डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आपले आभाळ पेलताना - वाहत्या वाऱ्यासंगे

बाईच्या 'बाईपणातून' येणाऱ्या दुःखाचं रूप निराळं आणि 'हरेक वेदनेचा रंगही वेगळाच' अशा हजारो स्त्रियांच्या कहाण्या समजावून घेताना आणि त्या सोडविण्याचा प्रयत्न करताना शैलाला कमी का प्रयास पडत असतील?

‘‘ज्या घरात बाईचं माणूसपण स्वयंभूपणे मान्य केलेलं होतं, अशा घरात मी वाढले. त्यामुळ की काय माझ्या विचाराला प्रारंभापासूनच एक निश्चित दिशा लाभली,’’ अशा आशयाचे उद्गार प्रा. शैला लोहिया ‘आपले आभाळ पेलताना’ या पुस्तकाच्या सुरुवातीलाच आपल्याला सांगून टाकते. हेच माणूसपण अवतीभोवतीच्या बायकांनाही लाभावं यासाठी शैला गेली कित्येक वर्षे जिवाच्या आकांताने धडपडत आहे. साथ डॉ. लोहियांची आहे, असं म्हणण्यापेक्षा 'मानवलोक', 'दिलासा', 'मनस्विनी' हे प्रकल्प दोघांच्या सहकार्यानेच उभे राहिले आहेत. नानाविध अडचणी मार्गात आल्या तरीसुद्धा, त्यातही शैलानं स्त्रियांच्या समस्यांवर अधिक लक्ष केंद्रित केलं.

अडचणीत आलेल्या स्त्रियांना अर्ध्या रात्री आधार देणारं 'दिलासा घर' सुरू केलं तेव्हा शैलाच्या अनुभवास आलं की सगळ्याच स्त्रियांच्यावर अन्याय झाला होता हे खरं असतं तरी ती स्वतःच सांगते त्याप्रमाणे स्त्रीच्या असहायतेचं रूप अनेक रंगी आणि अनेक तऱ्हेचं असतं. बाईच्या 'बाईपणातून' येणाऱ्या दुःखाचं रूप निराळं आणि 'हरेक वेदनेचा रंगही वेगळाच' अशा हजारो स्त्रियांच्या कहाण्या समजावून घेताना आणि त्या सोडविण्याचा प्रयत्न करताना शैलाला कमी का प्रयास पडत असतील? पहिली गोष्ट अशी की, समाजातूनच नव्हे तर घरातल्या माणसांकडूनही अमानुष वागणूक मिळाल्यामुळे रस्त्यावर येऊन पडलेल्या या स्त्रियांचा चांगुलपणावरचा विश्वासच उडालेला असतो. कुणीतरी सांगितले म्हणून आंबेजोगाईला डॉक्टरीणबाईकडे (खेडेगावात कोणत्याही सुशिक्षित बाईला डॉक्टरीण म्हणण्याचा प्रघात आहे) आणून सोडलं म्हणून नाइलाजानं अगतिकपणे आलेल्या बायका पहिले काही दिवस घट्ट मिटलेले ओठ उघडत नाहीत. आपली पूर्वकहाणी मोकळेपणानं सांगतच नाहीत. अशा वेळी कमालीच्या संयमाने वाट पहावी लागते. तो धीर शैलासारख्या आताआताच प्रौढावस्थेकडे झुकलेल्या स्त्रीकडे असावा याचे कौतुक वाटते.

एकदा का याच बायका मोकळ्या झाल्या की घडाघड आपल्या आयुष्यातील बारीकसारीक तपशीलसुद्धा बोलून दाखवतात. त्यात नवऱ्याने बेदम मारल्यामुळे विव्हल झालेली कांता असते, ‘मी ग्रॅज्युएट आहे, मला एम.ए. करायचं आहे,’ एवढंच सतत बडबडणारी सुधा, नवऱ्याने व्यसनापायी बाजारबसवीचे जिणे पत्करायला लावलेली शारदा, आईचं छत्र अल्पवयातच हरपल्यामुळं वाईट संगतीनं भरकटलेली लोली, सावत्र आईच्या जाचामुळे मुर्तुजासारख्या मुसलमान तरुणाशी संधान बांधून, त्याला देवासमोर माळ घातल्यामुळे आपलं लग्न झालंच आहे, असं भाबडेपणानं मानणारी आणि पुढे त्याने पोबारा केल्यानंतर उघड्‌यावर पडलेली मीरा, अशा एक का दोन, अनेक वाटा चुकलेल्या तरुणींच्या रांगा 'दिलासा’कडे वळू लागल्या, त्यांना नुसता आधार देऊन चालणार नव्हतं, तर त्यांना शक्यतो सन्मानानं घरी पाठवता येईल का पाहणं... तेही नाही जमलं तर कोर्टकचेऱ्या करून त्यांना पोटगी मिळवून देणं आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याकरिता आपलं आभाळ आपणच ‘पेलायला’ लावायची क्षमता त्यांच्यात निर्माण व्हावी म्हणून त्यांना अनेकविध उद्योगधंद्याचं शिक्षण देण्याची व्यवस्था करणं या एकातून एक निर्माण होणाऱ्या अनेकविध जबाबदाऱ्या शैला वर्षानुवर्षे पेलते आहे. त्यातही शांतासारख्या मुली आपलं दुःख बाजूला ठेवून इतर पीड़ित मुलींना आधार द्यायला पुढे सरसावतात तेव्हा शैलाच्या डोळ्यांत कृतार्थतेचे अश्रू असतात. परंतु प्रस्तावनेत प्रा. पुण्या भावे म्हणतात त्याप्रमाणे 'स्त्री-प्रश्न' अलग बेटावर ठेवून विचार करता येत नाही. त्या समाजाच्या समग्र समस्यांचा विचार करायला हवा. पण तोपर्यंत तरी शैला लोहियांच्या 'दिलासा' घराची जरुरी आहेच आहे.

'आपले आभाळ पेलताना’
 लेखिका : प्रा. शैला लोहिया
 साकेत प्रकाशन , मूल्य 70 रुपये.

वाहत्या वाऱ्यासंगे

प्रा. शैला लोहिया यांचा अलीकडेच प्रसिद्ध झालेला हा अवघ्या वीस लेखांचा संग्रह. 'वाहत्या वाऱ्यासंगे’ मुक्त मनाने स्वैरपणे भिरभिरताना त्या आपल्याला कुठंकुठे घेऊन जातात. कधी बदलत्या ऋतूतील निसर्गाची विविध विलोभनीय दृश्ये दाखवितात तर कधी जाणत्या वयापासून सामाजिक बांधिलकीचा वसा घेतल्यामुळे समाजातील अन्यायपीडित वर्गाशी आपली ओळख करून देऊन आपल्याला वास्तव जगाचे दर्शन घडवितात आणि अस्वस्थही करतात; तर कधी घटकेत बालसृष्टीत रमून भाद्रपदातील भुलाबाईचे असे चित्रदर्शी वर्णन करतात की त्यांच्याबरोबर आपणही आपलं त्या रम्य वयातील सख्यांबरोबरच बागडणं पुन्हा एकदा जगतो.

श्री. शंकर सारडा यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे हे सारे लेख म्हणजे तरल संवेदनाक्षम मनावर उमटलेले आल्हादकारक दवबिंदू आहेत. किती नेमक्या भाषेत श्री. सारडांनी शैला लोहियांच्या लिखाणाचे विशेष टिपलेले आहेत. लेखिका व प्रकाशक दोघेही समविचार आणि राष्ट्र सेवा दलाच्या सुसंस्कारातून वाढलेल्या पिढीचे प्रतिनिधी म्हणूनही असेल, नुसती त्यांची प्रस्तावना वाचली तरी शैला लोहियांची पूर्वीची ओळख नसलेला माणूसही त्यांच्या परिवारातील एक होऊन जातो. मी तर अवघ्या परांजपे घराण्याशीच लहान वयापासून कौटुंबिक नात्याने घट्ट बांधली गेलेली. शैलाची वाढत्या वयातील रूपे कौतुकानं न्याहाळणारी. त्यामुळे शैलाचं मनोगत वाचताना भारावून जाणारी.

शैला जशी बोलते-बागते तशीच लिहितेही. कृत्रिमपणाचा लवलेश नाही. सर्वत्रच स्वच्छ-निकोप मनाचं स्वाभाविक दर्शन असं काही गणिती समीकरण मांडता येणार नाही, पण आपण ज्या कुटुंबात वाढतो, जे बाह्य वातावरण आपल्या अवतीभोवती असतं त्याचा परिणाम आपल्या जडणघडणीवर कधी कळत तर कधी नकळतही होतच असतो. विशेषतः ते कुटुंब सर्वसामान्य लोकांपेक्षा फार फार वेगळं असेल तर. शैलापेक्षा निराळी स्त्री तेथे वाढूच शकली नसती. त्यासाठी शैलाचा संग्रहातील ‘आई साधीसुधी तरीही असामान्य’ हा शेवटचा लेख प्रारंभीच वाचायला हवा. शैलाचे आईवडील... शकुंतलाबाई व शंकरराथ परांजपे ही पतिपत्नींची एक अजोड जोडी.

दोघेही राष्ट्र सेवा दल व एकूणच सामाजिक-राजकीय कामात आकंठ डुंबून गेलेले. शंकररावांनी व्यवसाय म्हणून वकिली केलीच नाही. शैला म्हणते, "यांचा तो जणू फावल्या वेळचा उद्योग, स्थानिक व विविध व्यापक प्रश्नांनी आई-पपांचं कुटुंबजीवन अखेरपर्यंत रसरसलेलं होतं. आमचं घर या सामाजिक पाहुण्यांनी सदैव गजबजलेलं असायचं. आणि आई त्या सर्वांचं स्वागत उत्साहानं करी. एक निर्लेप साधेपणा आमच्या घरात होता. फणी-करंड्याच्या आरशापुढे ऐसपैस बसून दाढी करणारे मधु दंडवते, मस्तपैकी खुर्चीवर बसून चाकवताची पातळ भाजी आणि भात चवीने खाणारे नाथ पै, आम्हां सगळ्यांबरोबर पत्ते खेळणारे भाऊ रानडे, जयप्रकाशजी, राममनोहर लोहिया, आई घरात नसताना माझ्या लहानग्या भावाची शी-शू साफ करणारे साने गुरुजी, एस.एम.जोशी, नानासाहेब गोरे ही मंडळी आमच्या घरात पाहुणे म्हणून येत नसत तर ती कुटुंबीयांपैकी एक होती. ही सारी मोठी मंडळी तरी होती. पण अनेक सामान्य कार्यकर्त्यांनाही आमच्या घराचा मोठा आधार वाटे.

आई-पपांच्या या अनोख्या संस्कारातून मला खूप समृद्धी मिळाली.’’ शैलाला तू अमुक कर या करू नकोस असा उपदेश तिच्या आईवडिलांनी कधी केला नाही म्हणूनच की काय तिची निकोप वाढ झाली. राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकामध्ये काम करीत असताना डॉ. द्वारकादास लोहियांसारखा निष्ठावान कार्यकर्ताही जोडीदार म्हणून लाभला. त्यांच्या मानवलोकला ‘मनस्विनी’, ‘दिलासा घरा’ची जोड देताना तीही समाजकार्यात आकंठ बुडून गेली आहे. ती सध्या अंबाजोगाईच्या महिला विद्यालयाची प्राचार्या आहे.

शिक्षण देताना मुलींवर संस्कार ती करतेच आहे. पण तिचा एक विलोभनीय विशेष असा की, संगीत, नृत्य आणि लेखनकला यांमध्येही तिचे वेगळेपण स्पष्टपणे दिसून येते. अनाथ, शोषित, पीडित स्त्रियांच्या व्यथा पोटतिडकीने व्यक्त करताना तिची लेखणी पेटून निघते. (रेल्वेच्या डब्यातील आत्मा, मोहसिनाची सल, फुंकर, उत्तराच्या शोधातील प्रश्न, बेशरमीची झाडं इत्यादी लेख...) परंतु शैलामध्ये एक हळुवार मनाची, सौंदर्यासक्त, रसिक वृत्तीची स्त्रीही दडलेली आहे. त्यामुळे 'उमलतीचे रंग, गंध, मेंदी, आषाढातील एक दिवस, हा भाद्रपदातील महिना, हा वसंत रंगभरित...' अशा लेखांमध्ये तिने जे बहारदार वर्णन केले आहे ते वाचून मन प्रसन्न होते, सुखावून जाते.

‘मी युगविरहिणी’ आणि ‘आई साधीसुधी तरीही असामान्य’ हे लेख स्त्रीमनाला विशेष भावणारे आहेत. शैलाला नेमक्या शब्दासाठी कधी थांबावं लागलं नसेल, ना लिहिताना कधी खाडाखोड करावी लागेल. सगळंच लिखाण स्वच्छ, सरळ आणि ओघवतं. तरीदेखील शैलाचे काही खास बायकी वाक्प्रचार. जसे 'तिचे डोळे कसे शिकेकाईच्या बियांसारखे काळेभोर, गाभुळल्या चिंचेची चव जिभेवर कायम गोंदणं उठवून जाते, वेळ कसा कालवलेल्या दूधभातासारखा छान वाटला’… इ. खरं म्हणजे संग्रहातील सर्वच लेख मुद्दाम आवर्जून वाचावे असे आहेत. मुखपृष्ठ आतील आशयाशी सुसंगत असेच. त्यामुळेही या पुस्तकाची भर आपल्या ग्रंथसंग्रहामध्ये घालायलाच हवी असे प्रत्येक सुजाण वाचकाला वाटेल.

वाहत्या वाऱ्यासंगे
लेखिका : प्रा. शैला लोहिया
डॉ. सौ. निर्मला सारडा,ग्रंथविशेष प्रतिष्ठान, सातारा
मूल्य 60 रुपये

Tags: आपले आभाळ पेलताना नवे पुस्तक aple abhal peltana new book weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके