डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

मुलं नाटक करत नाहीत; परंतु ते जे काही करतात, ते नाटक असतं. बालनाट्य म्हणजे त्यांच्या नाट्याचा आविष्कार आहे. ज्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो. म्हणूनच ‘मुलांना नाट्यगृहात न्या...’ असे म्हणत यासाठीच ही संस्था आज जगभरात कार्यरत आहे, तिच्या पावलावर पाऊल टाकत आपण आपल्या पाल्याला नाट्यगृहात न्यायला हवं. कारण मुलांना अभिनयातून शिक्षण देणे ही काळाची गरज ठरलेली आहे.

Take a child to the theatre असं म्हणत २० मार्च २००१ पासून बालरंगभूमी दिन जगभरात साजरा होऊ लागला. याचं सगळं श्रेय ‘इंटरनॅशनल असोसिएशन ऑव्ह थिएटर फॉर यंग ऑडिअन्सेस’ या संस्थेला जातं. गेली १२ वर्षे ही संस्था याचा पाठपुरावा तत्परतेने करताना दिसत आहे. आपण जिला बालरंगभूमी म्हणतो, तीच ‘थिएटर फॉर यंग ऑडियन्स’ (टी.वाय.ए.) या अर्थाने कार्यरत आहे. टी.वाय.ए.मध्ये ज्येष्ठ कलाकार आपल्या अभिनयाने छोट्यांच्या दुनियेची सफर घडवून आणतात. ते त्यांची दुनिया त्यांच्याच नजरेतून साकार करतात. मुलांच्या आजूबाजूच्या वातावरणातून निर्माण झालेल्या समस्या, घटना, अडचणी यांवर ते नाटक बसवतात. पण यातून ते त्यांना कुठलाही उपदेश करत नाहीत की कुठला संदेश देत नाहीत.

ते आपल्याला विचार करायला भाग पडतात. ते मुलांना हसवतात, पण हे हसवणं म्हणजे त्याचं समजणं असतं. ही संस्था आजतागायत या संकल्पनेचा प्रसार जगभरातून करत आहे. कारण याच मुलांच्या हातात आपलं भविष्य आहे, याची जाणीव आता कुठे रुजू लागली आहे. म्हणून त्यांना रंगभूमीच्या माध्यमातून जगभरातील गोष्टी ‘आहेत तशाच सांगणे’ गरजेचे आहे. त्यांच्या प्रश्नांची उकल त्यांनाच करता यायला हवी, ज्यामुळे ते स्वत: त्याच्यापर्यंत पोहोचू शकतील. आपण फक्त निमित्तमात्र असतो. बालरंगभूमीच्या माध्यमातून सर्वांगीण विकास व्हावा म्हणून आपल्याकडेही असे प्रयत्न सुरू आहेत. पुण्यात १९८० च्या दशकात ‘ग्रिप्स थिएटर’ चळवळ सुरू झाली. त्यासाठी मोहन आगाशे यांनी पुढाकार घेतला होता.

या संस्थेशी सुलभा देशपांडे, मीना नाईक, विभा देशपांडे, श्रीरंग गोडबोले हेही जोडले गेलेले असून तेही या चळवळीत सक्रिय आहेत. मुलांना दृक्‌ आणि श्राव्य माध्यमाचं आकर्षण जन्मापासूनच असतं. आवाजाच्या दिशेने आणि हलणाऱ्या चित्रांकडे आपली नजर वळवत त्याच्याकडे ते सतत पाहत राहतात. बोलता येत नसलं तरी ते आपल्या नजरेतून आणि हावभावांतून आपली प्रतिक्रिया देत असत. खेळातून शिक्षणाचे धडे दिले जावेत यासाठी सतत धडपडणारा पिटर स्लेड याचे विचार या संदर्भात महत्त्वाचे वाटतात.

तो म्हणतो- मूल जन्माला आल्यापासून अभिनयाला सुरुवात करते. त्याला हवी असलेली प्रत्येक गोष्ट मिळविण्यासाठी ते धडपडत असते. इतरांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी ते हावभाव करते आणि रडतेही. हा  त्याच्या अभिनयाचा भाग आहे. या दोन गोष्टींचा आपण विचार केला तर आपल्या लक्षात सहज येईल की, आज बालरंगभूमीची गरज मोठ्या प्रमाणात आहे. शालेय पातळीवर याची खऱ्या अर्थाने गरज आहे आणि अशी रंगभूमी उभारताही येऊ शकते. कारण मुलं जेव्हा नाटक स्वत: करत असतात, तेव्हा त्यांच्या नाटकात नेपथ्य कधीच नसतं. भातुकलीच्या त्यांच्या खेळात आपल्याला या नेपथ्याची कल्पना येऊ शकते.

विजय तेंडुलकर यांच्या ‘इथे बाळे मिळतात’ या नाटकात याचा प्रत्यय आपल्याला सहज येतो. जिन्याखाली बाळू व नीलू अनुक्रमे डॉक्टर आणि नर्स बनून हॉस्पिटल उघडतात. डॉक्टरच्या वेशात वावरणारी बाळू रोग्याची तपासणी करणाऱ्या किंवा चुकीचे का होईना पण इंग्रजी बोलत नर्सच्या सोंगेतल्या नलूला सूचना देतो. या साऱ्यांमधून प्रौढांचे अनुकरण करण्याच्या मुलांच्या प्रवृत्तीचेच सूचन होते. या हॉस्पिटलमध्ये बाळंत न होताच बाळे मिळण्याची देवाने सोय केलेली- या त्यांच्या मेकबिलीव्हच्या जगाला तडा जातो, तो आंबेवाला व कल्हईवाला यांचे आगमन झाल्यावर. कारण आंबे-पैसे यांच्या आमिषाने व धाकट्या भावाबद्दल वाटणाऱ्या असूयेने नलू आपले धाकटे भावंड देऊन टाकते.

या नाटिकेत संवादांना प्राधान्य दिले आहे. तसेच आपल्या बालनाट्यात रंजकता येण्यासाठी केवळ विनोदावर तेंडुलकरांनी भर दिलेला नाही. अर्थात त्यांनी संपूर्णपणे विनोद वगळला आहे, असेही नाही. तसेच मुलं चंचल स्वभावाची असतात. शाळेतसुद्धा ती एका जागी बांधून ठेवणं शक्य नसतं. त्यामुळे ती स्थितप्रज्ञासारखी पुस्तकं कशी वाचतील? प्रत्येक वेळी   अभ्यासाचं ओझं त्यांच्या मनाला आणि व्यक्तित्वाला अडथळा निर्माण करू शकतं. इतिहास, भूगोलासारखे विषयही त्यांना अशा प्रयोगातून शिकवता येऊ शकतात. मुळात त्यांनाच ते विषय मांडायला लावायचे; जेणेकरून मुलं आपल्या कल्पनाशक्तीने त्याची मांडणी करू शकतील. आजूबाजूचा परिसर, गाव, इतिहासातील व्यक्तिरेखा असे विषयही त्यांना देऊन त्याच्यातील भूगोल आणि इतिहासाची माहिती त्यांना किती आहे, हे आपल्याला कळू शकते.

पिटर स्लेड म्हणतो, ‘बालनाट्य म्हणजे मुलाच्या नाट्याचा आविष्कार केला, कृती केली की मुले आनंदतात. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो आणि ती सुजाण, समजूतदार बनतात. प्रौढ माणसांना त्यांच्या खेळाचे निरीक्षण करून त्यांच्यामधील जिवंतपणा, चैतन्य अजमावता येते.’ उदा. विदर्भातील प्रकाश कामतीकर यांचे ‘रंगसप्तक’ हे बालनाटक. या बालनाटिकेत रंगांची उधळण तर आहेच, पण रंगांचा दुस्वास आणि त्यांचे एकमेकांशी असलेले भांडण यांना छेद देत ही नाटिका आकार घेते. कामतीकरांनी पांढऱ्या रंगांच्या पृथक्करणातून सात रंग तयार होतात; तसेच जांभळा, हिरवा आणि केशरी हे स्वतंत्र रंग नसून दोन रंगांतून तयार झालेली ती मिश्रणे आहेत, हे नाट्यलयीचा सुरेल संगम साधत रंजकपणे दाखून दिले आहे.

या बालनाटिकेतून मुलांना रंगांची ओळख तर होतेच, पण त्यांचे वेगळेपणही कळते. तसेच गेली अनेक वर्षे रंगभूमीवर गाजत असलेले ‘दुर्गा झाली गौरी’ हे माधव साखरदांडे यांचे बालनाटक. यातही रंगांची उधळण आहे. महत्त्वाचे म्हणजे यातून मुलांच्या कल्पनेची आणि स्वप्नांच्या दुनियेतील त्यांची सफरही होताना दिसते. मनोरंजन तर ते करतातच, पण मुलांना एकजागी ठेवून थिरकायलाही लावतात. मीना नाईक यांचेच ‘वाटेवरल्या काचा गं!’ हे आजच्या काळाला सुसंगत असे बालनाटक लैंगिक शिक्षण देतेच; पण मुलीला आपल्या आजूबाजूच्या परिचयाच्याच लोकांकडून कसा लैंगिक छळ होऊ शकतो, हेही यातून अधोरेखित केले जाते. अशा प्रकारची बालनाट्ये पाहून प्रौढांचा मुलाविषयीचा दृष्टिकोन बदलेल व मुलांविषयीची योग्य समज दृढ होईल.

मुलं नाटक करत नाहीत; परंतु ते जे काही करतात, ते नाटक असतं. बालनाट्य म्हणजे त्यांच्या नाट्याचा आविष्कार आहे. ज्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो. म्हणूनच ‘मुलांना नाट्यगृहात न्या...’ असे म्हणत यासाठीच ही संस्था आज जगभरात कार्यरत आहे, तिच्या पावलावर पाऊल टाकत आपण आपल्या पाल्याला नाट्यगृहात न्यायला हवं. कारण मुलांना अभिनयातून शिक्षण देणे ही काळाची गरज ठरलेली आहे.

वाढत चाललेल्या प्रसारमाध्यमांच्या विळख्यात मुले गुरफटली जाऊ लागली आहेत. त्यांना वेळीच आवर घालणे आवश्यक आहे. त्यांच्या कल्पनांना पंख फुटलेले आहेत, पण या विळख्यात ती अडकू नयेत आणि त्यांना आपल्या इच्छांचे पंखही आपण लावता कामा नयेत, कारण या पंखांचाही भार त्यांना सोसवणार नाही. जाता-जाता वर्डस्वर्थने म्हटलेल्या एका उक्तीची आठवण करून द्यावीशी वाटते. तो म्हणतो- Child is the

father of the man. म्हणून आज आपण आपल्या पाल्याला हात दिला तर तो नक्कीच आपली ओळख प्रस्थपित करेल...!

Tags: श्रीरंग गोडबोले विभा देशपांडे मीना नाईक सुलभा देशपांडे शारदा गांगुर्डे बालरंगभूमी दिन साजरा करा निमित्त shrirang godbole. vibha deshpande meena naik sulbha deshpande sharada gangurde Balrangabhoomi nimitta weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके