डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

हर्षभरित अंत:करणांचा स्वातंत्र्योद्गार!

सुभाषबाबूंची आझाद हिंद सेना, या सर्व घडामोडींची माहिती देत असताना मुलांमध्ये आपोआपच राष्ट्रीय वातावरण तयार होऊ लागले. 1947 च्या प्रारंभापासून हिंदुस्थानला स्वातंत्र्य देऊन ब्रिटिश शासन काढता पाय घेणार आहे ही गोष्ट सर्वश्रुत असल्याने मुख्याध्यापकांनीही मला कोणता अडथळा आणला नाही हे विशेष.

मी अनुभवलेला पहिला स्वातंत्र्यदिन...

पहिला स्वातंत्र्यदिन मी एका खेड्यात विद्यार्थ्याबरोबर साजरा केला. त्याचे असं झालं की, 1945 साली बी.ए. झाल्यानंतर मी एम.ए.साठी विलिंग्डन महाविद्यालयात नाव नोंदवलं. त्या वेळी सत्रात फक्त चारच दिवस आमची उपस्थिती अपेक्षित असायची. पदव्युत्तर विद्यार्थिनींची वसतिगृहात सोय नसल्यामुळे मधला दोन वर्षांचा काळ मी इथंतिथं कुठंतरी काढण्याच्या विचारात होते. योगायोगाची गोष्ट अशी की भी मोठ्या बहिणीकडे शिरोळला (कोल्हापूर) गेले असताना शिक्षणक्षेत्रातील काही मंडळी आमच्याकडे आली व नवीन सुरू होणाऱ्या शाळेत मी शिकवायला यावं अशी त्यांनी मोठ्या प्रेमळ आग्रहानं गळ घातली. एक तर शिक्षकांची वाण होतीच. शिवाय एखादी शिक्षिका शाळेला मिळाली तर मुलीही येतील हा त्यांचा हिशोब. आणि कार्यक्षम राहण्यामुळे मरगळ येणार नाही अशा विचाराने मी त्या शाळेत रुजू झालेही. 

तेथे येणारे विद्यार्थी वयाने बरेच मोठे होते. एकदोन वर्षे आधी त्यांनी फायनलची परीक्षा दिलेली असायची. माझ्याकडे प्रथम आठवीचा वर्ग होता. विद्यार्थी थोराड आणि दांडगट असेच दिसायचे. विद्यार्थि काँग्रेसमध्ये बरीच वर्षे काम केल्याने तरुण मुलामुलीत मिसळायची मला सवय होती. पण खेडेगावातल्या या शाळेत आपल्याला कसं जमेल अशी मला शंका आली. परंतु कशी कुणास ठाऊक, मला एक कल्पना सुचली. आणि पहिल्याच दिवशी फारसा अभ्यास घेता येणार नाही हे जाणून मी कुसुमाग्रजांची 'गर्जा जयजयकार' ही कविता खडया आवाजात गाऊन दाखवली. दंगा करण्याच्या मनःस्थितीत असलेली मुलंमुली चिडीचूप बसली. दुसरे दिवशी कवितेची पार्श्वभूमी मी स्पष्ट केली. शाहीर अमरशेख यांच्या तोंडून ही ओजस्वी कविता ऐकताना आम्हां महाविद्यालयीन तरुण-तरुणींची मनं थरारून जात असत. हेही त्यांना ओघातच सांगितलं. 

आणि पुढे आठवड्यातून दोन दिवस तरी मी मुलांना वसंत बापट, साने गुरुजी यांच्या कविता नुसत्या म्हणूनच दाखवू लागले असं नव्हे तर त्यांना एका सुरात म्हणायलाही लावू सागले. मुले अगदी समरसून मला साथ देत होती. त्यांना हे सगळं एकदमच वेगळे असं काही ऐकायला मिळतंय याचा आनंद त्यांच्या नजरेतून मला जाणवत होता. त्यासाठी आम्ही शाळा सुटल्यावर काही वेळ शाळेतच थांबत होतो. मग मी स्वातंत्रसंग्रामात भाग घेतलेल्या देशभक्तांच्या शौर्याच्या व त्यागाच्या कथा त्यांना सांगू लागले. शिरीषकुमार, वसंत दाते यांचे बलिदान, जिवावर उदार होऊन फैजपूरच्या काँग्रेसमध्ये सरळसोट ऐंशी फूट उंचीच्या स्तंभावर चढून ध्वजाची निरगाठ उकलणारा रणजित, तुरुंगामध्ये असतानाही उंच भिंतीवर चढून तिरंगा फडकावणाऱ्या इंदू भट व सिंधू देशपांडे, 9 ऑगस्टला सर्व मोठे नेते गजाआड असूनही नियोजित वेळी ध्वजवंदन झालेच पाहिजे या बांधिलकीच्या भावनेने अफाट गर्दीत पुसून ध्वज फडकवणारी अरुणा असफअल्ली. 

सुभाषबाबूंची आझाद हिंद सेना, या सर्व घडामोडींची माहिती देत असताना मुलांमध्ये आपोआपच राष्ट्रीय वातावरण तयार होऊ लागले. 1947 च्या प्रारंभापासून हिंदुस्थानला स्वातंत्र्य देऊन ब्रिटिश शासन काढता पाय घेणार आहे ही गोष्ट सर्वश्रुत असल्याने मुख्याध्यापकांनीही मला कोणता अडथळा आणला नाही हे विशेष. म्हणूनच स्वातंत्र्याचा क्षण मुक्रर झाल्यापासून आम्ही सर्वांनी पहिल्या स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम निश्चित केला. खरं म्हणजे मुलींनी संध्याकाळी दिवे लागण्याच्या आत घरी परतलं पाहिजे असा त्या वेळचा शिरस्ता होता. पण त्या दिवशी आमच्या ह्या योजनेत मुलीच नव्हे तर एका अर्थानं सगळं गावच सामील झालं होतं. 14 ऑगस्टला अमावास्या होती. पण मध्यरात्री भर बारा वाजता पहिल्या स्वातंत्र्यदिनाची सुरुवात करायची होती. तिन्ही सांजेपासूनच शाळेत मुला-मुलींची गर्दी होऊ लागली होती. 

मुख्याध्यापकांच्यावर सर्व जबाबदारी असली तरी मला बऱ्याच आधी शाळेत जावं लागलं होतं. पटांगणावर सडा टाकायचा, ध्वजस्थानी रांगोळी घालायची ही काम खास मुलींचीच. त्या काळी तयार हार मिळत नसत म्हणून मुलींनी फुल तोडण्यापासून हार तयार करण्यापर्यंतची काम आनंदाने स्वीकारली होती. कमानी उभारून पताका लावणं, सनईवाल्याला आमंत्रण देणं, असल्या गडबडीत मुलं आधीपासूनच गुंतली होती. एरवी या ना त्या सतरा सबबी सांगून शाळा चुकवणारी मुलंदेखील आज कोणतंही काम करायला अहमहमिकेनं पुढे येत होती. तेव्हा आतासारखा टी.व्ही. तर नव्हताच. रेडिओचंही प्रस्य कमीच होतं, पण त्यादिवशी एका मिनिटाचाही फरक पडणं कुणालाही चालणार नव्हतं. प्रत्येक क्षण मोलाचा होता. संबंध राष्ट्राच्या इतिहासातच एक देदीप्यमान गोष्ट घडणार होती. 

शतकानुशतकाच्या पारतंत्र्याच्या वेड्या निखळून पडणार होत्या. इतकी वर्षे अपमानित झालेला तिरंगा आता डौलानं, अभिमानाने फडकणार होता. तो क्षण जसजसा जवळ येऊ लागला तसतशा सर्वांच्या चित्तवृत्ती विलक्षण आनंदाने उचंबळून येऊ लागल्या. जातपात, विविध धर्म, स्त्री-पुरुष असले तटबंध केव्हाच मोडून पडले होते. त्या क्षणी सगळे एकाच ध्येयाने, धुंदीने बेहोष झाले होते. 12 चा शेवटचा ठोका पडला आणि टाळ्यांच्या प्रचंड गजरात तिरंगा वर चढवला गेला एका सुरात वंदेमातरत गायलं गेलं. ज्याला जी सुचेल त्या रीतीने मुलं मोठी माणसे आपला हर्ष प्रकट करीत होती. फटाके फटाफट फुटत होते. सनईचे स्वरही ऐकू येऊ नयेत इतका जयजयकार सर्वत्र दुमदुमत होता. 

गुलालाची, फुलांची उधळण होत होती. पेढे-बत्ताशांचं वाटप चालू होतं. लेझीमच्या तालात काढलेल्या मिरवणुकीत गर्दीमुळे एकमेकांना धक्के लागत होते. पावलावर पाऊल पडत होते. पण त्याबद्दल कुणाची तक्रार नव्हती. अतीव आनंदाने आज प्रत्येकाचं अंतःकरण काठोकाठ भरून आलं होतं. खेडेगावामध्ये दसऱ्याला देवाच्या पालखीची मिरवणूक निघाली की घराघरातील सुवासिनी रस्त्यावर आरत्या घेऊन उभ्याच असतात. ओवाळणे झाल्यावर भक्तिभावाने नमस्कार करतात. तशा प्रकारे या मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. मिरवणुकीत अग्रभागी झेंडा घेऊन चालणाऱ्या युवकाला भाली कुंकुम लावून ओवाळण्यात आले. झेंडयावर फुलांची उधळण करण्यात आली. पहाट होत आली तरी मुले-मुली घरी परतायला तयार नव्हती. इतकं त्या वेळचं वातावरण उत्तेजक झालं होतं. हा मी अनुभवलेला पहिला स्वातंत्र्यदिन. त्यानंतर आजपर्यंत अनेक स्वातंत्र्यदिनांच्या सोहळ्यांना मी हजर राहिले तरीही त्या पहिल्या स्वातंत्र्यदिनाची आठवण मनामध्ये आजतागायत घट्ट रुतून बसली आहे ती कायमचीच.

Tags: स्वातंत्रदिन  मुख्याध्यापक आझाद हिंद सेना सुभाषबाबू शांता बुद्धिसागर Independence Day Head Master Azad Hind Sena Subhashbabu Shanta Budhisagar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके