डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

शौर्यच्या या चित्रकलेमुळे वयाच्या पाचव्या वर्षीच एक विलक्षण घटना घडली. रॅमन मॅगसेसे पुरस्कारविजेते, पद्मभूषणप्राप्त प्रख्यात व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांनी शौर्यला आपल्या पुण्यातील निवासस्थानी बोलावून घेतले. आणि त्याच्या चित्रकलेचे प्रात्यक्षिक पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. शौर्यने त्यांच्यासमोर एक चित्र काढून दाखवले. त्या वेळी त्याच्या कलेने लक्ष्मण आनंदित झाले. ‘कायम चित्र काढत राहा’ असा आशीर्वादही त्यांनी दिला.

आज आपण रंगांसोबत खेळणाऱ्या एका मुलाची गोष्ट वाचणार आहोत. आज तो बारा वर्षांचा आहे. 2011 मध्ये हा मुलगा चार वर्षांचा होता, तेव्हा त्याने काढलेल्या चित्रांचं मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये प्रदर्शन भरलं होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे, संपूर्ण प्रदर्शन फक्त त्याच्या चित्रांनीच सजलं होतं. प्रदर्शन भरलं एवढीच आश्चर्याची गोष्ट नाहीये, तर हा मुलगा ‘स्वतःची पेंटिंग स्टाईल’ असणारा जगातला सर्वांत लहान चित्रकार म्हणून ओळखला जातोय. या मुलाचे नाव आहे शौर्य महानोत! मध्य प्रदेश राज्यातल्या निमच या छोट्या शहरात राहणारा शौर्य त्याच्या अमूर्त चित्रशैलीसाठी ओळखला जातो. अमूर्त चित्रांना इंग्रजीत ॲब्स्ट्रॅक्ट  पेंटिंग म्हणतात.

अमूर्त चित्र किंवा ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंगबद्दल तुम्ही कधी काही ऐकलंय? तुम्हाला कधी एखादं ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग बघायला मिळालंय? नाही? हरकत नाही. पण कधी तरी एखाद्या संध्याकाळी निळं आकाश दिसत असताना, त्यावरून हळूच सरकणारे पांढरे ढग बघणं आणि त्या ढगांमध्ये दिसणाऱ्या विविध आकृती शोधणं, असा खेळ तुम्ही कधी खेळला आहात का? निश्चित खेळला असणार! या खेळाची एक गंमत म्हणजे, आपल्यासोबतच्या प्रत्येक व्यक्तीला एकाच ढगात वेगवेगळ्या आकृती दिसतात! ‘ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग्ज’चंसुद्धा असंच काही तरी आहे. ही पेंटिंग्ज आपण बघतो तेव्हा त्यात काही रंग ओतल्यासारखे, पसरवल्यासारखे दिसतात आणि त्यातूनच काही आकार आपोआपच तयार झालेले दिसतात. या पेंटिंग्जकडे बघणाऱ्या प्रत्येकालाच त्यात वेगवेगळे काही तरी दिसू शकते. म्हणूनच तर त्याला अमूर्त म्हणतात. अमूर्त किंवा ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजेच जे मूर्त नाही.

थोडक्यात काय, तर ज्या चित्रांत प्रत्येकाला आपले आकार शोधता येतात, अर्थ लावता येतात- ती अमूर्त/ॲब्स्ट्रॅक्ट चित्रे. बाप रे! इतक्या लहान शौर्यला हे सगळं कसं काय माहीत? त्याने त्याचं पहिलं चित्र कसं काढलं असेल? त्याला हे कुणी शिकवले असेल?- असे खूप सारे प्रश्न तुमच्या मनात आले ना? तर एकदा घडलं असं...

शौर्यच्या मोठ्या बहिणी श्रेया आणि श्रुती रंगांचे डबे व कागद घेऊन चित्र काढत बसल्या होत्या. काही तरी कामानिमित्त आईने त्यांना बाहेरच्या खोलीत बोलवलं. बराच वेळ त्या काही परत आल्या नाहीत. खेळत-खेळत तीन वर्षांचा शौर्य त्यांच्या खोलीत पोहोचला, तेव्हा त्याचं लक्ष त्या रंगांच्या डब्याकडे गेलं. त्याला ते रंग इतके आकर्षक वाटले की, त्याने त्यातले काही रंग कागदावर मनसोक्त ओतले आणि पूर्ण ताकदीने आपले हात वेगवेगळ्या प्रकारे त्या कागदावर फिरवले. बराच वेळ तो त्यात रमला होता. काही वेळाने त्याच्या बहिणी आल्याने तो एकदम भानावर आला.

शौर्यने केलेला हा पराक्रम पाहून एका बहिणीने आईला मोठ्याने हाक मारली.  हाक मारल्याबरोबर शौर्य घाबरला आणि पटकन जाऊन एका टेबलाखाली लपला. आई आली आणि झालेला प्रकार पाहून ती थक्क झाली. तिने शौर्यला प्रेमाने बाहेर बोलावून घेतले आणि त्याचे भरभरून कौतुक केले. संध्याकाळी शौर्यचे बाबा घरी आल्यानंतर आई आणि दोघी बहिणींनी मोठ्या कौतुकाने शौर्यचे चित्र बाबांना दाखवले. बाबाही ते पाहून खूप आश्चर्यचकित झाले. त्याची बहीण बाबांना म्हणाली, ‘‘शौर्यच्या मनात रंगांबाबतीत एक अनामिक आकर्षण तर आहेच, पण त्याला त्याची आवडसुद्धा दिसत आहे. आपण त्याला रंगांचा बॉक्स आणि काही कॅनव्हास गिफ्ट देऊ या का? त्याला ते आवडेल.’’

आणि तिथूनच शौर्यचा चित्रकलेचा प्रवास सुरू झाला. तो त्याच्या आकारापेक्षा मोठ्या कॅनव्हासवर तासन्‌तास बसून त्यावर वेगवेगळे रंग शिंपडायचा. कधी कधी तर त्यासाठी वेगवेगळ्या करामतीही करायचा. आता पाहा हां- जसं आपण क्रिकेट खेळताना बॉलिंग करतो, तसं हातात रंगाने माखलेला ब्रश घेऊन, खांद्यापासून गोल हात फिरवत तो समोर असलेल्या कॅनव्हासवर त्या ब्रशमधले रंग शिंपडायचा. त्याला त्यात मजा वाटायची आणि काही वेळानंतर समोर एक अद्‌भुत चित्र तयार झालेलं असायचं. शौर्यला रंगनिवडीचे ज्ञानही जणू काही ‘गॉड गिफ्ट’ आहे, असं त्याचं चित्रं पाहणाऱ्या प्रत्येकाला वाटायचं.

तेव्हा शौर्य इतका लहान होता की, त्याला त्याच्या रंगांच्या बाटल्यासुद्धा स्वतःहून उघडता येत नव्हत्या. त्याचे मोठमोठे कॅनव्हास आणि पेंटिंगसाठी लागणारं सारं सामान आणण्यासाठी, आवरण्यासाठी, नीट रचून देण्यासाठी, त्याच्या दोन्ही बहिणी आणि आई-वडील खूप मदत करायचे.

शौर्यचे बाबा आणि आजी हेसुद्धा उत्तम कलाकार आहेत, मात्र निमचसारख्या छोट्याशा शहरात राहत असल्याने त्यांची कला फार लोकांपर्यंत पोहोचली नाही. आपल्या मुलाबाबत असं होऊ नये, म्हणून ते कुटुंब शौर्यच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. या क्षेत्राबद्दलची विविध प्रकारची महत्त्वाची माहिती शौर्यला मिळवून देणे, त्याला लागणाऱ्या वस्तू आणून देणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, त्याच्यावर कोणतीही जबरदस्ती न करणे; त्याच्या मनाप्रमाणे त्याला वाटेल तेव्हा, वाटेल तितका वेळ चित्र काढत राहू देणे- अशा प्रकारे त्याचे कुटुंबीय त्याला वागवतात. कधी कधी तर शौर्य चित्र काढता-काढताच खेळायला पळतो, भलतंच काही तरी काम करतो किंवा थोडा वेळ ब्रेक घेऊन मग उरलेलं चित्र काढतो.  

अर्थात, शौर्य काही दिवसभर चित्रच काढत बसत नाही. काही वेळा कार्टून बघतो. शाळेचा होमवर्क करायला त्रासही देतो. कधी कधी बास्केट बॉल, क्रिकेट या खेळांमध्ये रमतो आणि इतकं सगळं करून परत रंगांच्या दुनियेकडे धाव घेतो. शौर्य इतका लहान आहे की, त्याला चित्रांबाबत तांत्रिक गोष्टी माहीतसुद्धा नाहीत. म्हणजे अगदी त्याने दोन रंग मिसळून तिसरा नवा रंग तयार केला तरी त्याला त्या रंगाचं नावसुद्धा सांगता येत नाही. मात्र त्याला त्या रंगांचे स्पर्श आवडतात. वेगवेगळ्या रंगांना एकत्र करणं आवडतं. त्यातून तयार होणाऱ्या नक्षी, आकार त्याला भावतात. मजा येते म्हणून तो पेंटिंग करतो. जेव्हा जसा मूड असतो तसे रंग तो निवडतो, कॅनव्हासवर ते उतरवतो.

शौर्यचा आवडता पेंटर जॅक्सन पोलॉक आहे आणि गंमत म्हणजे जगभरातल्या अनेक लोकांनी शौर्यला छोटा जॅक्सन पोलॉक असंदेखील म्हटलं आहे. या जॅक्सन पोलॉकची गोष्टसुद्धा वेगळीच आहे. जॅक्सन 1912 मध्ये अमेरिकेत जन्माला आला. भित्तिचित्रे काढण्यामध्ये त्याचं शिक्षण झालं होतं. पण नंतर त्याने ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग सुरू केलं. तो भल्या मोठ्या कॅनव्हासवर रंग ओतायचा आणि संपूर्ण शरीराचा जोर वापरून ते रंग पसरवायचा. कधी कधी तर तो ब्रशऐवजी चाकू, झाडूच्या काड्या, काठ्या, वाळू या वस्तूसुद्धा वापरायचा. त्यातून चित्राला एक वेगळाच इफेक्ट यायचा. कधी कधी तर त्याच्या चित्रांवर त्याच्या पायाचे ठसेदेखील असायचे.

जॅक्सन पॉलॉकचं असं म्हणणं होतं की, अशा प्रकारे चित्र काढल्याने अंतर्मनातल्या भावना कॅनव्हासवर उमटतात आणि चित्र पाहणाऱ्यापर्यंत विविध पद्धतीने पोहोचतात. या कलेच्या प्रकाराला ॲब्स्ट्रॅक्ट एक्स्प्रेशनिझम असं म्हणतात. या प्रकारात फारसे नियम नसल्याने, कलाकाराने स्वतःचीच एक नवी शैली तयार करून ही चित्रं काढायची असतात. कधी कधी याला  ‘ऑटोमॅटिझम’ असंसुद्धा म्हणतात. याचा अर्थ असा की- तुम्हाला कशाचं चित्र काढायचं आहे, तुमच्या डोक्यात कोणता विषय घोळत आहे, अशी कुठलीही आखणी तुम्ही चित्र काढण्याआधी बनवत नाही. अशी चित्रं बनवण्यासाठी बाय चान्स किंवा अनपेक्षितपणा याचा वापर करता.

हे इतकं मजेशीर आहे की, याची एक कृती तर आपण करून बघायलाच पाहिजे. उदाहरणार्थ एक कागद आणि पेन घ्या. कागदावर पेनाचे टोक कुठे तरी ठेवा आणि तुमचे डोळे बंद करून वाटेल तिकडे तो पेन फिरवा. काही वेळानंतर डोळे उघडा आणि ढ्याणटॅढ्याण! या प्रकारातली तुमची पहिली कलाकृती साधारण तयार झाली!

तर, जितकी गंमत आपल्याला ही कलाकृती करताना येईल, तितकीच मजा शौर्यला त्याचे चित्र काढताना येत असते. केवळ रंगांसोबत खेळणे इथपर्यंत शौर्य थांबला नाही, पुढच्या काहीच वर्षांत त्याने स्वतःची एक वेगळी शैली शोधून काढली. या शैलीत तो त्याचे ठरलेले रंग त्याला आवडत असलेल्या पद्धतीने कॅनव्हासवर पसरवतो. नंतर ते चित्र वाळेपर्यंत थांबतो आणि मग काही विशिष्ट आकारात किंवा पद्धतीने त्या चित्रावर चिकटपट्टी चिकटवून, त्यावर पांढऱ्या रंगाचा एक हलकासा थर देतो आणि तो थर वाळल्यावर त्या चिकटपट्‌ट्या ओढून काढतो. त्यानंतर निर्माण झालेलं चित्र अद्‌भुत असतं.

शौर्य आता बारा वर्षांचा आहे. सर्वांत लहान वयाच्या चित्रकारांपैकी एक असणाऱ्या या शौर्यने आजवर त्याच्या एकट्याच्या चित्रांची प्रदर्शने ठिकठिकाणी भरवली आहेत. त्यातील काही नावं सांगायची तर- न्यूयॉर्क येथील आर्टएक्स्पो, मुंबईमध्ये मायक्रोसॉफ्ट्‌स फ्युचर डिकोडेड प्रदर्शनात. अमेरिकेतील  न्यू जर्सी येथील गॅलरीमध्ये तो फिचर्ड आर्टिस्ट आहे. अमेरिकेतील जॉन लेनोन हा संगीतकार व अँथोनी क्वीन या अभिनेत्यांच्या चित्रांसोबतही त्याची चित्रे प्रदर्शनात लागली आहेत. आजपर्यंत एकूण 62 हजार डॉलर्स इतकी कमाई त्याच्या चित्रांनी केली आहे!

शौर्यच्या या चित्रकलेमुळे तो पाच वर्षांचा होता तेव्हा एक विलक्षण घटना घडली. रॅमन मॅगसेसे पुरस्कारविजेते, पद्मभूषणप्राप्त विख्यात व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांनी शौर्यला पुण्यातील निवासस्थानी बोलावून घेतले होते आणि त्याच्या चित्रकलेचे प्रात्यक्षिक पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. शौर्यने त्यांच्यासमोर एक चित्र काढून दाखवले. त्या वेळी लक्ष्मण त्याच्या कलेने आनंदित झाले. ‘कायम चित्र काढत राहा’ असा आशीर्वादही त्यांनी दिला, त्याचा सत्कारही केला.

एका नामवंत व्यंगचित्रकाराकडून अशी दाद मिळणे ही शौर्यसाठी खूप भारावून टाकणारी गोष्ट होती. शौर्यने स्वतःची वेबसाईटसुद्धा स्वतःच डिझाईन केली आहे. तिथे त्याच्या चित्रांविषयी, आजवरच्या प्रवासाविषयी माहिती उपलब्ध आहे. त्याची सुंदरसुंदर चित्रेही इथं पाहायला मिळतात. नेहमीप्रमाणे या कामीही त्याला कुटुंबीयांनी मदत केली.

आणि हो, आणखी एक विशेष म्हणजे, नुकताच त्याने मायक्रोसॉफ्टबरोबर एक करारही केला आहे. या करारांतर्गत तो त्याची ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग्ज डिजिटल पद्धतीने बनवणार आहे. शौर्यचे आई-वडील पुष्पा व आदित्यसिंग महानोत, दोन बहिणी श्रेया व श्रुती आणि त्याच्या कलेची जाण असणारे इतर लोक यांच्यामुळे शौर्यला अनुकूल वातावरण मिळत गेले. त्यामुळे तो त्याच्या संपूर्ण क्षमता अजमावू शकत आहे. ‘मोठेपणी तुला काय व्हायला आवडेल?’ असं एका मुलाखतीत विचारल्यावर शौर्य अगदी निरागसपणे म्हणाला, ‘‘आर्टिस्ट.’’ तुमच्या आमच्यातसुद्धा असा एक आर्टिस्ट कायम असतो. आपण आपल्यातला असा आर्टिस्ट शोधण्याचा प्रयत्न केला, तर तो कुठल्या ना कुठल्या रूपात सापडेलच.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

दिपाली अवकाळे,  पुणे
deepaliawkale.25@gmail.com

संचालिका, स्वानुभव इंडिया ह्युमन डेव्हलपमेंट प्रा. लि.


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके