डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

या अनुभवामुळे माझ्या असे लक्षात आले की- आपल्याला जो काही बदल व्हावासा वाटतो, तो करण्याचे सामर्थ्य आपल्यातच आहे. माझ्या स्टॅनफर्ड विद्यापीठामधील खोलीत बसून ज्यूस पिता-पिता मला स्वात खोऱ्यातील एका मुलीचे आयुष्य  बदलण्याचा मार्ग सापडला होता. त्या शिबिरानंतर केवळ पाचच वर्षांनी हीच मुलगी (मलाला) जगाला शांततेचा संदेश देणारा सामर्थ्यवान आवाज बनली. 

हॅलो,
या कार्यक्रमात बोलण्याचे निमंत्रण मला मिळाले, तेव्हा माझ्या मनात भीतीची किंचित भावना दाटून आली होती. पण आता ती भावना राहिली नाही. मी तुमच्याशी काय बोलावे याविषयी विचार करू लागले तसे मला जाणवले की, माझ्याच आयुष्यातून जे तीन महत्त्वाचे धडे मी शिकले ते सांगावेत. आजचा माझा विषय आहे- ‘स्टार्ट नाऊ’ (आताच सुरुवात करा). कदाचित तुमच्यापैकी ज्यांना आताच काहीतरी आणि नवे करायचे आहे, त्यांना माझ्या आयुष्यातील हे तीन धडे उपयोगी पडतील, अशी मला आशा आहे. पहिला धडा आहे- इतर व्यक्तींच्या आयुष्याशी स्वतःला जोडून घेणे, हा ज्ञानप्राप्तीचा सर्वोत्तम मार्ग आहे.

कसे ते सांगते... माझा जन्म पाकिस्तानात झाला. माझे आई-वडील सर्वसामान्य कुटुंबातून आलेले होते. वडील सात वर्षांचे असतानाच अनाथ झाले होते. आमचा परंपरावादी समाज असल्याने माझ्या आईला कॉलेजात शिकण्यासाठी न पाठवता, तिचे लग्न करून दिले गेले. मात्र आमच्या आर्थिक परिस्थितीत परवडू शकेल असे सर्वोत्तम शिक्षण आम्हाला मिळावे, यासाठी माझ्या आई-वडिलांनी खूप कष्ट केले. त्यामुळे माझे बालपण चांगल्या घरात  गेले. पण सभोवती असे दिसत होते की, दिवसेंदिवस आपल्या समाजाची प्रगती होण्याऐवजी अधोगतीच होत आहे. समाजात गरिबीचे प्रमाण वाढत होते. स्त्रीपुरुषाच्या संख्येतील समतोल ढासळत होता. मूलतत्त्ववाद, धार्मिक कट्टरतावाद आणि दहशतवाद यांचे प्रमाण वाढत चालले होते. आजूबाजूला घडणारे हे सर्व बदल मला तेव्हा समजत होते असे नाही. मात्र, असे वाटत होते की- ज्यांना रोजच्या आयुष्यात या साऱ्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो आणि त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात, त्यांच्यापर्यंत तर मी जाऊ शकते. 

म्हणून मग वयाच्या चौदाव्या वर्षी मी स्त्रियांसाठी असलेल्या तुरुंगात जाऊ लागले. काही तरी गुन्हा केल्याची शिक्षा म्हणून तुरुंगात आलेल्या स्त्रिया तिथे होत्या. शिक्षा झालेल्या स्त्रियांची मुलेसुद्धा तिथे होती. ही अशी मुले होती, ज्यांचा जन्म तुरुंगातच झाला होता. त्यांनी बाहेरचे जग पाहिलेलेच नव्हते. त्यांना आपले म्हणेल असे या जगात कोणीही नव्हते. त्यामुळे, जन्म होण्यापूर्वीच तुम्ही इतरांना नकोसे होता, ही काय भावना असते, हे मला तिथे गेल्यावर समजले. त्या लहान मुलांच्या मनात हिंसा, द्वेष आणि चीड यांचीच निर्मिती होईल असे वातावरण तिथे होते. 

मी सोळा वर्षांची असताना माझा सर्वांत जवळचा मित्र मरण पावला. तो ज्या घरात राहत होता, ते घरच २००५ मध्ये पाकिस्तानात भूकंप झाल्यानंतर कोसळले होते. पुढील वर्षभर मी भूकंपाने खूप नुकसान झालेल्या लोकांसाठी असलेल्या मदतछावणीत जाऊन काम करत असे. त्या कामाद्वारे माझ्या मनातील दु:ख हलके करण्याचा प्रयत्न करत असे. त्या छावणीत काम करणाऱ्या मदतनीसांमध्ये मी एकमेव मुलगी होते. त्यामुळे स्त्रिया किंवा लहान मुलींबाबत येणारा कोणताही प्रश्न माझ्याकडेच येत असे. 

छावणीत त्या वर्षभराच्या काळात मला विविध स्वरूपाची कामे करावी लागली. उदा. तिथे अशाही काही स्त्रिया होत्या, ज्यांचे दूध छातीतच गोठून गेले होते. त्यांना घेऊन मी हॉस्पिटलमध्ये जात असे. किंवा, तेथील मुलींशी कडक उन्हाच्या वेळीसुद्धा तंबूच्या आत बसूनच बोलावे लागत असे. मनात इच्छा असली, तरी त्या मुली तंबूच्या बाहेर पडू शकत नव्हत्या. कारण त्या मुली इतर पुरुषांना दिसता कामा नयेत, अशी त्यांच्या वडिलांनी-भावांनी त्या मुलींना सक्त ताकीद दिलेली होती. जगातील सर्वांत खडतर, जगायला कठीण अशी परिस्थिती असूनसुद्धा त्यांना, केवळ त्या स्त्रिया आहेत म्हणून अशी वागणूक दिली जात असे. ‘स्त्री’ असणे हीच शरमेची गोष्ट आहे, ही  भावना नेमकी काय असते, हे मला तेव्हा लक्षात  आले. थोडक्यात काय तर, वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या लोकांबरोबर काम करताना मला जे शिकायला मिळाले, ते शाळेत किंवा पुस्तकात कधीच शिकायला मिळाले नसते.

प्रत्यक्ष लोकांमध्ये काम करण्यातून जे शिक्षण मला मिळाले, त्याच्या आधारेच मी माझ्या आयुष्यातील निर्णय घेतले आहेत. एवढेच नाही तर माझ्या व्यक्तिमत्त्वाची जडण-घडण त्याआधारेच झाली आहे. त्यामुळे तुमच्यापैकी ज्यांना असे वाटते की- आपल्याला ज्ञान मिळवायचे आहे, त्यांनी प्रश्नाच्या मुळाशी जायला हवे आणि जे लोक अशा समस्यांचा सामना रोजच्या आयुष्यात करत आहेत, त्यांना शोधायला हवे. त्यांच्याशी सहानुभूतीने वागायला हवे. कल्पनासुद्धा येणार नाही इतके यातून शिकायला मिळेल.

आता तुम्हाला माझ्या आयुष्यातून शिकलेल्या दुसऱ्या धड्याविषयी सांगते. दुसरा धडा आहे- तुमचे ज्या गोष्टींवर मनापासून प्रेम असते, त्यांच्यावर प्रभाव टाकण्याचे व त्यांना बदलण्याचे सामर्थ्य तुमच्यातच असते.

कसे ते सांगते... मी अठरा वर्षांची असताना मला अमेरिकेतील अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या स्टॅनफर्ड विद्यापीठात शिकायला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. तेव्हा मी अचंबित झाले होते. कारण एका नव्या जगाची दारे माझ्यासाठी खुली झाली होती. अमेरिकेत जाऊन काय करायचे, याच्या असंख्य कल्पना आणि शक्यता यांनी मनात गर्दी केली होती. तिथे गेल्यावर माझा वेडेपणा, धडपडण्याची वृत्ती पाहून, अमेरिकेतील प्राध्यापकांनी सांगितले की, तू एक ‘सोशल आन्त्रप्रेनर’ (कामामागील मूल्य आणि कामाचे परिणाम सामाजिक, मात्र कामामागील कार्यपद्धती उद्योजकाची) आहेस. मलाही वाटले की, मी खरोखरच तशी आहे. 

परंतु मी स्टॅनफर्डमध्ये शिकत असताना मला हेही जाणवत होते की, आपला पाकिस्तानी समाज गाळात अधिकाधिक रुतत चाललेला आहे. दहशतवादी हल्ल्याच्या बातम्या जवळपास दररोज येत होत्या. समाजात मूलतत्त्ववादाचा प्रभाव अधिकाधिक वाढत चालला होता. तेव्हा नेमके काय करावे, हे मला सुचत नव्हते. मनातून खूप भीती वाटत होती. रोज रात्री झोपायला जाताना मी माझ्या मोबाईल फोनची रिंग मोठ्याने वाजेल अशा रीतीने तो जवळ ठेवत असे. कारण ‘माझे कुटुंबीय एखाद्या हल्ल्यात सापडले असून, त्यांचे काही बरे-वाईट झाले आहे’, अशी बातमी देणारा फोन कधीही येऊ शकत होता.

मी विद्यापीठात दुसऱ्या वर्षात शिकत होते. बातम्या पाहत असताना, एका व्हिडिओमध्ये, स्वात खोऱ्यातील अकरा वर्षांची एक मुलगी तिथल्या हिंसाचाराविरुद्ध बोलत होती. ती मुलगी राहत होती त्या प्रदेशात तालिबानी (म्हणजे धार्मिक मूलतत्त्ववादाच्या आधारे लोकांवर सत्ता राबवणाऱ्या) लोकांनी स्त्रियांना शिकण्यास बंदी घातली होती. परंतु, त्या मुलीला मात्र शाळेत जायचे होते. तालिबानी लोकांच्या या आदेशाविरुद्ध कोणीच बोलायला तयार नव्हते, तेव्हा ती मुलगी ठामपणे म्हणत होती की, ‘माझी जगाला विनंती आहे, कृपा करून माझ्या शाळेला वाचवा. माझ्या स्वात खोऱ्याला वाचवा.’ 

तिचा तो व्हिडिओ पाहून मी अस्वस्थ झाले. मी जिथे लहानपणापासून वाढले, ते इस्लामाबाद शहर स्वात खोऱ्यापासून केवळ तीन तासांच्या अंतरावर होते. त्यामुळे त्या मुलीच्या जागी मीसुद्धा असू शकत होते! मला हे माहीत होते की, तिला मदत करायला हवी; परंतु नेमकी कशी मदत करावी, हे मला कळत नव्हते. त्यामुळे मी त्या मुलीच्या वडिलांशी संपर्क साधला आणि त्यांना विचारले की, ‘आपण काय करू शकतो?’

त्या वर्षीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी पाकिस्तानात आले, तेव्हा मी एक उन्हाळी शिबिर भरवायचे ठरवले होते. त्या शिबिरात मलाला आणि तिच्यासारख्या इतर मुलींना एकत्र आणायचे होते. आणि मी ज्या जगात राहत होते, त्या आधुनिक जगात त्यांना प्रवेश मिळवून द्यावा असे वाटत होते. ते शिबिर आयोजित करणे, हा माझ्यासाठी मन हेलावून टाकणारा अनुभव होता. आणि हे सारे मी कोणासाठी करत होते? तर, मलाला युसुफझाई नावाच्या एका अकरा वर्षांच्या मुलीसाठी! 

या अनुभवामुळे माझ्या असे लक्षात आले की- आपल्याला जो काही बदल व्हावासा वाटतो, तो करण्याचे सामर्थ्य आपल्यातच आहे. माझ्या स्टॅनफर्ड विद्यापीठामधील खोलीत बसून ज्यूस पिता-पिता मला स्वात खोऱ्यातील एका मुलीचे आयुष्य  बदलण्याचा मार्ग सापडला होता. त्या शिबिरानंतर केवळ पाचच वर्षांनी हीच मुलगी (मलाला) जगाला शांततेचा संदेश देणारा सामर्थ्यवान आवाज बनली. 

थोडक्यात सांगायचे तर, जगात आपल्या मदतीला येतील असे सुपर हीरो वगैरे कोणी नसतात. आपणच आपली मदत करू शकतो. कोणी तरी येईल आणि आपल्याला मदत करेल, अशी आपण ज्यांची वाट पाहत असतो, ते खरे तर आपणच असतो. आता तुम्हाला तिसऱ्या धड्याविषयी सांगते. तिसरा धडा आहे- आयुष्यात असे प्रसंग येतात, जेव्हा तुम्हाला स्वतःविषयी निर्णय घ्यायचे असतात. अशा प्रसंगी तुम्ही तुमच्या मनाचा आवाज ऐकायला हवा.

माझ्याही आयुष्यात असा निर्णय घ्यायचा क्षण २०१२ मध्ये आला. तेव्हा माझे स्टॅनफर्ड विद्यापीठातील शिक्षण संपले होते. मॅकिन्से नावाच्या व्यवस्थापनक्षेत्रातील एका प्रतिष्ठित कंपनीकडून मला नोकरीची ऑफर आली होती. स्टॅनफर्ड विद्यापीठातील  कोणत्याही पदवीधर तरुण-तरुणीला स्वप्नवत्‌ वाटेल अशीच ती ऑफर होती. मी ती नोकरी स्वीकारली आणि पश्चिम आशियातील दुबई नावाच्या शहरात आले. माझे नोकरीचे पहिले वर्ष रोमांचकारी होते. ते वर्ष मला खूप काही शिकवूनसुद्धा गेले. त्याच सुमारास हे लक्षात आले होते की, मी जर उलटसुलट निर्णय घेतले नाहीत, तर माझे करिअर सुरक्षित असेल.  

मॅकिन्से कंपनीत काम करायला सुरुवात करून एक वर्षच झाले होते. मी त्या वेळी काही कामानिमित्त इजिप्तमध्ये गेले होते. काम संपवून मी माझा फोन स्विच ऑन केला आणि फोनवर आलेला मेसेज पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ‘मलालावर गोळ्या झाडल्या गेल्या आहेत’ असे सांगणारा तो मेसेज होता. मी परतीच्या प्रवासात विमानात बसलेले असताना स्वतःशीच पुटपुटत होते, ‘अरे देवा, त्यांनी हे काय केले!’ झाले होते असे की, मलाला शाळेत जात असताना तिला रस्त्यात अडवण्यात आले होते आणि तिच्या डोक्यात मागच्या बाजूने अतिशय जवळून गोळी मारली होती. तिची परिस्थिती अतिशय चिंताजनक होती. त्या काळात आम्ही रोज दिवसा अशी प्रार्थना करत असू की, तिने आजची रात्र तरी जगावे. 

जगभरातील लोक तिच्या कहाणीमुळे हादरले होते. जेव्हा लोक तिच्यासाठी प्रार्थना करत नव्हते किंवा ती जगेल अशी आशा बाळगत नव्हते, कारण तेव्हा ते चिडलेले होते. एकविसाव्या शतकातसुद्धा एका मुलीला, केवळ ती शाळेत जाते या कारणासाठी डोक्यात गोळ्या मारल्या जातात, याचा लोकांना संताप आलेला होता. मला त्याच वेळेला लक्षात आले की, मलालाच्या उदाहरणामुळे एका चळवळीची सुरुवात झालेली आहे. या चळवळीमुळे जगाचा चेहरामोहराच बदलून जाणार आहे. 

तेव्हा मी माझे करिअर बाजूला ठेवले आणि ब्रिटनमधील बर्मिंगहॅम येथे गेले. सुरुवातीचे काही दिवस पाकिस्तानात उपचार केल्यानंतर पुढील उपचारांसाठी मलालाला बर्मिंगहॅमला आणण्यात आले होते. तिचे कुटुंब ज्या दिवशी बर्मिंगहॅम शहरात आले, त्याच दिवशी मीसुद्धा तिथे पोहोचले. त्या हल्ल्यानंतर ती वाचली, हे माझ्या दृष्टीने सर्वांत मोठे आश्चर्य होते. हॉस्पिटलमध्ये तिच्या बाजूला बसलेली असताना मी तिला विचारले, ‘‘मलाला, जगभरात असंख्य लोक तुझ्यासाठी प्रार्थना करत आहेत आणि तुला मदत करण्याची त्यांची इच्छा आहे. मी त्यांना काय सांगू?’’

तिने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली, ‘‘मी आता ठीक आहे. पण माझ्यासारख्याच इतर मुलींना मदत करण्यासाठी तू त्यांना सांगू शकशील का?’’ 

तेव्हाच मला हे लक्षात आले की, मलालाने केवळ एका चळवळीला प्रेरणा दिली आहे असे नसून, ती आता समोर आलेल्या अडचणींची पर्वा न करता लढत राहणार आहे. मात्र आता तिच्यासमोर पूर्वीपेक्षा मोठे व्यासपीठ होते. ती आता केवळ स्वात खोऱ्यातील मुलींच्या शिक्षणासाठी लढणार नव्हती, साऱ्या जगातील मुलींच्या शिक्षणासाठी लढणे हे तिचे लक्ष्य झाले होते. अशा वेळेस तिला विश्वासू सहकाऱ्यांची गरज होती. 

मला त्या वेळेस निर्णय घ्यायचा होता. मी माझी नोकरी करत राहावी, की मलालाबरोबर राहून पुढे काय करायचे याचे नियोजन करावे? तिचे उद्दिष्ट होते- जग बदलण्यासाठी प्रयत्न करायचे आणि मुलींना शालेय शिक्षणाचा मार्ग खुला करून द्यायचा. पण नोकरी सोडून मलालासोबत राहणे, या गोष्टीला मी तेव्हा तयार नव्हते. मला भीतीसुद्धा वाटत होती. पण हेही कळत होते की, हाच निर्णायक क्षण आहे. मग सर्व शंका बाजूला ठेवून, नोकरी सोडून मलालाच्या कार्यात उडी घ्यायचे ठरवले. त्यानंतर मी मागे वळून कधीच पाहिले नाही.

थोडक्यात, आपल्या आयुष्यात आपण असा एखादा निर्णय घेतो, ज्यामुळे आपले आयुष्य कायमचे बदलते. अशा निर्णयाच्या प्रसंगी स्वत:च्या मनाचे ऐकायला हवे. कुठे जायचे आहे, हे आपल्या मनाला कळत असते आणि ते आपल्याला चुकीच्या मार्गाने कधीही नेत नाही.

तर हे झाले माझ्या आयुष्यातून मी शिकलेले तीन धडे. माझे हे भाषण संपवताना मी तुम्हाला एक वाक्य सांगते- ‘मी मलाला आहे’. हे वाक्य मलालाने प्रेरणा दिलेल्या चळवळीचे प्रतीक आहे. हे असे वाक्य आहे, जे जगभरातील लोकांनी आपलेसे केले आहे. माझ्या आयुष्यातील तुम्हाला सांगितलेले तीन धडे यातून व्यक्त होतात. म्हणूनच मी माझ्या भाषणाच्या शेवटी एकच सांगू इच्छिते. 

‘मी मलाला आहे’ असे मी म्हणणार आहे, कारण इतर व्यक्तींच्या आयुष्याशी जोडून घेतल्याने संघर्ष करणारी एक मुलगी असणे म्हणजे काय, हे मला कळते. ‘मी मलाला आहे’, कारण माझ्या आयुष्याची सूत्रे मी माझ्या हातात घेते आणि मला योग्य वाटेल त्या पद्धतीने ते बदलायचा प्रयत्न करते. आणि ‘मी मलाला आहे’, कारण मी माझे आयुष्य बदलण्याचा निर्णय आज आणि रोजच मनापासून घेत आहे.

(अनुवाद : संकल्प गुर्जर)

 

Tags: शिझा शाहीद मलाला युसुफजाई तालिबान पाकिस्तान शिक्षण प्रेरणादायी टेड टॉक बालकुमार दिवाळी अंक संकल्प गुर्जर महिला शिक्षणहक्क Inspirational story Ted Talk 2017 Balkumar Diwali ank teenage Sankalp Gurjar woman Right to education Shiza Shahid Yusufjai Malala Taliban Pakistan Education weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके