सुरू आहे, पण ते संस्थेत नाहीत. सारा कारभार माझ्या हाती सोपवून ते तटस्थ वृत्तीने संस्थेचे काम बघतात.

बघता-बघता माझा मुलांचा गोतावळा वाढू लागला. आज 125 मुले संस्थेत आहेत. अंध, अपंग, मतिमंद, बेवारस असलेल्या या मुलांना सांभाळणे तर सुरू केले, पण त्यांच्या पुनर्वसनाचे काय, असा प्रश्न मला छळू लागला. मग मी शासनाच्या यासंबंधीच्या धोरणांचा अभ्यास सुरू केला. त्यासाठी देशभरातल्या अनेक संस्थांना भेटी दिल्या. सरकारी अधिकाऱ्यांशी बोललो. शासन अनुदान देत असलेल्या संस्थांची पाहणी केली तेव्हा लक्षात असे आले की, शासनाचे धोरणच फसवे आहे. केवळ संस्थांचे आर्थिक हित साधणारे आहे. अशा मुलांच्या पुनर्वसनाच्या मुद्यावरसुद्धा या धोरणात ठोस उपाययोजना नाहीत. या मुलांना सांभाळण्यासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांची सोय कशी करता येईल, याचाच विचार या धोरणात केलेला आहे.

अशा मुलांना स्वावलंबनाचे धडे देण्यासाठी आखलेले कार्यक्रमसुद्धा फसवे आहेत. मुख्य म्हणजे, या धोरणात 1८ वर्षांपर्यंत मुलांना सांभाळण्याची तरतूद आहे. “नंतर काय?” या प्रश्नाचे उत्तर कुणाकडेच नाही. आपल्या समाजात धडधाकट मुलांना पालक वाऱ्यावर सोडत नाहीत. सोडले तरी अशा मुलांना जगायचे कसे ते शिकवावे लागत नाही. इथे तर अंध, अपंग, बेवारस मुलांचा प्रश्न. त्यांनी स्वबळावर आयुष्य जगावे असा विचार शासन कसा करू शकते, असा प्रश्न मला पडला. मग मी ठरवले. या क्षेत्रात शासनाची कोणतीही मदत न घेता पुनर्वसनाचे स्वत:चे मॉडेल तयार करायचे. आज 25 वर्षांनंतर माझे ‘वझ्झर मॉडेल’ पूर्णत्वास आले आहे.

माझ्या संस्थेचा मालक मी नाही. माझ्यासोबत असलेली सव्वाशे मुले-मुली ही संस्था चालवतात. 25 एकरात या मुलांनी 15 हजार झाडांचे सुंदर जंगल तयार केले आहे. त्यातून मिळणारे वनौपज, त्याद्वारे तयार होणाऱ्या औषधी, हा सारा व्याप मुलेच सांभाळतात. माझ्या संस्थेत एकही कर्मचारी नाही. मुलांनाच सारी कामे वाटून दिली आहेत. आपल्या अपंगत्वाचा अजिबात बाऊ न करता ते सर्व कामे करतात. या मुलांना मी केवळ आत्मनिर्भरच केले नाही, तर त्यांचे संसार कसे उभे राहतील, याचीही काळजी घेतली. आतापर्यंत 1७ मुलींची लग्ने मी समाजातल्या धडधाकट तरुणांशी लावून दिली. त्यातल्या 15 मुलींना 23 मुले-मुली झाली आहेत व त्यापैकी कुणीही अपंग नाही. सारे सुदृढ आहेत. ही लग्ने लावताना मी सनदी व पोलीस सेवेतील अधिकारी, राजकारण्यांना बोलावतो. यापैकी कुणी मुलीचे बाबा होतात, तर कुणी मामा. अमरावतीच्या प्रत्येक जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्ताच्या शासकीय निवासस्थानातून माझ्या मुलींची वरात निघालेली आहे. या सहभागामुळे हे अधिकारी नंतर बदलून कुठेही गेले तरी त्यांच्या मानलेल्या मुली व भाचीकडे नियमितपणे लक्ष ठेवतात. त्यांच्या संसाराला काय हवे, नको ते बघतात. ज्यांची लग्ने लावून दिली त्या मुलींना मी संस्थेत पाय ठेवू देत नाही. त्या भेटायला आल्या की, इतर मुली अस्वस्थ होतात. अंध, अपंग, मतिमंद मुलींशी लग्न करणारे तरुण मला बरोबर भेटतात.

केवळ मुलींची लग्नेच नाही, तर संस्थेतल्या मुलांना मी शाळेतून नियमित शिक्षण देतो. या बळावर आतापर्यंत 12 मुलांना सरकारी नोकरी मिळाली आहे. सध्या 20 मुले उच्चशिक्षण घेत आहेत. ही मुले कुठली, त्यांचे खरे आई- वडील कोण याविषयी मला माहिती नाही. ते शोधण्याच्या भानगडीत मी कधी पडलो नाही. आज माझ्या संस्थेचा सचिव मी विदुर नावाच्या आंधळ्या मुलाला केले आहे.  तोच माझा कायदेशीर वारस आहे. हा विदुर मला पंढरपूरच्या विठोबा-रखुमाईच्या देवळाजवळ रडताना सापडला. तेव्हा तो एक वर्षाचा होता. आज तो 20 वर्षांचा आहे व महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. शिक्षणासोबतच तो संस्थेची सर्व कामे सांभाळतो. माझ्या गोतावळ्यात असलेल्या प्रत्येकाची कथा अशीच आहे.

आता संस्थेचे नाव झाल्याने अनेक ओळखीचे लोक कुठे मुले सापडली की, माझ्याकडे आणून सोडतात. या बेवारस मुलांनासुद्धा जगण्याचा तेवढाच हक्क आहे, हे मी प्रशासनाला पटवून दिले. यानंतर संस्थेतल्या 63 मुलांना रहिवासाचा दाखला व आधार कार्ड मिळाले. सध्या संस्थेतल्या 20 मुलांना मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. सरकारचे या मुलांच्या संदर्भातले धोरण चुकीचे असल्याने दरवर्षी एक लाख मुले विकली जातात. अनैतिक व्यापारात ओढली जातात. त्यातल्या काही मुलांना मी पालकत्व देऊ शकलो. इतरांचे काय? हा प्रश्न मला कायम छळत राहतो.

काहीतरी व्यंग असलेल्या या मुलांना सांभाळणे सोपे नाही. विशेषत: वयात आलेल्या मुलींना सांभाळणे आणखी कठीण असते. संस्थेत मुले-मुली एकत्र राहतात. त्यामुळे खूप काळजी घ्यावी लागते. मी दर महिन्याला अमरावतीवरून डॉक्टर बोलावून सर्वांची नियमित तपासणी करून घेतो. या मुलांची सेवा करताना अनेकदा कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागले. नऊ वर्षांपूर्वी शीतल नावाची माझी बहुविकलांग मुलगी आजारी पडली. तिला अमरावतीला उपचारासाठी नेले. रक्ताची गरज पडली तेव्हा मी रक्त दिले, पण ती वाचू शकली नाही. तेव्हा मी पार खचून गेलो. वयात आलेली मुलगी अचानक जाणे हा मोठा धक्का होता. त्याक्षणी मला पालक होता आले; पण आई कधीच होता येणार नाही, अशी जाणीव झाली. मुलींचे मासिक पाळीसारखे विषय हाताळताना माझ्या मनात हेच विचार येत राहतात. मी सेवेच्या माध्यमातून देवाला हरवले; पण आई होऊ शकलो नाही अशी खंत मग मनात घर करून जाते.

वडिलांच्या सांगण्यावरून मी लग्न केले. माझाही संसार उभा राहिला; पण मी त्यात कधी रमलो नाही. 1990 नंतर मी कधीच बायको-मुलांना भेटलो नाही. त्यांना संस्थेत पाय ठेवू दिला नाही. त्यांची खबरबात मला बाहेरून कळते; पण मी मनावर दगड ठेवून सारे पाश तोडले. एकदा माझ्या सख्ख्या मुलीचे नागपूरला ऑपरेशन होते. त्याच वेळी माझ्या चार अपंग मुली आजारी होत्या व रुग्णालयात होत्या. मला नातेवाईकांकडून खूप निरोप आले; पण मी आजारी मुलींसोबत अमरावतीलाच राहिलो. माझ्या काही मित्रांना कळल्यावर त्यांनी नागपूरला धाव घेतली व व्यवस्था केली.

माझ्या गोतावळ्यातील बाली नावाच्या अपंग मुलीचे लग्न अकोल्यात होणार होते. लग्नाच्या आदल्या दिवशीच पत्नी वारल्याचा निरोप आला; पण मी गेलो नाही. गेलेल्या माणसाला कशाला महत्त्व द्यायचे? त्यापेक्षा सुखी आयुष्याची सुरुवात करणाऱ्या बालीला सोबत करणे मला महत्त्वाचे वाटले. माझे नातेवाईकही भरपूर आहेत; पण मी कुणालाही जवळ फिरकू देत नाही. माझे नाव झाल्यावर काहींनी जवळ येण्याचा प्रयत्न केला; पण मी त्यांपासून दूर राहिलो. माझ्या काही नातेवाईकांनी माझ्या संस्थेच्या नावावर पैसे गोळा करण्याचा प्रयत्नही मी हाणून पाडला. मी कुणाही परक्या व्यक्तीकडून कधीच देणगी घेत नाही. मला अनेकांनी पुरस्कार देऊ केले, पण मी ते कधीच स्वीकारले नाही. मध्यंतरी लता मंगेशकरांकडून एका पुरस्कारासाठी विचारणा झाली. मी ‘नाही’ म्हटले. ‘आधी इथे वझ्झरला या, काम बघा, मग मी पुरस्काराचे काय ते ठरवेन’, अशी अट घातली. अर्थात, ती त्यांनी मान्य केली नाही.

मध्यंतरी केंद्र शासनाने या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांची परिषद दिल्लीत भरवली. मी मुलांना घेऊन गेलो. तिथे आलेले संस्थाचालक पंचतारांकित पेहरावात होते. मी भाषणातून साऱ्यांची खरडपट्टी काढली व निघून आलो. अंध, अपंग, बेवारस, मतिमंद मुलांचे पुनर्वसन व मरेपर्यंत सांभाळ करण्याची जबाबदारी सरकारने स्वीकारली पाहिजे. 1८ वर्षानंतर त्यांना वाऱ्यावर सोडू नये, अशी मागणी मी सातत्याने सरकारकडे करीत आहे. यासाठी 1955 चा कायदा बदलण्याची गरज आहे, पण कुणीही त्याकडे लक्ष देत नाही. माझ्या संस्थेला नियमितपणे भेट देणाऱ्या लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन व केंद्रीय मंत्री हंसराज अहीर आता या बदलासाठी पाठपुरावा करीत आहेत. त्यांना यश मिळते की नाही हे बघावे लागेल. माझ्या हयातीत हा निर्णय झाला तर मला सेवेचे समाधान लाभेल, अन्यथा नाही.

माझ्या मृत्यूनंतर ही संस्था मुलेच सांभाळणार आहेत. मी संस्थेच्या आवारातच एक खड्डा तयार करून ठेवला आहे ‘हयाती कबर’ असे त्याचे नाव आहे. तिथे मला मुलेच गाडतील, असे मृत्यूपत्रच तयार करून ठेवले आहे. आज मृत्यूचे विचार मनात येताना आयुष्य किती सुंदर होते याचाही भास मला सतत होत राहतो. 125 मुलांचा पालक म्हणून!

शब्दांकन - देवेंद्र गावंडे, नागपूर

Tags: देवेंद्र गावंडे Devendra Gavande Balhgruha Blind Handicapped Bewaris Mukbadhir Matimand Ambadaspant Vaidya बालगृह अंध अपंग मतिमंद अंबादासपंत वैद्य वझ्झर शंकर पापळकर Wazzar Vazzar Shankar Papalkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके