डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

दिल्लीला महाराष्ट्र शासनाचे एक सांस्कृतिक केंद्र आहे. ते दरवर्षी नोव्हेंबरमध्ये रंगभूमी दिनानिमित्त, महाराष्ट्रातल्या निरनिराळ्या नाटयसंस्थांची मराठी नाटके दिल्लीत करतात. 1972च्या नोव्हेंबरात त्यांनी 'कलावैभव' या मोहनच्या संस्थेची तीन नाटके केली- 'काचेचा चंद्र', 'हिमालयाची सावली' आणि 'पप्पा सांगा कुणाचे'. तीन दिवस तीन नाटके. त्यावेळी दिल्ली सरकारात असलेले यशवंतराव चव्हाण (उपपंतप्रधान), गोखले (कायदामंत्री), र. के. खाडिलकर (मजूरमंत्री), मोहन धारिया आणि इतर काही खासदार रोज नाटक पहायला येत असत आणि मुख्य म्हणजे सर्वजण नाटकाच्या पहिल्या घंटेपासून स्थानापन्न असत- आणि शेवटपर्यंत विनातक्रार नाटक पहात असत. कदाचित यशवंतरावांच्या धाकाने असेल! यशवंतराव नाटकानंतर आत येऊन सर्वांशी गप्पा मारण्यात रंगून जात. 

एक दिवस 'आय.एन.टी.'चे दामूभाई जव्हेरी सांगत आले, की बंगालचे ख्यातनाम रंगकर्मी, महान नट आणि संस्थाचालक शंभू मित्र यांना तुम्हांला भेटायची इच्छा आहे. मला आश्चर्य वाटले. माझे नाव त्यांच्यापर्यंत पोचले असेलसे मला वाटलेच नव्हते. त्यांचे नाव भारतातील अग्रगण्य अभिनेते-दिग्दर्शक म्हणून गाजलेले होते. आज त्यांच्यामुळेच बंगाली रंगभूमी ही भारतातील सर्वश्रेष्ठ मानली जात होती. 'बादल सरकार' हे नाटककार, शंभू आणि तृप्ती मित्र हे अभिनेते दांपत्य, उत्पल दत्त हे साम्यवादी, प्रचारकी नाट्यचळवळ चालवणारे नाटककार- अभिनेते, तापस सेनसारखे प्रकाश योजनेतील जादूगार, असल्या नावांनी बंगाली रंगभूमीचा दबदबा फार मोठा होता. त्यामुळे मी अर्थातच मोठ्या उत्सुकतेने शंभू मित्रांना भेटायला गेलो. चर्चगेटला एका हॉटेलमध्ये ते उतरले होते. तपास काढत मी त्यांच्या खोलीत पोचलो; आणि खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते मोकळेपणी गप्पा मारू लागले. माझे 'काचेचा चंद्र', 'नटसम्राट' आणि 'हिमालयाची सावली' सारे त्यांनी पाहिले होते. 'सावली' त्यांना खूप आवडले होते. ते त्यांना पुन्हा पाहायचे होते. 'तुम्ही ते पॅरॅलिसीस झाल्याचे काम कसे करता, ते मला अभ्यासायचे आहे!' ते अगदी विद्यार्थ्याच्या नम्रतेने म्हणाले. सगळे बोलणे इंग्रजीत, खास ऑक्सफर्ड उच्चार करत! शंभूदा हे नुसतेच अभिनेते नव्हते. ते एक मोठे प्रयोगशील रंगकर्मी होते. रवींद्रनाथ टागोरांची काव्यनाट्ये त्यांनी रंगभूमीवर लोकप्रिय करून दाखवली होती. त्यांनी स्वतः सॉफोक्लीजच्या 'इडिपस' नाटकाचे, ग्रीक भाषेचा अभ्यास करून, बंगालीत भाषांतर केले होते; आणि स्वतः इडीपसचे काम करून त्या नाटकाचा बंगाली प्रयोगही केला होता. इब्सेनच्या 'डॉल्स हाऊस', "एनिमी ऑफ दी पीपल' अशा नाटकांची बंगाली रूपांतरेही त्यांच्या 'बहुरूपी' या संस्थेतर्फे सादर केली होती. 'वाचिक अभिनय' या विषयाचा त्यांनी खूप खोलवर जाऊन विचार केलेला होता. शब्दोच्चारातील निरनिराळे बारकावे आणि त्यामुळे अर्थावर होणारे निरनिराळे परिणाम, यांबद्दल ते खूप विस्ताराने आणि अभ्यासपूर्ण बोलले. 

मी नुस्ता मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो. आणि मग त्यांनी मंत्र उच्चारावे तशी दोन वाक्ये उच्चारली... An Actor has to be athelete Philosopher! Stiful दुसरे, You are the instrument and you are the Player! 

दोनच वाक्ये. पण त्यांनी माझ्या 'नट' असण्याला मूलाधार दिला. नट असण्याचा संपूर्ण आशय दोन ओळींच्या मंत्रात सांगितला! 'नटाने आपले शरीर एकाद्या क्रीडापटूप्रमाणे प्रमाणबद्ध, कार्यक्षम, लवचिक, डौलदार, चपळ आणि संपूर्णपणे स्वतःच्या ताब्यात ठेवले पाहिजे’ 

आणि आपली बुद्धी एखाद्या तत्त्वज्ञाप्रमाणे सर्वगामी, सातत्याने मनन, चिंतन करणारी, जीवनाच्या सर्वांगांना स्पर्श करणारी आणि अगदी मुक्त, स्वतंत्र संचार करणारी अशी ठेवली पाहिजे.' 'आणि नट हा स्वतः वाद्य आहे आणि वाजवणाराही तोच आहे ! त्याच्या हातात एखादी सतार किंवा बासरी देऊन ती त्याला वाजवायला सांगितलेली नाही; तर तो स्वतःच सतार किंवा बासरी आहे. आणि ती वाजवून त्यातून संगीत निर्माण करणाराही तोच आहे. वाद्यातून तो कर्कश गोंगाट निर्माण करणार, की मधुर संगीत निर्माण करणार, यावर तो वाईट नट की चांगला नट हे अवलंबून राहणार. त्याचे शरीर आणि बुद्धी हेच त्याचे वाद्य आहे; आणि ते वाद्य कायम कार्यक्षम आणि सुरांत लावलेले असणे, ही जबाबदारीही त्याचीच आहे.' म्हणजे नट होणे ही फावल्या वेळात, सहज जाता येता करण्याची गोष्ट नाहीच. ते एक पूर्ण वेळचे व्रत आहे. रंगभूमीविषयक कर्मकांडात गुंतून पडणारा रंगकर्मी होणे पुरेसे नाही; तर रंगभूमीचा विचार-आचार अग्रक्रमाने करणारा रंगधर्मी होणे आवश्यक आहे!

आयुष्यभर पुरेल एवढे संचित घेऊन मी शंभूदांकडून बाहेर पडलो! An Actor has to be Athelete Philosopher! आणि You are the instrument and you are the Player! आजतागायत सगळ्या आयुष्याची वाटचाल या दोन वाक्यांच्या आधारानेच करत आलो! 

एक दिवस गप्पा मारता मारता मी गमतीने म्हटले की 'आता गंभीर नाटके फार झाली बाबा! आता नवीन नाटक करायचे तर विनोदी नाटकच करायचे!' लगेच मोहन पंधरा दिवसांत, सुरेश खऱ्यांनी गुजराती नाटकाचे केलेले भाषांतर घेऊन आला! 'पप्पा सांगा कुणाचे', असे त्याचे मराठी नाव होते. शुद्ध प्रहसनात्मक नाटक होते. दोन बायकांचा दादला त्याच्या दोन मुलांच्या हुशारीने कसा वठणीवर येतो, याची गोष्टहोती. फार वाखाणण्यासारखे नाटकात काहीच नव्हते. खरे म्हणजे दोन मुलांच्या महा-इरसाल भूमिकाच महत्त्वाच्या होत्या. पण शुद्ध फार्स मी कधी केलाच नव्हता- एकदा करून तर पहावा, म्हणून मी तो करायला घेतला. 

ऐतिहासिक नाटकात काम करायचा अनुभव नसल्याने माझे 'संभाजी'च्या कामात प्रथम बरेच हाल झाले होते. फार्सिकल कामाचाही अनुभव नसल्याने इयेही हाल होतात की काय, अशी भीती होती. पण ह्यावेळी भरपूर तालमी मिळाल्यामुळे तसे काही झाले नाही. अगदी आत्माराम भेंड्याइतके नाही, पण माझे काम लोकांना खूप आवडले खरे. पण फार्स करण्यामागे, सतत गंभीर भूमिका करत राहण्याच्या ताणातून थोडा विरंगुळा मिळावा हा जो हेतू होता, तो मुळीच साध्य झाला नाही! एक तर नंदकुमार रावत्यांनी दिग्दर्शन करताना आम्हा सर्वांनाच इतक्या असंख्य आणि जलद हालचाली दिल्या होत्या, की नाटकभर धावपळ करून पार दमून जायला व्हायचे! नाटकाच्या पहिल्याच दिवशी मोहनने या नाटकाचे प्रयोग लावले. सकाळी साडेदहा, दुपारी साडेतीन आणि रात्री साडेआठ! दुसऱ्या दिवशी अंथरुणातून उठता येईना, इतके पाय भरून आले होते! 

ते सोडा. सवयीने पाय दुखायचे थांबले असते! पण लक्षात असे आले की गंभीर (म्हणजे नटसम्राट किंवा सावली) भूमिकांचा जेवढा मानसिक ताण आहे, तेवढाच या विनोदी कामांचा ताण आहे! विरंगुळा आहे; तुफान करमणूक आहे; पोट धरधरून हसायचे आहे ते प्रेक्षकांना- नटांना गंभीर भूमिकांइतकीच एकाग्रता, आणि थोडा जास्तच सावधपणा विनोदी भूमिका करताना आवश्यक आहे! सावधपणा जास्त हवा; कारण प्रेक्षकांचा हशा संपल्याशिवाय पुढचे वाक्य बोलायचे नाही- आणि कुठला हशा किती वेळ चालेल, त्याचा नेम नाही. मग हशा चालू असेपर्यंत भूमिकेला अनुरूप असे काहीतरी हावभाव, हातवारे करत रहायचे आणि हशा संपल्याबरोबर पुढचे वाक्य बोलायचे! याला अगदी तीक्ष्ण असे वेळेचे भान हवे. खूप प्रयोग झाल्यानंतर, सवयीने हा ताण थोडा कमी होईल- पण तसा तो गंभीर भूमिका करतानाही होतो! 

वर्षाच्या सुरुवातीला 'सावली' आणि सप्टेंबरमध्ये 'पप्या' अशी एका वर्षात दोन, प्रचंड चालणारी नाटके आली. 'काचेचा चंद्र' आणि 'नटसम्राट' धुमधडाक्यात चालत होतीच. रंग असा दिसत होता, की मी वर्षानुवर्षे हीच नाटके करत राहणार की काय? कुठल्याच नाटकाची लोकप्रियता ओसरण्याची काही चिन्हेच दिसत नव्हती!

दिल्लीला महाराष्ट्र शासनाचे एक सांस्कृतिक केंद्र आहे. ते दरवर्षी नोव्हेंबरमध्ये रंगभूमी दिनानिमित्त, महाराष्ट्रातल्या निरनिराळ्या नाटयसंस्थांची मराठी नाटके दिल्लीत करतात. 1972च्या नोव्हेंबरात त्यांनी 'कलावैभव' या मोहनच्या संस्थेची तीन नाटके केली- 'काचेचा चंद्र', 'हिमालयाची सावली' आणि 'पप्पा सांगा कुणाचे'. तीन दिवस तीन नाटके. त्यावेळी दिल्ली सरकारात असलेले यशवंतराव चव्हाण (उपपंतप्रधान), गोखले (कायदामंत्री), र. के. खाडिलकर (मजूरमंत्री), मोहन धारिया आणि इतर काही खासदार रोज नाटक पहायला येत असत आणि मुख्य म्हणजे सर्वजण नाटकाच्या पहिल्या घंटेपासून स्थानापन्न असत- आणि शेवटपर्यंत विनातक्रार नाटक पहात असत. कदाचित यशवंतरावांच्या धाकाने असेल! यशवंतराव नाटकानंतर आत येऊन सर्वांशी गप्पा मारण्यात रंगून जात. 

दिल्लीला एक दिवस इब्राहिम अल्काझी मला त्यांच्या 'राष्ट्रीय नाटयशाळा'मध्ये त्यांच्या विद्याथ्यांशी बोलायला घेऊन गेले. मला या नाट्यशाळेसंबंधी फक्त ऐकीव माहिती होती. अल्काझींबद्दलची माहितीही ऐकीवच होती- पण त्यांच्या  नावाचा दबदबा मुंबईत चांगलाच होता. थिएटर यूनिट ही मुळात त्यांनी केलेली संस्था, दुबे, विजयाबाई ही मंडळी त्यांच्या शिष्यांपैकी होती. दिल्लीला N.S.D. स्थापन होण्यापूर्वी अल्काझी मुंबईत इंग्रजी नाटके करीत असत. मला त्यांचे कुठलेच नाटक पहायला मिळाले नव्हते- पण त्यांनी बसवलेल्या नाट्यप्रयोगांचे कौतुक मुंबईकर मंडळी अगदी हातचे न राखता करीत असत. एक आदर्श नाट्यशिक्षक- कदाचित भारतातील एकमेव- अशी त्यांची ख्याती होती. दुबे, विजयाबाईंसारखे स्वतंत्र प्रतिभेचे दिग्दर्शक मात्र त्यांच्याबरोबर झालेल्या मतभेदांमुळे त्यांच्यापासून दूर झाले होते; पण तेही त्यांच्याबद्दल आदरानेच बोलत. नाटकाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी त्यांनी नाटकवाल्यांना दिली. नाटकाच्या निरनिराळ्या अंगांकडे सुटे सुटे न पाहता सबंध नाटकाचा साकल्याने विचार करून, एखाद्या भव्य पेंटींगप्रमाणे नाटक प्रेक्षकांसमोर सादर करणे, त्यातील अभिनय, नेपथ्य, रंगभूषा, ध्वनी इत्यादी सगळ्या घटकांना त्यांचे योग्य ते- आणि तेवढेच- महत्त्व द्यायचे; पण ते संपूर्ण नाटकाचा आशय आणि त्याचा घाट लक्षात घेऊन त्याचा एक भाग म्हणून द्यायचे. 'पडद्याला टाळी' बगैरे असले प्रकार नाहीत. अर्थातच 'स्टार सिस्टम' नाही. कुठल्याही एका अंगाचा फाजील बडेजाव नाही. नाटकाचा होणारा समग्र परिणाम हा सर्वांत महत्त्वाचा, असे अल्काझी मानत. अशा नाट्यक्षेत्रातील थोर विचारवंताच्या शाळेत जाऊन त्याच्या विद्यार्थ्यांच्याबरोबर गप्पा मारणे हा माझ्या शिक्षणाचाच एक भाग होता! त्यांचा जास्त परिचय होऊ शकला नाही; कारण त्यांनी स्वतःला एन.एस.डी.च्या कामात अगदी गाडून घेतले होते आणि मी महाराष्ट्रभर फिरत नाटकाचे प्रयोग करत होतो! 'काचेचा चंद्र' आणि 'नटसम्राट' या -नाटकांचे प्रयोग झाले नाहीत, असे महाराष्ट्रात शहरच राहिले नसेल! एप्रिल 1969 पासून 1972 अखेरपर्यंत, जवळजवळ अडीच वर्षांत मी जे सात- आठशे प्रयोग महाराष्ट्रभर केले, त्यांतील बहुसंख्य प्रयोग 'चंद्र' आणि 'नटसम्राट' यांचेच होते- आणि त्यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागण्याची चिन्हेच दिसत नव्हती.

'सावलीही जोरात चालत होते- आणि गंमत म्हणून केलेले 'पप्पा' ही लोकांना खूप आवडत होते. तेव्हा मी गंभीरपणे विचार करू लागलो. 'ही नाटके जितकी वर्षे चालतील तितकी वर्षे ती करत राहण्याची मी जबाबदारी घेता कामा नये. कारण तसे केले तर मला आयुष्यभर ही एवढीच नाटके करत राहावे लागेल! आणि हे माझ्या प्रकृतीला मुळीच मानवणारे नाही. यासाठी मी नाट्यव्यवसाय पत्करलेला नाही. नव्या नव्या नाटकांचे प्रयोग करावेत; आपल्या सर्जनशीलतेला जी नवी नवी आव्हाने मिळत राहतील ती आनंदाने स्वीकारावीत; आणि हा खेळ आयुष्यभर खेळत रहावे, हा या व्यवसायात पडण्याचा हेतू आहे. तेव्हा कुठलेही नाटक काही विशिष्ट प्रयोग-संख्येनंतर सोडून देण्याचा आपला अधिकार निर्मात्यांनी मानला पाहिजे. आपल्याला आवडल्याशिवाय आपण नाटक करायला घेणार नाही हे खरे. पण प्रत्येक नाटकाची आपल्याला गुंतवून ठेवण्याची ताकद वेगवेगळी असणार. काही नाटकांचा संपूर्ण शोध आपल्याला दोनशे प्रयोगात लागेल तर काहींचा शोध पूर्ण व्हायला चारशे प्रयोग त्या नाटकाशी खेळावे लागेल. तेव्हा एखादे नवे नाटक करायला घेताना निर्मात्याला ही कल्पना दिली पाहिजे, की विशिष्ट प्रयोगसंख्येनंतर नाटक सोडून जाण्याचे स्वातंत्र्य मला असेल. अर्थात सोडून जाताना, माझ्या जागी जो नवा नट उभा राहणार असेल त्याला तालमी देऊन त्वाची भूमिका बसवून घेण्याची जबाबदारी मी घेईन, आपली सर्जनशीलता वाताड न होता सतत चैतन्यमय राहावी, ही काळजी घेणे आवश्यक आहे.

हा निर्णय मनाशी घेतल्यावर मी 'गोवा हिंदू'च्या रामकृष्ण नाईकांना सांगितला. "मी तीनशे प्रयोगानंतर 'नटसम्राट' सोडायचे ठरविले आहे." त्यांची तीव्र प्रतिक्रिया काहीशी अपेक्षित होती. “म्हणजे, एवढे मोठे नाटक तुम्ही मारणार! तुम्ही सोडून गेल्यावर ते नाटक चालणे शक्यच नाही!" 'नटसम्राट'ची आणि त्यातल्या माझ्या भूमिकेची स्तुती त्यावेळी अगदी शिगेला पोहोचली होती, हे खरे होते; पण केवळ तेवढ्यावरून असला निष्कर्ष काढणे हे मला अगदी बालिशपणाचे बाटले! मी रामकृष्णांना म्हटले, “रामकृष्ण, मोठी नाटके नटांमुळे मोठी होत नाहीत! मोठ्या नाटकांमुळे नटच झाले तर मोठे होतात! शेक्सपियरचे 'हॅम्लेट' तीनशे वर्षांहून जास्त चालले आहे: कितीतरी जगभरच्या नटांनी आजवर त्यात 'हॅम्लेट साकार केला. जगाचे सोडा- 'एकच प्याला' करणारे कितीतरी 'सुधाकर' आपल्या महाराष्ट्रात झाले आणि होताहेत, त्यातील काही तर अगदी सामान्य सुधाकर-सिंधू आहेत. पण ते नाटक आजही मोठेच मानले जाते! तेही सोडा, तुमचेच 'रायगडाला जेव्हा जाग येते' घ्या. पहिल्या 'संभाजी'ने शंभर प्रयोगानंतर नाटक सोडले (किंवा त्याला सोडणे भाग पडले, म्हणा), त्यानंतर आलेल्या दुसऱ्या 'संभाजी'ने त्याच नाटकाचे शेकडो प्रयोग केले, आणि दोन संभाजीमधला गुणवत्तेचा फरक म्हणाल तर जमीन-अस्मानाचा होता! पण नाटक तितक्याच जोरात चालू राहिले ना! 'नटसम्राट'बद्दल तर तुम्ही काळजीच सोडा. ती भूमिका करावीशी वाटणारे कितीतरी मोठे नट आज मराठीत उपलब्ध आहेत!" निरुत्तर झालेल्या रामकृष्णांनी विषय झटकून टाकला. 

Tags: नाटक रंगभूमी यशवंतराव चव्हाण बंगाली रंगभूमी शंभू मित्र दामूभाई जव्हेरी आय.एन.टी डॉ. श्रीराम लागू Dr. Shriram lagu Bengali Theater Shambhu Mitra Damubhai Jawheri INT weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके