डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

भवरलाल जैन यांचे वैशिष्ट्य असे की, त्यांनी शेतकरी उपयोगी तंत्रज्ञानाने शेती सोपी करण्याचा व शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तंत्रज्ञान सुलभ केले, त्याच्या कार्यशाळा घेतल्या, दर्जेदार व अधिक उत्पन्न कसे मिळवायचे ते उतीतंत्र प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले. तंत्रज्ञानाची मक्तेदारी संपविली. तिचे लोकशाहीकरण केले. हे करताना आपले उत्पादन विकले व नफाही कमावला. आपली कंपनी मोठी केली. जळगावातील सात हजार लोकांना रोजगारही दिला.

जळगावचे उद्योगपती व गांधीवादी भवरलाल जैन यांचे वयाच्या 79 व्या वर्षी निधन झाले. वाकोद या (मराठवाड्याच्या सीमेवरील) जळगाव जिल्ह्यातील एका छोट्या खेड्यात साधारण स्थितीतील मारवाडी कुटुंबात जन्माला आलेले भवरलाल जैन यांचे निधन झाले, तेव्हा त्यांच्या जैन इरिगेशनचे कारखाने अमेरिका-इस्रायलसह अनेक देशांत होते व वार्षिक उलाढाल 4,500 कोटी होती. केवळ सात हजार रुपयांच्या भांडवलावर त्यांनी 1962 मध्ये केरोसिनचा व्यापार सुरू केला. त्या काळी रॉकेलचा पुरवठा तुटपुंजा होता. सरकारी अधिकारी लायसेन्स देत होते. त्यांनी अधिकाऱ्यांशी उत्तम संबंध प्रस्थापित केले. आपल्याजवळ आलेल्यांची काळजी घेण्याचा त्यांचा स्वभाव होता. या अधिकाऱ्यांनी त्यांना पेट्रोलपंप व गॅसची एजन्सी दिली.

त्यांनी व्यापार करताना भांडवलाचा विचारपूर्वक वापर केला. स्वतःचे घर न बांधता ते पैसे व्यापारात गुंतवून कमाई करावी, तिथे भांडवल वाढून व्यापार वाढवावा व दरमहा भाडे भरावे, असा विचार त्यांनी केला होता. पुढे त्यांना एक संधी चालून आली. तिचे त्यांनी सोने केले. सहकारी तत्त्वावर केला फॅक्टरी सुरू झाली होती. तो प्रयोग अयशस्वी झाला. केला फॅक्टरी विक्रीला निघाली. भवरलाल जैन यांनी ती विकत घेतली तिथे पपईपासून पपेन बनवण्याचा उद्योग सुरू केला. सामान्यत: व्यापारी विचारपद्धती व कारखानदारी यांची विचारपद्धती वेगळी असते. भवरलाल जैन यांनी दोन्हींत यश मिळवले. शेतकऱ्याने पपई खरवडून पपईचे काढलेले दूध जैन उद्योग समूहाने खरेदी करण्यास सुरुवात केली. चिरा मारलेली पपई बाजारात ग्राहक घेईनात. अशी पपई फेकण्याची वेळ आली. भवरलाल जैन यांनी खरवडलेल्या दिसणाऱ्या पपयांची खरेदी करून त्यापासून कँडी-टूटी-फ्रुटी बनविण्यास सुरुवात केली. त्यामुळे भवरलालजींना पपई स्वस्तात मिळू लागली. पपईचा चिक व पपईविक्री असे शेतकऱ्यांनादेखील एकूण अधिक उत्पन्न मिळू लागले.

भवरलालजी इथेच थांबले नाहीत. त्यांनी निर्यातीचा मार्ग शोधला. पपईपासून तयार केलेले ‘पेपेन’ भारतातील भावाच्या तीनपट किमतीला निर्यात केले. त्या काळी सिमेंटचे महागडे पाईप वापरात होते. नव्या पीव्हीसी पाईपचे उद्योग भारतात सुरू झाले होते. त्यांनी पीव्हीसी पाईप उत्पादनाचा उद्योग सुरू केला. पाण्याचा व शेतीउत्पन्नाचा संबंध लक्षात घेऊन ठिबक सिंचन हा भावी काळाशी सुसंगत पर्याय आहे, हे पुढे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ठिबक सिंचनसंच बनविण्यास सुरुवात केली. ते  नेहमी पुढचा विचार करीत. भारतातील अनेक उत्पादकांपैकी केवळ एक ठिबक सिंचनसंच उत्पादक न होता, त्यांनी जगातील तंत्रज्ञानाचा मागोवा घेतला.

पाण्याची कमतरता असलेल्या इस्रायलने प्रथम ठिबक सिंचन विकसित केले होते. तेथील कंपनीकडून तंत्रज्ञान विकत घेता-घेता एके दिवशी ते इस्रायलच्या ठिबक सिंचन कम्युनचे भागीदार झाले. पुढे अमेरिकेतील ठिबक सिंचन कंपनी त्यांनी विकत घेतली. त्यांनी उती तंत्रज्ञानाचे महत्त्व हेरले. दर्जेदार व उत्पन्न देणाऱ्या झाडांची तंतोतंत तशीच अनेक झाडे करता येतात व सगळ्यांना हवे तसे उत्पन्न मिळविण्याची संधी मिळते. खानदेशातील शेतकरी पेरीत असलेल्या केळी व डाळिंब या पिकांत उती तंत्रज्ञानाची रोपे विकण्यास त्यांनी सुरुवात केली. भवरलाल जैन यांचे वैशिष्ट्य असे की, त्यांनी शेतकरी उपयोगी तंत्रज्ञानाने शेती सोपी करण्याचा व शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तंत्रज्ञान सुलभ केले, त्याच्या कार्यशाळा घेतल्या, दर्जेदार व अधिक उत्पन्न कसे मिळवायचे ते उतीतंत्र प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले.

तंत्रज्ञानाची मक्तेदारी संपविली. तिचे लोकशाहीकरण केले. हे करताना आपले उत्पादन विकले व नफाही कमावला. आपली कंपनी मोठी केली. जळगावातील सात हजार लोकांना रोजगारही दिला. त्यांनी सुरू केलेल्या प्रत्येक व्यापारामागे विचार होता. त्यांनी शेती व शेतकरी यांना कायम ग्राहक मानून नजरेसमोर ठेवले किंवा शेतकऱ्यांच्या उत्पादनांवर प्रक्रिया केली. त्यांनी कांदा पावडर, आमपल्प व पेरूपल्पचे उत्पादन केले. त्याची निर्यात केली. त्यांनी ठरवून कधीही दारू वा गुटखा यांचे उत्पादन केले नाही. त्यांना या वस्तू उत्पादनातील भरमसाट नफा कळत नव्हता, असे नाही.

ग्रामीण बांधिलकी पलीकडील उद्योगविस्तार करताना त्यांनी सोलर पॅनेल, हीटर, दिवे, पॉलिहाऊस, प्लॅस्टिक वंडरवूड अशी नव्या तंत्राची उत्पादने निवडली. ते माल पोहोचविताना सर्व वाहनांना कंपनीतर्फे बायो-डिझेल देऊन गाडीभाडे ठरवीत. गाडीभाडे कमी लागे व अंतर्गत उत्पादन बायो-डिझेल म्हणून वापरले जाई. त्यांच्या कारखान्यात कामगार युनियन कधीही झाली नाही. इतर व्यापाऱ्यांप्रमाणे त्यांनी काही व्यापारी तडजोडी केल्या. हे करताना आपली एक व्यावसायिक नीती ठरविली. व्यापारी मंडळी सावध असतात. गोड बोलतात, कटू सत्य बोलत नाहीत. भवरलाल जैन अनेकदा जाहीररीत्या आपली मते स्पष्टपणे मांडीत असत. एकदा स्पेअर पार्टच्या दुकानाचे उद्‌घाटन करताना त्यांनी ‘संचालकांनी हा धंदा का निवडला?’ असा जाहीर प्रश्न विचारून सांगितले की, स्पेअर पार्टच्या दुकानदाराला कंपनीचे नाव लावलेले डुप्लिकेट स्पेअर्स जेन्युइन सांगून विकावे लागतात. नाही तर पुरेसा नफा राहत नाही.  

त्यांनी सगळ्यांशी संबंध ठेवले. व्यवहारी असल्याने जळगावातील प्रबळ राजकारणी सुरेश जैन यांच्यामागे पूर्ण शक्तिनिशी ते उभे राहिले. याचा त्यांच्या उद्योगाला करसवलती मिळविणे यात आर्थिक लाभदेखील झाला. सुरेश जैन यांच्या तुरुंगवासाच्या काळात व सत्ता बदलल्यावरदेखील त्यांनी संकटग्रस्त सुरेश जैन यांची साथ सोडली नाही. एकदा आपला मानले की, त्याच्या संकटात साथ देण्याची त्यांची वृत्ती होती. शरद पवार त्यांना मित्र मानतात. त्यांनी भवरलाल जैन यांचे काका दलूभाऊ जैन राष्ट्र सेवादलात होते. त्यांनी एस.एम.जोशींना घरी बोलावले. राजस्थानी समाजात जसे घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या पायांवर डोके ठेवून आशीर्वाद घेतात तसा भवरलाल जैन यांनी एस.एम. जोशींच्या पायावर डोके ठेवून आशीर्वाद घेतला.

नारायणभाई देसाई यांचा ते वडिलधाऱ्यांसारखा आदर करीत असत. अण्णा हजारे यांनी एका प्रकरणात त्यांच्या कंपनीचे ठिबक सिंचन अनुदान थांबविले, तरीही ते अण्णा हजारेंबाबत आदरभाव बाळगून होते. अण्णा हजारे यांनी दिल्लीत भ्रष्टाचारविरोधी आंदोलन सुरू केले. भवरलाल जैन यांनी स्वेच्छेने आंदोलनाला आर्थिक मदत पाठविली. मी त्यांना अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठीच्या जाहीर सभेसाठी बोलवायला गेलो, तर त्यांनी नम्रपणे प्रकृतीच्या कारणाने नकार दिला. चांगल्या माणसांमागे उभे राहतानाही कायम आपल्या उद्योगाचे हित नजरेआड होऊ दिले नाही.

एकदा जळगाव नगरपालिकेने त्यांना मानपत्र देण्याचे ठरविले. त्या वेळी निम्मे-अधिक नगरसेवक गुंड होते. सगळ्यांना संधी मिळावी यासाठी दर सहा महिन्यांनी नवा महापौर निवडला जाई. नवे महापौर हे पोलीस रेकॉर्डनुसार गुंड. त्यांच्या अनेक बायका, दारूचा व पत्त्यांचा अड्डा. भवरलालजींनी तत्कालीन महापौरांच्या हस्ते घाईगर्दीत मानपत्र घेतले व नव्या महापौरांच्या हस्ते मानपत्र घेणे टाळले. अशी काळजी ते नेहमी घेत.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाबद्दल वाचून त्यांनी स्वतःहून एकदा देणगी पाठविली होती. एकदा मी, डॉ.श्रीराम लागू, बाबा आढाव व डॉ.नरेंद्र दाभोलकर त्यांना ऐनवेळी भेटायला गेलो होतो. कामाच्या व्यग्रतेमुळे ते भेटू शकले नाहीत. त्यांनी कशासाठी आला होतात, हे विचारले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीला एक गाडी घ्यायची होती, ते काही मदत करू शकतात का, हे विचारण्यासाठी आम्ही आलो होतो- असे त्यांना सांगितले. तो काळ त्यांच्या व्यवसायाचा अडचणीचा होता. ते सॉफ्टवेअरपासून मार्बल-ग्रॅनाईटच्या खाणी अशा नव्या व्यवसायात नुकसानीत गेले होते. दोन वर्षांनी त्यांनी स्वतःहून बोलावून घेतले आणि तेव्हा अडचणीमुळे या मोठ्या माणसांना मी देणगी देऊ शकलो नाही. त्या वेळीच ठरविले होते की, पैसे  आल्यावर आपण दिले पाहिजेत व त्यांनी अंनिसला गाडी दिली.

ते पांढरे शुभ्र कपडे घालीत. शक्यतो स्वच्छ पांढरा शर्ट व पायजमा. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात साधेपणा होता. त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती नम्र होत्या, पैशाचा अहंकार कधी कुटुंबीयांत दिसला नाही. मारवाडी असूनही त्यांच्या सुना कधी महागड्या साड्या-दागिने घालून सार्वजनिक समारंभात मिरवीत नसत. त्यांच्या भवरलाल-कांताताई जैन फौंडेशनच्या कार्यक्रमात एक विश्वस्त ना.धों.महानोर व्यासपीठावर असतील तर भवरलालजी खाली प्रेक्षकांत बसत. त्यांना मिरवणारे, फोटोत पुढे-पुढे करणारे आवडत नसत. विचारवंतांचा सहवास व गप्पा त्यांना आवडत असत. ना.धों. महानोर, भालचंद्र नेमाडे, जब्बार पटेल, डॉ.सुभाष चौधरी असे अनेक त्यांचे आवडते होते.

सश्रद्ध असूनही त्यांनी आपल्या जैन धर्माचे मंदिर बांधले नाही. जातीपाती-धर्म यांच्या पलीकडे जाणारी त्यांची दृष्टी व वर्तन होते. आपल्या नातवांना उत्तम शिक्षण-संस्कार देताना ते दूर जाऊ नयेत यासाठी त्यांनी जळगावात अनुभूती शाळा उभारली. त्यांच्या शाळेची फी अतिश्रीमंतांना परवडेल अशी आहे, ही टीका झाली. त्यांनी टीका गांभीर्याने घेतली व गरिबांच्या मुलांसाठी अनुभूती-2 शाळा सुरू केली. ते विचारातून गांधींकडे वळाले. त्यांना गांधीत नव्या युगाचा क्रांतिकारी महावीर दिसला. 

त्यांनी मनापासून स्वीकारलेला आदर्श गांधीजींचा. त्यांच्या जन्मगावी वाकोदला बिनविरोध-पक्षविरहित निवडणुका व्हाव्यात, असा त्यांनी प्रयत्न केला. गांधीजींच्या मार्गाने वाकोदचा विकास करणाऱ्या अवलिया मुकुंद दीक्षितच्या मागे ते उभे राहिले. मुकुंद कर्मठ गांधीवादी. वेळ आली तर भवरलालजींशी वाद घालणारा. वाकोदच्या भर सभेत ‘गावाच्या कामाला तुमचा शंभर टक्के पैसा चालणार नाही. तुम्ही श्रीमंत आहात, इतरांपेक्षा दोन पैसे जास्त द्या. पण गावाच्या वर्गणीतून काम होईल’ असे तोंडावर सुनावणारा. त्याच्या या बोलण्याचे भवरलाल कौतुक करीत. गांधीजींचे भव्य स्मारक गांधीतीर्थ त्यांनी उभे केले. पैसे स्वतःचे असताना चंद्रशेखर धर्माधिकारी यांना अध्यक्ष केले. ते बांधताना एखादी ऐतिहासिक इमारत असते तशी हजार वर्षे टिकेल अशी लाल दगडांत इमारत उभारली. हे करताना पैशांचा विचार केला नाही. 10-20 कोटी खर्च केले आणि आपल्या कल्पनेतील उत्तम शिल्प उभे केले. तिथे आवारात गांधीजींचे पुतळे, प्रदर्शनी, कार्यक्रम सभागृह, अभ्यासकांना राहण्याची व्यवस्था असे स्मारक उभारले आहे. गांधीजींवरील सर्व साहित्य, पत्रे, छापून आलेले सगळे जगभरातून गोळा केले. अभिमान वाटावा अशी एक देखणी कलाकृती जळगावात उभी राहिली.

त्यांच्या मोठ्या मनाचा एक अनुभव आम्ही घेतला. जळगावात राम आपटे प्रतिष्ठानने ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाचा प्रयोग केला. त्या वेळी या नाटकाला जैन फाउंडेशनने सहकार्य केल्याचे सांगण्यात आले. भवरलाल जैन गांधीवादी, आणि असे कसे झाले? आम्ही सारे गांधींना मानणारे हादरलो. मनातून कमालीचे दुखावलो. त्यांना पत्र लिहिले. त्यांनी जाहीर खुलासा करावा, अशी मागणी केली. आमच्या निषेधाच्या पत्राने त्यांचे कर्मचारी नाराज होते. भवरलालजींनी भेटायला बोलावले. भेटण्याआधी आम्ही सारे गांधीवादी तणावात होतो. गांधीजींच्या पद्धतीने निर्वैर चर्चा होते का, असे वाटत होते. मोकळेपणे चर्चा केली. सांगितले- अशा वेळी मी गांधीजींच्या पद्धतीने विचार करतो. आम्ही आर्थिक मदत केलेली नाही. तरीही त्यांनी का जाहीर केले, माहीत नाही. माझे मन स्वच्छ आहे. मला खुलासा करून या खोट्या मंडळींचे महत्त्व वाढवायचे नाही. आपण या नथुराम विचारांचा संघर्ष विचारांनी करू या. प्रतिक्रिया देण्यापेक्षा आपण पुढाकार घेऊ, मुद्दे उपस्थित करू. यात गांधी संशोधन केंद्र आयोजन करील, पुढाकार घेईल, असे त्यांनी सांगितले. भरभरून मनापासून बोलले. ते गांधीवादी आहेत याची खात्री पटली.

त्यांची प्रकृती बरी नव्हती, तरी ते इतके बोलतात यामुळे त्यांचे कुटुंबीय काळजीत होते. जाताना त्यांनी प्रत्येकाची व्यक्तिगत चौकशी केली. सगळेजण समाधानात बाहेर पडले. एका करोडपती व्यक्तीला आपल्या कमावलेल्या पैशांतून दिलेल्या कथित देणगीची इतकी मोकळी चर्चा करावीशी वाटते, हे विशेष आहे. मित्रांचे वेगळेपण, त्यांचा वेगळा विचार केवळ स्वीकारून चालणार नाही, त्यांचा आदर केला पाहिजे, हे ते पाहत. दुसऱ्याचे विचार एकाग्रपणे ऐकत, समजावून घेत. त्यांच्या विश्वात सगळ्यांना स्थान होते. जगाच्या मैत्राची – प्रेमाची - आपुलकीची गांधीजींची जगण्याची शैली त्यांनी अंगीकारली होती.

Tags: मृत्युलेख शंकर सोनाळकर उद्योजक महात्मा गांधी गांधीवादी भंवरलाल जैन Obituary Shekhar Sonalkar Industrialist Mahatma Gandhi Gadhivadi Bhanvarlal Jain weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके