डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

स्वातंत्र्यस्तोत्र : चंद्र गगनिचा ढळला

कादंबरीची परिणामकारकता तिच्या अतिशय सुगम, सुस्पष्ट रचनेत दडलेली आहे. संपूर्ण कथन एकदिक पद्धतीचे, म्हणजे आरंभ, मध्य आणि सूचक अंत, असे आहे. घटना, प्रसंग, पात्रे यांची जटिल गुंतागुंत नाही, गर्दी नाही. मुख्य पात्रे पाचसहाच. त्यात महापौर ऑर्डन केंद्रस्थानी. स्नेहशील, वरकरणी साधाभोळा, परिपक्व आणि लोकनिष्ठ असा हा नेता आहे. डॉक्टर विंटर, मॉली, ॲनी असे दोघेतिघे लक्षात राहतात, कारण त्यांना काहीशी गोलाई आहे, विकसित होण्याची क्षमता त्यांच्याजवळ आहे. सहा सैनिकी अधिकारी तसे यांत्रिक व्यवस्थेतून तयार झालेले यांत्रिक पुतळे आहेत. अर्थात त्यांपैकी काहींची वैशिष्ट्ये लेखक सूचित करतो, परंतु पात्रे म्हणून त्यांचा विकास शक्य आणि अपेक्षित नाही; ते एका व्यवस्थेचे प्रतिनिधी आहेत.

जॉन स्टाइनबेक (1902-1968) हे अमेरिकन साहित्यातले एक प्रथम श्रेणीचे अल्पाक्षरी लेखक. त्यांनी लिहिलेल्या डझनभर कादंबऱ्यांपैकी ‘द ग्रेप्स ऑफ राथ’, ‘ऑफ माइस अँड मेन’, ‘टॉर्टिला फ्लॅट्‌स’, ‘द मून इज डाउन’ या विशेष लोकप्रिय. त्यांनी लिहिलेले ‘ट्रॅव्हल्स विथ चार्ली’ हे एक कॅरव्हान प्रकारातली तंबू व राहण्याची सोय असलेली मोठी थोरली गाडी घेऊन अमेरिकेतील सर्व म्हणजे पन्नास राज्ये भटकून आल्याचे रोचक प्रवासवर्णन आहे. चार्ली हा त्यांचा आवडता कुत्रा! त्यांची सर्वाधिक गाजलेली कादंबरी म्हणजे ‘द ग्रेप्स ऑफ राथ’ ही होय.

दुसऱ्या महायुद्धाच्या काही वर्षे आधी, म्हणजे 1930 नंतर अमेरिकेत आर्थिक महामंदी आली; सामान्य लोकांची अन्नान्न दशा झाली. रोजगार आणि अन्नाच्या शोधात हातांवर पोट असणारे हजारो गरीब मजूर आणि स्थलांतरित भूमिहीनांचे जथेच्या जथे दूरच्या राज्यात जीविकेच्या शोधात देशोधडीला लागले. अनेकांनी क्षुधा आणि तृष्णा असह्य झाल्याने रस्त्यातच प्राण सोडले. ‘द ग्रेप्स ऑफ राथ’ ही अशाच एका देशोधडीला लागलेल्या जोड नावाच्या भल्या मोठ्या स्थलांतरित कुटुंबाची करुण कहाणी आहे. आजोबा, काका, लहानगी नातवंडे, वडील आणि विशीतली गर्भवती रोझ असा हा कबिला ओक्लोमा राज्यातून चौदाशे मैल दूर असलेल्या कॅलिफोर्नियाला मजल-दरमजल करत, वाटेत मिळेल त्या गोठ्यात रात्र काढत, चालत निघालेला आहे. कॅलिफोर्नियात हजारो मजुरांची आवश्यकता आहे, अशी जाहिरात त्यांनी वाचलेली आहे. त्या आशेवर हा खडतर प्रवास सुरू झालेला आहे. प्रत्यक्षात तिथे गेल्यावर एका गचाळ गोठ्यात मुक्काम आणि ठेकेदाराने केलेली हर तऱ्हेची छळवणूक, पिळवणूक अनेक मजुरांच्या नशिबी लिहून ठेवलेली आहे. माणसांना जनावरांपेक्षादेखील वाईट रीतीने वागवले जाते आहे, मारहाण केली जाते आहे, पूर्ण मजुरी दिली जात नाही. कादंबरीचा शेवट अत्यंत हृदयद्रावक परंतु तेवढाच माणुसकीचे उदात्त दर्शन घडविणारा, प्रभावी आहे. शेजारी एक जख्ख म्हातारा क्षुधा आणि तृष्णेने मरणोन्मुख झालेला आहे. तरुण गर्भिणी रोझ हे बघते. करुणा आणि वात्सल्य यांनी तिचा पान्हा भरून येतो आणि ती त्या म्हाताऱ्याला स्तन्य देते. परिस्थितीविषयीचा क्रोध जेवढा अनावर आहे, तेवढीच माणुसकी आणि वात्सल्यदेखील जिवंत आहे, या अर्थाने रोझची स्तनरूपी द्राक्षे हे क्रोध आणि वात्सल्याची निरागस रसपूर्णता यांचे प्रतीक असल्याचा बोध वाचकाला कथेच्या शीर्षकातून होतो. वस्तुतः संपूर्ण कादंबरीच एक सलग रूपककथा असून ज्यू लोकांचे महाप्रस्थान, गोठ्यात जन्मलेल्या जीझसचा शेवटचा प्रवास, नरकाकडून स्वर्गाकडे जाण्याची ओढ, अशी उकल करता येते. शेवटचे स्तनपानाचे दृश्य अश्लील असून अनेक राज्यांनी या कादंबरीवर बंदी घातली होती; एवढेच नव्हे तर तिची जाहीरपणे होळी केली गेली. परंतु तिने मानवी जीवनाची होणारी विटंबना दाखवून आणि त्याच वेळी माणसाच्या क्रौर्याचे घृणास्पद वर्तन उघडे पाडून साऱ्या अमेरिकेचे डोळे खाडकन उघडले, असा लौकिक पुढे या कादंबरीला प्राप्त झाला. एकूण साहित्यसेवेबद्दल जॉन स्टाइनबेक यांना पुलित्झर आणि नोबेल सन्मानांनी गौरविले गेले.

मानवाच्या मूलभूत हक्क-अधिकारांपैकी धर्म, उच्चार, संचार, आदी सप्तस्वातंत्र्ये गाभाभूत मानली गेलेली आहेत. ती कोणा एका शासकाने मानवाला दिलेली नसून मानवाचे स्वातंत्र्य हे निसर्गतःच जन्मसिद्ध आहे, ही धारणा त्याच्या तळाशी आहे. सुसंस्कृत, विचारी मनाला तर हे स्वातंत्र्य प्राणांहूनही प्रिय असून ते जपण्याची इच्छा आणि धडपड अथक असते. त्यातूनच फ्रेंच राज्यक्रांती झाली, जगात अन्यत्रदेखील त्या झालेल्या आहेत. स्टाइनबेक यांची ‘द मून इज डाउन’ (चंद्र गगनिचा ढळला) ही लघुकादंबरी अशीच एका स्वातंत्र्यलढ्याची रोमहर्षक आणि प्रेरक कथा सांगते.

स्कँडिनेव्हिया देशातले सुंदर समुद्रकिनारा लाभलेले एक मध्यम आकाराचे निर्नाम शहर. मुख्य जीविकासाधन म्हणजे मासेमारी आणि कोळशाच्या खाणीतली नोकरी. विपुल सागरी अन्न आणि कोळशाचे विपुल खनिज उत्पादन, यांवर सारी अर्थव्यवस्था आधारलेली आहे. गाव शांत, सुशील, समाधानी आणि एकूण सुशेगाद वृत्तीचे आहे. लोकांचा लोकशाही व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. तिथला महापौर ऑर्डन गेली अनेक वर्षे बिनविरोधपणे निवडून येऊन इमाने, इतबारे, प्रेमाने लोकसेवा करण्यात रमलेला आहे. आहेच तसा तो निरागस, निष्कपट, महत्त्वाकांक्षाहीन, स्नेहशील गृहस्थ आणि त्याची बायकोदेखील अशीच निरागस आणि प्रेमळ आहे. अनेक शतकांची ही लोकशाहीची ‘युटोपिया’सदृश परंपरा असल्याचा त्याच्यासह सर्व नगरजनांना रास्त अभिमान आहे.

एखाद्या सरोवराच्या शांत पाण्यावर कुणी एखादा भला मोठा दगड टाकून खळबळ लाटा निर्माण कराव्यात, पाणी गढूळ करून टाकावे, असा प्रसंग ओढवतो- अनपेक्षित आणि अचानकपणे. उन्हाळ्यातल्या एका सूर्यप्रकाशित, प्रसन्न, शांत रविवारी सकाळी कोण्यातरी आक्रमक देशाचे शे-दोनशे मशीनगनधारी सैनिक गावात प्रवेशतात. नेमक्या याच वेळी गावातल्या जॉर्ज कॉरेल नावाच्या लोकप्रिय बड्या दुकानदाराने गावापासून सात-आठ मैल दूरच्या गावासाठी एक क्रीडा उत्सव योजलेला असून गावातल्या सैनिकांना आणि अनेक जवानांना स्वखर्चाने तिकडे नेलेले आहे. इकडे सकाळी अकरा वाजेपर्यंत या आक्रमक घुसखोरांनी शहराचा ताबा घेतलेला असतो आणि महापौर ऑर्डन यांच्या निवासावरदेखील त्यांनी कब्जा मिळवला असतो. तिथेच आता त्यांचे सैनिकी कार्यालय स्थापित केले गेले आहे. देशातले आणि आपले कोणीच पोलीस किंवा कोणीच सैनिक आणि तरुण पोरे कसे कोणी कुठे दिसत नाहीत, आणि या घुसखोराना त्यांनी काहीच कसा प्रतिकार केला नाही, याचे महापौर ऑर्डनला आश्चर्य वाटते. त्याची स्वयंपाकीण ॲनी फार चतुर, चौकस- पण चिडखोर आहे. आपले सहा लोक या घुसखोरांनी गोळ्या घालून मारून टाकल्याची खबर ती महापौरांना देते. तिथेच डॉक्टर विंटर हा मित्र उपस्थित आहे. तो एक महत्त्वाची माहिती देतो. जॉर्ज कॉरेलने गावापासून दूर क्रीडा महोत्सव योजिलेला असून गावातल्या सैनिकांना आणि अनेक जवानांना स्वखर्चाने तिकडे नेलेले आहे. त्याने नगरात हत्यारे बाळगणाऱ्यांची यादी तयार करून या घुसखोरांना दिलेली आहे. थोडक्यात, हा जॉर्ज कॉरेल फुटला आहे. तो फितूर झाला असून काहीएक अंतस्थ हेतूने त्याने हे सर्व नियोजन केलेले आहे. ही त्याची गद्दारी लवकरच बहुतेक सर्व नागरिकांच्या ध्यानात येते आणि हळूहळू त्याच्यावर बहिष्कार टाकला जातो. लोकांच्या मनात त्याच्याविषयी भयंकर घृणा निर्माण होते.

आक्रमक देशाचे कर्नल लान्सर, मेजर हंटर, कॅप्टन बेन्टिंक, कॅप्टन लॉफ्ट, लेफ्टनंट प्रॅकल आणि लेफ्टनंट टाँडर असे सहा सैनिकी अधिकारी हजर झालेले असून त्यांनी महापौरांच्या घराचा ताबा घेऊन तिथे आपले कार्यालय थाटले आहे. महापौरदेखील तिथेच राहत आहेत. संपूर्ण निवास सशस्त्र सैनिकांनी घेरलेला आहे. एक सोजीर स्वयंपाकघरात घुसून ॲनीबाईशी जवळीक करू बघतो. संतापी ॲनी त्याच्या अंगावर उकळते पाणी टाकते! तिला गोळी घालू का, म्हणून शिपाई आपल्या कर्नलसाहेबाला विचारतो, पण कर्नल तशी परवानगी देत नाही. उगीच इथल्या लोकांना विरोधात उभे करायला नको, हे त्याचे सूत्र आहे. हा तसा एक छोटाच प्रसंग आहे परंतु दुबळे दिसणारे सर्वसामान्य लोकदेखील जीव जाण्याची पाळी आली तर आपली प्रतिष्ठा, आपले वैयक्तिक स्वातंत्र्य अबाधित ठेवू इच्छितात, आणि अति झाले की दुबळेदेखील जिवाच्या आकांताने प्रतिकाराला सिद्ध होतात, हे लेखक सुचवू इच्छित आहे. एखादा क्षुद्र कीटकदेखील शेवटी हल्ला करायला उलटतो (इव्हन अ वर्म टर्न्‌स) या म्हणीचा येथे अर्थ लागतो. या शांत, सुस्त गावात आक्रमकांना झालेला हा पहिला प्रतीकात्मक प्रतिकार आहे. तुमचा अधिकार वापरून तुमच्या लोकांना समज द्या, त्यांना आवरा, असे कर्नल महापौरांना दरडावतो, तेव्हा महापौर म्हणतात, ‘‘इथे सर्व अधिकार त्या शहरात म्हणजे लोकांच्या हातात आहेत, माझ्या नव्हे. लोक हेच सर्वश्रेष्ठ आहेत.’’ लोकशाही आणि लोकशक्ती यांवरचा दृढ विश्वास महापौरांच्या या उत्तरात व्यक्त झालेला आहे.  

हळूहळू घुसखोर सैनिक आणि सामान्य नागरिक यांच्यातील तेढ, संघर्ष वाढू लागतात. एक अलिखित असहकार चळवळ सुरू होते. कोळसा खाणीतले कामगार ‘आस्ते काम’ धोरण सुरू करतात. यातून संघर्षाची जोरदार ठिणगी पडते. कॅप्टन बेन्टिंक आणि कॅप्टन लॉफ्ट एका खाणीजवळ उभे आहेत. अलेक्झांडर मॉर्डन नावाचा कामगार काम सोडून जाऊ इच्छितो आहे. कॅप्टन लॉफ्ट त्याला धमकावून कामावर येण्याची सक्ती करतो. ‘‘मी इथला स्वतंत्र नागरिक आहे’’, असे अलेक्झांडर मॉर्डन त्याला सुनावतो. तेवढ्यात कॅप्टन बेन्टिंकदेखील तिथे आलेला आहे. कॅप्टन लॉफ्ट त्याच्याकडे वळतो आणि त्याच वेळी अलेक्झांडर त्याच्या कुदळीने हल्ला करतो; तो नेमका कॅप्टन बेंटिंकच्या जिव्हारी लागतो आणि कॅप्टन तिथेच कोसळतो. हा इथला दुसरा संतप्त प्रतिकार. साधी स्वयंपाकीण ॲन असो किंवा साधा खाणकामगार अलेक्झांडर असो; साध्या, सामान्य माणसांच्या मनात अशी स्वातंत्र्यप्रेमाची ज्योत मंदपणे तेवत असते, हा संदेश त्या मागे आहे. आपले स्वातंत्र्य जपण्याची प्रबळ ऊर्मी त्यातूनच अचानक स्थंडिलरूप धारण करते.

अलेक्झांडरला तिथल्या तिथेच गोळी घालता येणे शक्य असते, परंतु सैनिकी सत्ता न्यायप्रिय असते, हे येथील लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी त्याच्यावर झटपट खटला उभा केला जातो. अर्थात, हे केवळ नाटक आहे, कारण शेवटी त्याला मृत्युदंड ठरलेलाच आहे; हे सर्वांना माहीत असते. इथे सैन्याधिकारी एक डाव खेळतात. ते महापौर ऑर्डन यालाच न्यायाधीश म्हणून नेमतात, म्हणजे ‘तुमच्याच माणसाने ही मृत्युदंडाची शिक्षा तुमच्या नागरिकाला दिलेली आहे, आमचा त्यात काहीएक हात नाही’, असा संदेश जावा आणि जगमित्र महापौर ऑर्डनला शत्रू निर्माण व्हावेत, ही खेळी आहे. त्याला तशी समज देण्यात येते आणि काय शिक्षा द्यायची हेही सांगितले जाते. अर्थातच ऐन वेळी ऑर्डन हे करायचे नाकारतो आणि ‘या राज्यात असा कोणाला मृत्युदंड देण्याचा अधिकार मला आणि इतर कोणालाच नाही’, हे ठणकावून सांगतो. अलेक्स हा अतिशय चांगला आणि शांत वृत्तीचा नागरिक आहे, त्याच्या हातून असे भयानक कृत्य व्हायला तसेच काहीतरी गंभीर कारण आहे. आणि ते म्हणजे त्याची विद्ध झालेली स्वातंत्र्यनिष्ठा, हे होय, हे ऑर्डनला ठाऊक आहे. इथल्या प्रत्येक नागरिकात हे सूत्र रुजलेले आहे. अर्थात, हातात अनियंत्रित सत्ता आलेली असल्याने शेवटी अलेक्सला भर चौकात गोळी घालून देहान्ताची शिक्षा सुनावली जाते, कारण बेशिस्त लोकांना अशीच शिक्षा मिळेल हा संदेश जायला हवा ना. पण, ‘लोकांचे मन तुम्हांला समजत नाही, तुमचा इतिहास पराभवाचा आहे’, हेही तो ठणकावून सांगतो. मग, ‘कायदा आणि शिस्त यांचे काय,’ असे जेव्हा कर्नल त्याला विचारतो तेव्हा महापौर ऑर्डन म्हणतो, ‘‘इथे येऊन तुम्ही आमचे सहा लोक मारले. आमच्या कायद्यानुसार तुम्ही सर्व जण खुनी गुन्हेगार आहात. कायदा महामूर्ख आहे. तुमच्या-आमच्यांत काहीएक कायदा अस्तित्वात नाही. हे युद्ध आहे. एक तर तुम्ही आम्हां सर्वांना ठार कराल किंवा आम्ही तुम्हां सर्वांना यमसदनाला धाडू. तुम्ही कायदा उद्‌ध्वस्त केला आणि नवा कायदा आणता आहात.’’ हा नवा कायदा म्हणजे एकछत्री अंमल, अत्याचार, हिंसा, स्वातंत्र्यसंकोच किंवा गळचेपी, यासाठीच निर्माण केला गेलेला आहे. इथल्या -आणि कुठल्याच स्वातंत्र्यप्रिय जनतेला तो अजिबात मान्य नाही, या श्रद्धेचा इथे पुनरुच्चार होताना दिसतो. शेवटी संयम संपून कर्नल म्हणतो, ‘‘आम्ही तुझ्याकडून मदतीची अपेक्षा केली आहे.’’ त्यावर ऑर्डन म्हणतो, ‘‘ठीक आहे. तुम्ही आमचे सहा लोक गोळ्या घालून मारले. यासाठी तुमचे किती सैनिक वापरले?’’ ‘‘वीस’’, कर्नल सांगतो. ‘‘मग असे करा, या वीस लोकांना आधी गोळ्या घाला, मग मी अलेक्सच्या देहान्ताला परवानगी देतो!’’ इथे वाटाघाटी संपतात. शेवटी ऑर्डन कर्नलला सुनावतो, ‘‘एक गोष्ट तुम्ही करू शकणार नाही, ती म्हणजे लोकांचा मनोबलभंग.’’ 

अधिकारी मंडळी एकूण परिस्थितीची चर्चा करीत असताना जॉर्ज कॉरेल त्यांना भेटायला येतो. हा पूर्णतः बाजारी मनोवृत्तीचा, सदसद्‌विवेकबुद्धी नसलेला, स्वार्थी आणि महत्त्वाकांक्षी इसम आहे. घुसखोरांना नगरात प्रवेश आणि सत्ता काबीज करायला याने मदत केलेली आहे, त्याची किंमत वसूल करायला हा या अधिकारी मंडळींना भेटायला आलेला आहे. सर्वसामान्य नगरजनांत याची आता गुप्तपणे छि:थू झालेली आहे, किंबहुना लोक याचा तिरस्कार करू लागलेले आहेत आणि या अधिकारी मंडळींना याची खबरबात लागलेली आहे. लोकांच्या द्वेष आणि संतापाला हा एक ना एक दिवस बळी जाणार आहे, हे त्यांना निश्चित कळलेले आहे. आणि महापौर ऑर्डनचा चौकस बटलर तर म्हणतोच, ‘‘हा (कॉरेल) काही फार दिवस जगेल असे वाटत नाही.’’ त्याच्या दुकानावर साऱ्या नगराने बहिष्कार टाकलेला आहे; धंदा पूर्णपणे बसला आहे. किंबहुना त्याला ठार करण्याचा एक प्रयत्न झालादेखील आहे, परंतु शाइस्तेखानाप्रमाणेच याचेदेखील जिवावरचे बोटांवर निभावले आहे. कर्नल विचारतो, ‘‘तो दगड कुणीतरी फेकलेला नव्हता याबद्दल तुझी खात्री आहे का?’’ कॉरेल म्हणतो, ‘‘छे:, गेल्या शंभर वर्षांत या लोकांनी युद्ध पाहिलेले नाही. ते झगडणे विसरून गेले आहेत.’’ आणि मग कॉरेल सरळ आपल्या किमतीच्या वसुलीचा प्रस्ताव मांडतो : ‘‘मला या नागराचा महापौर करा! त्यामुळे तुमच्या सैनिकी शासनाला मदत होईल. माझ्या अहवालात मी हे तुमच्या लीडरच्या कानी घातले आहे.’’

यावर कर्नल सुनावतो, ‘‘इथली जनता तर तुझी शत्रू झालीच आहे; ते तुझा तिरस्कार करतात. आणि आमच्याही आदराला तू पात्र राहिलेला नाहीस! आणि लीडरला सैनिकांचे मन समजते. कॉरेल, आता तुला इथे काहीच किंमत राहिलेली नाही. कदाचित आता तू दुसऱ्या शहरात जाशील, तिथे सत्तादेखील मिळेल.’’ तेव्हा निर्लज्ज कॉरेल म्हणतो, ‘‘हे इथले लोक आता पराभूत झालेले आहेत. होतील काही दिवसांत थंड.’’ तेव्हा कर्नल सुनावतो, ‘‘अरे, थंड वगैरे काही खरे नाही. पराभव हा अल्पजीवी असतो. आणि तू गद्दारी करून त्यांच्यावर ही स्थिती आणलेली आहे, हे त्यांना कळलेले आहे. जा घरी, रात्री एकटा-दुकटा बाहेर पडू नकोस, हेल्मेट घाल.’’ कर्नल त्याला आपला ब्रुसेलमधला अनुभव सांगतो - एक गोड आवाजाची, सुंदर चेहऱ्याची, नितळ वर्णाची पोरगी आम्हांला सिगारेटी आणि पोरी पुरवायची. तिच्या मुलाला आम्ही गोळी घातलेली होती. तिने गुपचूप शांतपणे आमच्या बारा साजिरांना कंठस्नान घातले. आम्ही जेव्हा काढता पाय घेऊ लागलो तेव्हा तिथल्या लोकांनी आमच्यापैकी जखमी, लंगड्या सैनिकाना मारून टाकले, जाळून टाकले, काही जणांचे डोळे उपसून काढले आणि काही जाणांना क्रुसावर खिळले. हा संवाद सुरू असताना एक शिपाई आत येतो आणि कर्नलला सांगतो, ‘‘कॅप्टन बेंटिंकचा खून झालाय.’’

कर्नलबरोबर चर्चा सुरू आहे. वातावरण अंधारून आलेलं आहे. खिडकीबाहेर एक भला मोठा ढग दिसतो आहे. ‘‘चांगलाच मोठा ढग आला आहे की. पण जाईल तोही.’’ महापौर ऑर्डन आपला मित्र डॉक्टर विंटरला सूचकपणे सांगतो. पाचसहा महिने उलटले आहेत. प्रसन्न उन्हाळा संपून हळूहळू थंडीचे दिवस सुरू होऊ घातले आहेत. लवकरच बर्फदेखील पडायला लागले आहे. जमीन, रस्ते, घरे, झाडे यांवर बर्फाचे थर साचू लागलेले आहेत. बर्फ म्हणजे मृत्यू. तरीही चंद्रास्त झाला की या गावाला जाग येऊ लागलेली आहे. गुपचूप भेटीगाठी, नियोजन, मदतकार्य, एकट्यादुकट्या शत्रुसैनिकांवर छुपे हल्ले आणि त्यांचा खात्मा, असे प्रकार सुरू झालेले आहेत. प्रत्यक्ष सैनिकी अधिकारी आणि त्यांचे सोजीर यांच्याही मनात भीती घर करू लागलेली आहे. त्यांनी आता अन्नपदार्थांचे रेशनिंग सुरू करून लोकांची अडवणूक सुरू केली आहे. त्यांचं एकाकीपण, घराची ओढ, त्यांना व्याकूळ, वेडेपिसे करीत आहे. लेफ्टनंट टाँडर तर भरकटलाच आहे.

अलेक्सची बायको (विधवा) मॉली मॉर्डन तिच्या छोट्याशा घरात स्वेटर विणत एकाकी, उदासपणे बसलेली आहे. एवढ्यात दारावर टकटक होते. मनात अनेक शंका डोकावतात. पण दारात उभा असतो लेफ्टनंट टाँडर! त्याला हवे आहे प्रेम, स्त्रीसहवास, संवाद, मानसिक सहारा. मॉली मॉर्डनला हे सर्व समजते आहे. ‘‘मी भुकेने व्याकूळ झालेले आहे; मला दोन घास काहीतरी खायला दे’’, अशी विनवणी ती त्याला करते. तो गेल्यावर खुद्द महापौर ऑर्डन प्रवेशतो. सोबत दोन तरुण पोरे आहेत. कोरेलची मोटरबोट चोरून हे दोघे रात्रीच्या अंधारात इंग्लंडला पलायन करणार आहेत. तिथून मदत, विशेषतः कमी शक्तीचे डायनामाइट पाठवण्याची योजना आहे.

ही मंडळी गेल्यावर पुनश्च लेफ्टनंट टाँडर खाद्यपदार्थ घेऊन मॉली मॉर्डनच्या घरी हजर होतो. मॉली मॉर्डनला ते अपेक्षितच आहे. आपली धारदार मोठी कात्री घेऊन ती सज्ज आहे. इकडे जसजसा चंद्र ढगाआड जातो तसतसे बाँबफेकी विमाने मारा सुरू करतात. कोळशाच्या खाणीजवळ हा मारा होतो. लवकरच अनेक विमाने घिरट्या घालू लागतात. त्यांतून छोट्या छोट्या हजारो निळ्या कापडी छत्र्या खाली सोडल्या जातात. त्यांना डायनामाइटची छोटी छोटी पाकिटे जोडलेली आहेत. चंद्रास्तानंतर गावातली लहान मुले रात्री बर्फात भटकून ही पाकिटे गोळा करतात आणि दूर टेकड्यांमध्ये ठरल्या ठिकाणी ती पाकिटे लपवून ठेवतात! मधल्या काळात लेफ्टनंट टाँडरचा खून झाल्याची बातमी येऊन ठेपते. मॉलीने आपले काम बेमालूमपणे केलेले आहे! इतरही सैनिक असेच एकाएकी बेपत्ता होऊ लागलेले आहेत. आणि आता रेल्वेचे रूळ डायनामाइटने ठिकठिकाणी उखडून टाकल्याच्या घटना वाढीला लागलेल्या आहेत. एकदोन पूलदेखील तोडून ठेवलेले दिसत आहेत. चंद्रास्तानंतर रात्रीच्या अंधारात भर बर्फात आणि हाडे मोडणाऱ्या थंडीत ही कामे करण्यात थोरपोर गढलेले आहेत. खाणीतून कोळशाचे उत्पादनदेखील थंडावलेले आहे. या खनिजासाठीच तर हे आक्रमण झालेले आहे. विजेवर चालणाऱ्या रेल्वेगाड्या अजून त्या काळी मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या नव्हत्या. कारखानदारी आणि मालवाहतूक यांसाठी ऊर्जा पुरवठा मुख्यतः वाफ निर्माण करणाऱ्या कोळशावरच अवलंबून असल्याने शत्रूच्या हालचालीच ठप्प होऊ घातल्या आहेत. असे चहूबाजूंनी आक्रमकांना कोंडीत गाठून जेरीस आणले जात आहे. त्यांचादेखील धीर आता सुटू लागलेला आहे. माशा पकडणाऱ्या चिकट कागदालाच माशांनी पराभूत केले आहे, असे डॉक्टर विंटर उद्गारतो. एव्हाना या तात्पुरत्या सैनिकी कचेरीजवळ डायनामाइटचे स्फोट ऐकू येऊ लागलेले आहेत. खिडक्यांच्या एकदोन काचादेखील फुटल्या आहेत. बर्फासह आता मृत्यू दारात येऊन ठेपलेला आहे.

आता सैन्याधिकारीसुद्धा हे सहन करण्यापलीकडे गेलेले आहेत. महापौर ऑर्डन ऐकत नाही म्हटल्यावर त्याच्या देहदंडाचा निर्णय झाला असून लेफ्टनंट प्रॅकल त्याला ताब्यात घेण्यासाठी उपस्थित झालेला आहे. कादंबरीचा शेवट अतिशय सूचक आणि कथेला एका विलक्षण उंचीवर नेतो. आक्रमकांसाठी मृत्यू सज्ज आहेच, पण ध्येयोदात्त धैर्य आणि लोकशाहीवरील अपार श्रद्धेचे मूर्त रूप असलेल्या महापौर ऑर्डन याचाही मृत्यू समोर ठाकलेला आहे. आता त्याच्या अंगात प्रत्यक्ष सॉक्रेटीसचा आत्मा संचारतो. कर्नलला तो उच्च रवाने इशारा देतो, ‘‘मी भविष्य सांगतो. आज तुम्ही जे लोक माझा खून करता आहात त्या तुम्हांला माझ्या प्रस्थानानंतर लगेचच यापेक्षाही मोठी सजा मिळणार आहे.’’ कर्नल हे सारे मंत्रमुग्धपणे ऐकतो आहे. ‘‘आज आहेत त्याहून कितीतरी अधिक फिर्यादी उद्या तुमच्यावर अधिक गंभीर आरोप करणार आहेत. आज रोखलय मी त्यांना. पण उद्या ते अधिक निष्ठुरपणे तुमचा समाचार घेतील. मला मारून टाकल्याने तुमच्या अमंगल अस्तित्वावर शिंतोडे उडायचे तुम्ही थांबवू शकाल हा भ्रम आहे.’’     

डॉक्टर विंटर त्या कर्नलला म्हणतो, ‘‘त्या बर्फात छोटी मुले तुमच्या लीडरचा पुतळा तयार करताना मला दिसली आहेत. लवकरच ते तो उद्‌ध्वस्त करतील.’’ ऑर्डन पुस्ती जोडतो, ‘‘हो, कर्नल, लवकरच ही मुले त्या पुतळ्याची वात शिलगावतील. मी त्यांना रोखू शकत नाही.’’ मग शेजारी उभा असलेल्या मित्र डॉक्टर विंटरकडे वळून ऑर्डन म्हणतो, ‘‘क्रितो, एस्क्लेपिअसला मी एक कोंबडं देऊ लागतो. माझं हे एवढं कर्ज तू फेडशील ना?’’

‘‘नक्कीच हे कर्ज फेडेन मी.’’ डॉक्टर विंटर.

कारागृहात असलेल्या सॉक्रेटीसच्या विषप्राशनानंतरचा करुण प्रसंग इथे पुन्हा आधुनिक स्वरूपात लेखकाने उभा केलेला आहे. सॉक्रेटीसचा मित्र क्रितो शेवटपर्यंत त्याच्या सोबत असतो. त्याला उद्देशून सॉक्रेटीसने काढलेले उद्गार इथे ऑर्डन पुन्हा उच्च रवाने काढतो. लोकशाही वाचवून मुलभूत मानवी स्वातंत्र्य रक्षिण्याचे आणि सशक्त करण्याचे त्याचे हे कर्ज आहे, हे सांगणे नलगे.                           

कादंबरीची परिणामकारकता तिच्या अतिशय सुगम, सुस्पष्ट रचनेत दडलेली आहे. संपूर्ण कथन एकदिक पद्धतीचे, म्हणजे आरंभ, मध्य आणि सूचक अंत, असे आहे. घटना, प्रसंग, पात्रे यांची जटिल गुंतागुंत नाही, गर्दी नाही. मुख्य पात्रे पाचसहाच. त्यात महापौर ऑर्डन केंद्रस्थानी. स्नेहशील, वरकरणी साधाभोळा, परिपक्व आणि लोकनिष्ठ असा हा नेता आहे. डॉक्टर विंटर, मॉली, ॲनी असे दोघेतिघे लक्षात राहतात, कारण त्यांना काहीशी गोलाई आहे, विकसित होण्याची क्षमता त्यांच्याजवळ आहे. सहा सैनिकी अधिकारी तसे यांत्रिक व्यवस्थेतून तयार झालेले यांत्रिक पुतळे आहेत. अर्थात त्यांपैकी काहींची वैशिष्ट्ये लेखक सूचित करतो, परंतु पात्रे म्हणून त्यांचा विकास शक्य आणि अपेक्षित नाही; ते एका व्यवस्थेचे प्रतिनिधी आहेत.

कादंबरीचा केंद्रस्थ विचार काय आहे, याचे उत्तर फक्त मानवी अस्तित्वाला सन्मान मिळण्यासाठी आवश्यक असलेली लोकसत्ता, समता आणि स्वातंत्र्य हेच आहे. समान व्यक्तींच्या मार्गदर्शनाचा स्वेच्छेने केलेला स्वीकार, हा तर लोकशाहीच्या तळाशी असलेला पाया आहे. कादंबरीत मांडलेला हा महान विचार निवेदनात्मक नसून संवादाधिष्ठित आहे. आणि हे संवाद पल्लेदार नसून छोटे, सोपे आणि सूचक आहेत. त्यातूनदेखील नाट्यात्मकता निर्माण होते. उगीच नाटकी प्रसंग, पाल्हाळीक वर्णने, आणि बोलघेवड्या पात्रांना इथे थारा नाही. उदाहरणार्थ, दोन तरुण मुले कॉरेलची बोट चोरून शस्त्रास्त्रे मिळवण्यासाठी सागरी मार्गाने वादळी रात्री इंग्लंडकडे पलायन करतात, किंवा मॉली कात्रीच्या मोठ्या पात्याने लेफ्टनंट टाँडरचा कोथळा बाहेर काढते, असे प्रसंग निकृष्ट लेखकांच्या आवडीचे असतात. लेखक म्हणून स्टाइनबेकची इयत्ता फार वरची आहे. पानेच्या पाने भरून काढून चार पैसे अधिक गाठीला मारण्याच्या हिकमती इथे नाहीत. स्थलांतरितांविषयीच्या एका पुस्तकाचे लेखन करीत असताना टाइम मासिकाने एक फोटोग्राफर सोबत देऊन स्थलांतरितांवर एक अहवाल तयार करण्याचे काम स्टाइनबेकवर सोपवले होते. परंतु केवळ निव्वळ खर्चापोटी लागणारे मानधन त्याने घेतले, अधिक दिले जाणारे द्रव्य घ्यायला त्याने नकार दिला. ‘‘दुःखितांच्या यातनांवर मला पैसे मिळवायचे नाहीत.’’ हे त्याचे उत्तर.

नाटकी घटना, प्रसंग, पात्रे, संवाद यांना जसा फाटा दिलेला आहे, तसेच उगीच जटिल, दुर्बोध अशी प्रतिमा-प्रतीके, निवेदनशैलीदेखील इथे टाळलेली आहे. आक्रमकांच्या लीडरचा पोरांनी केलेला बर्फ-माणूस आणि त्याला लवकरच लागणारी चूड, महापौर ऑर्डनला खिडकीतून दिसणारा अजस्र काळा ढग आणि लवकरच तो निघून जाईल हे त्याचे सूचक उद्‌गार, अशा काही मोजक्या जागा आहेत. परंतु मुख्य प्रतीक बर्फाचे आहे. घरे, रस्ते, जमीन, झाडे असा सर्वत्र साचत जाणारा, साऱ्या नगराला कवेत घेणारा, आरंभीचा भुसभुशीत असलेला आणि नंतर  दगडी-कठीण होणारा बर्फ प्रत्यक्षात येऊ घातलेल्या सर्वव्यापी मृत्यूचे थंडगार, परिणामकारक प्रतीक आहे.

स्वातंत्र्यरक्षण विरुद्ध स्वातंत्र्यदमन, स्वातंत्र्यहरण विरुद्ध स्वातंत्र्य पुनर्स्थापना, यातला निरंतर आणि जगभर चाललेला हा संघर्ष आहे. स्वातंत्र्य हे स्वयंभू, स्वयंसिद्ध मूल्य असून केवळ लोकशाहीतच त्याचा प्रतिपाळ आणि आदर होऊ शकतो, ही श्रद्धा या कादंबरीचे केन्द्रस्थ सूत्र आहे. स्वातंत्र्य आणि लोकशाही यांची दोनशे वर्षांची अक्षुण्ण, समृद्ध परंपरा अभिमानाने जोपासणाऱ्या अमेरिकन मनाला ही मूल्ये तडजोडीच्या पलीकडची वाटतात. लोकसत्ता की एकसत्ता, स्वातंत्र्य की गळचेपी, समता की ‘विषम-ज्वर’, असे हे द्वंद्व आहे, आणि हाच कादंबरीचा खरा संदेश आहे. तिचे अल्पाक्षरत्व, एकदिक कथन आणि सुगम रचना ही तिची शक्तिस्थळे आहेत.

ब्रिटिश कादंबरीकार ई.एम. फॉर्स्टरने त्याच्या ‘ॲस्पेक्ट्‌स ऑफ द नॉव्हेल’ या छोटेखानी पुस्तकात कादंबरीरचनेच्या संदर्भात एक सूत्र असे मांडले आहे की तिच्यातून शेवटी काहीतरी प्राक्तन झाले पाहिजे; कादंबरीने काहीतरी भविष्यवादी दिशादर्शन करायला हवे. याचा वस्तुपाठ त्याच्याच गाजलेल्या ‘अ पॅसेज टु इंडिया’ या कादंबरीच्या शेवटी आढळतो. डॉक्टर अझीज आणि स्थानिक शाळेचा इंग्रज हेडमास्टर फील्डिंग हे दोघे मित्र आहेत. आता फील्डिंग इंग्लंडला परत जायला निघालेला आहे. दोघे घोड्यांवर बसून रपेट मारत आहेत. ही आता शेवटचीच रपेट आहे. शेवटी त्यांचे दोन घोडे दोन वेगळ्या दिशांना वळतात. भारत आणि इंग्रजी सत्ता एकाच मार्गाने, एकाच दिशेने एकत्रितरीत्या जाऊ शकत नाहीत, हे प्राक्तन इथे सूचित झालेले आहे. रात्रीच्या गर्भात असलेला उद्याचा उषःकाल त्यात सूचित झालेला आहे. तेच तंत्र ‘द मून इज डाउन’मध्ये प्रकट झालेले दिसते. जनता आणि जनसत्ता हेच अंतिमतः विजयी होतात, हे ते प्राक्कथन आहे.  स्वातंत्र्याचे स्तोत्र म्हणून ही कथा फार प्रभावी आणि प्रेरक आहे.       

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके