डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

'साधना प्रकाशन' : ध्येयवादी वृत्तीने केलेली अर्धशतकाची वाटचाल

महाराष्ट्र फाऊंडेशन ही अमेरिकेतील महाराष्ट्रीयन व्यक्तींची मान्यवर संस्था. श्री. सुनील देशमुख यांच्या उदार देणगीतून मराठी साहित्य प्रकाशन क्षेत्रातील विशेष कामगिरीसाठी भरीव पुरस्कार त्यांनी गेले काही बर्षे चालू केले आहेत. प्रकाशन संस्थेला देण्यात येणारा मानाचा एक लाखाचा पुरस्कार या वर्षी साधना प्रकाशनाला लाभला. साधना प्रकाशनाचेही हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. त्यावेळी हे घडावे हे विशेष अर्थपूर्ण. पुरस्कार वितरण 29 डिसेंबर 1998 रोजी औरंगाबाद येथे झाले. त्यानिमित्ताने साधना प्रकाशनाच्या वाटचालीचा हा धावता आढावा.

15 ऑगस्ट 1948 ला ‘साधना’ साप्ताहिकाचा पहिला अंक प्रसिद्ध झाला आणि साने गुरुजी त्यांचे तरुण सहकारी श्रीरंग वरेरकर यांना म्हणाले, “आता आपला प्रेस आहे, साधना साप्ताहिकानंतर साधना प्रकाशन सुरू केले पाहिजे". वरेरकर लागलीच कामाची जुळणी करू लागले आणि गांधीजयंतीस 2 ऑक्टोबर 1948 ला ‘बापूजींच्या गोड गोष्टी,  भाग 1 ला'  हे पुस्तक प्रसिद्ध झाले क्राऊन साईजच्या 36 पानांच्या या पुस्तकाची किंमत होती सहा आणे ( म्हणजे आजचे 40 पैसे ). साने गुरुजींनी मुलांसाठी गांधीजींच्या जीवनाची ओळख करुन देणारे असे सहा भाग लिहिले आणि प्रकाशित केले. ‘धडपडणारी मुले', 'श्यामची पत्रे', ‘साक्षरतेच्या कथा'... साने गुरुजी सहजसुंदर लेखन करीत होते आणि साधना प्रकाशन आकाराला येत होते. साधना साप्ताहिकातून साने गुरुजींनी लिहिलेली ‘सुंदर पत्रे’ त्यांना पुस्तकरूपाने तीन भागांत प्रसिद्ध करावयाची होती. परंतु 11 जून 1950 ला त्यांनी आपली जीवनज्योतच मालवून टाकली.

गुरुजींच्या निधनाचा मोठा फटका त्यांच्या सहकाऱ्यांना बसला पण ते थांबले नाहीत. त्या वर्षीच्या दिवाळीतच ‘सुंदर पत्रे' ( भाग पहिला ) प्रसिद्ध झाला. साने गुरुजींच्यावर लिहिणारे थोर लेखक साधना प्रकाशनाला लाभले. आचार्य अत्रे यांचे ‘मूत्युचे चुंबन घेणारा महाकवी’ आणि पु.ल.देशपांडे यांचे 'मातृधर्मी साने गुरुजी’ या दोन प्रतिभावान लेखकांच्या मौलिक पुस्तिका. वसंत बापटांच्या प्रतिभेला स्वातंत्रलढ्यात पहिला बहर आला आणि 1952 साली साधना प्रकाशनाने त्यांचा 'बिजली' हा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध केला. तेव्हापासून आजपर्यंत कवी वसंत बापटांनी बालमनाला भुरळ घालणाऱ्या ज्या कविता लिहिल्या त्यांचा समावेश असलेला ‘फुलराणीच्या कविता’ आणि 'गरगर गिरकी' सारख्या कवितांच्या पाच पुस्तकांचा संच साधना प्रकाशनाने बालवाचकांना दिला.

बालवाङ्ममय हा साधना प्रकाशनाचा एक आकर्षक पैलू. मा. रा. भागवत , यदुनाथ थत्ते, लीलाधर हेगडे, दत्ता ताम्हणे, कमलिनी काटदरे आदींनी ही बालसाहित्याचे दालन समृद्ध केले. लीलाधर हेगडे यांची ‘पाचूचे बेट', 'हणमू' आदी सहा पुस्तके, राजाभाऊ मंगळवेढेकर यांनी रेखाटलेली 'मुक्या' ही व्यक्तिरेखा, नानासाहेब गोरे यांनी मुला-मुलींसाठी लिहिलेले 'बेडूकवाडी' हे नाटक ही सारी पुस्तके बालवाचकांना फार आवडली यदुनाथ थत्ते यांथे 'दक्षिण ध्रुव प्रदेशाचा शोध' आणि भा. रा. भागवत यांचे 'दुष्ट भाला देशभक्त झाला'- या पुस्तकांतील साहसी जीवनाच्या वेधक चित्रणाला कुमारवयातील वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. यदुनाथ थत्ते यांनी ओके या प्रतिभावान चित्रकाराकडून थोर शास्त्रज्ञांची चित्रे काढून घेतली आणि शास्त्रज्ञांच्या चित्रांचा हा संच साधना प्रकाशनाने प्रसिद्ध केला.

महाराष्ट्रातील विज्ञानाच्या अध्यापकांनी या शैक्षणिक प्रकाशनाचे हार्दिक स्वागत केले. 1950 ते 1965 या पंधरा वर्षांमध्ये मराठीतील कथा लेखनाला बहर आला होता. या वेळी साधना प्रकाशनाने अनेक सुंदर कथासंग्रह प्रसिद्ध केले. दि.वा. मोकाशी यांचा’ आमोद सुनासि आले’, शंकर पाटील यांचा ‘भेटीगाठी’, कविवर्य बा. भ. बोरकर यांचा 'प्रियदर्शनी’, हमीद दलवाई यांचा 'लाट' आणि प्रल्हाद बडेर यांचा ‘चढण' हे कथासंग्रह वाचकांना अतिशय आवडले, दलित साहित्यातील विद्रोहाचा आवाज जोराने उमटण्यापूर्वी दलीतांच्या, उपेक्षतांच्या जीवनाचे वास्तव आणि प्रभावी चित्रण शंकरराव खरात यांनी केले. 

'तडीपार' आणि 'टिटवीचा फेरा' हे खरातांचे दोन कथासंग्रह साधना प्रकाशनाने प्रसिद्ध केले आणि त्यांच्यावर चर्चासत्रेही झाली साहित्यातील या नव्या प्रवाहाचे प्रातिनिधिक असे हे दोन कथासंग्रह खूपच गाजले. मधु मंगेश कर्णिक आणि आनंद यादव यांच्या विपुल लेखनापैकी सुरुवातीची पुस्तके साधना प्रकाशनानेच प्रसिद्ध केली आणि त्यांच्या लेखनाकडे समीक्षकांचे लक्ष एकदम वेधले गेले, मधु मंगेश कर्णिकांचा ‘पारघ' हा कथासंग्रह, 'नाती-गोती हा व्यक्तिचित्रांचा संग्रह आणि आनंद यादवांचे 'मातीखालची माती' ही पुस्तके वैशिष्ट्यपूर्ण ठरली. मधु कुलकर्णी यांनी मोजकेच पण अत्यंत कसदार कथालेखन केले आहे आणि चोखंदळ समीक्षकांनीही त्यांच्या कथालेखनाची प्रशंसा केली आहे.

मधु कुलकर्णी यांचा 'वळण’ हा पहिला कथासंग्रह साधना प्रकाशनाने प्रसिद्ध केला आणि शेवटचा कथासंग्रही साधना प्रकाशनानेच प्रकाशित केला. त्यांचे भरघोस मराठवाड्यातील सेखकाने सुंदर विनोदी कथा लिहिल्या आहेत. त्यांचा 'वहाटूळ' हा विनोदी कथा संग्रह साधना प्रकाशनानेच प्रसिद्ध केला. कथेप्रमाणेच मराठी कादंबरीतील नव्या प्रवाहांचे दर्शन घडविणाऱ्या दोन कादंबऱ्या साधना प्रकाशनाने प्रसिद्ध केल्या. मनोहर शहाणे यांचे धाकटे ‘आकाश' आणि भाऊ पाध्ये यांची ‘वैतागवाडी’ या दोनही कादंबऱ्या फार गाजल्या. वामन इंगळे यांचे 'मायबाप, मुमताज रहिमतपुरे यांचे 'प्राजक्त' आणि डॉ. वसंत अवसरे यांनी लिहिलेले ‘भिक्षूंच्या प्रदेशातून’ हे प्रवासवर्णन या ललित पुस्तकांना रसिक वाचक आणि चोखंदळ समीक्षक यांनी मनापासून दाद दिली.

अण्णासाहेब सहस्रबुद्धे यांचे 'माझी घडण' आणि मेहरुन्निसा दलवाई यांचे 'मी भरून पावले आहे' ही एकमेकांपेक्षा अगदी भिन्न स्वरूप असलेली आत्मकथनपर पुस्तके साधना प्रकाशनाने प्रसिद्ध केली. अण्णासाहेब सहस्रबुद्धे यांचे आत्मनिवेदन कार्यकर्त्यांना प्रेरक ठरले. हमीद दलवाईना साथ देताना मेहरुन्निसांना जे सोसावे लागले त्याचे प्रांजळ निवेदन मेहरुन्निसांनी केले आहे आणि या निवेदनातूनच स्वतंत्र अस्तित्व असलेली त्यांची व्यक्तिरेखा प्रगट झाली आहे. एस. एम. जोशी यांचे 'बालपणीच्या आठवणी’ हे छोटेसे आत्मकथन कुमार वाचकांना फार आवडले. नानासाहेब गोरे यांच्या निवडक साहित्याचा भरदार संग्रह ‘नारायणीय', बाबा आमटे यांचे ‘ज्वाला आणि फुले 'आणि शिरुभाऊ लिमये यांचे ‘निवडुंगाची बोंडे' ही ललित पुस्तके म्हणजे साधना प्रकाशनाचे ठसठशीत अलंकार. कथा कादंबऱ्या आणि ललित लेखसंग्रहांप्रमाणेच दोन थोर लेखकांची नाटके प्रसिद्ध करण्याचे भाग्य साधना प्रकाशनास लाभले.

विश्राम बेडेकरांचे 'वाजे पाऊल आपुले’ आणि गिरीश कर्नाड यांच्या 'हयवदन’ या नाटकाचा चि. त्र्यं. खानोलकर यांनी केलेला मराठी अनुवाद, ही ती दोन नाटके. ललित साहित्यात अन्य ललित कलांना महत्त्वाचे स्थान आहे याची जाणीव ठेवून साधना प्रकाशनाने संगीतातील असामान्य कलावंत गायकांचे मार्मिक रसग्रहण करणारी रामकृष्ण बाक्रे यांची दोन पुस्तके- 'बुजुर्ग' आणि ‘भिन्न षड्ज' प्रसिद्ध केली. या दोनही पुस्तकांना रसिकांची उत्तम दाद मिळाली. ग. दि. माडगूळकर यांनी ‘मंतरलेले दिवस’ या अविस्मरणीय पुस्तकात 1942 च्या स्वातंत्र्य संग्रामातील सातारा-सांगली भागात नाना पाटलांच्या नेतृत्वाखालील ‘पत्री’ सरकारच्या रोमहर्षक पर्वाचे अत्यंत चित्तवेधक वर्णन केले आहे. देशभक्तीने पेटलेल्या साहसी बीरांची व्यक्तिचित्रे आणि पारतंत्र्याच्या शृंखला तोडण्यासाठी त्यांनी केलेल्या त्यागाच्या कथा वाचताना वाचक आजही मंत्रमुग्ध होतो. 

साने गुरुजींच्या प्रेरणेने काम करणाऱ्या साधना प्रकाशनाला 'मंतरलेले दिवस’ ने वैभवशाली केले भारतावर 1962 साली झालेले आक्रमण, 1965 साली झालेला भारत- पाकिस्तान संग्राम आणि 1971 साली भारताने पाकिस्तानी सैन्याच्या मगरमिठीतून बांगला देशाला मुक्त केल्यावर स्वतंत्र बांगला देशाची झालेली निर्मिती- आधुनिक भारताच्या जीवनातील तीनही समरप्रसंगांवरील वैशिष्ठ्यपूर्ण पुस्तके साधना प्रकाशनाने प्रसिद्ध केली. 1962 साली अपुऱ्या तयारीमुळे शूर भारतीय जवानांना जी माघार घ्यावी लागली त्या वेळच्या त्यांच्या मनःस्थितीचे दर्शन लीलाधर हेगडे यांच्या 'तरी हात शिवशिवत राहिले' या पुस्तकात होते. 1965 आणि 1971 या दोनही समरप्रसंगांच्या वेळी ग. प्र. प्रधान हे ‘साधना' चे प्रतिनिधी म्हणून युद्धभूमीकडे गेले होते. तेथे त्यांना भारतीय जवानांच्या मर्दुमकीचा, सरहद्दीवरील भारतीय नागरिकांच्या शौर्याचा जो प्रत्यय आला आणि युद्ध समाप्तीनंतरच्या समाजाचे जीवन त्यांना जसे दिसले, त्याचे चित्रण त्यांनी 'हाजीपीर' व सोनार बांगला या दोन पुस्तकां मध्ये केले. ‘हाजीपीर' हे पुस्तक फार गाजले व त्याच्या एकापाठोपाठ तीन आवृत्त्या निघाल्या. 

‘आंतरभारती’ हे साने गुरुजींचे एक स्वप्न होते आणि म्हणूनच भारताच्या विविध भाषांतील थोर लेखकांचा परिचय करून देणारे ‘कथाकार' हे अरविंद गोखले यांचे पुस्तक साधना प्रकाशनाने प्रसिद्ध केले. याचबरोबर अरविंद गोखले यांनी लिहिलेली ‘पाकिस्तानी कथाकार’ व ‘बांगलादेशी कथाकार’' ही दोन पुस्तकेही साधना प्रकाशनाने प्रसिद्ध केली . मराठीतील थोर कथालेखकाच्या या तीन पुस्तकांमध्ये आंतरभारतीचे प्रतिबिंब उमटले आहे. सुप्रसिद्ध गुर्जर साहित्यिक गुलाबदास ब्रोकर यांच्या ‘जीवनसरिता' या कथासंग्रहाचा मराठी अनुवाद प्रसिद्ध करता आला याचा साधना प्रकाशनाला अभिमान वाटतो . तेलगू लेखिका स्नेहलता रेड्डी यांच्या ‘सीता' या आणीबाणीत गाजलेल्या नाटकाचा अनुवादही साधना प्रकाशनाने प्रसिद्ध केला. ललित साहित्याप्रमाणेच मौलिक वैचारिक साहित्य प्रसिद्ध करणे ही साधना प्रकाशनाने आपली जबाबदारी मानली आणि विचारवंत लेखकांच्या सहकार्यामुळे ते कार्य करता आले.

नरहर कुरुंदकरांचा 'शिवरात्र' हा लेखसंग्रह, 'लोकशाही समाजवाद' हे देवदत्त दाभोलकरोंचे पुस्तक आणि चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे भारतीय संविधानाचे ‘अधिष्ठान' ही तीन तात्विक विवेचन करणारी पुस्तके साधना प्रकाशनाने प्रसिद्ध केली. त्याचप्रमाणे 'लोकशाहीची आराधना ' हा बॅ. नाथ पै यांच्या व्याख्यानांचा संग्रह आणि 'लोकशाहीचा कैवारी' हे त्यांचे वासू देशपांडे यांनी लिहिलेले चरित्र साधना प्रकाशनाने प्रसिद्ध केले. मृणालिनी देसाई यांच्या ‘प्रगतीच्या निकषावर' या महिलावर्षात प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात भारतीय स्त्रियांच्या वाटचालीचे स्फूर्तिदायी दर्शन भारतातील थोर स्त्रियांच्या व्यक्ति चित्रांद्वारा घडविले आहे. प्रमिला संघवी यांचे 'विश्वविक्रमी वीरांगना आणि रोहिणी गवाणकर यांचे 'कॅप्टन लक्ष्मी’ व ‘राणी झांशी रेजिमेंट' ही दोन अशीच प्रेरणादायी पुस्तके आहेत. नलिनी पंडित यांच्या स्वातंत्र्योत्तर काळातील दलितांचा लढा या पुस्तकात सामाजिक समतेसाठी सुरू झालेल्या संघर्षातील पहिल्या पर्याचे वर्णन आणि विवेचन केलेले आहे. या आणि अशा अन्य उद्बोधक पुस्तकांना वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. नानासाहेब गोरे यांनी वेगवेगळ्या लेखकांच्या महत्त्वपूर्ण पुस्तकांना मौलिक प्रस्तावना लिहिल्या. या सर्व प्रस्तावनांचा संग्रह 'पारख', साधना प्रकाशनाने नानासाहेबांच्या पहिल्या स्मृतिदिनी प्रसिद्ध केला. या सर्व प्रस्तावनांमध्ये संबंधित पुस्तकांतील विवेचनाचा परामर्ष घेतानाच पुस्तकात चर्चिलेल्या विषयांचे नानासाहेबांनी केलेले विश्लेषण मूलग्राही आहे. त्यामुळेच प्रगल्भ वाचकांनी या पुस्तकाचे मनोमन स्वागत केले. 1975 साली आणीबाणी जाहीर झाल्यानंतर ‘साधना’ ने निर्भयपणे लोकशाहीवादी भूमिका मांडली. हे अग्निदिव्य करताना ‘साधना’ ने साने गुरुजींची उज्वल परंपरा चालविली. मुंबई उच्च न्यायालयात 'साधना' च्या भूमिकेवरील शासकीय आक्षेप दूर झाला. हा वृत्तांत 'साधना व्हिंडीकेटेड' या इंग्रजीतील साधना प्रकाशनातआहे. 

आणीबाणीत तुरुंगात असताना जयप्रकाश नारायण यांनी आपले मनोगत लिहिले. इंग्रजी मनोगताचा पु.ल.देशपांडे यांनी केलेला ‘स्वगत’ हा स्फूर्तिदायी अनुवाद प्रकाशित करण्याचे भाग्य साधना प्रकाशनाला लाभले. 'आणीबाणीतील पत्रे’ ( भाग पहिला आणि दुसरा ) हे डॉ. अरुण लिमये यांनी संपादित केलेले संग्रह साधना प्रकाशनाने प्रसिद्ध केले. साधना प्रकाशनाच्या अनेक पुस्तकांना पुरस्कार मिळाले आणि वाचकांनीही हार्दिक प्रतिसाद दिला. ‘स्वातंत्र्य संग्रामाचे महाभारत’ या ग. प्र. प्रधान यांच्या ग्रंथाची तिसरी आवृत्ती संपत आली आहे. या पुस्तकाची हिंदी आणि कन्नड भाषांमध्ये भाषांतरे झाली. ‘अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र’ या लिंकन यांच्या इंग्रजी पत्राचा वसंत बापट यांनी अनुवाद केला आहे.  हे पत्र महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात पोहोचले असून त्याची नववी आवृत्ती निघाली आहे.

साधना प्रकाशन हे साधना ट्रस्टतर्फे चालविले जाते. त्यामुळे आजवर साधना ट्रस्टच्या विश्वस्तांनी हे काम मानद प्रकाशक म्हणून केले. प्रकाशनाचा नफा लोकशिक्षणासाठीच खर्च केला जातो . साधना प्रकाशनाला आजवर अनेक उन्हाळे-पावसाळे अनुभवावे लागले. 1961 साली पानशेत पुराच्या वेळी सर्व काही वाहून गेले. परंतु या आणि अन्य अनेक अडचणींवर सर्वश्री एस. एम. जोशी, श्रीरंग वरेरकर, हरिभाऊ गद्रे , यदुनाथ थत्ते, प्रभाकर सिद्ध, नाना डेंगळे आदींनी निर्भयपणे मात केली गेल्या काही वर्षांपासून साधना प्रकाशनाची जबाबदारी वसंत बापट यांनी घेतली आहे. वाचकांना आवडतील अशी पुस्तके प्रसिद्ध करताना त्यांच्या किंमती सामान्य वाचकांना परवडतील अशा ठेवण्याची दृष्टी साधना प्रकाशनाने सतत ठेवली आहे. अर्थात बदलत्या काळाचे आणि बदलत्या अभिरुचीचेही भान साधना प्रकाशनाला आहे. एका वेळच्या साध्या सुध्या साधना प्रकाशनाचे बहिरंग गेल्या पंधरा वर्षांमध्ये अत्यंत कलात्मक झाले आहे. 'साने गुरुजींची जीवनगाथा' या ग्रंथाची पहिली आवृत्ती व 24 डिसेंबरला प्रसिद्ध होणारी तिसरी आवृत्ती यांची मुखपृष्ठे पाहिली की साधेपणातून सौंदर्याकडे जाण्याच्या आमच्या धडपडीचा प्रत्यय येईल. साधना प्रकाशनाने ललित साहित्यातील नवीन प्रवाहांचा आविष्कार करणारे साहित्य, मुला- मुलींच्यावर संस्कार करणारी चरित्रे, कथा आणि निबंध, आणि समाजाचे प्रबोधन करणारे कसदार वैचारिक साहित्य आजवर प्रसिद्ध केले. वर्तमानकालांतील समस्यांवर प्रकाश टाकताना भविष्याचा वेध घेणारे आणि मूल्याधिष्ठित सामाजिक बांधिलकीचा आग्रह धरणारे साहित्य साधना प्रकाशनाने आजवर वाचकांना सादर केले. साने गुरुजींच्या ध्येयवादाचा वारसा साधना प्रकाशनास लाभला . याच ध्येयवादी वृत्तीने माय- मराठीची सेवा करण्यासाठी विविध पुरोगामी प्रवृत्तीचा आविष्कार करणारे साहित्य प्रसिद्ध करणे हे कार्य भावी काळात निर्भयपणे आणि निर्धाराने चालवावे हा साने गुरुजी जन्मशताब्दिवर्षात साधना प्रकाशनाने केलेला संकल्प आहे.

Tags: भाजपा कॉंग्रेस इंदिरा गांधी आणीबाणी साने गुरुजी BJP Congress Indira Gandhi Emergency Sane Guruji sadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके