डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

'मी अगोदर शेतकरी आहे आणि मागाहून कवी आहे' असे म्हणणाऱ्या ना. धों. महानोर यांची महत्त्वाची मुलाखत या अंकात आहे. शेतकरऱ्याची उपेक्षा, नवी कृषितंत्रे, कोरडवाहू पिके, शेतमालाचे बाजारभाव, जागतिकीकरणाची स्पर्धा आणि सामान्य शेतकरी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कृत्रिम खते, फळबागायत, बियाणे, जैवतंत्रज्ञान इथपासून 'शेतकरी साहित्य संमेलना' पर्यंत अनेक मूलभूत प्रश्न विचारले आहेत.

देवळा (जि.नाशिक) येथील रामरावजी आहेर महाविद्यालयाचे 2004- 05 या वर्षाचे 'बांधिलकी' हे नियतकालिक हाती पडले. 'तुकारामांच्या गाथेनंतर', 'शेतकऱ्याच्या आसूडानंतर’ अक्षरशः 'शेतकऱ्याची गाथा' हाती आली. महाविद्यालयांची गुणवत्ता ठरविणारी नॅक ही केन्द्रीय चाचणी अस्तित्वात येण्यापूर्वी तर कित्येक महाविद्यालयांची नियतकालिके निघत नसत. परंतु आता मार्कस् ठेवलेत. परिसरातून अशी बरीच नियतकालिके घरी येतात. गुळगुळीत कागद, आतील भपकेबाज (भंपक!) फोटो, जाहिराती आणि यातून पाने उरली तर हौसेखातरचे लेख... या पार्श्वभूमीवर देवळा येथील महाविद्यालयाने महाराष्ट्राला आदर्श ठरावा असा प्रकल्प राबविला आहे. गुणच द्यावचे असतील तर 100 पैकी 101 गुण द्यावेत असा...

या अंकात शेती आणि शेतकरी या विषयाचे विश्लेषण केले आहे. शेतक-यांवर 100 पुस्तके लिहून जे साधणार नाही ते या 306 पानांच्या अंकातून साधले आहे. तज्ज्ञांना सांगतो (पुढाऱ्यांना नव्हे!) काही विदर्भाचे दौरे करू नका, मानसोपचारवाल्यांची टीम पाठवून, त्यांचा अमूल्य वेळही दवडू नका, किंवा बी. टी. कॉटनचा प्रचार करायला स्वामीनाथन साहेबांना प्रवासाची दगदग करायलाही लावू नका... फक्त ‘बांधिलकी’चा अंक वाचा. येथील विद्यार्थ्यांना भेटा, तेच सर्व काही सांगतील. हा अंक महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचवा. कळू देत विद्यापीठातील विद्वानांना, तज्ज्ञांना उच्च शिक्षणाने नेमकं काय करायला हवं आणि ते काय करताहेत.

या अंकात पहिल्या 19 पानांत कॉलेजचा त्रोटक अहवाल आहे. 18 पाने फोटोसाठी. (कृष्ण धवल) फोटोही समर्पक असेच आणि बाकी आत सर्व शेतकऱ्यांचे, शेतकऱ्यांसाठीचे आहे. सुरुवातीला ना. धों. महानोर यांची पोटतिडकीची मुलाखत आहे, याशिवाय सर्वश्री अशोक गायकवाड, खंडू येवले, दादाजी पाटील, दत्तात्रय आहेर या यशस्वी शेतकऱ्यांच्या मुलाखती आहेत. शेती, तिचे यशापयश, त्याची कारणमीमांसा, उपाययोजना यांपासून शेतकरी साहित्यापर्यंत अत्यंत अभ्यासूपणाने घेतलेल्या मुलाखती आहेत. अंकात 'शेतकऱ्याचा आसूड', 'बारोमास', 'पांगिरा', 'चारा-पाणी', 'माय-लेकरं', 'तांबड फुटी', 'नवी वारूळ', 'शेती व पाणी', 'आत्महत्या' केलेल्या शेतकऱ्याच्या अंगणातून, टाहो, पड रे पाण्या, एक होता कार्व्हर, योद्धा शेतकरी, सर्जा, सुगीतील शेतकरी कविता, गोदान (हिंदी) या पुस्तकांची विद्यार्थ्यांनी केलेली परीक्षणे आहेत. ही सर्व पुस्तके अस्सल शेतकरी साहित्याची आहेत आणि त्यांची परीक्षणे मातीत जन्मलेल्या कोवळ्या मुलांनी केलेली आहेत. शशिकांत भामरे या एस. वाय. बी. ए. च्या विद्यार्थ्याने केलेले 'बारोमास'चे परीक्षण तर मूळ पुस्तकापेक्षाही काळजाला पीळ पाडते. शशिकांत म्हणतो, 'शेतकऱ्यांच्या घरात जन्माला येणे म्हणजे सनातन काळातील अस्पृश्यांच्या घरात जन्माला येणे.

नोकरीवाले, व्यापारी आणि शेतकरी यांच्या जीवनातील तफावत त्याला कायम जाणवत असावी. 'बारोमास'मधील नेमक्या ओळीवर तो अडखळतो. "ज्या लोकांना कापूस कसा पिकतो हे माहीत नसतं, ते नरम रुईच्या दुलया वापरतात आणि जो शेतकरी कापूस पिकवितो तो गोधडीवर झोपतो…” या प्रश्नांनी तो गोंधळून जातोय आणि त्याला प्रश्न पडतोय, 'पुढे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची पोरं मोठी होतील, त्यांना समाजाविषयी, देशाविषयी काय आस्था राहील?...' अंगावर काटा उभी करणारी स्थळं तो 'बारोमास 'मध्ये शोधतोय.

'मायलेकरं' या कवितेचं परीक्षण करताना कविता देवरे ही द्वितीय वर्षात शिकणारी मुलगी कवितेतील या नेमक्या ओळी शोधते. खेड्यातला मुलगा मराठी शाळा संपवून इंग्रजी शाळेत गेल्यावर त्याला वाटतं...

'वाटे, मास्तर दिवाण
किंवा कारकून व्हावं
रानी जळत्या मायबापा 
गार छायेत आणावं...'

पुढे तो कॉलेजचे शिक्षण घ्यायला शहरात जातो. तेव्हा घरी गाडग्यात कण्याही वेळेवर नसायच्या. त्यावेळी त्याला वाटते

वाटे वकील प्राध्यापक 
किंवा अधिकारी व्हावं
जणू परदेशी सायब
होऊनिया परतावं. 

असं आजही प्रातिनिधिक ओळीवरच कविता स्थिरावते आणि शेतकऱ्यांच्या मुलांचे भावविश्व पुढे येते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहून व्याकूळ झालेला विद्यार्थी राजेंद्र आहेर 'टाहो’चे परीक्षण करताना त्यात वाहूनच गेलेला आहे. आत्महत्यांना कारणीभूत असलेल्या व्यवस्थेला तळतळाट देण्यासाठी तो इंद्रजित भालेराव यांच्या ओळी लिहितो…

'दुःख दळून खाणाराला 
आत्महत्येच्या कड्यावर 
आणून पोचवणारांनो, 
देवाचं जातं दमानं फिरतं 
पण फार बारीक दळतं 
असं कबीर सांगून गेलाय...'

किंवा

असे कोणते ढग
सरकत आहेत रानावरून 
की सावलीतही करपत आहे रान 
अशा कोणत्या बरसाती 
बरसत आहेत रानावर

की मुळापासून कुजतं आहे रान! या ओळींवरून या विद्याच्य्यांच्या समजेपर्यंत पोहोचणेही अवघड होऊन जाते आणि असेच प्रत्येक पुस्तकाच्या परीक्षणाचे.

'मी अगोदर शेतकरी आहे आणि मागाहून कवी आहे' असे म्हणणाऱ्या ना. धों. महानोर यांची महत्त्वाची मुलाखत या अंकात आहे. शेतकरऱ्याची उपेक्षा, नवी कृषितंत्रे, कोरडवाहू पिके, शेतमालाचे बाजारभाव, जागतिकीकरणाची स्पर्धा आणि सामान्य शेतकरी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कृत्रिम खते, फळबागायत, बियाणे, जैवतंत्रज्ञान इथपासून 'शेतकरी साहित्य संमेलना' पर्यंत अनेक मूलभूत प्रश्न विचारले आहेत. त्यांची महानोरांनी मूलगामी, तपशीलात जाऊन चर्चा केली आहे. विशेषतः 'शेतकरी साहित्याबाबतची चर्चा मार्गदर्शक आहे. याच धर्तीवर या महाविद्यालय परिसरातील यशस्वी, प्रयोगशील, शेतकऱ्यांच्या मुलाखती वाचकास बरेच काही देऊन जातात.

अंकात याच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शंभर स्वतंत्र लेख आहेत. अंगावर रोमांच उभे करणारे, अस्सल मातीतील ते लेख आहेत, डोक्यावर घेऊन नाचावेत असे. लेखांचे विषयही विनीचे. 'कोरडवाहू शेतकरी', 'शेतीतील कष्ट', 'शेतकऱ्याची सुख दुःखे', 'आदिवासी शेतकरी', 'शेतकरी आणि सावकारी', 'शेतकऱ्याचे सामाजिक स्थान', 'शेतकरी गरीब का?' 'मी शेतकरी बोलू हायन" 'माझी शेतकरी आई', 'शेतकरीसन्या शिकेल पोरी', 'शेतकरी आत्महत्या का करतात', 'आमन्या बाया', 'आम्हनी शेती', 'शेतमजुराची मुलाखत.. आदी विषयांवर लेख आहेत. प्रत्येक लेखाला मातीचा खास वास आहे. शेतकरी वेदनेचा हुंकार आहे, प्रगटलेला मूक आकांत आहे. लेखक होण्याचा' पहिलाच अनुभव देण्यासाठी या महाविद्यालयाने बरेच काही केल्याचा तो पुरावा आहे. याचबरोबर वनौषधी, शेतीपासून, पाट-पाणी, शेती आणि जागतिकीकरण, इस्रायलची शेती इथपासून तर आजच्या भारनियमनापर्यंत लेख आहेत. चर्चा आहे. त्याची पूर्ण यादी देणे येथे शक्य होणार नाही.

अंकाच्या मुखपृष्ठावर बा. ह. टोके या चित्रकाराचे ओसाड शेतकऱ्याचे चित्र आहे, तर मलपृष्ठावर Village on Sale : Lock, Stock, Tractor ही Neelam Raaj/TNN ही इंग्रजीतील बातमी आहे. पंजाबमधील मन्सा जिल्ह्यातील मलसिंगवाला गाव विकणे आहे' अशी ती बातमी आहे. बातमी लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही.

पी.साईनाथ म्हणतात, 'महाराष्ट्रात 100 सदानंद देशमुख असतील तर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्यास त्यांची नक्कीच मदत होऊ शकेल. देवळा महाविद्यालयात त्यांची बीजं पेरली आहेत. नीट निगराण केली तर ते शक्य आहे. देवळा महाविद्यालयाच्या ‘बांधिलकी’ परिवाराला म्हणूनच सलाम.

Tags: बारोमास सदानंद देशमुख देवळा महाविद्यालय बांधिलकी मासिक Agriculture Literature Farmer Suicide Farmer Deola College Reading weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके