डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

साहित्याच्या प्रांतात दमदार पदार्पण करणारा कवी : मुबारक शेख

कवी मुबारक शेख म्हणतात त्याप्रमाणे पोलिसाची एक विकृत प्रतिमाच आपल्या मनावर कोरली जाते. परिणामी जे रक्षक आहेत- असायला पाहिजेत, त्यांच्याविषयीच आपल्या मनात अविश्वास निर्माण होतो. खरं म्हणजे सध्याचे आपले सगळंच जीवन इतकं गढूळ झालंय की कुणाबद्दलच विश्वास उरू नये अशी आपली अवस्था आहे.

आपल्या मनात एखाद्या पेशाविषयी समज/गैरसमज कशामुळे निर्माण होतात ? एकदम एके दिवशी माणसाच्या डोक्यात उद्भवलेले हे विचार असतात असं म्हणता येत नाही. सगळेच अनुभव स्वतःलाव यायला हवेत असं नाही. इतरांचे अनुभव ऐकूनही आपली मते बनत असतातच की. आणि आपल्या स्वभावाची नकळतच अशी धारणा झालेली असते की चांगल्या गोष्टीवर आपला चटकन विश्वास बसत नाही, पण वाईट गोष्टी मात्र आपल्या मनात घट्ट रुतून बसतात. मनाची बैठक अशा रीतीनेच तयार झालेली असल्यामुळे कोणत्याही घटनेचे विश्लेषण आपण त्याच नजरेतून करीत असतो. त्यामुळेच 'पोलीस' या व्यक्तीबद्दल आपल्या मनात असलीच तर दरारायुक्त भीतीच असते. कदाचित त्याचा बाह्यवेषही त्याला थोडाबहुत कारणीभूत असावा. 

लहानपणी काही आगळीक हातून घडली की पालक पोलिसाचीच भीती घालतात. त्यामुळे बालपणापासून पोलिसाची एक घट्ट प्रतिमा आपल्या मनात तयार होत जाते. वाढत्या वयात अशा प्रकारची भीती उरायचं काही कारण नाही. परंतु नित्यशः येणाऱ्या बातम्यांमधून, दूरदर्शन, चित्रपट या साऱ्या माध्यमांतून कवी मुबारक शेख म्हणतात त्याप्रमाणे पोलिसाची एक विकृत प्रतिमाच आपल्या मनावर कोरली जाते. परिणामी जे रक्षक आहेत- असायला पाहिजेत, त्यांच्याविषयीच आपल्या मनात अविश्वास निर्माण होतो. खरं म्हणजे सध्याचे आपले सगळंच जीवन इतकं गढूळ झालंय की कुणाबद्दल च विश्वास उरू नये अशी आपली अवस्था आहे. 

त्यातही दलितांना, शोषितांना, विशेषतः स्त्रियांना ठिकठिकाणी येणारे अनुभव ते इतके विदारक आहेत की घराबाहेरच्या कुठल्याच क्षेत्रात ती निश्चितपणे वावरू शकत नाही. त्यांतही चढ-उताराची श्रेणी असतेच. कोणताही अन्याय सहन करण्याची बायका तयारी ठेवतात. परंतु पोलीसचौकीवर जाऊन गुन्हा नोंदवावा असं त्यांना वाटत नाही कारण तेथेच उरलीसुरली अब्रूही लुटली जाण्याची त्यांना दाट शक्यता वाटते. हे असंच आणि सदैव घडत जात असेल, असं समजण्याचं कारण नाही. परंतु 'पोलीस’ हाही एक माणूसच असतो. त्यालाही मन, भावना, नाती असतात, हे मुळी कुणी लक्षातच घेत नाही. त्यामुळे हा घटक समाजापासून दुरावल्यासारखाच झाला आहे,' हे उद्गार सोलापूरचे पोलीस आयुक्त श्री. महेशगौरी यांनी 'सत्यमेव जयते' या मुवारक शेख यांच्या काव्यसंग्रहाच्या उद्घाटनप्रसंगी काढले, ते पटण्यासारखेच आहेत. 

मुबारक शेख, हे दैनिक लोकमतचे उपसंपादक, हे नुकतेच साहित्याच्या प्रांतामध्ये वावरू लागले आहेत. परंतु त्यांची पहिली वहिलीच पावले इतकी दमदार आहेत की थोडयाच अवधीत त्यांनी वाङ्मयसृष्टीत एक स्वतःचं असं वेगळे स्थान सहजगत्याच संपादन केलं आहे. त्यांचा पहिला ‘नमाज आणि महाआरती' हा कथासंग्रह (त्याला त्यांनीच व्यथासंग्रह असं नाव दिलं आहे) बराच गाजला आणि ह.ना.आपटे हे सन्मानाचं पारितोषिक तर त्याला मिळालंच, पण त्यानंतरही नानाविध पुरस्कारांचे ते मानकरी झाले. याचं एक कारण मला असं वाटतं की समाजातील उपेक्षित घटकांविषयी त्यांना मनापासूनच आत्मीयता वाटते. 

त्यात ओढून ताणून आणलेली कृत्रिमता नाही. किंवा वेगळे काही करून दाखवण्याची हौसही नाही. 

ती एक त्यांची सहजप्रवृत्ती आहे. म्हणूनच पोलीस या आजवर दुर्लक्षित राहिलेल्या, समाजातील एका महत्त्वाच्या पण गैरसमजाने वेढलेल्या व्यक्तीकडे त्यांचं लक्ष सहजपणं वेधलं आणि कधी कुणाला सुचलंही नसेल असा 'पोलीस' हा त्यांचा काव्यविषय होऊ शकला. 'दक्षता' या मासिकातून प्रकाशित होणारं कथासाहित्य हे पोलीस तपासावर आधारित असतं. त्यांच्या शौर्याची आणि धाडसाची वर्णनं त्यात असतात, नाही असं नाही. पण एक ‘माणूस' म्हणून त्याच्या मनातील भावना कथेमधून क्वचितच चित्रित केल्या जातात. मग काव्यातून त्यांचे चित्रण करण्यावी कल्पना दूरच राहिली. परंतु मुबारक शेख यांनी आपल्या 'सत्यमेव जयते' या काव्यसंग्रहातून पोलिसांचीच सुखदुःखं अत्यंत संवेदनाक्षम मनानं जाणून घेऊन नेमक्या शब्दात मांडली आहेत.

"पोलीस' या त्यांच्या दुसऱ्याच कवितेमध्ये ते म्हणतात -
"मनातील गैरसमजुती पुसा, जरासे जवळ या, तुमच्यासारखीच माणसं असतात पोलीस" ते आपल्या 'चार शब्द आपुलकीचे' या प्रस्तावनेत म्हणतात, "स्वतःकडे, किंबहुना स्वतःच्या कुटुंबाकडेही दुर्लक्ष करून तो समाज नावाची एक मोठ्ठी कुटुंबसंस्था सांभाळत असतो. केवळ समाजातल्या प्रत्येक आसुरी प्रवृत्तीशी तो मुकाबला करीत नाही, तर त्यायोगे निर्माण होणाऱ्या हिंसक अशांततेशी सुद्धा तो करडा सामना करतो. म्हणूनच समाजातील जबाबदार व्यक्तींमध्ये पोलिसांची गणना करायला हवी. पण हा सन्मान त्याला कचितच लाभतो." 

मुबारक शेख मुद्दाम पोलिसांच्यात जाऊन, मिसळून त्यांच्या व्यथा जाणून घेऊन काव्यरचना करीत नाहीत. सहजगत्याच टिपलेल्या काही दृश्यातून त्यांना पोलिसांच्यातलं माणूसपण लक्षात आलेलं आहे. आणि स्वतःचं माणूसपण जपणाऱ्या वृत्तीतूनच ते काव्यपंक्तीमधून साकारही झालेलं आहे. रस्त्यावरून जाताना प्रचंड रहदारीतून वाट काढताना गाडी थांबविण्यासाठी म्हणून आपले पोलिसांच्या हाताकडे लक्ष जातं एवढंच. त्याचा अधिक विचार करण्याची आपल्याला आवश्यकता भासत नाही. पण मुबारक शेख यांनी असा एक पोलीस पाहिलेला आहे की जो शाळेतल्या मुलीला रोज चॉकलेट देतो, तिच्याशी गप्पा मारतो, प्रेमानं तिचे मुके घेतो. कारण स्वतःला अपत्य नसल्यामुळे तो तिच्यावरच वात्सल्याचा वर्षाव करतो. 

असाही एक विरळा पोलीस त्यांनी पहिला आहे की चौकीत रोज येणाऱ्या एका तरुणीची तो खुषमस्करी करतो, स्वतःच्या डब्यातलं जेवण तिला हातानं जेवू घालतो. 'कारण कुणीतरी अब्रू लुटलेल्या त्या तरुणीला त्यानं बहीण मानलंय.' म्हणूनच मुबारक शेख यांची पोलिसांच्याकडे बघण्याची दृष्टीच एकदम सर्वसाधारण माणसापेक्षा वेगळी आहे. म्हणून पोलिसांच्या वतीनं ते समाजाला अशी ग्वाही देतात की, ‘माझ्या चौकीत यावे कुणीही कधीही. इथे सत्याची, न्यायाची देतो निःशंक ग्वाही. येथे नाही कसलेच शस्त्र मने जिंकतो प्रेमाने, आम्ही जनतेचे मित्र.' उलट घरादारा शहरापासूनच अलिप्त असतात पोलीस आठवण झाली की कासावीस होतात पोलीस रात्र रात्र जागतात प्राणप्रिय देशासाठी इशारा होताच पुढे सरसावतात ‘पोलीस' अशा पोलिसांना साध्या साध्या कौटुंबिक सुखांची पूर्तता करता येत नसते. 

बायकोला वाटतं नवरा आपल्याला काहीतरी सोन्यामोत्याचे दागिने घेऊन येईल. पण पोलीस तिला भिजल्या डोळ्यांनी सांगतो, माफ कर मला, मी आणू शकलो नाही तू सांगितलेल्या मौल्यवान पाटल्या, बांगड्या..पण तिथं त्या राज्यात आतंकाने भयभीत होते तिथं मी पक्ष्यांची किलबिल पुन्हा परत आणली. या पक्ष्यांचा मधुर आवाज तुझ्या हातातल्या बांगड्याइतकाच गोड आहे, ‘माफ कर, मी आणली नाहीत पोरांसाठीही कसलीच खेळणी त्या चिमुरडयांची मला खूप काळजी वाटतं गं.. पण दऱ्याखोऱ्यांत लहान वयातच ज्यांच्या हाती रायफलीचं खेळणं येतं, नाही तरी पोलिसांना खाजगी जीवन असतंच कुठे ?    

म्हणूनच 'तर तू पोलीस होशील' या कवितेत मुबारक शेख म्हणतात, ‘आधी तुझे चुंबन घेणाऱ्या तुझ्या चिमुरडीचे, ओठ निर्दयपणानं अलग कर तुझ्या गालापासून, काढ तिचे चिमुकले हात तुझ्या गळ्यातून, आणि क्षणभरच कल्पना कर की दंगल पेटली आहे, अन तिला दारातच टाकून पळ कर्तव्यपूर्तीसाठी, तू घर-दार टाकून पळू शकलास, तर पोलीस होशील. पुढे 'पोलिसाच्या डायरी' त कवीनं असं म्हटलं आहे की महिनेन् महिने घरवं पत्रही येत नाही, तेव्हा 'मीच मला खूप वेळा पत्र लिहिलेले आहे. ज्यात मीच पत्नी झालेलो आहे आणि मीच माझा मुलगा. अशी अजब पत्रही तुम्हाला माझ्या डायरीत सापडतील. 

त्यामुळे पोलीस हे दिसतात निर्भय आणि निष्ठुरसुद्धा; परंतु आतून मात्र ते खूप वेळेला तुमच्या आमच्यापेक्षा अधिक हळवे झालेले असतात. म्हणूनच 'पोलिसांचे साहेब' इतके हळुवार झालेले दिसतात की मुबारक शेख म्हणतात, 'चौकीतल्या भिंतीच्या कोनाइयातले, छतावरचे भोक बुजवले तर साहेब रागावले. प्रेमानं म्हणाले 'अरे त्यात चिमण्यांची जोडी गुण्यागोविंदाने राहत होती रे'. खूप वारा सुटला म्हणून चौकीची मागची खिडकी बंद ठेवली. साहेबांनी ती आल्या आल्या उघडली. साहेब म्हणाले, 'रोज येणारं फुलपाखरू खिडकीतून अजून आत यायचंव रे.' तुम्हाला आम्हाला हा काल्पनिक कथाभाग वाटेल, पण असे पोलिसांचे साहेब कवींनी मात्र प्रत्यक्ष पाहिलेले आहेत. 

त्यांना असंही सुचवायचें आहे की गुन्हा करणारे सगळेच लोक राक्षस नसतात. म्हणून कवी पोलिसाला सांगतात की शक्य असेल तर गुन्हेगारांनाही‌ माणसांत आणण्याचा प्रयत्न कर. कोणत्याही प्रश्नाकडे आपण कोणत्या हृष्टीनं पाहतो यावर बरंच काही अवलंबून असतं. इथे पूर्वग्रहच आपल्या स्वच्छ दृष्टीच्या आड येत असतात. पण मुबारक शेखांच्या 'पोलिसाच्या निरीक्षणात' असं आलं की त्याच्या चीकीसमोर एक मशीद आहे आणि एक मंदिर आहे. तो दुरूनच लक्ष ठेवून असतो. परंतु त्याच्याच शब्दांत सांगायचं झालं तर 'खूप काही घडतं, पण काहीच घडत नाही. मुल्ला पहाटेची अजान देतो, पुजारी सकाळची आरती करतो. काही वेळानंतर दोघे मिळून एका हँटिलात चहा घेतात. मी पहातच असतो. तसं खूप काही घडतं, पण काहीच घडत नाही कारण हिंदू, मुस्लिम या दोघांच्या वैरभावाचीच आपण कल्पना केलेली आहे आणि कधी ना कधी त्यांच्यात दंगल उसळेल अशी आपल्याला भीती वाटते. पण तसं कधीच घडलेलं नाही असं त्या पोलिसांचं निरीक्षण आहे. 

म्हणूनच तो पुन्हा पुन्हा म्हणतो, खूप काही घडतं, पण काहीच घडत नाही.' पण पोलिसांना नेहमी शहरातल्या एखाद्या चौकीवर काम करून थोडंच भागतं ? त्यांना माथेफिरू अतिरेक्यांशीही तोंड द्यावं लागतं. अशा वेळी प्राण गमावण्याचीच तयारी ठेवावी लागते. म्हणून कवी 'पोलिसांच्या रक्तखुणा' या कवितेत म्हणतात, 'काळाच्या रूळावरून धडधडत गेला अतिरेक्यांचा काफला, कितीतरी फौजा चिणल्या गेल्या, बंदूक, स्टेनगन आणि बाँबखाली इमानी पोलिसांच्या रक्तानं लालेलाल झाली आहेत इतिहासाची पानं' पण मरतानाही 'पोलिस आहे मी देशाचा रखवालदार झालो आहे.' याचं भान त्याला शेवटपर्यंत असतं. म्हणूनच कवी पोलिसांना 'मानाचा मुजरा' करतात. 

त्यांच्या आणखी एका कवितेतील एक पोलीस मित्राला असं पत्र लिहितो की 'इथे सगळी अतिरेक्यांनी इतकी नासधूस करून टाकली आहे की ओळखीच्या कोणत्याच खुणा तुला आता इथे दिसणार नाहीत. म्हणून तू माझ्या गावी येऊ नकोस.' पण लगेच दुसऱ्याच 'सत्यमेव जयते' या कवितेत ते म्हणतात. 'मित्रा तू घाबरतोस ? असं खचून कसं चालेल ? इतरांनी देह टाकले तरी आपल्या बॅजवर लिहिलेल्या 'सत्यमेव जयते 'च्या संदेशाकडे बघ आणि मनाला धीर देत रहा. जन्मभरचंच वादळवाऱ्याचं जीवन त्यातही काहीजणांना दंगलीमध्ये प्राणाला मुकावं लागतं. 

म्हणूनच हा काव्यसंग्रह 'दंगलीत शहीद झालेल्या तमाम पोलिसांना' मुबारक शेख यांनी अर्पण केला आहे.. अशा संभाव्य शेवटाची कल्पना ठेवीतच सेवा करीत राहणाऱ्या पोलिसांनाही निरोपाच्या प्रसंगी चौकी, ठाणं, शहर सोडताना मन गलबलून येतं. कारण एकच म्हणजे पोलीसदेखील इतरांच्यासारखा एक माणूस असतो, हेच. या संग्रहातील 43 कवितांमध्ये पोलिसांचे जीवन, निरनिराळ्या प्रसंगाने उद्भवणारे त्यांच्या मनातील भावतरंग मुबारक शेख यांनी प्रत्ययकारी भाषेत वर्णिलेले आहेत. प्रत्येक कवितेवरची चित्रे विलक्षण बोलकी आहेत. त्याबद्दल हेमंत कपुरे व शिरीष घाटे यांचंही अभिनंदन करायलाच हवं. हा कवितासंग्रह वाचल्यानंतर आपल्यापाशी तो असायला हवा असंच पुष्कळांना वाटेल.

'सत्यमेव जयते' (कविता संग्रह )
लेखक : मुबारक शेख रुबाई प्रकाशन , 
उत्तर कसबा, सोलापूर
मूल्य : 50 रुपये

Tags: शिरीष घाटे हेमंत कपुरे पोलीस सोलापूर रुबाई प्रकाशन कविता संग्रह सत्यमेव जयते मुबारक शेख शांता बुद्धिसागर shirish ghate hemant kapure police solapur rubai Pablication collection of poems satymev wins mubarak shaikh Shanta Budwisagar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके