डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आमच्या मालूताई स्वभावाने भाविकच. बुद्धिवादी घराण्यामध्ये वाढल्या असल्यामुळे देवदेवतांच्या पूजनाचा त्यांचा मार्ग नाही पण गुणज्ञता आणि कृतज्ञता हे त्यांचे मोठे गुण आहेत. गुणी माणसांविषयी त्यांना मनापासून अगत्य वाटते. अशा माणसांच्या गुणांचा परिचय सर्वांना करून देण्याची त्यांची असोशी असते.

'भावफुले' हे शीर्षक निवडण्यात शांताबाई किर्लोस्करांनी मोठेच औचित्य दर्शविले आहे. मालतीबाईंनी वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या ह्या व्यक्तिचित्रांचा संग्रह ‘पसायदान' मधून उचलून पुण्याला आणला आणि त्यातून नेटके संपादन करून तो शांताबाई आपल्यापुढे ठेवला. त्याच येळी या पुस्तकाला कोणते नाव ययायचे तेही मुकुंदराव व शांताबाईंनी ठरविले. पुस्तक तयार होऊन त्याचे प्रकाशन केव्हा व कुणाच्या हस्ते करायचे याचा तोपर्यंत खुद्द मालतीबाईंना सुद्धा पत्ता नव्हता. कोणी तरी सांगितले म्हणून किंवा संबंधित व्यक्तीकडून काही मिळवायचे म्हणून यांतील एकही व्यक्तिचित्र मालतीबाईंनी रेखाटले नाही. त्यांच्या अंतर्मनात ज्या भावभावना उमटल्या त्या अगदी सहजपणे शब्दबद्ध होत गेल्या. या लेखनाचे स्वरूप असे आहे. दैवताची पूजा करताना आपण आवर्जून फुले वाहतो. मालतीबाईंना भावलेली ही सर्व माणसे अशीच त्यांची परम श्रद्धास्थानेच आहेत. आणि त्यांच्यासंबंधीच्या भावनाही फुलासारख्याच नाजूक आणि सुगंधित अशाच आहेत. 

पुस्तकाच्या प्रारंभी शांताबाई 'दोन शब्द' सांगताना म्हणतात, 'आमच्या मालूताई स्वभावाने भाविकच. बुद्धिवादी घराण्यामध्ये वाढल्या असल्यामुळे देवदेवतांच्या पूजनाचा त्यांचा मार्ग नाही पण गुणज्ञता आणि कृतज्ञता हे त्यांचे मोठे गुण आहेत. गुणी माणसांविषयी त्यांना मनापासून अगत्य वाटते. अशा माणसांच्या गुणांचा परिचय सर्वांना करून देण्याची त्यांची असोशी असते. त्याच्या जोडीला तल्लख स्मरणशक्ती लहानसहान वर्तनाचे तपशील टिपून घेते त्यामुळे आपला भाव जिथे जडला त्यांच्याविषयी लिहिताना त्या सुंदर व्यक्तिचित्र उभे करतात.'नणंदभावजयांचा सहवास हा अर्थातच इतरांपेक्षा अधिक निकटचा. परंतु ज्यांना ज्यांना मालतीबाईंच्या मैत्रीचा लाभ झाला आहे तेही त्यांच्याबद्दल असाच निर्वाळा देतील. संग्रहातील सत्तावीस व्यक्तिचित्रे मालतीबाईंनी चितारली आहेत. परंतु शेवटचे खुद्द मालूताईंचे स्वभावविशेष डॉ. सरोजिनी वैद्य यांच्या शब्दांत वाचताना भाव फुलांचा सुगंध दीर्घकाळ मनात रेंगाळत राहतो. वयाच्या सहाव्या वर्षीच शंकरभाऊंनी आपल्या छोट्या लेकीला शिक्षणासाठी हिंगण्याला ठेवले. 

पहिली प्रतिक्रिया रडण्या- भेकण्याचीची असली तरी गुरुवर्य वा.म. जोशींचा पाठीवरचा पहिला अतीव मायेचा स्पर्श, बरोबरीच्या खेळगड्यांप्रमाणे मुलींच्याबरोबर खेळण्याची त्यांची वृत्ती, पूज्य महर्षी कर्व्यांनी सदैव जपलेले आश्रमातील पवित्र वातावरण (आजही मालतीबाईंच्या टेबलावर अण्णांचा फोटो ठेवलेला असतो.) करडया शिस्तीच्या पण तितक्याच प्रेमळ चिपळूणकरबाई, गुरुजींच्या आडनावापेक्षा 'नाना,' 'तात्या', 'मावशी', 'आका', 'बू काका’ अशा घरगुती नावाने होत असलेला वापर यामुळे मालतीबाईंना आश्रमाची ओढ पुढील वयात इतक्या तीव्रतेने वाटत आली की त्या 'हे बंध आश्रमा, त्वा माझे प्रमाण घ्यावे' या नितांत सुंदर लेखात म्हणतात. 'दैनंदिन व्यापातून सवड झाली की कितीदा वाटते आपल्याला पंख असते तर भुरंदिशी हिंगण्याच्या वनदेवीच्या टेकडीवर जाऊन बसता आले असते, पुन्हा लहान होता आले असते. 

सर्वात प्रभावी व्यक्तिचित्रण आहे ते शंकरभाऊंचे (या आठवणींनी भिजती डोळे अजुनी). चिमुकली लेक हिंगण्याहून प्रथमच परत आली तेव्हा किर्लोस्करवाडी स्टेशनवरच तिला उचलून घेताना डबडबल्या डोळ्यांतून त्यांच्या शर्टावर थेंब पडले 'त्या थेंबात माझा स्वर्ग मला भेटला' असे मालतीबाई म्हणतात, तेव्हा त्यांच्याप्रमाणे आपलेही डोळे ओलावतात. पण शंकरभाऊंची माया आंधळी नव्हती, वडीलधाऱ्यांचा मान ठेवण्याचे, कुणाच्याही नैसर्गिक व्यंगाचा उल्लेख न करण्याचे शंकरभाऊंनी दिलेले संस्कार त्यांचे सुजाण पालकत्व स्पष्ट करतात. हसरी, खेळकर, रसिक वृत्ती हा शंकर भाऊंचा खास स्वभावविशेष होता. कोणतीही घटना शब्दांनी सांगण्यापेक्षा झटपट चित्रातून साकारण्याची त्यांची हातोटी होती. सहकाऱ्यांच्यावर त्यांचा विश्वास होता. त्यांच्याकडे येणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल, कामगारांबद्दल त्यांची आदरभावनाच असायची. 

वाडीच्या कारखान्यात मुख्य कचेरीच्या समोर त्यांनी एका शेतकऱ्याचा शोभिवंत पुतळा उभा केला होता. यांतील सर्वांत हृदयस्पर्शी व्यक्तिचित्र आहे ते सोलापूरच्या 'संचार’ चे आय संपादक श्री. रंगाअण्णा वैद्य यांचे. अण्णांचे आणि मालतीबाईचे असे एक अनामिक जिव्हाळ्याचे नाते होते की त्याचे वर्णन शब्दांत करता येणार नाही. सोलापूरला एकाच वर्गात शिकत असल्यामुळेही त्यांचा स्नेह जमला असेल. परंतु एखाद्याबद्दल का आणि किती ओढ वाटावी याचे काही गणिती समीकरण नसते. या नात्याला कोणतेही ठराविक लेबल चिकटवण्याचा अट्टाहास सुजाण मंडळी करीत नसतात. संबंधित माणसाबद्दल प्रेम वाटते म्हणून वाटते. त्याची कारणमीमांसा करायची नसते. आणि हे असे खोलवर वाटणे जेव्हा उभयपक्षी असते तेव्हा त्यातील छटा अधिकच गहिरी होते. त्यातही हा जिवलग मित्र काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर आपण काय काय आणि किती किती हरवले आहे याची जाणीव रात्रंदिवस अस्वस्थ करीत राहते. 

जीवनातील सारे रस, रंग, गंध कायमचे उडून गेले आहेत असे वाटून आता आपल्या जीवनाचे प्रयोजन काय, हा प्रश्न वारंवार छळत राहतो. अर्थात हे वर्णन रंगाअण्णा वैद्यांच्या मृत्यूनंतरच्या मालतीबाईच्या मन:स्थितीचे आहे. या संग्रहात ते असतानाच 'प्रिय मित्र श्रीरंग वैद्य' यांना घातलेली आर्त साद आहे. कै. नरहर कुरुंदकर यांच्याविषयी मालतीबाईंच्या मनात अपार आदर आहे. त्यांच्या आकस्मिक मृत्यूने त्या उन्मळून गेल्या. कुरुंदकरांना अकाली मृत्यू यावा आला काही इतरही कारणे घडली असतील. पण सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांची चाहते मंडळीही अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर टाकतात. एखाद्या बकरीने झाडाची पाने ओरबाडून खावीत तशा आपणा सर्वांनी त्यांच्या शक्ती राबवल्या अशा अपराधी जाणीवेने व दुखावलेल्या मनाने मालतीबाई प्रश्न विचारतात, 'की आपणसुद्धा त्यांच्या अकाली निधनाला काही अंशी कारणीभूत नाही का? अपार कृतज्ञता हा मालतीबाईंचा स्थायीभाव गुरुजींच्याबद्दल मालतीबाईंनी अत्यंत भक्तिभावाने लिहिले आहे, म. द. हातकणंगलेकर, वि. रा. करंदीकर, यांच्या यशामुळे त्या मनोमन हरखून जातात. 

'पसायदान’ समोर दीपमाळ' लावण्याची कल्पना बोलून दाखवताच घटप्रभेच्या नावाप्रमाणेच प्रेमळ असलेल्या वत्सलाबाई वैद्य, खेड्यातील आपल्या मुसलमान मैत्रिणीच्या मुलाकडून दीपमाळ बनवून घेऊन ती आवर्जून मालतीबाईंना भेट म्हणून देतात. ही सारी व्यक्तिचित्रे वाचत असताना आपल्याला राहून राहून असे वाटते की मालतीबाईंच्या हातून स्वतंत्र अशी उत्तम ग्रंथसंपदा पुढेही निर्माण होऊ शकेल. ती क्षमता त्यांच्यात निश्चितच आहे. शारीरिक दृष्ट्या त्या लहानपणापासून अधू आहेत. त्यातच नुकतीच त्यांच्या हृदयावर एक शस्त्रक्रियाही झालेली आहे. त्यामुळे त्या शरीराने व मनाने अधिकच खंगलेल्या दिसतात. वयानेही आता पंचाहत्तरी गाठलेली आहे. त्या शुभ वाढदिवसाच्या निमित्ताने तर मुकुंदराव व शांताबाईंनी ही ‘भावफुले' भेट त्यांना दिलेली आहेत. या वयात माणसाला शारीरिक व मानसिक विश्रांतीची गरज असते हे तर खरेच आहे. पण मन कुठे तरी गुंतून राहणे हेही एका दृष्टीने प्रकृती सुधारण्याकरता आवश्यक असते. म्हणून मालतीबाईंनी त्यांना सहजपणे साध्य होणाऱ्या लेखनास जेव्हा आणि जमेल तेवढा वेळ द्यावा असे त्यांच्याविषयी आदरभाव बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना सहकाऱ्यांना व आमच्यासारख्या निकटवर्तीयांना वाटते.

'भावफुले'
लेखक : मालती किर्लोस्कर 
प्रकाशक : शांता किलोस्कर
मूल्य : 75 रुपये

Tags: नरहर कुरुंदकर    रंगाअण्णा वैद्य मालती किर्लोस्कर वि. रा. करंदीकर म. द. हातकणंगलेकर डॉ. सरोजिनी वैद्य शांता बुद्धिसागर Narahar Kurundkar Rangaanna Vaidya Malati Kirloskar V.R. Karandikar M.D. Hatkanangalekar Dr. Sarojini Vaidy Shanta Buddhisagar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके