डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

असामान्यत्वाचा सतत शोध घेणारे असामान्य व्यक्तिमत्त्व

कुमार जसा कम्युनिस्ट पक्षाचा सदस्य नाही, तसाच तो काँग्रेसचाही नाही; अनुयायी तर नाहीच नाही. मग तो इंदिरा गांधींचे आणि काँग्रेस पक्षाचे समर्थन का करतो? त्यातच त्याचा वेगळेपणा आणि निर्भीडपणा आहे. आपल्याला कोण काय म्हणेल याची त्याला फिकीर नसते, तर आपल्याला जे काही म्हणायचे आहे त्याला तत्त्वाचा आणि सत्याचा आधार आहे की नाही एवढेच पाहायचे, अशी त्याची धारणा असते.  ज्या कुणाला याची कारणमीमांसा जाणून घ्यायची आहे, त्यांनी त्याची दोन पुस्तके जरूर वाचावीत. एक आहे ‘ज्वालामुखीच्या तोंडावर’ आणि दुसरे आहे ‘कथा स्वातंत्र्याची’. आधुनिक स्वातंत्र्योत्तर भारतीय समाजाची रचना नेहरूंनी मांडलेल्या निधर्मीय (secular),  बहुत्वावर (plural) आधारित असलेल्या उदारमतवादावर, आधुनिक तंत्रज्ञानावर आणि विज्ञानावर तसेच आर्थिक-राजकीय व्यवहारावर सामाजिक अंकुश ठेवूनच होऊ शकते- अशी कुमारची पक्की धारणा आहे. संसदीय पद्धतीची लोकशाही अशी रचना आणण्यास समर्पक आहे, अशीही त्याची खात्री आहे. एकीकडे एकाधिकारशाही नको असा कंठशोष करणारे दुसरीकडे एकाच व्यक्तीविषयक द्वेषावर आधारित राजकारण करीत आहेत. आपण तेवढे तत्त्वनिष्ठ व बाकीचे तत्त्वभ्रष्ट- असा त्यांचा आविर्भाव असतो. त्यांचा समाचार कुमार सढळ हाताने घेतो.      

कुमारची आणि माझी ओळख पन्नासहून अधिक वर्षांची. मी दहा-बारा वर्षांचा असल्यापासूनची आणि तो सोळा-सतरा वर्षांचा असल्यापासूनची. आम्ही एकाच शाळेतले. मी पाचवीत गेलो, तेव्हा तो अकरावीत होता. बालपणातून थेट तारुण्यात उडी मारणाऱ्या लोकांपैकी तो एक असावा. शाळा संपल्यानंतरच्या 8-10 वर्षांत कुमारच्या व्यक्तिमत्त्वाची बैठक घडली. वैचारिक क्षेत्रातला त्याचा बहु-दिश संचार हा त्या वयात आणि काळात (1967) सुरू झाला, तो आजतागायत चालू आहे. अव्याहत यंत्र (perpetual machine) ही विज्ञानातील एक कविकल्पना आहे. कुमारच्या बाबतीत ती कविकल्पना नसून ते एक प्रत्यक्ष घटित आहे. कुमारच्या बाबतीत ते यंत्रवत्‌ नसून काव्यमय आहे. वैचारिक म्हटले की ते रुक्षच असले पाहिजे, भावनाशून्य असले पाहिजे- असा एक समज आहे. कुमारच्या बाबतीत हा समज लागू पडत नाही. विचार जिवंत असतो; हसतो, खेळतो, रिझवतो तसेच झुंजवतो. कुमारच्या लिखाणातील आणि भाषणातील वाक्या-वाक्याला याची प्रचिती येते. त्याच्या लिखाणाला आणि भाषणांना मिळणारी लोकांची दाद हेच सांगून जाते. आज महाराष्ट्रात त्याच्याइतका जनसंपर्क असलेला, सर्व वैचारिक रंगांच्या छटा असणाऱ्या लोकांना प्रिय असलेला दुसरा माणूस सापडणे अवघड जाईल. कुमारच्या एकूण जडणघडणीमध्ये सर्वांत मोठा वाटा त्याच्या आईचा आहे. सभ्यता, रसिकता आणि व्यक्तिमत्त्वातील कणखरपणा कुमारने आईकडून घेतला आहे. आचार्य अत्रे यांना कुमार गुरु मानत होता आणि त्यांचे अनन्यसाधारण स्थानही होते, पण कुमारने त्याच्या वृत्तपत्रीय लेखनामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारण, विज्ञान, समाजशास्त्र, मानसशास्त्र हे विषय ज्या पद्धतीने मांडले तसे त्याचे गुरु अत्रे यांनीही मांडले नव्हते, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही.

कुमार आयआयटीत होता, हेही फारच कमी लोकांना माहीत आहे. ज्यांना माहीत आहे, त्यांना तो तिथे विद्यार्थी नव्हता की शिक्षक नव्हता याचेही कदाचित आश्चर्य वाटेल. तो तिथल्या संगणक विभागात तांत्रिक सहायक होता. रेडिओदुरुस्तीचा त्याने एक छोटा डिप्लोमा केला होता आणि त्याच्या आधारावर त्याला तिथे नोकरी मिळाली होती. (संध्याकाळच्या कॉलेजात जाऊन त्याने बी.ए. केले. संध्याकाळची कॉलेजव्यवस्था चालू राहावी, यासाठी मुंबईत विद्यार्थ्यांना मोठे आंदोलन करावे लागले होते. त्यात भाग घेतला म्हणून कुमारला ‘घरातून चालता हो’ असेही त्याच्या वडिलांनी सुनावले होते.) पण अशा ठिकाणच्या नोकरीचा त्याने भरघोस लाभ उठवला. एखाद्या विद्यार्थ्याने नसेल केला इतका पुरेपूर वापर त्याने आयआयटीच्या लायब्ररीचा केला. आयआयटीच्या लायब्ररीचे एक वैशिष्ट्य असे की, तिथे सर्वच विषयांवरची पुस्तके उपलब्ध होती.  बी.ए. करतानाच्या विषयांचे भांडारच त्याच्या हाताशी होते. पुढे त्याच्या विचाराच्या पद्धतीवर ठसा उमटविणारे जे.कृष्णमूर्ती यांच्या तत्त्वज्ञानाची त्याची ओळख तिथलीच. फारच कमी मराठी लोकांना कृष्णमूर्ती ठाऊक आहेत. कुमार त्यांच्यापैकी एक आहे. कुमारला त्यांच्याबद्दल असणारे प्रेम हे त्याला फ्रॉईडबद्दल असणाऱ्या जिव्हाळ्याइतकेच जबरदस्त आहे. मार्क्स, फ्रॉईड, जे.कृष्णमूर्ती, मकलेहान अशी माणसं एकाच पंक्तीला कशी बसतात याचे अनेकांना आश्चर्य वाटते. पण कुमार ते अभिमानाने सांगतो आणि प्रसंगी विशद करूनही सांगतो. पगडी घालून पठडीतला विचार करणाऱ्यांपैकी कुमार नाही, हे ज्यांना माहीत आहे; त्यांना त्याचे याबद्दल विशेष कौतुकच वाटते. कुमारची मूळ वैचारिक बैठक मानवतावादी आणि उदारमतवादी आहे. त्या वैचारिकतेशी त्याची असलेली बांधिलकी अतूट आहे. तो जहाल नाही तर परखड आहे. फटकळ नाही तर स्पष्टवक्ता आहे. कुमार त्याचे मत आणि विचार कधीही झाकून ठेवीत नाही आणि टीकेला दबून मुरडत नाही. तो माणसं तोडत नाही तर जोडण्याचा प्रयत्न करतो. विरोधकांशी कितीही तीव्र मतभेद असला, तरी असभ्यपणे वागत नाही की त्यांच्या पाठीवर टीकास्त्र सोडत नाही.     

शारदा साठे (त्याची सहधर्मचारिणी) आणि चेंबूर हायस्कूलचे त्याचे एक शिक्षक भाऊ फाटक यांच्यामुळे त्याचा लाल निशाण पक्षाशी संबंध आला. या दोघांमुळे आणि लाल निशाण पक्षाचे संस्थापक एस.के. (श्रीपाद कृष्ण) लिमये यांच्यामुळे त्याला मार्क्सवादाचा परिचय झाला. पुष्कळांची अशी समजूत आहे की, कुमार लाल निशाण पक्षाचा कार्यकर्ता आहे किंवा होता. त्यात वस्तुतः कधीही तथ्य नव्हते. परंतु भाऊ फाटक आणि एस.के. या दोघांबद्दल कुमारला नितांत प्रेम व आदर आहे; त्यांचे वैचारिक आणि भावनिक ऋण तो कधीही नाकारत नाही. आपले स्वतंत्र व्यक्तिमत्त्व पुढे करण्यासाठी त्यांच्याशी त्याचे असलेले मतभेद याचेही त्याने कधी भांडवल केले नाही. त्याचमुळे आपण लाल निशाण पक्षाचे कार्यकर्ते नव्हतो किंवा कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य नव्हतो, असा खुलासासुद्धा तो चुकूनही करत नाही.  वस्तुस्थिती अशी आहे की, कुमारचे विचार आणि त्याची कृती ही कायम स्वतंत्र प्रज्ञेची होती व आहे. एस. के. पाठोपाठ त्याचा एस.ए. (श्रीपाद अमृत) डांगे यांच्याशी संबंध आला. या तिघांचे सर्व काही कुमारला पटत होते, असे नाही. पण या तिघांकडून पुष्कळ काही शिकायला मिळेल याची त्याला खात्री होती आणि तसे तो शिकलादेखील. मला स्वतःला या तिघांनाही जवळून पाहण्याची संधी कुमारमुळेच मिळाली. आपण काय म्हणतो आहोत हे याला जरी पटलेले नसले, तरी आपल्याला जे म्हणायचे आहे हे याला समजते याचे समाधान आणि त्याचा आनंद मला त्यांच्या डोळ्यांत दिसत असे. कुमारशी बोलताना त्यांना वाटणारा मोकळेपणा आणि त्यांचे खुलणारे व्यक्तिमत्त्व हे कुमारच्या आम्ही काही मित्रांनी जवळून पहिले आहे. कुमारशी ते पत्रकार म्हणून कधीच बोलले नाहीत. त्या तिघांनाही कुमारच्या स्वतंत्र विचाराबद्दल, निर्भीडपणाबद्दल  आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल कुतूहलमिश्रित कौतुक वाटे आणि त्याच्याशी ते समरस होत. असे काय कुमार हिरीरीने मांडत असे की- ज्यामुळे काहींना त्याचे कौतुक वाटावे, तर काहींना राग यावा?

कुमार जसा कम्युनिस्ट पक्षाचा सदस्य नाही, तसाच तो काँग्रेसचाही नाही; अनुयायी तर नाहीच नाही. मग तो इंदिरा गांधींचे आणि काँग्रेस पक्षाचे समर्थन का करतो? त्यातच त्याचा वेगळेपणा आणि निर्भीडपणा आहे. आपल्याला कोण काय म्हणेल याची त्याला फिकीर नसते, तर आपल्याला जे काही म्हणायचे आहे त्याला तत्त्वाचा आणि सत्याचा आधार आहे की नाही एवढेच पाहायचे, अशी त्याची धारणा असते.  ज्या कुणाला याची कारणमीमांसा जाणून घ्यायची आहे, त्यांनी त्याची दोन पुस्तके जरूर वाचावीत. एक आहे ‘ज्वालामुखीच्या तोंडावर’ आणि दुसरे आहे ‘कथा स्वातंत्र्याची’. आधुनिक स्वातंत्र्योत्तर भारतीय समाजाची रचना नेहरूंनी मांडलेल्या निधर्मीय (secular),  बहुत्वावर (plural) आधारित असलेल्या उदारमतवादावर, आधुनिक तंत्रज्ञानावर आणि विज्ञानावर तसेच आर्थिक-राजकीय व्यवहारावर सामाजिक अंकुश ठेवूनच होऊ शकते- अशी कुमारची पक्की धारणा आहे. संसदीय पद्धतीची लोकशाही अशी रचना आणण्यास समर्पक आहे, अशीही त्याची खात्री आहे. एकीकडे एकाधिकारशाही नको असा कंठशोष करणारे दुसरीकडे एकाच व्यक्तीविषयक द्वेषावर आधारित राजकारण करीत आहेत. आपण तेवढे तत्त्वनिष्ठ व बाकीचे तत्त्वभ्रष्ट- असा त्यांचा आविर्भाव असतो. त्यांचा समाचार कुमार सढळ हाताने घेतो.      

नेहरूंचा उदारमतवाद गाडून त्या जागी एकवचनी हिंदू धर्माधिष्ठित राज्यशकट उभे करावयाचे असे त्यांचे राजकीय उद्दिष्ट आहे, असे कुमारचे मत आहे. असे राजकारण कोणताही विधिनिषेध न बाळगता, देशाला आंधळ्या आणि विषारी विचारसरणीच्या खाईत लोटणारे आहे, असे त्याचे पक्के मत आहे. ते मांडायला तो कचरत नाही. कुमारच्या वाट्याला येणारी त्वेषपत्रं आणि इंटरनेटवर राहुल, सोनिया यांच्यासमवेत होणारी हेटाळणी याच्यामागचे रहस्य हे आहे. त्याच्या स्वभावाच्या पूर्णपणे विरोधी असलेल्या व्यक्तिपूजेच्या दोषारोपाचा  धोका पत्करून तो या मंडळींच्या बाजूने उभा राहतो. त्यामुळे तो व्यक्तिधार्जिणा असल्याचे भासते, इतकेच. कुमारची स्मरणशक्ती, त्याच्याकडे उपलब्ध असलेले संदर्भ आणि राजकारणातील रथी-महारथींच्या दुटप्पीपणाबद्दलचे त्याच्याकडचे अगण्य पुरावे आहेत.  त्यामुळेच त्याचे भाषण ऐकायला लोक उत्सुक असतात. घटनांचे, व्यक्तिमत्त्वांचे डोळ्यांना न दिसणारे संदर्भ तो सहजगत्या उलगडून सांगून जातो. त्याच्या विरोधकांनाही तो त्यामुळेच आवडत असावा. उदारमतवाद म्हणजे सब कुछ चलता है, सर्वच विचारांचा आदर करायला पाहिजे- असे बिलकुल नाही. त्यामुळे कुमार त्याला न पटणाऱ्या विचारांवर लेखणीचा आणि वाचेचा घणाघाती हल्ला करतो. त्याच्या विवेचनात डोळे आणि कान उघडे ठेवणाऱ्यांना तथ्य सापडते, म्हणूनच त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न दोनदा झाला आणि कुमारची अडचण वाटणाऱ्या मंडळींकडून हल्लेखोरांना अभय मिळाले. 

त्याच्या या एकचित्ताला आणि व्यासंगाला पत्रकारिता हा एक समर्पक व्यवसाय त्याला लाभलेला आहे, हाही काही एक योगायोग नाही. त्याने तो एक जपलेला आणि जोपासलेला मार्ग आहे. बी.ए. झाल्यावर त्याने एम.ए. विथ थिसिससाठी मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतला. वृत्तपत्रांचे जनमानसातील स्थान काय असा काहीसा त्याच्या अभ्यासाचा विषय होता. ते करीत असताना त्याने ‘राजकारण’ नावाचे मासिक सुरू केले. नंतर आयआयटीमधली नोकरी सोडून दिल्लीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन येथे तो गेला. तिथे मार्शल मकलेहान यांच्या लिखाणाचा त्याचा परिचय झाला. नंतर टाइम्स ऑफ इंडियाच्या संदर्भ विभागात नोकरी घेऊन मुंबईत परतला. एकीकडे नोकरी करत असताना नंतर ‘सत्यचित्र’ नावाचे पाक्षिक सुरू केले. राजकारण मासिक काय किंवा सत्यचित्र पाक्षिक काय- दोन्ही नियतकालिकांत वेगळ्या विषयांची निवड करण्याची, स्वतः लिहिण्याची आणि इतरांकडून लिहून घेण्याची त्याची हातोटी विलक्षण होती. साहित्य, कला, चित्रपट, विज्ञान, समाजकारण याबद्दल लिहिताना त्याचे राजकारणाचे टोक कधी सुटले नाही- समव्यावसायिक आणि इतर प्रतिष्ठित मंडळींचा प्रसंगी तीव्र रोष पत्करूनसुद्धा. वर उल्लेखलेली त्याची नेहरूवादी उदारमतवादाची राजकीय बैठक मजबूत आहे. ती त्याने सोडली, तर अनेक जण त्याला डोक्यावर घ्यायला पुढे येतील. तरुण मुलांना कुमारची भाषणे आवडतात, कारण त्यात सहसा दुसरे कुणीही सांगणार नाही अशा गोष्टी आणि विचार ऐकायला मिळतात. तीच गोष्ट त्याचे लिखाण वाचणाऱ्यांची आहे. भूतकाळाचे अवलोकन करायला मिळते, वर्तमानाचे विश्लेषण पाहता येते, तर भविष्याचा वेध घेता येतो. लिहावेसे वाटले म्हणून कुमार कधीही लिहीत नाही किंवा बोलावेसे वाटले म्हणून बोलत नाही. लिहिण्यासारखे आणि सांगण्यासारखे आपल्याजवळ काही आहे म्हणून तो लिहितो आणि बोलतो.

जग समजून घ्यायला आजपर्यंत खूप लोक पुढे आले; आता जग बदलायची वेळ येऊन ठेपलेली आहे, असे मार्क्सचे एक उद्‌धृत आहे. कुमार गमतीने ते फिरवून सांगतो की- जग बदलण्यासाठी ते समजणेसुद्धा आवश्यक आहे! जग जर सतत बदलत असेल, तर आपली जगाची समजसुद्धा सतत पुढे जाणारी पाहिजे. ते समजायचे असेल आणि बदलायचे असेल तर सहिष्णू पद्धतीने, विज्ञानाची कास धरून, धर्मापेक्षा तत्त्वज्ञानावर विचार-व्यवहार आधारून उदारमतवादी लोकशाही पद्धतीनेच आपण ते साध्य करू शकतो. त्यासाठी आपल्यातली सामाजिकता, कुतूहल आणि माणुसकी टिकवणे आवश्यक आहे, हे सांगणे हे कुमारच्या लिखाणाचे उद्दिष्ट आहे. राजकारणाच्या धुराळ्यात ते उद्दिष्ट अस्पष्ट झाले तरी प्रत्येक संवेदनशील माणसाला ते भावेल, यात काही शंका नाही. आज महाराष्ट्रातले सामाजिक भान ज्या काही व्यक्तींमुळे टिकून असेल, त्यांच्यात कुमारची गणना जरूर होईल. कुमारला मिळालेला हा जीवनगौरव पुरस्कार सयुक्तिक तर आहेच. तसा तो दर दहा वर्षांनी मिळावा इतके विपुल लिखाण आणि अफाट जनसंपर्क त्याच्याकडून घडत राहो. महाराष्ट्र फाउंडेशनने त्याची दुसऱ्यांदा दखल घेतली, ही कौतुकास्पद गोष्ट आहे. दोहोंना माझ्या शुभेच्छा.

Tags: जवाहरलाल नेहरू शारदा साठे कॉंग्रेस इंदिरा गांधी भाऊ फाटक श्रीपाद अमृत डांगे महाराष्ट्र फाउंडेशन कुमार केतकर Jawaharlal Nehru Sharada Sathe Congress Indira Gandhi Bhau Fatak Shripad Amrut Dange Maharashtra Foundation Kumar Ketkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके