डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘साधना'ची जबाबदारी स्वीकारल्यानंतर डॉ. श्रीराम लागू यांच्या नाट्यविषयक जीवन- प्रवासाचा मागोवा घेणारे 'जडण-घडण' हे त्यांचे आत्मनिवेदन प्रसिद्धीस मिळणे हा माझा व 'साधना'चा मोठाच बहुमान होता. ते कसदार लेखन विलक्षण वाचकप्रिय ठरले. त्या कालखंडानंतरच्या नाट्यप्रवासाचा पुढील भाग आता डॉक्टर लिहीत आहेत. या अंकापासून ‘साधना’ त तो क्रमशः प्रसिद्ध होईल. आम्ही कृतज्ञ आहोत. - संपादक, साधना.
 

1969 च्या जानेवारीत मी भारतात परतलो. आल्याआल्या अर्थातच 'नोकरी' शोधायला लागलो. तीन वर्षांपूर्वी आफ्रिका गेलो त्याआधीच मी जवळजवळ महाराष्ट्रभर, 'एक उदयोन्मुख नट' म्हणून माहीत झालेलो होतो. 'जगन्नाथाचा रथ', 'वेड्याचं घर उन्हात', 'मी जिंकलो, मी हरलो,' 'खून पाहावा करून', 'यशोदा' अशा नाटकांतील माझी कामे चांगली गाजली होती. पी.डी.ए. आणि रंगायन या दोन्ही प्रायोगिक नाट्यसंस्थांच्या लौकिकात आणि यशात माझा वाटा सर्वमान्य होता. किंबहुना, मराठी हौशी, प्रायोगिक रंगभूमीवरचा एक अग्रगण्य अभिनेता म्हणून माझा लौकिक होता. तेव्हा मी भारतात परतल्यावर (आणि तोही व्यावसायिक नट होण्याचा निर्णय घेऊन!) मराठी रंगभूमी माझ्यासाठी पायघड्या घालून मला प्रेमालिंगन देईल अशी माझी भाबडी समजूत होती! माझी बोट आफ्रिकेहून येऊन मुंबईच्या धक्क्याला लागली तेव्हा माझ्या स्वागतासाठी मराठी रंगभूमीची कुणीच माणसे धक्क्यावर आलेली नाहीत, म्हणून मी त्याचवेळी थोडा हिरमुसला झालो होतो!

मी व्यावसायिक नट होण्याचा निर्णय घेऊन भारतात परततो आहे. यापुढे डॉक्टरी करण्याचा माझा अजिबात विचार नाही, हे माझ्या घरच्यांना आणि माझ्या ज्येष्ठ स्नेह्यांना मी आफ्रिकेतूनच पत्राने कळविले होते. या माझ्या निर्णयाचे कुणीच फारशा उत्साहाने स्वागत केले नव्हते. त्यांनी ते तसे करावे अशी अपेक्षाही मी केली नव्हती. पण माझा निर्णय पक्का आहे म्हटल्यावर ही सगळी मंडळी भक्कमपणे माझ्या पाठीशी उभी राहतील, याची मला खात्री होती. माझ्या हट्टीपणाबद्दल त्यांचीही खात्री होती! ज्या कारणांसाठी ह्या सुहृदांचा माझ्या निर्णयाला विरोध होता, ती कारणे महत्त्वाची आहेत, हे मलाही कळत होते. मी त्यावेळी बेचाळीस वर्षांचा होतो. म्हणजे निम्म्यापेक्षा अधिक आयुष्य संपून गेलेले होते. माझी आई आणि दोन शिकत्या मुलांची जबाबदारी माझ्यावर होती. अशा परिस्थितीत,व्यवस्थित चाललेला वैद्यकीय व्यवसाय बंद करून ज्या नाट्यव्यवसायात कसलीच शाश्वती कुणीच देऊ शकत नाही, अशा अस्थिर व्यवसायात उडी घालणे मुळीच शहाणपणाचे नाही, हे मलाही दिसत होते. पण माझा निर्णय शहाणपणाचा आहे, असा मुळी माझा दावाच नव्हता! एका आंतरिक निकडीपायी मला तो निर्णय घेणे भाग होते. त्याला माझा इलाज नव्हता. निर्णय घेताना 'विचार'च म्हणायचा तर मी एवढाच केला होता की समजा, व्यावसायिक नट म्हणून मी अयशस्वी ठरलो, तर माझा वैद्यकीय व्यवसाय आहेच की! तो मी केव्हाही परत सुरू करू शकतो! पण आत्मविश्वास एवढा वाटत होता की नट म्हणून अयशस्वी होण्याची कल्पनाही मनाला शिवत नव्हती. त्या आत्मविश्वासाला मात्र विचाराचा आधार खूपच होता.

एकोणीसशे तीस-चाळीस साली रडतखडत कशीबशी जिवंत असलेली मराठी रंगभूमी आता साठीनंतर चांगलीच तरारून उभी होती. शिरवाडकर, अत्रे, कानेटकर, कालेलकर, कोल्हटकर, तेंडुलकर असे नाटककार लिहीत होते. मा.दत्ताराम, नाना फाटक, मामा पेंडसे, भेंडे, घाणेकर असे नट नाटके गाजवीत होते. प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने पुन्हा नाटकाकडे वळत होता. विशी तिशीत नाकाशी सूत धरल्यासारखी वाटणारी मराठी रंगभूमी आता सत्तरीत नव्या सुवर्णयुगाची प्रभात पाहत होती आणि या सगळ्यांत आपले स्थान नगण्य असणे शक्य नाही, असे ठामपणे वाटत होते.

तरुणपणी पाहिलेले हॉलिवुड दिग्गज नट आठवत होते. त्यांच्या तुलनेत आपण कमी पडू कदाचित पण आज मराठी रंगभूमीवर जे नट गाजताहेत त्यांच्यापेक्षा आपण कणभरही कमी नाही; असलो तर काकणभर सरसच असू, असे मन सांगत होते. आणि त्याला अहंकाराचा जरासुद्धा वास नव्हता. केवळ वस्तुस्थितीची स्वच्छ जाणीव होती. त्यामुळे कुणाबद्दल असूया, मत्सर वाटण्याचा प्रश्नच नव्हता. माझ्या भावाने (श्रीकांत) मला एका पत्रात लिहिले होते, 'व्यावसायिक नट होण्याचा निर्णय घेताना तुला एका महत्त्वाच्या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आज मराठी रंगभूमीवर काशिनाथ घाणेकर हा सर्वश्रेष्ठ नट मानला जातो. त्याच्याशी तुला स्पर्धा करावी लागेल.’ ते वाचून मी खूप हसलो होतो. मी म्हटले, ‘मला कुणाशी स्पर्धा करण्यासाठी, नंबर मिळवण्यासाठी, किंवा माझी श्रेष्ठता सिद्ध करण्यासाठी रंगभूमीवर जायचेच नाही. माझे रक्त मला तिकडे खेचते आहे, म्हणून मला रंगभूमीवर जायचे आहे!’

त्या वेळचे, सर्वात जास्त काम असलेले नट म्हणजे मास्टर दत्ताराम, अनेक नाटके त्यांची संबंध पाठ होती. ते जवळजवळ दर दिवशी दोन किंवा तीन नाट्यप्रयोगांत कामे करीत. त्यावेळी त्यांची प्रयोगाची 'नाईट' शंभर रुपये होती म्हणे. म्हणजे महिना जवळजवळ आठ-नऊ हजार रुपये झाले! म्हणजे आजचे जवळजवळ चाळीस पन्नास हजार! ते म्हणे, मराठीतील त्यावेळचे एकमेव नट असे होते, की त्यांची मुले 'कॉन्व्हेन्ट'मध्ये शिकत होती! ह्या हिशेबाने (तो खरा की खोटा कुणास ठाऊक) सुद्धा मला चांगलाच दिलासा दिला. इतके पैसे जर व्यावसायिक नटाला मिळू शकतात तर ते आपल्याला मिळणारच या खात्रीने मी निर्धास्त झालो!

माझ्या काही निकटवर्तीयांनी असाही मुद्दा काढला, की माझे आजवरचे आयुष्य तसे सुखासीन गेलेले आहे आणि नाटककंपन्यांच्या दौऱ्यांची दगदग, त्यांची बेशिस्त मला झेपायची नाही. जे नट लहानपणापासूनच अशा दगदगीला सरावलेले असतात त्यांची गोष्ट वेगळी पडते. पण वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी एकदम आयुष्याचा ढांचा बदलायचा, ही गोष्ट आरोग्याला घातक ठरू शकते. मुद्दा बरोबरच होता. आणि मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे या मुद्याचे महत्त्व मला कळत होतेच. पण मी चांगलाच सुदृढ होतो. लहानपणापासून व्यायाम करीत राहिल्याने तब्येतीची काहीच तक्रार नव्हती. आफ्रिकेतसुद्धा मी टेनिस, स्कॉश असले घामटे कातणारे खेळ खेळत होतो. आणि नुकताच एकोणीस हजार फूट उंचीचा पर्वत किलिमांजारो- चढून आलो होतो. शिवाय पी.डी.ए. आणि रंगायनच्या नाटकांच्या वेळी अगदी स्टेज झाडण्यापासून पडतील ते कष्ट करत होतोच की!

आणखी एक महत्वाचा मुद्दा काही मित्रांनी काढला. त्यांचे म्हणणे असे की पी.डी.ए. काय किंवा रंगायन काय- सुशिक्षितांच्या, सुसंस्कृतांच्या संस्था होत्या. तेथील वातावरण, तेथील हिशेब बहुतांश नाटकाच्या भोवती फिरत असत. सदैव विचार नाटकाचा, साहित्याचा, संगीताचा, चित्रपटाचा इत्यादी नाटकाशी संबंधित कलांचा असे. व्यावसायिक नाटक कंपन्या म्हणजे प्रामुख्याने पैशाचा विचार करणाऱ्या धंदेवाईकांचे अड्डे. कलाविचार तिथे असलाच, तर तो अगदीच दुय्यम असणार. आपल्या वातावरणात फार काळ काढता येणार नाही- गुदमरायला होईल. जळात राहून माशांशी फटकून राहता येणार नाही!

या मुद्द्याचा मात्र मी विचार केला नव्हता. मी व्यावसायिक नाटके खूप पाहिली असली, तरी व्यावसायिक नाटक-कंपन्यांतील वातावरण असे असते हे मला काहीच माहीत नव्हते. पण माझा एकंदर स्वभावच एकलकोंडेपणाकडे झुकणारा होता. सदैव माणसांच्या गराड्यात राहणारा मी नव्हतोच. त्यामुळे या प्रश्नाचा फार बाऊ मी केला नाही.

या सर्वापेक्षा फार महत्त्वाचा मुद्दा होता मुलांचा. आनंद मॅट्रिक झालेला-बिंबा दोन वर्षांनी मॅट्रिक होणार. दोघांचे पुढचे सगळे शिक्षण व्हायचे. अशावेळी त्यांना स्थैर्याची ग्वाही असावी लागते. पालकांची- त्यांच्या साहचर्याची आणि मार्गदर्शनाची फार गरज असते. मी व्यावसायिक नट होणार म्हणजे माझी सारखीच भटकंती चालणार. दौऱ्यांच्या निमित्ताने मी आठआठ, पंधरापंधरा दिवस घरापासून दूर असणार; तेव्हा मुलांनी काय करायचे?

हा कळीचा प्रश्न सोडवला आईने आणि भाऊ वहिनींनी (विजय आणि रश्मी). त्यांनी असे ठरवले की मुलांनी पुण्यालाच त्यांच्याजवळ राहावे. नाहीतरी गेली तीन वर्षे मी आफ्रिकेत असताना मुले पुण्याला त्यांच्याजवळच होती. मी व्यवसायानिमित्त मुंबईकर होणार, हे उघडच होते. मी कुठेही भटकत राहिलो तरी मुलांची माझ्याबरोबर फरफट नको हा विचार फारच महत्त्वाचा होता. तो प्रत्यक्षात आला. आई आणि विजय-रश्मी यांनी मुलांना आई-बापांची उणीव मुळीसुद्धा भासू दिली नाही म्हणूनच मी पुढे एवढ्या भराऱ्या मारू शकलो.
०००
म्हणजे मी व्यावसायिक नाटकाच्या समुद्रात उडी ठोकण्याचा निर्णय पूर्ण विचारांती घेतला, असे आता म्हणायलाही हरकत नाही!

निर्णय घेतला- पण हारतुरे घेऊन आपले मराठी रंगभूमीवर स्वागत होईल; व्यावसायिक रंगभूमी आपली चातकासारखी वाट पाहत असेल वगैरे- तसले काहीच झाले नाही. नाटक निर्मात्यांचे उंबरठे झिजवायचे वगैरे तंत्र मला अजिबात ठाऊक नव्हते. तेव्हा माझ्या ज्येष्ठ स्नेह्यांनाच त्रास देऊ लागलो. वसंत कानेटकर, तात्यासाहेब शिरवाडकर, विजय तेंडुलकर हे ते ज्येष्ठ स्नेही. पहिले दोघे नाशिक, तेंडुलकर मुंबईला आणि मी पुण्याला. मला असे वाटे की हे तिघे म्हणजे मराठी रंगभूमीचे भक्कम खांब आहेत. यांनी कुठल्याही नाट्यनिर्मात्याकडे नुसता शब्द टाकला की मला नाटकात काम मिळून जाईल. त्यामुळे मी ऊठसूट मुंबई-नाशिकला चकरा मारू लागलो. पण काही जमेलसे दिसेना. मी तर अगदी उतावळा झालो; मिळेल त्या कंपनीत मिळेल ते काम करण्याची तयारी दाखवली.

खरे म्हणजे नाटक आवडल्याशिवाय, त्यातील भूमिका आवडल्याशिवाय मारून मुटकून नाटकात काम करायचे नाही, असा माझा दंडक होता. इतक्या वर्षांत तो दंडक मोडण्याची पाळी माझ्यावर आली नव्हती. पण आता मी ते करायलाही तयार होतो.

मग एक दिवस वसंतराव मला म्हणाले, ‘डॉक्टर, तुम्ही चुकीच्या काळात परत आलात. आपल्या व्यावसायिक नाटक कंपन्यांची साधारणपणे अशी पद्धत आहे की नवीन नाटक ते पावसाळ्यात बसवायला घेतात आणि पावसाळा संपतासंपता ते बाहेर काढतात. त्यामुळे आत्ता नवीन नाटकाचा कुणी विचारच करीत नाही.' मी मटकन् खालीच बसलो. आत्ताशी जानेवारी संपत होता. म्हणजे अजून सहा महिने थांबावं लागणार! तोपर्यंत मी जिवंत तरी राहीन का? मी चडफडत पुण्याला परतलो. मग असा विचार केला की आपण इथे नव्हतो त्यामधील तीन वर्षांत मराठी नाटकात आणि सिनेमात कायकाय फरक पडला आहे ते पाहून घ्यावे. म्हणजे आपल्याला कुठल्या पीचवर बॅटिंग करायची आहे, त्याचा तरी अंदाज येईल.

एकूण चित्र खूपच आशादायक वाटले. व्यावसायिक नाट्यप्रयोगातील बेशिस्त आणि वाह्यातपणा बराच कमी झालेला दिसला. ‘अबोल झाली सतार' हे पुरुषोत्तम दारव्हेकर लिखित नाटक अगदीच भावुक आणि उथळ होते. पण दारव्हेकरांनीच बसवलेला त्याचा प्रयोग, रंगायनची आठवण व्हावी इतका शिस्तबद्ध, सुविहीत आणि देखणा होता. व्यवसायाने प्रायोगिकांची शिस्त उचलल्याचे ते सुचिन्हच होते. 'कथा अकलेच्या कांद्याची' या नाटकात निळू फुले आणि 'विच्छा माझी पुरी करा' मध्ये दादा कोंडके हे दोन अफलातून नट मराठी रंगभूमीवर अपूर्व धिंगाणा घालत होते! 'कट्यार काळजात घुसली' या नाटकात प्रिय मित्र वसंतखाँ देशपांडे सर्वंकष नाटकाचे अत्यंत प्रभावी दर्शन घडवीत होते. निराशा केली ती वसंतराव कानेटकरांच्या गाजलेल्या ‘अश्रूंची झाली फुले' या नाटकाने. वसंतरावांच्या लिखाणातील प्रेक्षकशरणता जाणवण्याइतपत धोकादायक वाटली- आणि नाटकाच्या प्रयोगात साऱ्याच कलावंतांनी अभिनयाचा भलताच अतिरेक करून प्रयोग पार बटबटीत करून टाकला. 'रायगडात’ संभाजीचे काम उत्कृष्ट करणारा काशीनाथ पारच प्रेक्षकांच्या आहारी गेला होता. पाहून वाईट वाटले. आफ्रिकेत असताना, वाचून मला अतिशय आवडलेल्या, तेंडुलकरांच्या ‘शांतता! कोर्ट चालू आहे.' या नाटकाचा प्रयोग मिळाला. 'सतीश दुभाषी' नावाचा (अबोल झाली सतार मध्ये आधी पाहिलेला) विलक्षण ताकदीचा नट लक्षात ठसला. 

प्रायोगिक रंगभूमीवरही पडझड झालेली दिसती होती. 'रंगायन'मधून अरविंद-सुलभा आणि 'शांतता कोर्ट'चा सारा जथ्था फुटून बाहेर पडला होता. त्यांनी 'आविष्कार' नावाची नवी संस्था काढली होती. दारव्हेकर व्यावसायिक रंगभूमीवर अवतरल्यामुळे नागपूरची त्यांची 'रंजन कलामंदिर' ही संस्थाही डळमळीत झाली होती. 'पी.डी.ए.’ मध्ये जब्बार पटेल आणि त्याचे तरुण सहकारी अस्वस्थ होते. विजया मेहतांनी व्यावसायिक नाटकात पाय टाकला होता.

चित्रपटाबाबत माझा मार्गदर्शक माझा तरुण मित्र जब्बार पटेल. 'पी.डी.ए.च्या 'खून पाहावा करून' नाटकाच्या वेळी जब्बार मेडिकल कॉलेजात जात होता. मी आफ्रिकेहून परत आलो त्यावेळी तो डॉक्टर होऊन पुण्याच्याच एका हॉस्पिटलमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत होता. त्यामुळे आमच्या बऱ्याच वेळा भेटीगाठी होत. त्यावेळी लक्षात आले की जब्बारच्या डोक्यात नाटक जितक्या जोरात पिंगा घातले आहे, त्यापेक्षा अधिक सिनेमा पिंगा घालत आहे. त्याने मला दोन गोष्टी पुनःपुन्हा सांगितल्या. एक म्हणजे सिनेमाचे एकदम फिरून गेलेले डोके बरेच ताळ्यावर आले आहे आणि त्याला कारणीभूत दोन नये दिग्दर्शक आहेत; एकाचे नाव आहे गुलजार आणि दुसऱ्याचे हषीकेश मुखर्जी. त्याने सांगितलेली दुसरी गोष्ट म्हणजे 'तुमच्या दिलीपकुमार च्या तोंडात मारील असा एक नट सध्या राज्य करतो आहे. त्याचे नाव आहे राजेश खन्ना!' मी दिलीप कुमारला फार मोठा नट मानायचो, हे त्याला माहीत होते.

खरे म्हणजे तोही मानायचा, मग मी गुलजार, हृषीदा आणि राजेश खन्ना यांच्या शोधात निघालो.

लवकरच गुलजारचा ‘अचानक' हा चित्रपट पाहायला मिळाला. पाहून चाटच पडलो. हॉलिवुडचा एखादा चित्रपट पाहतो आहेसे वाटले. हिंदी सिनेमाने तीन वर्षांत मोठीच उड़ी मारलेली दिसते, असे मनात आले. काही दिवसांनी दुसरा चित्रपट मिळाला तो म्हणजे 'आनंद', यात एका दगडात दोन पक्षी मरणार होते. कारण त्याचे दिग्दर्शक होते हृषीदा आणि मुख्य भूमिका होती राजेश खन्नाची! हाही चित्रपट मला आवडलाच. गुलजारप्रमाणेच हृषीदा मोठे दिग्दर्शक आहेत, हे पटले- पण राजेश खन्ना मोठा नट आहे हे काही पटले नाही. उलट त्याच्या डॉक्टरचे काम करणारा, लंबूटांग नट, काम छोटे असून मोठा नट वाटला. पुढे कळले. त्याचे नाव ‘अमिताभ बच्चन' होते. एकंदरीत हिंदी चित्रपटाची स्थिती बरीच आशादायक झाली होती- हे माझ्या फायद्याचेच होते. कारण मी एकदा व्यावसायिक नट झाल्यावर चित्रपटात मला कामे मिळणार, हे मी धरूनच चाललो होतो! अगदी 'सत्यजित रे' नाही तरी बाकीचेही काही बरे दिग्दर्शक दिसतात हा दिलासा मिळाला. अजून नाटकातही काम मिळत नव्हते आणि मी एकदम सिनेमात काम मिळण्याचे स्वप्न पहात होतो!

असे दिवस चालले होते. तेवढ्यात वसंतरावच एक दिवस मदतीला आले. मला विचारावे का न विचारावे, अशा द्विधा मनःस्थितीत होते. चाचपडत बोलत होते. म्हणाले, “एक नाटक आहे.... माझे आहे. त्यात काम आहे... मेजर काम आहे... पण ते काम आधी एकाने केलेले आहे. ते कराल का, असे तुम्हाला विचारायचा धीर होत नाही.” त्यांना मधेच तोडत ती एकदम म्हणालो, “वसंतराव, असले प्रश्न मी प्रतिष्ठेचे करत नाही हे तुम्ही जाणता. आजपर्यंत कितीतरी भूमिका मी दुसऱ्यांनी केलेल्याच आहेत! मी कोण गणपतराव जोशी लागून गेलो आहे? पण मी माझा वैद्यकीय व्यवसाय बंद करून बसलो आहे आणि हा बेकारीचा काळ मला असह्य होतो आहे. पोटापाण्याची चिंता आहे म्हणून नव्हे- पण नाटकात काम करायला मी अगदी आसुसलो आहे!”

मग वसंतरावांना जरा धीर आला. ते म्हणाले, “प्रभाकर पणशीकरांची 'नाट्यसंपदा’ नावाची कंपनी आहे. ते माझे 'इथे ओशाळला मृत्यू' हे नाटक करतात. बरेच प्रयोग झालेले आहेत. त्यात संभाजीचे काम प्रथम काशीनाथ करत होता. काही प्रयोगानंतरच त्याने ते सोडले. आता ते काम मास्टर दत्ताराम करतात. पण त्यांचेही आता वय झाले आहे. आणि त्यांनाही ते काम सोडायची इच्छा आहे. तर ते काम तुम्ही करायला तयार असलात तर मी पणशीकरांकडे शब्द टाकतो. तुम्ही हवे तर नाटक वाचून पाहा. कारण नाटक संभाजीऐवजी औरंगजेबाकडे जास्त झुकले आहे, असा त्या नाटकावर आक्षेप आहे.” मी वसंतरावांना म्हटले, “नाटक मी वाचीनच. त्याचे प्रयोग चालू आहेत म्हणता तर मी प्रयोगही पाहीन. पण मी काम करायला तयार आहे असे तुम्ही पणशीकरांना बेलाशक कळवा. तुमचे नाटक आणि त्यात संभाजीची भूमिका- वाईट असून असून किती असणार? पणशीकरांना सांगा, माझी काहीही अट नाही. लवकरात लवकर तालमी घ्या आणि प्रयोग सुरू करा, माझी व्यावसायिक रंगभूमीवरची पहिली भूमिका सेकंड नव्हे तर थर्डहँड असावी अशीच श्रींची इच्छा असणार!"

मी मोठ्या उत्साहाने नाटकाचे पुस्तक पैदा केले आणि एका दमात वाचून काढले. एकदा- दोनदा-तीनदा! 'संभाजी' कुठे मनात उतरेना. 'रायगडला जेव्हा जाग येते' या नाटकाचे गुणदोष काहीही असोत, त्या नाटकात एक मनस्वीपणा होता. एका सशक्त प्रतिभेचा तो उत्स्फूर्त आविष्कार होता. 'ओशाळला मृत्यू’ परिणामाकरिता मारून मुटकून लिहिलेले नाटक दिसते आहे. 'रायगडा'मधला संभाजी काशीनाथने इतक्या उंचीवर नेऊन ठेवला, की साऱ्या महाराष्ट्रात काशीनाथच्या संभाजीची प्रतिमा फार स्पष्टपणे उमटली. काशीनाथ म्हणजे संभाजी असे समीकरण होण्याइतकी खोल उमटली. नंतर काही कारणाने काशीनाथला 'रायगड' सोडावे लागले. नाटक चालूच राहिले आणि काशीनाथची इतर भूमिकांद्वारा कीर्ती वृद्धिंगतच होत राहिली. तेव्हा आता काशीनाथच्या संभाजीच्या प्रतिमेचे लाड करण्याकरता 'ओशाळला मृत्यू' लिहिलेले दिसते, कष्टपूर्वक घडवलेले दिसते. प्रेक्षकांच्या संभाजी-प्रेमाला चुचकारण्याचा आटापिटा नाटकात स्पष्ट दिसत राहतो.

घोटाळा असा झाला आहे की, या सगळ्या कृत्रिम खटाटोपाला न जुमानता वसंतरावांच्या सशक्त प्रतिभेने याच नाटकात एकीकडे औरंगजेब निर्माण केला आहे. या नाटकातला औरंगजेब ही प्रतिभेची निर्मिती आहे! संभाजीचा प्रभाव या नाटकात पडत नाही, असे म्हणण्यापेक्षा हे नाटक पूर्णपणे औरंगजेबावर घसरलेले आहे. असेच म्हटले पाहिजे!

काशीनाथने हे नाटक का सोडावे; आणि काशीनाथने सोडले, दत्तारामबापूंनी सोडले, तरी ते तिसरा संभाजी आणून चालूच ठेवावे असे औरंगजेबाचे काम करणाऱ्या पणशीकरांना का वाटावे, याची कारणे नाटक वाचताच उघड झाली!

ही सारी मीमांसा मी वसंतरावांच्या कानावर घातली आणि म्हटले, “तरीही मी 'संभाजी' करायला तयार आहे. कारण मुख्य म्हणजे मला लवकरात लवकर रंगमंचावर उतरायचे आहे; आणि माझे पदार्पण वसंत कानेटकरांच्या नाटकात आणि नाट्यसंपदासारख्या प्रतिष्ठित संस्थेतर्फे व्हावे, हे माझ्या कारकीर्दीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकेल. आणि तिसरे म्हणजे माझे संभाजीचे काम पडले, तरी माझी तुलना काशीनाथ आणि दत्तारामबापू या मराठी रंगभूमीवरच्या दोन दिग्गज नटांशी होईल!”

पदार्पणातच एवढी कमाई काही वाईट नाही. मी लगेच पाठांतराला लागलो. संभाजीला अर्थात् भाषण खूप होते- आणि पाठांतराला अवघड होते. पण मला लवकरच नाटकाचा प्रयोगच पाहायला मिळाला. मी संभाजीचे काम करणार, या हिशेबाने मी दत्तारामबापूंचे काम पाहत होतो. म्हणजे मी संभाजीची तालीमच करत होतो म्हणा ना. संभाजीचा प्रवेश कुठून; उठणे बसणे केव्हा, कुठे; तलवार उपसणे केव्हा कसे, असल्या गोष्टीच मी बारकाईने टिपत होतो. दत्तारामबापू खूपच थकलेले दिसत होते- त्यांच्या वयात त्यांची जिद्द मात्र वाखाणण्यासारखी होती. काशीनाथने नाटक सोडले तेव्हा केवळ पणशीकरांची अडचण होऊ नये, म्हणून बापूंनी हे काम स्वीकारले होते. एकदा काम स्वीकारल्यावर चुकारपणा करणे त्यांच्या रक्तातच नव्हते. मध्यंतरात मी आत त्यांना भेटायला गेलो तर माझे हात धरून म्हणाले, "तुम्ही संभाजी करणार म्हणे आता. तर लवकर या. आम्ही थकलो आता”; आणि त्यांचे ते अतिनिर्मळ हास्य, खळखळून हसले.

पणशीकरांकडून आज निरोप येईल, उद्या येईल म्हणून मी वाट पाहत, पाठांतर करत बसलो. वसंतराव भेटले की मी त्यांना विचारी, प्रथम ते म्हणाले, “मी तुमचा निर्णय पंतांना कळवला आहे. आता त्यांनीच काय ते ठरवायचे आहे.” मी वाट पाहत थांबलो. नंतर काही दिवसांनी भेटले तेव्हा म्हणाले, “त्यांच्या मनात तुमच्याविषयी काही शंका आहेत. त्यांच्याभोवतीच्या मंडळींनी त्यांना तुमच्याबद्दल काहीतरी घाबरवणारी माहिती दिली आहे. तुम्ही म्हणे संस्था फोडणारे आहात. म्हणजे पी.डी.ए. आणि रंगायन!" मग माझ्या कानात हळूच कुजबुजले, “तुमचे बायकांच्या बाबतीतील वर्तन ठीक नाही म्हणे.” यावर आम्ही दोघेही खळखळून हसलो. मग मी म्हणालो, “मग माझ्याशी पणशीकर स्पष्ट का बोलत नाहीत?” तेव्हा वसंतराव म्हणाले, “नाही, नाही. पणशीकरांना तसे काहीच म्हणायचे नाही. पण भोवतालची मंडळी महत्त्वाची आहेत. त्यांची समजूत काढण्यात त्यांना वेळ लागतोय. पणशीकरांचा निरोप आहे, पाठांतर चालू राहू दे."

पणशीकर स्वतः माझ्याशी कधीच का बोलले नाहीत? सुरुवातीला सगळा व्यवहार वसंतरावांच्या मार्फत का होत होता, हे मला शेवटपर्यंत कळले नाही!

मी वसंतरावांना म्हणे, “हे लोक तालमी वगैरे करतात ना? मी आहे हौशी रंगभूमीवरचा नट. आम्हाला तीन तीन महिने तालमींची सवय! मला सांगायचे नाहीत ना, की उद्या प्रयोग आहे तेव्हा थिएटरमध्ये या!” वसंतराव मला धीर द्यायचे. तालमीशिवाय प्रयोग होणार नाही, म्हणायचे. माझे टेन्शन वाढतच चालले.

शेवटी एकदा निरोप आला की, ‘१० एप्रिलला पंढरपूरला प्रयोग ठरला आहे, तालमी मुंबईला होतील.' तीनएक आठवड्यांचा अवधी होता- माझे भाषण पाठ झाले होते- त्यामुळे तीन आठवड्यांच्या तालमीत भागेल अशा कल्पनेने मी निर्धास्त झालो. आपण ‘संभाजी' करणार याची खात्री वाटली. टेन्शन संपले. तालमी सुरू होण्याची वाट पाहू लागलो. खरे म्हणजे मी एकदम हवेतच तरंगू लागलो. मी स्वतःच संभाजी असल्यासारखा बोलू, चालू लागलो!

क्रमशः

Tags: प्रभाकर पणशीकर पुरुषोत्तम दारव्हेकर काशिनाथ घाणेकर रंगायन पीडीए जडणघडण डॉ. श्रीराम लागू Prabhakar panshikar Purushottam darvekar Kashinath ghanekar rangayan PDA Dr. Shriram Lagu weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके