डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

क्रिकेटच्या निर्णयप्रक्रियेत तंत्रज्ञानाची मदत हवी

क्रिकेटच्या खेळात रोबोसारखा यांत्रिकपणा परवडण्यासारखा नाही, त्यातील मानवी अंग (ह्युमन एलिमेंट) नष्ट करून चालणार नाही, ते टिकायलाच हवे. क्रिकेटधुरिणांनी ही बाब लक्षात ठेवायला हवी, पण अधिकाधिक बिनचूक निर्णयांसाठी आधुनिक यंत्रसामुग्रीचा उपयोग अटळ आहे. वारंवार होणाऱ्या पंचांच्या चुकांमुळे रंगाचा बेरंग होऊ शकतो, याची प्रचिती सिडनी कसोटीत आली.

क्रिकेट हा जंटलमन्सचा गेम समजलाजात असे, पण आता तो तसा राहिलेला नाही. या खेळात प्रचंड पैसा आला, मॅचफिक्सिंगचे ग्रहण त्याला लागलं आणि हा खेळ बदनाम झाला. त्रयस्थ पंच, सामनाधिकारी यांच्या जमान्यात, प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात, चुकीच्या निर्णयांमुळे वाद वाढत चालले असून कटुता, वितुष्ट येण्याचे प्रसंग वारंवार घडत आहेत.खेळाच्या निकोप वाढीसाठी ही बाब हानीकारक आहे.

भारतीय संघ ऑस्ट्रेलियात असून गावस्कर-बॉर्डर करंडकासाठी दोन्ही संघात निकराची झुंज अपेक्षित होती.पण मेलबर्नच्या सलामीच्या कसोटीत भारतीय संघाने चौथ्या दिवशीच पांढरे निशाण दाखवले. नूतन वर्षात सिडनीत दुसऱ्या कसोटीला सुरुवात झाली.सिडनीच्या खेळपट्टीचा भारताला धार्जिणी असा लौकिक आहे. 1947-48च्या दौऱ्यात इथेच डॉन ब्रॅडमनसारख्या महान फलंदाजाचा विजय हजारेंनी अवघ्या 13 धावांवर त्रिफळा उडवला, तसेच भारताने कांगारूंवर पहिल्या डावात आघाडी घेतली ही आठवण आजही ताजी वाटते. अनिल कुंबळेच्या भारतीय संघाकडून क्रिकेट चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या, पण मेलबर्नच्या अपयशी सलामीनंतर सिडनीतही पराभवाची आफत भारतावर ओढवली आणि बरोबरी ऐवजी 0-2ची पिछाडी भारताच्या नशिबी आली.

सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, राहुल द्रविड, सौरभ गांगुली, लक्ष्मण हे अव्वल पाच खेळाडू संघात असूनदेखील, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात मालिका जिंकण्याची किमया भारताला जमणार नाही हे आता निश्चित आहे. पण ऑस्ट्रेलियाच्या यशाला काळी किनार लाभली आहे, ती पंचांच्या चुकीच्या निर्णयांची तसेच सामनाधिकाऱ्यांच्या पक्षपाती वर्तणुकीची.कसोटी क्रिकेट मधील चढउतार सिडनीत बघायला मिळाले. झहीरच्या गैरहजेरीत नवा चेंडू हाताळण्याच्या रुद्रप्रतापमुळे कांगारूंची अवस्था 6 बाद 132 अशी झाली; पण सायमंडस्, हॉगच्या शतकी भागीमुळे त्यांनी चारशेचा टप्पा ओलांडला. स्टीव बकनर, मार्क बेन्सन यांनी मेहेरनजर केल्यामुळे सायमंड्सने शतक झळकावले. 30 धावांवर तो झेलबाद असतानाही पंचांग त्याला नाबाद ठरवले. झेल टिपला आहे, हे ठाऊक असूनही सायमंड्सने क्रीझ सोडले नाही. ‘खडूस ऑस्ट्रेलियन्स’चा वॉकर म्हणून लौकिक नव्हताच. बिल लॉरी हा यात माहिर, तो तर सबसे बडा ‘नॉनवॉकर’. बिल लॉरीची परंपरा बॉब सिंप्सनने कायम राखली.

भारताविरुद्ध 1977-78च्या कसोटी मालिकेत त्याने ही सवय कसोशीने पाळत धावांच्या राशी उभारल्या.ऑस्ट्रेलियाची ही समृद्ध परंपरा सुरू ठेवलीय ती पंटर पँटिंग आणि त्याच्या सहकाऱ्यांनी. सायमंड्सच्या शतकाचा फटका भारताला बसला, पण नाउमेद नहोता भारताने कांगारूंना तोडीस तोड जबाब देत 532 धावा केल्या. सचिन तेंडुलकर, लक्ष्मण यांनी शतकं फटकावली तर गांगुली, द्रविड, हरभजन यांनी अर्धशतके झळकावली. दुसऱ्या डावात हेडन, हसीच्या शतकांमुळे ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी 333 धावांचे आव्हान दिले. शिवाय हरभजनने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पाँटिंगला बाद केल्यावर ज्या कोलांटउड्या मारल्या, त्याने पाँटिंग मनोमन वैतागला. आठव्यांदा त्याला हरभजनने पॅव्हेलियनची वाट दाखवली

चौथ्या डावात त्रिशतकी मजल मारणं सोपं नसलं तरी कठीण निश्चितच नव्हतं. राहुल द्रविड, सौरभ गांगुली यांना वादग्रस्तरित्या बाद देण्याची आगळीक पंच मार्क बेन्सन, स्टीव बकनर यांनी केल्यावर गहजब झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (आयसीसी) खेळात पारदर्शकता आणण्यासाठी त्रयस्थ पंच, तिसरे पंच (टेलिव्हिजन पंच) त्याच्या मदतीला चौथा पंच आणि सामनाधिकारी (मॅच रेफ्री) असा लवाजमा नेमला. शिवाय आधुनिक तंत्रज्ञानाची मदतही त्यांच्या दिमतीला असतेच, पण खेळातील रंगत वाढण्याऐवजी कमी होत चाललीय. ही कटुता टाळण्यासाठी खेळात अधिकाधिक विकसित तंत्रज्ञानाची मदत घ्यायला हवी असे वाटते.

आयसीसीच्या एलिट पॅनलमध्ये दहाचपंच आहेत तर इंटरनॅशनल पॅनलमध्ये आहेत तीस पंच. पंचांच्या दृष्टीने विचार करता सततच्या सामन्यांमुळे प्रवासाची दगदग, निरनिराळ्या देशातील वेगवेगळ्या वेळा (टाईम झोन) तसेच हवामान या बाबीही लक्षात घ्यायला हव्यात. याचा परिणाम त्यांच्या निर्णयक्षमतेवर होणं अटळ आहे.एलिट पॅनलमध्ये भारताचा एकही पंच नाही ही खेदाची बाब. आपल्या पंचांचा दर्जा चांगला नसल्याची ओरड होते.वेंकटराघवनसारखा खमका पंच आपल्याकडे होता. दर्जेदार ऑफस्पिनर, उत्तम क्षेत्ररक्षक तसेच कर्णधारपद भूषवल्यामुळे त्याचा दरारा होता, पण वेंकटच्या निवृत्तीनंतर मात्र एलिट पॅनलमध्ये भारतीय पंच नाहीत. सुरेश शास्त्री, अमित साहेबा हे दोघेजण आंतरराष्ट्रीय पॅनलमध्ये आहेत.

स्टीव बकनर जमैकाचे, क्रिकेट पंचगिरीआधी फुटबॉलच्या वर्ल्डकप प्राथमिक फेरीच्या लढतीत त्यांनी रेफ्रीची भूमिका बजावली आहे.फुटबॉल रेफ्रीसाठी वयोमर्यादा 45 असल्यामुळे त्यांनी आपला मोर्चा वळवला क्रिकेटकडे. आयसीसी पंचांचे निवृत्तीचे वय आहे 65 वर्षे. बकनर सध्या आहेत 61 वर्षांचे.वयोमानानुसार त्यांच्या दृष्टी आणि श्रवणशक्तीवर परिणाम होणं स्वाभाविक आहे. शंभरहून अधिक कसोटी तसेच दोनशेच्या आसपास वनडेतही (पाच वर्ल्डकप फायनल्सचा अनुभव त्यांच्या गाठीशी जमा आहे) त्यांनी पंचगिरी केली आहे; पण अलीकडे अन् खासकरून भारताच्या सामन्यात त्यांची पंचगिरी सुमारच ठरतेय. टेलिव्हिजनवरील प्रक्षेपणामुळे तर त्यांच्या चुका ठळकपणे नजरेत भरतात. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या खेळाडूंना शिक्षा होते.

पाकिस्तानविरुद्ध जयपूर वनडेत पंचांच्या निर्णयावर नाराजी दर्शवणाऱ्या युवराजला दंड करण्यात आला. पंचांना मात्र चुकीचे निर्णय दिले तरी शिक्षेची तरतूद नसल्यामुळे पंचांना खेळाडू.मीडिया तसेच प्रेक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागते.

एलिट पॅनलमध्ये एखाद्या पंचाचा समावेश करावा की नाही, हे कर्णधारांच्या अहवालावर अवलंबून असते. प्रत्येक सामन्यानंतर कर्णधार आयसीसीला अहवाल सादर करतात, त्यात पंचांबाबत टीकाटिपणी असते. पंचांच्या एखाददुसऱ्या निर्णयाकडे दुर्लक्ष केले तरी त्यांच्याकडून सातत्याने चुका झाल्या तर तिकडे दुर्लक्ष करता येत नाही.

क्रिकेटच्या खेळात रोबोसारखा यांत्रिकपणा परवडण्यासारखा नाही, त्यातील मानवी अंग (ह्युमन एलिमेंट) नष्ट करून चालणार नाही, ते टिकायलाच हवे. क्रिकेटधुरिणांनी ही बाब लक्षात ठेवायला हवी, पण अधिकाधिक बिनचूक निर्णयांसाठी आधुनिक यंत्रसामुग्रीचा उपयोग अटळ आहे. वारंवार होणाऱ्या पंचांच्या चुकांमुळे रंगाचा बेरंग होऊ शकतो, याची प्रचिती सिडनी कसोटीत आली.याच कसोटीत तिसरे पंच ब्रूस ऑक्सनफर्ड यांनी महेंद्रसिंग धोनीने केलेले यष्टीचितचे अपील नाकारले, अन् सायमंड्सला जीवदान लाभल्यावर खेळाचे पारडेच फिरले. खेळाडूंप्रमाणे पंचांवरही प्रचंड दडपण असते तेव्हा तंत्रज्ञानाची मदत घेण्यात काहीच वावगं नाही. टेलिव्हिजन चॅनलमध्ये सामन्याच्या प्रक्षेपणासाठी प्रचंड स्पर्धा असते, त्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होते. प्रेक्षकांनाचांगले दर्जेदार प्रक्षेपण दाखवण्यासाठी ते जीवाचा आटापिटा करत असतात.

तिसऱ्या पंचांच्या भूमिकेचे पुनर्विलोकन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. सायमंड्स यष्टिचीत असल्याचा निर्णय तसेच राहुल द्रविडच्या झेलाबाबतचा निर्णय वादग्रस्त ठरले. अशा प्रसंगी दुसऱ्या पंचांना मैदानातील पंचांशी वॉकीटॉकीवरून संपर्क साधून निर्णय फिरवण्याची मुभा द्यायला हवी. चार पंच आणि सामनाधिकारी अशी पाच मंडळी खेळावर नियंत्रण राखण्याचे काम करतात. टेनिसप्रमाणे क्रिकेटमध्ये रेफरलची पद्धत राबवण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. या वर्षअखेरीस पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत प्रायोगिकरित्या आयसीसी याची अंमलबजावणी करणार असून त्याची गरज आहे.

हरभजनने सायमंड्सला केलेल्या वर्णद्वेषी शेरेबाजीच्या आरोपाची व त्याला बजावण्यात आलेल्या तीन कसोटी सामन्यांची बंदीची शिक्षा माईक प्रॉक्टर यांनी ठोठावल्यावर क्रिकेटजगतात तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने याबाबत कडक धोरण अवलंबिले आहे. बंदी न उठवल्यास भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा दौरा अर्धवट सोडून देईल, याचा पुनरुच्चार भारतीय क्रिकेट मंडळाने केला आहे. आयसीसीच्या आचारसंहितेनुसार दौरा अर्धवट सोडल्यास भारताला जबर दंड भरावा लागेल.

Tags: क्रीडा क्रिकेट हरभजन द्रविड गांगुली लक्ष्मण सौरभ गांगुली राहुल द्रविड अनिल कुंबळे सचिन तेंडुलकर weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके