डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

बारा-तेरा वर्षांपूर्वी पुण्याला एका हौशी नाट्यसंस्थेने केलेले हे नाटक त्यावेळी सर्वार्थाने चांगलेच गाजले होते. जवळजवळ शंभरएक प्रयोग त्यावेळी झाले होते. म्हणजे प्रायोगिक नाटकाच्या बाबतीत विक्रमच म्हणायला हरकत नव्हती. जाणकारांनी, समीक्षकांनी त्याची तोंड भरून स्तुती केली होती. वसंतराव तर त्यांच्या पहिल्याच नाटकाने ख्यातनाम नाटककार झाले होते. आणि तेच नाटक आज बारा वर्षांनंतर अत्यंत श्रीमंत निर्मितीमूल्यांनिशी, एका खूप देखण्या प्रयोगाद्वारे अवतरते आणि जेमतेम डझनभर प्रयोगात कोसळते, हे काय गणित आहे? आम्ही सगळेच चक्रावून गेलो.

एक दिवस मोहन वाघ मला भेटायला आले. त्यांचा माझा थोडासा परिचय होता. ते आणि पणशीकरांनी मिळून एक नाटककंपनी काढली होती. आणि वसंतरावांचे ‘मोहिनी’ नावाचे पार फसलेले नाटक मी आफ्रिकेला जाण्याअगोदर पाहिले होते, त्यावेळी त्यांची भेट झाली होती. मी आफ्रिकेहून परत आल्यावर तेंडुलकर मला वाघांच्याकडे ‘दाखवायला’ घेऊन गेले होते! वाघ आता पणशीकरांपासून वेगळे होऊन त्यांनी 'चंद्रलेखा' नावाची स्वतंत्र कंपनी काढली होती.

त्यांनी पहिल्याच वाक्यात माझी विकेट घेतली. 'तुम्ही ‘चंद्रलेखा’ करता 'वेड्याचं घर उन्हात' कराल का? तुम्हीच डायरेक्ट करायचं आणि काम करायचं. मी तुम्हाला 100 रुपये नाईट देईन.' माझा माझ्या कानावर विश्वास बसेना. 'म्हणजे वसंतरावांचे पहिले नाटक? आम्ही  1957 साली केलेलं?' मी भडाभडा विचारलं. ‘हो तेच!’

मी कशाला नाही म्हणू?

मी मोठ्या उत्साहात पणशीकरांना सांगायला गेलो- तर, ऐकून त्यांचा चेहरा एकदम खर्रकन् उतरला. “हा नेहमी माझे अ‍ॅक्टर्स फोडत असतो! नाईट किती देतोय?” अत्यंत कडवटपणे ते उद्गारले. या दोघांचे एकमेकांत काही बिनसलेले मला माहीतच नव्हते. मी म्हटले, “100 रुपये म्हणाले वाटतं. पण माझ्या दृष्टीनं नाईट काही महत्त्वाची नाही. तुम्ही 75 रुपये देताच आहात...” “मी पण आता 100 करणारच होतो” एकदम माझे बोलणे कापत पणशीकर म्हणाले, “हे पहा डॉक्टर, तुम्ही या धंद्यात नवीन आहात. हे खेळ तुम्हाला कळणार नाहीत. तुम्ही यात पडू नका. मधल्यामधे तुमचा बकरा होईल. एका संस्थेला चिकटून राहण्यात तुमचं हित आहे.” मी म्हटलं, “ ‘वेड्याचं घर’ माझं अत्यंत आवडतं नाटक, ते व्यावसायिक रंगभूमीवर मला करायला मिळेल हे माझ्या स्वप्नातही येणं शक्य नव्हतं. तेव्हा ते कोण करत; म्हणजे कोणती कंपनी करते- हे माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं नाही. तुम्ही करत असाल तर मी तुमच्याकरता करेन,” मी त्यांना असंही म्हटलं की, “एकाच संस्थेला- म्हणजे कंपनीला चिकटून राहणं मला मान्य नाही. सबंध मराठी रंगभूमी मी 'संस्था' मानतो- बाकी तुमच्या सगळ्या 'कंपन्या'. दुसरं असं, की माझ्यावर आर्थिक जबाबदारी एवढी आहे की महिना अडीच-तीन हजार रुपये कमावणंही गरजेचं आहे- म्हणजे रोज एक प्रयोग तरी करायला हवा. दोन-तीन चालणारी नाटकं हाताशी असल्याशिवाय हे कसं शक्य आहे?

 नाइलाजाने पणशीकरांनी मान डोलावली. मी मोठ्या उत्साहाने 'वेड्याचं घर'च्या तयारीला लागतो. दिग्दर्शनाची संपूर्ण जबाबदारी वाघांनी माझ्यावर टाकली होती. नेपथ्य रघुवीर तळाशीलकर करणार होते, त्यामुळे मी निर्धास्त होतो. म्हणजे निर्मितीची बाजू चोख असणार ही खात्री होती. मोहन वाघांची तशी ख्यातीच होती. पात्रयोजना वाघांच्या सल्ल्याने पण माझ्या मतानेच करायची होती. प्रेक्षकशरण अतिरेकी अभिनयाचा मला अगदी तिटकारा होता. संयत, वास्तवदर्शी अभिनय करणारी मंडळी मराठी रंगभूमीवर अलीकडच्या काळात बऱ्याच संख्येने दिसू लागली होती. कुसुम कुलकर्णी, श्रीकांत मोघे, गणेश सोळंकी, जयश्री बांगर, नारायण पै वगैरे मंडळी प्रायोगिक चळवळीत काम करणारीच होती. प्रश्न ‘दामू’चा होता. ही भूमिका अवघड होती. पहिल्या दोन अंकात वेडा, खुळा, ओंगळ असलेला, मुका भिकारी आणि तिसऱ्या अंकात, ब्रह्मदेशात अनेक वर्षे यशस्वी व्यापार केलेला एक रुबाबदार, भारदस्त, मनमिळाऊ दामोदरपंत असे या भूमिकेचे व्यामिश्र स्वरूप होते. त्यासाठी उत्तम समज असलेल्या, देखण्या नटाची गरज होती. माझ्या डोळ्यांसमोर सतीश दुभाषी आला. भूमिका फार मोठी नसली तरी महत्त्वाची होती.

मी सतीशला त्या भूमिकेसाठी विचारले तर त्याने भलतीच अडचण सांगितली. तो म्हणाला, “नाही! मी यापुढे ओठावर मिशी डकवणार नाही! वयस्क माणसाचे काम करणार नाही!” मी बघतच राहिलो. सतीशकडून मी ही अपेक्षा केली नव्हती. याने माझ्याकडून पॉल म्युनीचे चरित्र नेऊन वाचले होते! मी त्याला म्हटले, “काय लहान मुलासारखं बोलतोयस, सतीश? ओठावर मिशी आहे म्हणून या नाटकातील 'दादा'ची भूमिका तू नाकारशील काय? तुला निरनिराळ्या भूमिका करायच्या आहेत, का जन्मभर 'सतीश दुभाषी' ही एकच भूमिका करायची आहे?” खरी गोष्ट अशी होती की सतीशने 'वेड्याचं घर' वाचलेलं नव्हतं. ते वाचल्यावर तो 'दामू' करायला एका पायावर तयार झाला. आणि त्याने ते काम अप्रतिम केले!

‘वेड्याचं घर’ नव्याने बसवायचे म्हणजे मला तालमीकरता मुंबईत येऊन राहावे लागणार होते. जे मी टाळायला बघत होतो, तेच पदरी येणार होते. वाघांनी तो प्रश्न चुटकीसरशी सोडवला. तालमी चालू असेपर्यंत मला राहण्यासाठी, मोगल लेनमधला एक चार खोल्यांचा फ्लॅटच त्यांनी मला दिला. फ्लॅट रिकामाच होता. म्हणजे फर्निचर, भांडीकुंडी, वगैरे काहीही नव्हते. कुणी राहतही नव्हते- खंडीभर झुरळे सोडून! पहिल्या दिवशी पुकारलेले झुरळांविरुद्धचे युद्ध सतत सात दिवस (अरब-इस्रायल युद्धासारखे!) चालले. पण नंतर रात्रभर निर्वेधपणे झोप मिळू लागली. चहा-जेवणखाण सगळे बाहेरच, आजपर्यंत सरावलेल्या सुखवस्तू आयुष्याचा मागमूसही नाही. पण त्याचे काही वाटलेही नाही. कारण नवीन नाटकाच्या तालमी आणि ‘मृत्यू’ चे प्रयोग चालू होते.

'वेड्याचं घर’ च्या तालमी आम्ही अगदी कसून करत होतो. जवळजवळ सगळेच प्रायोगिक नाटकातील कलावंत होते; त्यामुळे तालमींचे महत्त्व कुणाला नव्याने पटवायचे नव्हते. श्रीकांत मोघे एकटा चुकीचे बेअरिंग घेऊन काम करीत होता. दिग्दर्शक या नात्याने मी त्याला सांगून पाहिले; पण ‘बापू’ ची भूमिका तो फारच खेळकर, मिश्किल अशी रंगवत होता. 'बापू' तसा नसून तो खूपच गंभीर आहे; परधर्मीय मुलीशी लग्न करण्याचा त्याचा निश्चय हा अतिशय गांभीर्याने, विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे; त्याचे गाण्याचे वेड हे त्याच्या वडिलांच्या (‘दादा’ च्या) दृष्टीने पाखंड असले, सर्वनाशाच्या खड्ड्यात ढकलणारे असले तरी त्याच्या स्वतःच्या दृष्टीने ती पवित्र कलासाधना आहे अशा तऱ्हेचे त्याचे वागणे-बोलणे असायला हवे, हे मी त्याला अनेकवेळा सांगितले. पण तो मिश्किल, खेळकर बेअरिंग सोडेना- आणि मला ते अजिबात पटेना. शेवटी एक दिवस त्याने मला एकट्याला थोडे बाजूला घेतले आणि म्हणाला, “त्याचं काय आहे डॉक्टर, की माझं आता एक 'इमेज' (प्रतिमा) झालेलं आहे, ‘लेकुरे’ मध्ये काम केल्यामुळे! आता मला त्यातून बाहेर येऊन चालायचं नाही. पब्लिक मला स्वीकारणार नाही!” ते ऐकत एकदम अतीव करुणेनं माझं मन भरून आलं!

वसंतरावांच्या 'लेकुरे उदंड जाली' या सुंदर नाटकातील श्रीकांतची भूमिका मी पाहिली होती. मराठी रंगभूमीवर मी पाहिलेल्या अविस्मरणीय भूमिकांपैकी ती होती, यात वादच नाही. श्रीकांतच्या देखण्या आणि खळाळत्या व्यक्तिमत्त्वाला अगदी फिट्ट बसणारी ती भूमिका होती. श्रीकांतनं भूमिकेचं सोनं केलं होतं आणि त्यामुळे तो नाट्यरसिकांच्या गळ्यातला ताईत वगैरे झालेला होता, हे निःसंशयच! पण त्या एका भूमिकेचे मजबूत साखळदंड कायमचे आपल्या पायांभोवती स्वतःच बांधून घेऊन हा गुणी नट, त्या साखळदंडाच्या खणखणाटाने सबंध जन्मभर प्रेक्षकांना रिझवीत राहण्याचे स्वप्न पाहत होता काय? एवढ्या कलागुणांच्या एवढ्या भीषण नाशाच्या कल्पनेनं माझं मन पिळवटून गेलं. बराचसा वाईटपणा पदरात घेऊन, दिग्दर्शक या नात्यानं मी त्याला माझं मत सांगत राहिलो.. त्याचा परिणाम त्याच्यावर किती झाला, माहीत नाही. कारण दहा-बारा प्रयोगांतच 'वेडयाचं घर' बंद पडलं. एक देखणा प्रयोग, सतीश दुभाषीची एक खूप वेगळी आणि उत्कृष्ट भूमिका वाया गेली! बारा-तेरा वर्षांपूर्वी पुण्याला एका हौशी नाट्यसंस्थेने केलेले हे नाटक त्यावेळी सर्वार्थाने चांगलेच गाजले होते. जवळजवळ शंभरएक प्रयोग त्यावेळी झाले होते. म्हणजे प्रायोगिक नाटकाच्या बाबतीत विक्रमच म्हणायला हरकत नव्हती. जाणकारांनी, समीक्षकांनी त्याची तोंड भरून स्तुती केली होती. वसंतराव तर त्यांच्या पहिल्याच नाटकाने ख्यातनाम नाटककार झाले होते. आणि तेच नाटक आज बारा वर्षांनंतर अत्यंत श्रीमंत निर्मितीमूल्यांनिशी, एका खूप देखण्या प्रयोगाद्वारे अवतरते आणि जेमतेम डझनभर प्रयोगात कोसळते, हे काय गणित आहे? आम्ही सगळेच चक्रावून गेलो. मराठी प्रेक्षक दहाएक वर्षांत इतका धावत पुढे गेला काय की हे नाटक त्याला जुनाट वाटू लागले? का तो इतक्या हलक्या-फुलक्या मनोवृत्तीचा झाला की एवढे गांभीर्याने केलेले मनोविश्लेषण हा त्याच्या डोक्याला ताप वाटू लागला? कारण कोल्हटकर-कालेलकरांची नाटके चांगली चालत होती! माझ्या मात्र मनात आले, की 57 साली जितका जीव लावून, अगदी सर्वस्व गुंतवून आम्ही पी.डी.ए.च्या मंडळींनी ते नाटक उभे केले, तेवढी जिवाची गुंतवणूक व्यावसायिक नाटकामध्ये होणे अशक्यच होते! आणि काही नाटकांची जातच अशी असते की ती व्यावसायिक हिशेब अलिप्तपणे मांडून परिणामकारक होऊच शकत नाहीत. ‘घाशीराम कोतवाल’ एवढ्या मोठ्या सर्वांगीण यशानंतरही व्यावसायिक रंगभूमी यशस्वी करू शकणार नाही - असे तर हे गणित नाही?

‘वेड्याचं घर उन्हात’ अयशस्वी झाल्याचा शोक करत बसायला वेळच नव्हता. ‘मृत्यू’ चे प्रयोग चालू होते. माझे संभाजीचे काम प्रयोगागणिक सुधारत होते. तेवढ्यातच ‘बेस्ट’च्या कलामंडळाचे कार्यवाह कापडी आणि जयसिंग चव्हाण हे दोघे श्री.ना.पेंडश्यांचा निरोप घेऊन आले. पी.डी.ए. आणि रंगायनच्या काळात 'यशोदा' नाटकाच्या निमित्ताने शिरुभाऊंचा चांगलाच परिचय झाला होता. मराठीतला एक सामर्थ्यसंपन्न लेखक म्हणून त्यांच्याबद्दल मोठा आदरभाव तर होताच, त्यात, वयातील अंतर जाणवू न देणारा, त्यांचा मोकळाढाकळा स्वभाव यामुळे माझ्या लेखी शिरुभाऊंना आदरणीय वडीलधाऱ्या माणसाचे स्थान होते. त्यांचा शब्द मोडणे अशक्य होते. निरोप असा होता की ‘बेस्ट’ ची मंडळी श्री.ना.यांचे ‘राजे मास्तर’ हे नाटक बसवू इच्छितात- त्याचे दिग्दर्शन मी करावे! पेंडसे हे बेस्ट मध्येच अनेक वर्षे नोकरीच्या निमित्ताने काढलेले- आणि बेस्ट ची कर्मचारी मंडळी नाटकाची मोठी हौशी, हा मंडळीनी सरकारी नाट्यस्पर्धेत पेंडश्यांच्या 'संभूसांच्या चाळीत' या नाटकाचा अप्रतिम प्रयोग करून खूप बक्षिसे मिळवली होती. तो प्रयोग मी पाहिलेला होता. त्यावरून 'बेस्ट' मंडळीत भरपूर नाट्यगुण असलेली आणि पडेल ते काम करायला तयार असलेली खूप माणसे आहेत, याचा अंदाज मला आलेला होता. ‘राजे मास्तर’ हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर झाले होते; पण फारसे चालले नव्हते. शिरुभाऊंच्या मते नाटक अयशस्वी होण्याचे कारण म्हणजे त्याला लाभलेले दुबळे दिग्दर्शन. कारण प्रमुख भूमिका चंद्रकांत गोखले आणि सुमती गुप्ते यांनी केल्या होत्या आणि यापेक्षा अधिक चांगली जोडी मिळणे अशक्य होते. सुदैवाने हे दोघेही 'बेस्ट'च्या नाटकात कामे करायला तयार होते. त्यांच्याबरोबर बाकीच्या भूमिका ‘बेस्ट’ च्या हौशी नटांनी करायच्या आणि या नाटकाचा व्यावसायिक रंगभूमीवर प्रयोग करायचा अशी कल्पना होती.

मी नाटक वाचले. पेंडश्यांच्या कोकणातील अस्सल वातावरण, खास कोकणी माणसांचे जिवंत नमुने, इरसाल, जिद्दी, ध्येयवादी, परिस्थितीला पार शरण गेलेले, वगैरे सगळे! असा मसाला सगळा झणझणीत होता. पण मूळ कथावस्तू भावुक वाटावी इतकी आदर्शवादी. त्यामुळे नाटक यशस्वी होणे कठीण वाटले. तसे मी शिरूभाऊंशी बोललोही; पण ते म्हणाले, “मलाही तसेच वाटते. पण माझे आणि या मंडळींचे संबंध आता असे झाले आहेत की ते सगळे मला कुटुंबप्रमुख मानतात. ‘संभूसाच्या चाळीत’ खूप चालल्यामुळे ते सगळे फार खुशीत आहेत- आणि त्यामुळे खूप महत्त्वाकांक्षी झालेत. त्यांना लवकरच खानोलकरांचे एक नाटक मिळणार आहे असे दिसते. मधल्या काळात व्यावसायिक रंगभूमीवर उभे राहण्याचा त्यांचा विचार आहे. म्हणजे, अनुभव मिळावा म्हणून! माझ्या मागे लागले ‘नाटक द्या’ म्हणून. माझ्याजवळ होते ते मी दिले. त्यांना आवडले आहे. त्यांनी चंद्रकांत गोखले आणि सुमतीबाईंशी बोलणी करून त्यांना काम करायला तयारही केले आहे!”

एवढे स्वच्छ बोलणे झाल्यावर मला नकार देण्याचे कारणच नव्हते. आता पुन्हा तालमी सुरू होणार; तेव्हा पुन्हा मुंबईत राहण्याचा प्रश्न आला. कारण 'वेड्याचं घर उन्हात'च्या तालमी संपल्यावर मी वाघांनी दिलेला फ्लॅट सोडून दिला होता आणि पुन्हा माझ्या पुणे मुंबई चकरा चालू झाल्या, मग बेस्ट मंडळींनी मला चेंबूरला एका सिंधी कुटुंबाच्या फ्लॅटमध्ये एक खोली 'पेइंग गेस्ट' म्हणून मिळवून दिली. फ्लॅटमध्ये राहण्यापेक्षा थोडी अधिक गैरसोयी असलेली होती. पण तीनचार आठवड्यांचाच प्रश्न होता. कारण तेवढ्या अवधीत नाटक बसवणे भागच होते. जास्त तालमी करणे कंपनीला परवडण्यासारखे नव्हते. या नाटकातसुद्धा मी माझ्या माहितीची रंगायनची मंडळी घेतलीच- दत्ता भट, सुलभा देशपांडे, नारायण पै वगैरे. अर्थात चंद्रकांत गोखले, सुमती गुप्ते आणि ‘बेस्ट’ चे गुणी कलाकार होतेच.. सुलभाला एका ऐंशी वर्षाच्या म्हातारीचे काम होते. तिचा चेहरा आणि हात, पाय यांवर सुरकुत्या दिसाव्या म्हणून अंड्यातला पांढरा रस तिच्या अंगा-तोंडावर फासून तो सुकवला की हुबेहूब परिणाम साधत असे- पण कातडे विलक्षण तडतडत असे! आविष्कार-रंगायनच्या शिस्तीत ती वाढली असल्यामुळेच ती तो छळ मुकाट्याने सोसत असे. तालमीत त्रास झाला तो चंद्रकांत गोखल्यांना. प्रेक्षकांकडे पाठ करून संवाद म्हणताना त्यांना विलक्षण यातना होत! ते चांगलेच ज्येष्ठ नट होते. मा. दीनानाथांच्या कंपनीत लहानाचे मोठे झालेले होते. तत्कालीन अभिनय पठडीची खोल छाप त्यांच्या तंत्रावर होती. एरवी भावनाविष्कारात कुठेही आक्रस्ताळेपणा नाही, वाणी अगदी स्वच्छ, तिचा वापरही खूप संयत आणि वास्तवदर्शी. आधुनिक नटसंचात सहज सामावून जातील अशी अभिनयाची पद्धती- पण प्रेक्षकांकडे पाठ करून बोलणे म्हणजे त्यांना पावित्र्यभंग वाटे. माझ्या आग्रहाखातर ते तालमीत प्रेक्षकांकडे पाठ करून बोलत- पण त्यांना यातना होत! पण त्यांची अभिनयक्षमता दांडगी यात शंकाच नाही. सुमतीबाईसुद्धा तशा जुन्या पठडीतल्याच पण चित्रपटात कामे केल्यामुळे त्यांचे वळण बरेच आधुनिकतेकडे झुकणारे होते.

[क्रमशः]

Tags: आत्मचरित्र लमाण श्री. ना. पेंडसे सतीश दुभाषी चंद्रलेखा प्रभाकर पणशीकर मोहन वाघ ‘वेड्याचं घर उन्हात’ डॉ. श्रीराम लागू Satish Dubhashi ‘Chandralekha’ Prabhakar Panshikar ’ Mohan Wagh ‘Vedyacha Ghar Unhat Dr. Shreeram Lagu weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके