डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

डेक्कन कॉलेजकडे पाहून केशवरावांच्या मनात आलेले विचार

अरे, गाई चारणाऱ्या गोवाऱ्या, अमेरिका-इंग्लिशांच्या अमलापासून स्वतंत्र झाली, जर्मनीने फ्रान्सला एकदा पादाक्रांत केले होते किंवा राघोबादादांनी अटकेवर झेंडे लावले- या गोष्टी तुला माहीत नाहीत, म्हणून तुझी न्याहारीची भाकरी तुझ्या जिभेला कडसर लागते काय? नाही! तर मग तुला हा इतिहास माहीत नाही म्हणून तुझे काय वाईट झाले आहे? आणि तो मला माहीत आहे म्हणून मी तुझ्यापेक्षा अधिक काय कमाविले आहे? उलट, मी आपल्या मनाची शांती मात्र त्याच्या योगाने घालवून बसलो आहे, ती माझी मानसिक शांती मला कोणी परत देईल काय? अरे, सुखात कालक्रमणा करणाऱ्या गोवाऱ्या, तुझ्या-माझ्या स्थितीची आपण अदलाबदल करू; येतोस काय? पण छे! छे! तुला असे फसवून उपयोगी नाही. माझ्या ह्या बाह्यात्कारी डामडौलाला भुलून तू कदाचित्‌ फसशील.  

'Where ignorance is bliss, ‘tis folly to be wise.' डेक्कन कॉलेज सोडून केशवरावांना वीस-पंचवीस वर्षे झाली होती. डेक्कन कॉलेजातून बी.ए.चा अभ्यास संपवून पुढे केशवराव एलएल.बी.चा अभ्यास करण्याकरता तीनचार वर्षे मुंबईस होते. ती परीक्षा पास झाल्यानंतर त्यांनी खानदेशात वकिलीचे काम बरीच वर्षे केले. पुढे काही दिवसांनी त्यांचा मुनसफीचा नंबर आल्यावर त्यांनी मुनसफीची नोकरी पत्करली. केशवरावांनी जरी सरकारी चाकरी धरली होती, तरी त्या चाकरीमुळे त्यांची स्वदेशभक्ती तिळभरही कमी झाली नव्हती. ते नेहमी इंग्रजी व मराठी वर्तमानपत्रे वाचीत असत. त्यामुळे आपल्या देशाचे आणि देशबांधवांचे कसकसे हाल होत आहेत, याबद्दलची साद्यंत हकिगत त्यांना नेहमी अवगत असे आणि आपल्या देशाच्या अत्यंत कष्टमय स्थितीचे चित्र त्यांच्या डोळ्यांपुढे रात्रंदिवस दिसत असे. 

स्वदेशाच्या सद्यःस्थितीचे विचार त्यांच्या मनात नाहीत, असा एक क्षणही गेला नाही. ते सुग्रास अन्न जेवत असताना, दुष्काळाने उपाशी मरणारे लोक त्यांना डोळ्यांपुढे दिसत; आणि त्यामुळे त्यांना जेवण गोड लागत नसे. ते मऊ बिछान्यावर निजले असताना घरादारावाचून आणि वस्त्रावाचून उघड्या हवेत थंडीने कुडकुडणाऱ्या लोकांची त्यांना आठवण होई, त्यामुळे त्यांना साऱ्या रात्रभर झोप येत नसे. ते कोर्टात आपल्या न्यायाधीशाच्या खुर्चीवर अकरा वाजता येऊन बसले, म्हणजे त्या दुपारच्या वेळी उन्हा-तान्हात काबाडकष्ट करणारे लोक आणि भाकरीच्या तुकड्यासाठी दारोदार हिंडणारे भिक्षेकरी त्यांच्या डोळ्यांसमोर दिसू लागत; त्यामुळे त्यांना बराच वेळपर्यंत काही कामकाज सुचत नसे. आपल्या पगाराचे रुपये मोजून घेताना, आपल्या निकालाने जे गरीब ऋणको दिवाणी तुरुंगात पडलेले असत व ज्यांचीं घरेदारे जप्त झालेली असत- त्यांची त्यांना आठवण येई. दिवाणी तुरुंगातील कैदी आणि जप्त झालेली घरे ही महिन्याच्या काठी दहा-पाच तरी मोकळी होत; पण ते कैदी आणि ती घरे ह्यांना कोण मोकळे करते, हे वादीला आणि प्रतिवादीला दोघांनाही क्वचितच माहिती असे. 

अशा रीतीने केशवराव सरकारची आणि देशाची- दोघांचीही चाकरी बजावीत असताना काही वर्षे लोटली. परंतु पुढे एकदा असा काही प्रसंग आला की, त्यामुळे केशवरावांच्या मनाला उपरती होऊन, त्यांनी आपल्या चाकरीचा राजीनामा दिला व ते पुण्यात सुखवस्तू येऊन राहिले. केशवरावांची स्वदेशभक्ती दिवसेंदिवस दृढ होत चालली होती. पण त्यांची प्रकृती मात्र उलट अगदी क्षीण होत चालली होती. म्हणून ते व्यायामाकरता दररोज फिरायला जात असत. 

नित्यक्रमाप्रमाणे एके दिवशी पहाटेस फिरावयास गेले असता, मधेच दमल्यामुळे ते एका स्वच्छ कातळावर विसावा घेण्यासाठी बसले. त्यांच्या पलीकडून एक लहानसा ओढा वाहत होता. त्याच्या पलीकडे काही गाई आणि वासरे चरावयाला लावून एक गोवारी आपले अलगुज वाजवीत एका झाडाखाली बसला होता. समोरून डेक्कन कॉलेजची उंच शिखरे धुक्यामधून अंधुक-अंधुक दिसत होती. त्याकडे केशवरावांचे लक्ष गेले. ती शिखरे पाहून केशवरावांना पूर्वीची आठवण झाली. त्यांच्या राहण्याची खोली त्यांना दिसू लागली. त्यांचे कॉलेजमधील सोबती त्यांच्या डोळ्यांपुढे उभे राहिले. त्या वेळची स्थिती आपण आता अनुभवीत आहो, असा त्यांना क्षणभर भास झाला. तरी पण ती स्थितीच त्यांच्या डोळ्यांपुढे फार वेळ राहिली नाही. त्या वेळच्या स्थितीवरून हल्लीच्या स्थितीची त्यांना आठवण झाली. हल्ली आपल्या लोकांचे होत असलेले हाल त्यांच्या डोळ्यापुढे प्रत्यक्ष दिसू लागले. आपल्या लोकांची हल्लीची दीन, हीन आणि परावलंबी अवस्था त्यांच्या मनाला विंचवासारखी चावू लागली. आपल्या लोकांच्या हल्लीच्या दारिद्य्रामुळे त्यांना दाही दिशा उदास भासू लागल्या. असे विचार मनात येऊन त्यांचा कंठ दाटून आला व डोळे पाण्याने भरून आले. अशा स्थितीत त्यांच्या मनात पुढील विचार आले... 

‘माझ्या लोकांच्या दुःस्थितीबद्दल मलाच इतके वाईट का वाटते आहे? तो पलीकडच्या झाडाखाली बसलेला गोवारी आपल्या गाई खडकीवर चारावयाला सोडून देऊन आपली व आपल्या गाईची करमणूक करण्याकरता आपले अलगुज वाजवीत आहे. तो माझ्या देशातीलच नव्हे काय? त्याचा आणि माझा- आमचा दोघांचाही- जन्म या हिंदुस्थान देशातच झालेला नाही काय? आणि मी ज्यांना आपले देशबांधव म्हणून समजतो, ते याचेही देशबांधव नाहीत काय? पण हे हिंदुस्थानातील लोक जितके माझे देशबांधव आहेत, तितकेच ते याचेही आहेत. तर मग या देशबांधवांच्या दैन्यावस्थेकरता मी दुःखाने रडत बसावे आणि याने मजेने अलगुज वाजवीत बसावे; असे का? असे का होते? याचे कारण काय?’ असे म्हणून केशवरावांनी आपली शून्य दृष्टी चोहोकडे फिरवली. इतक्यात धुक्यामधून अंधुक-अंधुक दिसणाऱ्या डेक्कन कॉलेजच्या शिखरांकडे त्यांची दृष्टी गेली. त्याबरोबर त्यांच्या तोडांतून पुढील उद्‌गार निघाले... 

‘याचे कारण हे कॉलेज! माझ्या देशातील लोकांच्या दुःस्थितीबद्दल मी कष्टी का आणि हा निष्काळजी का- याचे कारण हे कॉलेज! माझ्या देशातील लोकांच्या पेट्यांतून पैसे नसले म्हणजे माझ्या पेटीत असलेले पैसे नाहीसे होतात असे नाही. मग त्यांच्या दारिद्य्रासाठी मी का रडावे? आणि माझ्या देशातील लोक अन्नावाचून उपाशी मरत असले, म्हणजे माझ्यापुढे वाढून येणाऱ्या ताटातील पक्वान्ने काही कमी होतात असे नाही. मग मी त्यांच्या उपासमारीसाठी का कळवळावे? अशी वास्तविक स्थिती असता, मी मात्र त्यांच्यासाठी रडतो व कळवळतो आणि हा खुशाल मजेने अलगुज वाजवीत बसतो- हा काय न्याय झाला! पण हा सगळा फरक या कॉलेजाने उत्पन्न केला आहे. 

मी जर 25 वर्षांपूर्वी या कॉलेजात पाऊल ठेवले नसते, तर आज मीही याच्यासारखा दुसऱ्या एखाद्या झाडाखाली गाई चारीत आणि अलगूज वाजवीत सुखाने बसलो असतो. तेथील गवत सरले असते, तर मी आपल्या गाई घेऊन दुसरीकडे गेलो असतो. ज्या दिवशी मी या कॉलेजात प्रथम गेलो, तो दिवसच जर अजिबात उगवला नसता, तर आजचा हा दिवस उगवण्याच्या वेळी मला माझ्या दुःखमय स्थितीबद्दल पश्चात्ताप आणि या गोवाऱ्याच्या आनंदमय जीवनयात्रेबद्दल हेवा कधीही वाटला नसता! 

मला लहानपणी फारसे समजत नसे, त्यामुळे माझी मॅट्रिक्युलेशनची परीक्षा होण्याच्या आधीपासूनच मी कॉलेजबद्दल मनोराज्य करीत असे. मी कॉलेजमध्ये आलो, तेव्हाही माझ्या मनात फार आशा होत्या. पण आता त्या आशांत काही अर्थ नाही, अशी माझी खात्री होऊन गेलेली आहे. ह्या कॉलेजमधून शिकून बाहेर पडलो, म्हणजे मी अमुक करीन- आणि तमुक करीन असे मला वाटत होते. मी आपल्या देशाच्या काही तरी कामी येईन, आपल्या देशातील लोकांची दैन्यावस्था दूर करीन, आपला धर्म उत्कृष्टावस्थेला नेईन- अशा एक ना दोन, लक्षावधी महत्त्वाकांक्षा माझ्या मनात घोळत होत्या. पण या महत्त्वाकांक्षा कॉलेजमधल्या! कॉलेजमधल्या महत्त्वाकांक्षा आणि कॉलेजच्या बाहेरील जगांमधील वस्तुस्थिती यांच्यात किती अंतर? पण या अंतराची त्या वेळी किंचितही कल्पना नसते. 

मी कॉलेजमधून बाहेर आलो आणि जगाचा अनुभव घेऊ लागली, तेव्हा मला असे दिसून आले कीं, मला फारच थोडी स्वतंत्रता आहे; मला माझ्या देशाकरता आणि देशबांधवांकरता फारच थोड्या गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. मी पाहिजे तर शाळेत पोरे हाकलू शकेन, एखादा बिनकिफायतीचा धंदा चालवू शकेन किंवा काँग्रेसमध्ये शब्दापुढे शब्द ठेवून काही वाक्ये बोलू शकेन; पण याच्या पलीकडे आपले ज्यात खरे हित आहे, अशी कोणतीही गोष्ट आज आपल्यापैकी कोणालाही करता येण्यासारखी नाही, अशी माझी पूर्ण खात्री होऊन चुकली. कॉलेजात असताना माझ्या पुष्कळ आशा होत्या. पण कॉलेजमधून बाहेर पडल्यावर मी काय केले? वकिलीचा धंदा करून मी गरिबागुरिबांना नाडले आणि न्यायाधीश झाल्यावर मी सरकारचा तोंडपुजेपणा केला. याच्यापेक्षा आणखी मी काय केले? 

माझ्या वडिलांना फार वाटत होते की, आपल्या मुलाने कॉलेजमध्ये जाऊन वरिष्ठ प्रतीचे शिक्षण संपादन करावे. बाबा, तुमच्या इच्छेप्रमाणे मी कॉलेजमध्ये जाऊन शिकलो, काही दिवस तीनतीनशे रुपये पगारदेखील मिळविला; पण त्याचा काय उपयोग? स्वार्थ साधण्यासाठी मी कॉलेजमध्ये जाऊन शिकावे, अशी बाबा तुमची कधीही इच्छा नसेल. पण कॉलेजमध्ये शिकून मी दुसऱ्यांचा अर्थ काय साधला आहे? माझ्या हातून कोणते देशकार्य झाले आहे? किंवा कोणत्या देशबंधूचे दुःख माझ्या हातून निवारण झालेले आहे? पण या गोष्टी कॉलेजातील शिक्षणाने सध्याच्या काळी होऊ शकतील, अशी कल्पनाच मुळी चुकीची आहे. सध्याचा प्रसंगच असा आहे की, कोणी कोठेही शिकलेला असो, सर्वांचे हात-पाय सारख्याच रीतीने बांधले गेलेले आहेत व ते त्यांना काही नियमित मर्यादेपर्यंतच हलविता येतात; त्याच्या पलीकडे त्यांना काहीएक करता येत नाही. अशी स्थिती असल्यामुळे या कॉलेजच्या शिक्षणापासून काही तादृश फायदा होणे तर लांबच राहिले, पण उलट एक मोठा थोरला तोटा मात्र होतो. 

आपल्या देशस्थितीबद्दल मला वाईट वाटते आणि हा गोवारी निष्काळजी आहे, याचे मुख्य कारण हेच की- आपली, आपल्या देशाची, आपल्या लोकांची व आपल्या धर्माची काय दुर्दशा झाली आहे, हे मला कळते आणि याला कळत नाही. याला सांप्रतच्या आपल्या वस्तुस्थितीचे ज्ञान नाही आणि मला आहे; यामुळे हा सुखी आणि मी दुःखी, असा आमच्यात फरक पडला आहे. त्याच्या चार गाई हेच त्याचे राज्य, रानांतले कुरण हाच याचा देश, त्याचे झोपडे हाच याचा राजवाडा आणि या गाई व वासरे हीच याची संपत्ती! याची दृष्टी फार आकुंचित आहे आणि याचे क्षितिज अतिशय मर्यादित आहे. म्हणून हा भाग्यवान गोवारी सुखी आहे. परंतु माझी तशी स्थिती नाही. ह्या कॉलेजाने माझी दृष्टी विस्तृत केली आणि माझे क्षितिज अमर्याद केले. मीही या गोवाऱ्याप्रमाणे माझे कुरणे हाच माझा देश आणि माझी गाई-वासरे हीच माझी संपत्ती, असे मानले असते. पण हे कॉलेजाने माझ्या ठिकाणी आता अशक्य करून ठेवले आहे. ते सुख ह्या कॉलेजाने माझ्यापासून हिरावून घेतले. त्याने मला शिकवले की, गंगोत्रीपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व हिंदुस्थान हा तुझा देश आहे. 

याने मला सांगितले की, या हिंदुस्थान देशात अपार संपत्ती पूर्वी होती व अजूनही आहे व ती सर्व तुझी आहे. या गोष्टी याने मला सांगितल्या नसत्या, तर आज मला जे सूर्यप्रकाशाचे दिवस मेघाच्छादित वाटत आहेत आणि ज्या चांदण्याच्या रात्री अंधकारमय वाटत आहेत, त्या तशा का बरे वाटल्या असत्या? मी आपला वेळ अज्ञानाच्या सुखात मोठ्या आनंदाने घालविला असता! पण या कॉलेजाने आणि कॉलेजातील ज्ञानाने माझ्या सुखात माती कालविली!! ह्याने मला ह्या जगात कोठेही विश्रांतीचे ठिकाण म्हणून ठेवले नाही. तो गोवारी दिवसा पाहिजे त्या झाडाखाली आपले अलगूज वाजवीत बसू शकेल आणि रात्री पाहिजे त्या कातळावर झोप घेऊ शकेल. पण मला हे शक्य नाही. 

ज्या मैदानात मी हल्ली आहे, त्याचीच गोष्ट घेतली तरी जेथे तो गोवारी स्वस्थ बसला आहे, तेथील जागा पाहून माझ्या मनात वादळांवर वादळे उत्पन्न होत आहेत. तिथेच पूर्वी पेशवाई होती. तेव्हा पेशव्यांनी काही कामगिरीसाठी होळकरांना बोलाविले म्हणजे त्यांच्या सैन्याचा तळ त्या ठिकाणी पडत असे! ज्या लढाईने पेशव्यांची पेशवाई बहुतेक नामशेष झाली, ती लढाई- खडकीची लढाई- याच्याच आसपास कोठे तरी लढली गेली असली पाहिजे! त्या लढाईत आशा अपरिपूर्ण राहून धारातीर्थी पडलेले शूर लोक कदाचित्‌ अजूनही येथे पिशाचरूपाने हिंडत असतील. त्यांची भयंकर स्वरूपे माझ्या डोळ्यांपुढे दिसतात, ती या गोवाऱ्याला कोठे दिसत आहेत? मी कोठेही जाऊन कोणतेही ठिकाण पाहिले, तरी तेथील वैभव नाहीसे झालेले आणि तेथील संपत्ती लयाला गेलेलीच माझ्या दृष्टीस पडते. 

संपत्ती गेल्यामुळे भिकार झालेली शहरे आणि वैभव गेल्यामुळे उजाड झालेली गावे, ही सर्व मला ह्या कॉलेजानेच दाखवून दिली. ह्याने मला ह्या गोष्टी सांगितल्या नसत्या; तर रायगड, पुणे, सातारा, विजापूर, आग्रा, दिल्ली या ठिकाणातून पूर्वीचे दगड, विटा, चुना, लाकडे ही कायम असली, तरी तिथून काही तरी नाहीसे झाले आहे, असे मला कशाला वाटले असते? याने जर मला या गोष्टी सांगितल्या नसत्या, तर मी या ठिकाणी गेल्यावर शिवाजीचे थडगे, शनवारवाडा, अजीमताऱ्याचा किल्ला, गोलघुमट, ताजमहाल किंवा कुतुबमीनार पाहायला जाऊन तेथे डोळ्यांतून टिपे का बरे लागली असती? इतर लोकांप्रमाणे मलाही तेथे जाऊन मजा मारता आली नसती काय? पण माझी सर्व मजा या कॉलेजाने नाहीशी केली आहे! मी या कॉलेजावर एकदा अतिशय प्रीती करीत होतो; पण त्या वेळेला जर मला अशी कल्पना असती की, हेच कॉलेज पुढे माझ्या सर्व सुखात माती कालविणार आहे, तर मी याच्यावर कधीही प्रीती केली नसती. या कॉलेजातून विद्या मिळते व विद्या ईश्वराचाच अंश आहे, हे सर्व खरे. परंतु विद्येची कृती ईश्वराच्या कृतीपेक्षा पुष्कळ कमतरपणाची! ईश्वर मनुष्याला डोळे आणि हात अशी दोन्हीही इंद्रिये देतो. पण विद्या फक्त मनुष्याला डोळेच देऊ शकते, याच्यापेक्षा जास्त ती देऊ शकत नाही. आणि हेच तर वाईट! याच्यापेक्षा डोळे नसलेले बरे. टँटॅलस म्हणून एक लिडियाचा राजा होता. ह्याला काही अपराधाबद्दल अशी शिक्षा करण्यात आली होती की, त्याच्या हनुवटीपर्यंत त्याला पाण्यात बुडवून ठेवले होते. परंतु तहान लागली, तर त्याला ते पाणी पिता येणे शक्य नव्हते. त्याला ते पाणी डोळ्यांनी दिसत असे, पण हाताने घेऊन तोंडात घालता येत नव्हते. याच्यापेक्षा ते पाणी डोळ्यांनी न दिसते, तर टँटलसची तहान इतकी प्रक्षुब्ध झाली नसती. 

या कॉलेजातील ज्ञानाने, ज्यांनी ते संपादन केले आहे, त्यांची अशाच प्रकारची स्थिती करून सोडली आहे. त्या ज्ञानाने दृष्टी उघडल्यामुळे सर्व बरे व वाईट, आपले व लोकांचे, हल्लीचे व पूर्वीचे त्यांना कळते; परंतु कळण्यापलीकडे दुसऱ्या काहीच रीतीने आपली अवस्था सुधारून घेता येत नाही, अशी स्थिती आहे. अशा स्थितीत मला वाटते, ज्ञानी असल्यापेक्षा अज्ञानी असणे अधिक चांगले! आपल्याविरुद्ध उठलेल्या देवदूतांना देवाने नरक- लोकात ढकलून दिले, त्या वेळेला त्या ठिकाणी थोडासा उजेड होता; पण त्या जागेतील भयंकरपणा किती आहे, हे त्या पतित झालेल्या देवदूतांना दिसावे, एवढ्याचपुरता तो उजेड होता, असे मिल्टनने वर्णन केलेले आहे. त्या प्रकारचीच आमच्या ज्ञानाची स्थिती आहे. आमच्या देशाची आणि आमच्या देशातील लोकांची अवस्था किती भयंकर आहे, हे समजण्यासाठीच आमचे ज्ञान आहे. ‘दुःखसंवेदनायैव मयि चैतन्यमर्पितम्‌।’ हे जसे रामाने म्हटले आहे, तसेच मला वाटते. 

मलाही असे म्हणता येईल की, ‘दुःखसंवेदनायैव मयि विज्ञानमर्पितम्‌।’ असले पंगू ज्ञान ह्या कॉलेजाने मला दिले आणि त्याने धड मला ह्या तीरावरही स्वस्थ अलगुजे वाजवीत आणि गाई चारीत बसू दिले नाही आणि धड पलीकडच्या तीरावरही या जगातील स्पृहणीय व उन्नत स्थितीचा अनुभव घेण्यास मला नेले नाही तर एखाद्या भोक पडलेल्या नावेप्रमाणे याने मला या दुःस्थितीच्या नदीत मध्यावर आणून सोडून दिले आहे, अशी या कॉलेजाने माझी दुर्दशा करून टाकली आहे. याने मला निरनिराळ्या वेळचे आणि निरनिराळ्या लोकांचे इतिहास वाचावयाला दिले. मला ते इतिहास वाचून काय करावयाचे होते? ते इतिहास न वाचलेले लोक जगात थोडे आहेत काय? त्यातलाच मी एक झालो असतो, पण निदान रात्रीची मला सुखाची झोप तरी लागली असती. आणि आता सगळ्या जगाचा इतिहास माझ्या स्मृतीमध्ये साठविलेला असूनही माझ्या मनाला सुख म्हटले तर काडीइतकेही नाही. आपल्या देशातील पूर्वीचे इतिहास वाचून आपले पूर्वज कसे होते आणि आपण त्यांच्या पोटी कसे निर्माण झालो, हे विचार मनात येऊन वाईट मात्र वाटावयाचे आणि दुसऱ्यांच्या देशातील हल्लीचे इतिहास वाचून ते लोक आपले घोडे पुढे ढकलण्यासाठी किती धडपडत आहेत व आपण आपल्या उन्नतीविषयी किती उदासीन आहोत, असे विचार मनात येऊन उद्वेग मात्र उत्पन्न व्हावयाचा- ते इतिहासज्ञान आपल्याला कशाला पाहिजे आहे! 

अरे, गाई चारणाऱ्या गोवाऱ्या, अमेरिका-इंग्लिशांच्या अमलापासून स्वतंत्र झाली, जर्मनीने फ्रान्सला एकदा पादाक्रांत केले होते किंवा राघोबादादांनी अटकेवर झेंडे लावले- या गोष्टी तुला माहीत नाहीत, म्हणून तुझी न्याहारीची भाकरी तुझ्या जिभेला कडसर लागते काय? नाही! तर मग तुला हा इतिहास माहीत नाही म्हणून तुझे काय वाईट झाले आहे? आणि तो मला माहीत आहे म्हणून मी तुझ्यापेक्षा अधिक काय कमाविले आहे? उलट, मी आपल्या मनाची शांती मात्र त्याच्या योगाने घालवून बसलो आहे, ती माझी मानसिक शांती मला कोणी परत देईल काय? अरे, सुखात कालक्रमणा करणाऱ्या गोवाऱ्या, तुझ्या-माझ्या स्थितीची आपण अदलाबदल करू; येतोस काय? पण छे! छे! तुला असे फसवून उपयोगी नाही. माझ्या ह्या बाह्यात्कारी डामडौलाला भुलून तू कदाचित्‌ फसशील. माझे हे बूट, ही पाटलोण, हा कोट, ही पगडी- ही सर्व बाहेरून तुला मोहक दिसत आहेत. पण ह्याच्या आत सारे दुःखच भरलेले आहे. ज्या कॉलेजाने मला हे दुःखोत्पादक ज्ञान दिले, त्यानेच हा मला दुःखमय पोशाख दिलेला आहे! ह्यात सुख नाही, तेव्हा तुझी सुखांत स्थिती तुझ्यापासून घेऊन तुला माझ्या दुःखात टाकणे मला बरोबर दिसत नाही. हे ज्ञानजन्य दुःख माझे मलाच सहन केले पाहिजे; दुसरा उपाय नाही! 

या गोवाऱ्याची स्थिती मला स्पृहणीय वाटते. पण ती मला प्राप्त व्हावी कशी? ह्या कॉलेजने मला दिलेले ज्ञान माझ्यातून नाहीसे झाल्यावाचून मला त्याच्यासारखे सुख कसे प्राप्त होणार? हे दुःखजनक ज्ञान मी विसरून जाईन तर बरे! पण मी घोकलेले इतिहास आता विसरणार कसे? ग्रीक लोकांच्या पुराणात एक नदी वर्णिलेली आहे. तिचे पाणी प्यायले असता मागील सर्व स्मृती नष्ट होते म्हणून म्हणतात. तसल्या एखाद्या नदीच्या पाण्याने जर हे सगळे ज्ञान विसरून जाईल, तर किती बरे चांगले होईल! या कॉलेजच्या ज्ञानाने आम्हाला नास्तिक आणि धर्मभ्रष्ट मात्र केले आहे. दुसऱ्यांची उन्नतावस्था आमच्या डोळ्यांपुढे मांडून ती संपादन करण्याच्या अशक्यतेमुळे आमच्या मनात त्याने निराशा मात्र उत्पन्न केली आहे. अशा प्रकारचे ज्ञान असल्यापेक्षा नसलेले बरे! व ज्ञानापेक्षा अज्ञानच बरे. डोळे आहेत पण हात नाहीत आणि ज्ञान आहे पण कर्तृत्वशक्ती नाही, अशा स्थितीतील ते डोळे आणि ते ज्ञान नुसते घेऊन काय करावयाचे आहे? जेथे अज्ञानातच सुख आहे, तेथे सज्ञान होणे म्हणजे मूर्खपणाच होय.’ 

अशा प्रकारचे विचार केशवरावजींच्या मनात चालले होते, तो सूर्य बराच वर आला. धुके पडलेले हळूहळू कमी होत जाऊन कॉलेजचे शिखर स्पष्ट दिसू लागले. त्या मैदानातील गवतावर पडलेल्या दहिंवराच्या थेंबांवर सूर्यकिरणे प्रतिबिंबित झाल्याच्या योगाने हा इंद्रनीलमण्यांचाच मळा पिकला आहे की काय, असा भास होऊ लागला होता. तेथे जवळूनच जो ओढा वाहात होता, त्याच्या लहान-लहान लाटांवर सूर्यबिंबाची अर्धवट प्रतिबिंबे चोहोकडे पडल्यामुळे हा रत्नखचित जमिनीचा भाग आहे की काय, अशी शोभा दिसत होती. तो गोवारी आपल्या गाई घेऊन अलगूज वाजवीत घराकडे चालला होता. इतका उशीर झालेला पाहून केशवरावही घरी जाण्याकरता उठले. उठल्यानंतर केशवरावांनी डेक्कन कॉलेजच्या शिखराकडे एकदा फिरून पाहिले. पण त्यासरशी त्यांच्या डोळ्यांतून अश्रू आले. ते पुसून त्यांनी आपली दृष्टी त्या गोवाऱ्याकडे आणि त्याच्या गार्इंकडे लावली. पण काही वेळाने तो गोवारी आणि त्या गाई दिसेनाशा झाल्या, तरी पण त्या गोवाऱ्याच्या अलगुजाचा शब्द ऐकू येत होता, तोच ऐकत केशवराव किती तरी वेळ उभे राहिले. पण पुढे तोही ऐकू येईनासा झाला, तेव्हा दुःखाचा एक सुस्कारा टाकून केशवरावांनी आपल्या घराकडे जाण्यास हळूहळू सुरुवात केली. 

शिवराम महादेव परांजपे
जन्म : 1864, मृत्यू : 1929 

(1898 ते 1908 या दशकात ‘काळ’ या साप्ताहिकातून प्रसिद्ध झालेल्या निवडक लेखांचे अकरा खंड प्रकाशित झाले आहेत, त्यातील तिसऱ्या खंडातून हा लेख घेतला आहे.)  

Tags: काळ शिवराम महादेव परांजपे गोवारी डेक्कन कॉलेज आगरकर टिळक केसरी विनोद शिरसाठ केशवराव संपादकीय shivram mahadev paranjape vinod shirsath deccan collage nyayadhish judiciary sadhana editorial Kesavrao weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

शिवराम महादेव परांजपे

मराठी पत्रकार, निबंधकार, लेखक. तत्कालीन ब्रिटिश भारतातील ब्रिटिश शासनाच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध 'काळ' या मराठी साप्ताहिकातून त्यांनी केलेली टीकात्मक पत्रकारिता मराठी पत्रकारितेच्या इतिहासातील मानदंड समजली जाते.


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात