डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘थर्ड आय’ : आशियाई चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने...

नोव्हेंबर महिन्यात मुंबईत ‘थर्ड आय’हा आशियाई चित्रपट महोत्सव पार पडला.तमिळ, कानडी, बंगाली, हिंदी या भाषेतील चित्रपटांयाशिवाय इराणी, चिनी, जपानी चित्रपटही या महोत्सवात प्रदर्शित झाले. या महोत्सवातील ‘पोएट ऑफ द वेस्टस्’ दिग्दर्शक मोहम्मद अहमदी (इराण) व ‘सायलेन्ट ऑनर’ दिग्दर्शक अनुज अनवर्तने (श्रीलंका) हे चित्रपट मला विशेष आवडले. अलीकडे प्रदर्शित झालेला ‘तारे जमीन पर’या चित्रपटात अमीर खानची महत्त्वाची भूमिका असून, दिग्दर्शक म्हणून अमीरचा हा पहिलाच चित्रपट आहे. दिग्दर्शकांचे पहिले चित्रपट या दृष्टीने वरील तीन चित्रपटांविषयी थोडेसे…

चित्रपट : ‘सायलेन्ट ऑनर’
(स्थानिक भाषेत- निराला गीरा) 
दिग्दर्शक- तनुज अनवर्तने, 
चित्रपट कथा- योलांड विरसिंगे 

अंमली पदार्थांचा अवैध व्यापार व गुन्हेगारी यातून उभी रहात असलेली समांतर व्यवस्था श्रीलंकेस मोठी डोकेदुखी झालेली असल्यामुळे, या संघटित गुन्हेगारीविरुद्ध पावले उचलण्याची मोठी जबाबदारी कायदेमंत्री सालिया (रवींद्र रंडेनिया) यांच्यावर येऊन पडते. सालिया अत्यंत कार्यतत्पर मंत्री. आई, पत्नी राधा (नीना फर्नांडो), कुमारवयीन मुलगा अर्जुन असा त्याचा परिवार, कोलंबो जवळील उच्चभ्रू समाजात रहात असतो.घर सुखसोयींनी समृद्ध असते. परंतु फुरसत काढून पत्नीशी बोलणं किंवा कुटुंबासाठी वेळ देणे मंत्रीमहोदयांना शक्यच होत नसते. छोट्या अर्जुनचे अप्रतिम पियानो वादन मात्र राधाचे मन प्रसन्न करण्यास हातभार लावत असते.

श्रीलंकेत अंमली पदार्थ भूतान व नेपाळ येथून आणले जात असल्याने त्याविरुद्धसार्क संघटनेच्या सहकार्याने परिणामकारक उपाययोजना करण्याच्या उद्देशाने कोलंबो येथे सार्क देशांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली जाते. या सरकारी हालचालीचा ड्रग्ज माफियांना सुगावा लागतो. बैठकीत देश-प्रतिनिधींची भाषणे झाल्यावर करारावर सह्या होण्यापूर्वी कायदेमंत्री सालिया भाषण देण्यासाठी उभे राहतात. ड्रग्ज माफियांनी आपली तयारी केलेली असते व समारंभ स्थळाजवळ दबा धरून बसलेला एक बंदूकधारी मारेकरी मंत्र्यावरनेम धरतो आणि चाप ओढतो. तेवढ्या क्षणात मुलगा अर्जुन सालियांना काहीतरी सांगण्यासाठी पुढे येतो. त्या मारेकऱ्याची गोळी त्याचा अचूक वेध घेते, अर्जुन तेथेच प्राण सोडतो.

कुमारावस्थेतील अर्जुनचा क्रूर हत्येचा राधा साहजिक पुणे जबरदस्त धक्का पोहोचतो. अर्जुनने शिक्षणातील हुशारी सोबतच पियानो वादनात विशेष नैपुण्य मिळवलेले असते. प्रोत्साहनाच्या दृष्टीतून राधाने अर्जुनच्या छंदात मनोमन रस घेतलेला असतो. तो जागतिक किर्तीचा पियानोवादक होणार हे त्या मातेचे स्वप्न असते. परंतु ते स्वप्नच राहते. राधाला या क्षणी अत्यावश्यक असलेला मानसिक आधार अगोदरच कामात व्यस्त असलेल्या सालियांकडून मिळणे शक्य नसते. शिवाय सासूकडून तसा आधार मिळण्याची शक्यता नसते. पुत्रवियोगाने निराश झालेल्या राधास आता आपले जगणे निरर्थक वाटू लागते. दिवसेंदिवस एकलकोंडी झालेल्या राधाची स्थिती दयनीय होत जाते. हवापालट, प्रवास या
उपायांनी तिची मानसिक स्थिती काही केल्या सुधारत नाही.

मंत्री महोदयांच्या परिचयातील स्त्री.सिंथिया हे सर्व पाहून त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने पुढे येते. राधाला पूर्ववत करण्याची ग्वाही मंत्रीमहोदयांना देऊन तिला आपल्यासोबत नेते. आणि एका इसमाशी ओळख करून देऊन ‘आजपासून हा तुझा डॉक्टर’असे सांगून मार्को (सौम्य लियानगे) या अंमली पदार्थांचा धंदा करणाऱ्या बोगस डॉक्टरच्या ताब्यात राधाला देते. राधाला प्रथम तो सिगरेटमधून अंमली पदार्थ देण्याचा खूप प्रयत्न करतो. ती त्यास विरोध करते. परंतु मार्को आपले प्रयत्न चालूच ठेवतो, अखेर राधा त्यास बळी पडते. अंमली पदार्थाच्या सेवनाने मन हलके झाल्याने तिला ते हवेहवेसे वाटू लागते. हळूहळू ती पूर्ण: व्यसनाधीन होते. अर्जुनची किंवा मंत्रीमहोदयांची आठवणही तिला येईनाशी होते. ‘त्या’ डॉक्टरच्या ती पूर्णतः अधीन होते, तो तिचा शरीर सुखासाठी व अंमली पदार्थ व्यवसायासाठी उपयोग करू लागतो. नाईट क्लब, डान्स पार्टी या ठिकाणी येत असलेली अंमली गिऱ्हाईके आता राधाच्या परिचयाची झालेली असतात. विक्रीचे अनेक व्यवहार तिच्यासमक्ष होऊ लागतात.

त्याचवेळी प्रखर टिकेचे लक्ष्य झालेल्या मंत्रीमहोदयांना अंमली पदार्थाच्या व्यवसायाविरुद्ध कडक मोर्चेबांधणी करणे क्रमप्राप्त होते. श्रीलंकेत अंमलीविरोधातील उपाययोजना वाढवली जाते. एकदा एका समुद्रकिनाऱ्याच्या जवळ अंमलीपदार्थ विक्रीचा फार मोठ्या प्रमाणावर सौदा ठरत असतो, तेव्हा पोलीसपथकाची त्यावर धाड पडते. डॉक्टरच्या गाडीत अंमली साठा सापडतो व त्याच गाडीत राधाही असते.साहजिकपणे तिलाही अटक होते. गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असल्याने अटक झालेल्यांना मोठी शिक्षा होते, राधा मंत्र्यांची पत्नी असूनही तिला तुरुंगात पाठवले जाते.

तुरुंगात सुरुवातीला व्यसनापासून दूर राहणे राधाला कठीण जाते, तेथील जीवनशैली इतर कैदी यांच्याशी जुळवून घेताना राधाला कठीण जाते. आलेल्या नैराश्येमुळे ती जीव देण्याचा प्रयत्नही करते, तेव्हा दुसरी महिला कैदी राधाला वाचवते. दोघींच्यात एक स्वाभाविक जवळीक निर्माण होऊन दोघी एकमेकींचा आधार बनतात. त्या महिलेला असलेल्या लहान मुलीशी राधाचा परिचय होतो. तुरुंगात येण्यापूर्वी ‘त्या’डॉक्टरला बळी पडलेल्या राधेत त्याचा वंश वाढत असतो. यातून होत असलेली सामाजिक टीका व घरातून आईकडून येत असलेले दडपण यापुढे नमून मंत्री राधेला कायदेशीर फारकत देऊन टाकतात. राधाही वैद्यकीय मदतीने आपली सोडवणूक करून घेते.

राधाविषयी आपुलकी असलेल्या कैदी महिलेचा एकदा राग अनावर होतो व झटापटीत दुसऱ्या एका कैदी महिलेचा तिच्या हातून जीव जातो. तिला मृत्युदंडाची शिक्षा होते. फाशी जाण्यापूर्वी ती आपली मुलगी मातृत्वास पारखी झालेल्या राधाकडे सुपूर्द करते. थोड्याच महिन्यात राधाची शिक्षा संपून ती मैत्रिणीच्या मुलीसह तुरुंगाबाहेर येते. दिशाहीन राधा जायचे कुठे असा विचार करीत एका दिशेने चालू लागते. तोच लाल दिव्यांच्या मोटारींचा एक ताफा तिच्या मागून येतो व पुढे निघून जातो. ताफ्यातील एका गाडीत मंत्री सालिया आहेत, हे तिच्या लक्षात येताच ती सोबतच्या मुलीचा दंड पकडते व झटकन विरुद्ध दिशने चालायला सुरुवात करते व आत्मनिश्चयाने स्वावलंबनाची व सन्मानाची वाट निश्चित करते.

सुरुवातीस उच्चभ्रू राहणीतील आई राधानंतर कल्पनेपलीकडच्या संकटात गुरफटते. म्हणून राधाच्या भूमिकेतील नीना फर्नांडोवर चित्रपट पाहताना अधिक लक्ष केंद्रित होते. तिने दोन्ही प्रकारच्या जीवनशैलीत लक्षात ठेवण्यासारखे काम केले आहे. रवींद्र रंडेनीयने उभा केलेला मितभाषी परंतु स्मार्ट मंत्री सालिया कमी वावर मिळूनही प्रभावी वाटला. ड्रगमाफिया (सौम्य लियानगे) आणि त्याची अतिउत्साही व महत्त्वाकांक्षी मैत्रीण सिंथिया यांचे जिवंत अभिनय प्रेक्षकांनाही चीड आणणारे वाटले. दिग्दर्शक म्हणून तनुज अनवर्तनेचा हा पहिलाच चित्रपट 95 मिनिटांची आटोपशीर लांबी. नेमके संवाद, प्रसंगांची जिवंत उभारणी यामुळे विषय गंभीर असूनही चित्रपट शेवटपर्यंत लक्ष वेधून घेतो व मनाची कायम पकड घेत राहतो. यांचे श्रेय दिग्दर्शक तनुज अनवर्तनेकडे जाते.

चित्रपट : ‘पोएट ऑफ द वेस्टस्’
(इराण) 
दिग्दर्शक- मोहम्मद अहमदी 

शिक्षित असूनही रस्ते झाडून व कचरा गोळा करणाऱ्या गाडीवर काम करून स्वत:चे पोट भरणाऱ्या स्वप्नाळू युवकांवर (फरझिन मोहदिस) ‘पोएट ऑफ द वेस्टस्’हा चित्रपट आहे. घरांच्या दारापाशी ठेवण्यात येणाऱ्या पिशव्या हुडकताना त्याला एकदा फाडून टाकलेल्या कागदावर लिहिलेली पत्र आढळतात. कधीकधी एका बंद घरातील दाढीवाल्या कवीबरोबर (मोहम्मद एसकंदारी) वार्तालाप करण्याची संधीही घेतो. तो कभी त्या झाडूवाल्या युवकावर खूष होऊन त्याला आपला काव्यसंग्रह भेट देतो. परंतु कपट्याच्या स्वरूपातील ती पत्रे मात्र त्याला स्वस्थ बसू देत नाहीत.ज्या घरापाशी ती पत्र मिळतात ते घरही शोधून ठेवतो. फुरसतीच्यावेळी इतरत्र वेळ न दवडता पत्रांचे कपटे जुळवून ती वाचण्याचा प्रयत्न करताना त्याला त्या पत्रामागील आशय, लिहिणाऱ्या व्यक्तीच्या भावना यांचा थोडाफार उलगडा होत जातो. अपघातात आपला प्रियकर गमावलेली एक दुःखी स्त्री परदेशात असलेल्या भावास पत्राद्वारे आपल्या अडचणी व व्यथा कळवते. इतके त्या युवकास समजते व त्याची त्या दुःखी स्त्रीशी भावनिक जवळीक उत्पन्न होते. प्रसंगी वेळात वेळ काढून तो नकळत तिच्यामागे सावलीप्रमाणे राहून तिच्याशी जवळीक साधल्याच्या समाधानात राहतो.

परंतु तो प्रत्यक्ष तिला भेटत नाही, असे करताना तो थोडाफार अडचणीतही येतो, पण तो ती सहन करतो. त्या स्त्रीस भावाकडून व्यवस्थित प्रतिसाद मिळत नाही व तिला त्याच्याकडे जाण्यासाठी व्हिसाही मिळण्यास अडचणी येत आहेत. इतपत माहिती त्या युवकास मिळते.म्हणून तिला दिलासा मिळावा यासाठी भावाच्या नावाने पत्र लिहून ती त्या स्त्रीच्या लेटर बॉक्समध्ये सरकवतो व ती पत्रे घेते याची लांब उभा राहून खात्री करतो. शक्यतो ती दुःखी-कष्टीराहू नये याकरता तो जमेल तसे प्रयत्न तिच्या अपरोक्षपणे करत राहतो.

दुसरीकडे त्या दाढीवाल्या कवीकडून कचरा मिळाला नाही किंवा त्याचे दर्शनही झाले नाही, म्हणून त्याला राहवत नाही.शिडीने तो कवीच्या घरात शिरतो तर तेथे कवी मृतावस्थेत आढळतो. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांच्या मथळ्यात त्याच कवीचा फोटो त्याला सर्वत्र दिसतो आणि एका प्रसिद्ध कवीशी आपला परिचय होता याचे समाधान त्या युवकास वाटते.

संपूर्ण चित्रपटातील घटना एकाच रस्त्याच्या जवळपास किंवा त्या युवकाची झोपडीवजा खोली येथे घडताना दिसतात. असे असूनही युवकाची स्वगते व त्याच्या कल्पना यामुळे कुठेही कंटाळवाणे वाटत नाही. निरागस चेहरा, हळुवारपणा, स्वतःशी पुटपुटणे यांच्याद्वारे फरझिन या कलाकाराने उभा केलेला युवक पाहताना भडकपणा जाणवत नाही. मोहम्मद अहमदीने दिग्दर्शित केलेल्या या पहिल्याच चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेख आहे.

चित्रपट : ‘तारे जमीन पर’
(अमीर खान प्रॉडक्शन्स) 
दिग्दर्शक- अमीर खान, 
लेखक- अमोल गुप्ते 

घोड्याच्या शर्यतीत घोडे जलद पळवून जिंकण्याची इर्शा आणि आपल्या पाल्यावर अभ्यासाचे मानेवरल्या ‘जू’प्रमाणे सतत टेन्शन ठेवून, त्याच्याकडून टक्केवारीची अपेक्षा करणे यात तसा फरकच राहिलेला नाही. स्वीकारलेल्या शिक्षणपद्धतीचे आपण बळी ठरत आहोत, हे खरे असले तरी विद्यार्थ्यांवर काय अन्याय होत असेल याचा विचार सर्वसाधारणत: केला जात नाही हेही तितकेच सत्य.

इशान असाच एक नऊ वर्षीय शाळकरी विद्यार्थी. त्याचा मोठा भाऊ शिक्षणात ठीक, पण इशानची लक्षणे मात्र अगदी वेगळी. वर्गात शिक्षक शिकवत असताना तो स्वत:चे लक्ष इतरत्र भिरभिरवतो.

पुस्तकातील शब्द त्याच्यापुढे तरंगतात.वाचताना शब्दांचे अर्थ तो इतके विचित्र लावतो की शिक्षिका त्याच्यावर नेहमी संतापतात. परंतु इशानला त्याची गंमत वाटते. ‘तीन नव्वे किती’विचारले तर तो नजरेसमोर नवग्रह आणून उत्तर सांगण्याचा प्रयत्न करतो. शिक्षणात त्याचे डोके असे भलतीकडे भन्नाट चालते. शिकवलेले समजण्याच्या क्षमतेचा अभाव इशानमध्ये असला तरी त्याच्यापाशी काही चांगले कलात्मक गुणही आहेत. दुर्दैवाने त्याकडे शिक्षकांचे, महत्त्वाकांक्षी पालकांचे दुर्लक्ष होऊन इशानचा कोंडमारा होतो.

शाळेच्या कोंडमाऱ्यातून सुटका करून घेण्याकरता एकदा शाळेला दांडी मारून मुंबईच्या रस्त्यावरून स्वच्छंदपणे भटकायचे तो ठरवतो, असे करण्याने त्याची शाळेतील रागीट शिक्षक व हेटाळणी करणारे मित्र यांच्यापासून सुटका होते. रस्त्यावर काढलेली चित्रे, मोकळेपणे खेळणारी मुलं, गाडीवर मिळणारा बर्फाचा गोळा यांचा अनुभव घेता येतो. बापाच्या खांद्यावर बसून बर्फाच्या गोळ्याची मजा चाखणारा मुलगा पाहून इशानला अप्रूप वाटते. शाळा बुडवून इशानने केलेली भटकण्याची बंडखोरी पाहून त्याचे वडील (बिपिन शर्मा) नाराज होतात, आणि त्याला पाचगणीच्या बोर्डींग स्कूलमध्ये दाखल करतात. इशानच्या विरोधाकडे ते दुर्लक्ष करतात.

बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवूनही इशानमध्ये काहीही सुधारणा होत नाही. अभ्यासात दुर्लक्ष झाल्याने त्याची वारंवार हजेरी घेतली जाऊन शिक्षाही होते. परंतु प्रगती होण्याची काहीच लक्षणे दिसत नाहीत. एकदा इशानच्या शाळेत आलेल्या राम शंकर निकुंभ सरांचे इशानकडे लक्ष जाते.इशानप्रमाणेच समस्येत अडकलेल्या मुलांच्या शाळेत असल्याने इशानची ‘ही’ समस्या त्यांना नेमकी समजते. त्याच्यातील वैगुण्ये न पाहता, त्याच्यातील सुप्त गुण व त्याची कला याकडे ते आग्रहाने पाहतात आणि त्याचे चित्रकलेतील नैपुण्य पाहून ते भारावतात. चित्रकला, आवाज व इतर क्लृप्त्या योजून निकुंभ सरांचे इशानला शिकवणे सुरू होते. अर्थातच ते बोर्डिंग स्कूलच्या अनुमतीने, अशा पद्धतीच्या शिकवणीने इशानला अभ्यासात गोडी लागते व तो व्यवस्थित प्रगतीपथावर येतो. इशानची बंडखोरी निवळून त्याला निकुंभ सर फार प्रिय वाटू लागतात.

अधिकाधिक गुण मिळवण्याकरता कोवळ्या व अजाणत्या पाल्यावर आणली गेलेली दडपणे, शिक्षेचा जाच, पालकांच्या पाल्याविषयी अवास्तव अपेक्षा या सर्वत्र आढळणाऱ्या समस्यांचा निकुंभ सरांच्या भूमिकेतून अमीर खानने ‘तारे जमीन पर’चित्रपटात अतिशय सूक्ष्मपणे वेध घेतला आहे. संवेदनशील मनाच्या विद्यार्थ्यांना आत्मीयतेने हाताळताना निकुंभ सरांचा हळुवारपणा लक्षात राहतो. विशेष म्हणजे स्वतःप्रथमच दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात अमीर खानची भूमिका मनावर ठसा उमटवणारी आहे. परंतु इशानने प्राप्त केलेले उत्तम गुण दाखवले गेल्याने प्रेक्षकांच्या मनात स्वाभाविकपणे गोंधळ उडतो.

दर्शीलने मनापासून उभा केलेला इशान इतका परिणामकारक आहे व त्यालाच चित्रपटाचा नायक म्हणावेसे वाटते. तीन नव्वे हे गणित सोडवताना इशानचे मन ग्रह-ताऱ्यात भरकटून पृथ्वी व प्लुटोसमोर येणे हा प्रसंग अ‍ॅनिमेशन तंत्राद्वारे पडद्यावर आणल्याने परिणाम साधला गेला आहे. ते पाहताना गंमत येते. बोर्डिंग स्कूलच्या प्रसंगापर्यंत चित्रपट मनावरची पकड सोडत नाही. परंतु पुढे एकंदर चित्रपट लांबत चाललाय असे जाणवते, त्यामुळे तो शेवटपर्यंत पाहताना चुळबुळ टाळावी म्हटली तरी टाळता येत नव्हती. शंकर अहसान यांचे पार्श्वसंगीत चित्रपटाचा मूड सांभाळण्यात हातभार लावणारे आहे.

छोट्यांचा असूनही मोठ्यांना विचार करायला लावून त्यांना जमिनीवर आणणारा हा चित्रपट!

Tags: अमीर खान तारे जमीन पर तनुज अनवर्तने सायलेन्ट ऑनर दिग्दर्शकांचे पहिले चित्रपट मोहम्मद अहमदी  चित्रपट ‘पोएट ऑफ द वेस्टस्’ weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके