डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

भारतीय संगीताचा मानदंड : पंडित भीमसेन जोशी

अनेक दिग्गज गायकांशी व्यक्तिगत जिव्हाळ्याचे स्नेहसंबंध आणि संगीतातील विलक्षण जाणकारी असा संपन्न आणि प्रगल्भ अनुभव असलेले प्रा. श्रीराम पुजारी ही आनंदस्थळे ‘साधना’ च्या वाचकांसाठी उलगडून दाखविणार आहेत. हे नवे सदर महिन्यातून एकदा प्रसिद्ध होईल.

महाराष्ट्र शासनाने स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांना महाराष्ट्रभूषण हा सन्मान दिला, हे योग्यच झाले. पुष्कळदा कालात सम येते पण या वेळी मात्र समेवर सम आली, याचा आनंद वाटतो. पं. भीमसेन यांचा पहिला कार्यक्रम स्व. सवाई गंधर्व यांच्या एकसष्टीनिमित्त पुण्यात झाला. पुणेकरांना घडलेले हे त्यांच्या गायनाचे पहिले दर्शन. हे गाणे झाले, पण त्यावर रामभाऊ कुंडगोळकरांच्या गाण्याचा फार मोठा परिणाम सारखा जाणवत होता. गेल्या पंचावन्न वर्षांत भीमसेनजींच्या गाण्यातील बदल पाहण्याचा आणि ऐकण्याचा योग आला. एकदा भीमण्णांबरोबर बनशंकरीला गेलो होतो. बनशंकरीची देवी ही भीमण्णांची कुलस्वामिनी. कृष्णेच्या काठी भाकरी-दही, वांग्याची भाजी खाण्याचा आमचा प्रघात असे. तेथून हुबळीला गेलो. तेथे कृष्णाबाई रामदूरकर या रामभाऊंच्या शिष्या, 27 ऑक्टोबरला खाँसाहेबांची पुण्यतिथी साजरी करीत असत. भीमण्णांच्या मनात या ठिकाणी सेवा करण्याचे आधीच ठरले होते. त्या रात्री अनेकांची गाणी झाल्यावर भीमसेनजी गायला बसले. त्या दिवशीचे त्यांचे गाणे म्हणजे रामभाऊ कुंदगोळकरांचे सहीसही गाणे. आलाप, मिंड, सरगम, बोलतान, तानप्रक्रिया, गमक, शब्दोच्चार, रागाची मांडणी हुबेहुब सवाई गंधर्वांची. अथपासून इतिपर्यंत गुरुगायनदर्शन! गंगूबाई हनगल आणि कृष्णाबाई यांच्या डोळ्यांतून संततधारा वाहात होत्या हे गाणे कधीच विसरता येणार नाही.

आरंभीच्या काळात भीमसेनजींची मैफल काही ठराविक रागांनीच नटलेली असे. यमन, शुद्धकल्याण, पूर्वकल्याण अशांपैकी एक राग, नंतर एक ठुमरी, मग मध्यंतर, नंतर मियाँमल्हार, दरबारी कानडा, बागेश्री अशांसारखा एक राग, एक नाट्यगीत आणि भैरवी अशी मैफलींची योजना असे. 'चंद्रिका ही जणू, 'उगीच का कांता', 'रामरंगी रंगले' ही नाट्यगीते फारच लोकप्रिय झाली.

1954 मध्ये भीमण्णांची पहिली मैफल कोलकता येथे झाली. या एका मैफिलीने पंडित भीमसेन जोशी हे नाव, भारताच्या संगीताच्या आकाशात तेजस्वीपणे चमकू लागले. कोलकत्याला पंडितजींचा एक चाहता वर्ग आहे. गेली 40 वर्षे भीमण्णांच्या गाण्याशिवाय कोलकत्याची संगीत परिषद पूर्ण झालेली नाही. भारतातील सर्व श्रेष्ठ साथीदारांबरोबर भीमण्णांचे गाणे झाले आहे. अनोखेलाल यांच्याबरोबर लखनौ आकाशवाणीवर झालेली रंगतदार मैफल चांगलीच आठवते.

भीमण्णांचे गाणे 1960 च्या सुमारास नवे रूप घेऊ लागले. संथ बिलंपत, आलापी आणखीनच संथ झाली. रागाचे स्वरूप मांडण्यात इतर काही गायकांच्या लकबी त्यांनी आपल्या गाण्यात सामावून घेतल्या. पारंपरिक रागांच्या ठेवणीत विचारपूर्वक नवे बदल केले. मालकंसची ठेवण हे एक त्याचे उत्तम उदाहरण आहे. भीमण्णांच्या डोक्यात गाण्याचे चिंतन सदासर्वकाळ चालूच असते. त्यांच्या स्वभावात एक विलक्षण जिद्द आहे. आजच्या त्यांच्या प्रचंड यशाला ही जिद्दच प्रेरणादायी ठरली आहे. भीमसेनजींच्या गाण्यातील विलक्षण भारदस्त, कल्पनारम्य ताना त्यांनी कष्टाने आणि प्रतिभेने साध्य केल्या आहेत. भारतीय गायकांमध्ये अशा ताना क्वचितच दिसतात. ख्याल गायकीबरोबरच ठुमरी नाट्यसंगीत, मराठी-हिंदी भजने यांनाही भीमण्णांनी श्रीमंती दिली.

आज यशाच्या शिखरावर असलेल्या थोर कलावंत गायकाला आरंभीच्या काळात किती वाईट दिवसांना सामोरे जावे लागते हेही पाहिले आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या समोरच्या बोळात एका खोलीत हा कलावंत राहात होता. तुटपुंज्या मिळकतीवर दिवस कंठित होता. आठ-आठ तास षड्ज-पंचम मिळवत रियाज करीत होता. भैरव, ललत आणि तोडी या रागांचा विस्तार एकेक स्वर लावत रियाज होत असे. रियाज़ालाही एवढी ताकद लागते हे तेव्हा कळले. सौ. वत्सलाबाई याच जागेत गाणे शिकण्यासाठी नुकत्याच येऊ लागल्या होत्या. टिळक रस्त्यावरच्या बादशाही बोर्डिंगमध्ये दुपारचे जेवण होई. मुक्ताबाई दीक्षित यांच्या ‘जुगार' नाटकाच्या तालमीही चालू होत्या. भीमण्णांनी त्या काळात कानडी नाटकांतूनही काम केले. अर्थात वत्सलाबाईही त्यात होत्या. याच काळात पु. ल. देशपांडे यांच्या घरी भीमण्णांची एक मैफल झाली. महाकवी द. रा. बेन्द्र, विठ्ठलराव दीक्षित, शाहू मोडक, वसंतराव देशपांडे, मधू ठाणेदार राम गबाले, मधू गोळवलकर अशी इनीगिनी वीस-पंचवीस माणसे या मैफिलीला होती. हे भीमण्णांचे गाणे अप्रतिम झाले. ख्याल गायनाचा आदर्श म्हणता येईल असे हे गाणे होते. मध्यंतरानंतर भीमण्णांनी मियाँमल्हार सुरू केला. आलाप, बढत फारच छान झाली. सुमारे दीड तास भीमण्णांनी राग आळवला.

मियाँमल्हाराबरोबरच बाहेरही पावसाने थैमान मांडले होते. ‘घुमड घुमड कर' बरोबर बाहेरही विजांचा कडकडाट चालू होता. आतले गाणे आणि बाहेर पावसाचे रौद्रदर्शन! आयुष्यात हा प्रसंग कधीही स्मरणातून जाईल, असे वाटत नाही.

भीमण्णांनी जालंदरला थंडीच्या कडाक्यात उत्तररात्री उघड्या मैदानावर गायलेला ललत म्हणजे आनंदाचा ठेवा होता. एक लाख लोक उघड्या मैदानावर गाणे ऐकायला आलेले प्रथम पाहिले. त्या प्रचंड थंडीत आवाज तरी बाहेर पडेल का अशी चिंता वाटत असताना सुरेल स्वरांची लड घेऊन भीमसेनजी 'रैन का सपना’ वर आरूढ झाले. विलक्षण तयारीने आणि जिद्दीने गायलेली जालंदरची ती मैफल लोकांना जिंकून गेली.

या वर्षी सवाई गंधर्व पुण्यतिथी संगीत महोत्सवाला पन्नास वर्षे होत आहेत. आज या महोत्सवाला देशात प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. या महोत्सवात गाण्याची कला सादर करण्याची संधी मिळणे हे मोठे प्रतिष्ठेचे समजले जाते. पण आरंभीचे दिवस आठवतात ते फार कष्टाचे होते. कोणाही कलावंताला बिदागी देण्यात येत नसे. अविधवा नवमीला सवाई गंधर्व गेले म्हणून सप्टेंबर महिन्यात एका शनिवारी ही पुण्यतिथी साजरी केली जाई. या पुण्यतिथीचे सर्व श्रेय पंडित भीमसेन जोशी यांच्या कष्टांना आहे. सायकलवर तीन रुपयांची तिकीटे विकत ते आठ दिवस गावभर भटकत असत. त्या भटकंतीतून पाच-सहाशे रुपये जमा होत. टिळक रस्त्यावर राम एजन्सीमध्ये पंडितजींचे एक गाणे होई. डॉ. नानासाहेब देशपांडे खर्चासाठी चार पाचशे रुपये देत. अशा हजार-बाराशे रुपयांत पुण्यतिथी साजरी होई. गंगूबाई हनगल, हिराबाई बडोदेकर, सरस्वती राणे, फिरोज दस्तूर, बालगंधर्व इत्यादी थोर गायक सेवाभावाने या महोत्सवात भाग घेत. पावसाळ्यात हा महोत्सव होत असल्याने या महोत्सवाला पावसाने पहिली काही वर्षे जोरदार तडाखा दिला. हॉलवरील पत्र्यावर पावसाचा होणारा प्रचंड आवाज आणि प्रचंड उकडणे यांमुळे एका वर्षी अनेकांचे गाणे विस्कळित झाले. पहाटे पाऊस थांबल्यावर भीमसेनजी गायला बसले आणि विलक्षण प्रतिभेने त्यांनी 'ललत’ ची मांडणी केली. सर्व वातावरण बदलून गेले. गाणे संपल्यावर पु. ल. देशपांडे म्हणाले, "रामभाऊंचा 'ललत' मला आज पुन्हा भेटला. इतका सुंदर 'ललत' मी ऐकलाच नव्हता." अशाच पावसाळ्यात, एका महोत्सवात कधी नव्हे त्या गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर गायला आल्या होत्या. त्या वेळी पुणे आकाशवाणीवर गाण्याचे थेट प्रक्षेपण केले जाई. प्रथम संगमेश्वर गुरव गायला बसले आणि थोड्याच वेळात पावसाची वर्दळ सुरू झाली. वाद्यांचे स्वर टिकेनात. प्रत्यक्ष संगमेश्वर गुरवांच्या अंगावरही पाऊस पडू लागला. पावसाच्या आवाजामुळे गाणे ऐकू येईनासे झाले. काळ तर मोठा कठीण आला. आकाशवाणीच्या प्रक्षेपणामुळे मध्येच थांबताही येईना. थोडयाच वेळात सुदैवाने पाऊस थांबला आणि मग मोगूबाईंचे गाणे झाले. श्रोते ओलेचिंब, पाणीच पाणी चोहीकडे, पण माईंनी पहिला स्वर लावला आणि सारे काही उजळून गेले. पहिल्या पाच-दहा मिनिटांतच बिहागड्याने मैफिलीचा ताबा घेतला. गाण्याची तपश्चर्या म्हणजे काय असते, याचा प्रत्यय आला. 'अतर सुगंध’ ने माईंनी आपल्या गाण्याची सांगता केली. माईसारख्या ज्येष्ठ गायिकेपासून कोलकत्यामधील तरुण गायिकेपर्यंत भारतातील असंख्य लहान-थोर कलावंतांनी केवळ भीमसेनजींच्या शब्दामुळे या महोत्सवात कला सादर केली. अफगाणिस्तानचा महंमदशा गायकही आपली हजेरी लावून गेला. या वटवृक्ष झालेल्या महोत्सवाचे, 'सारे श्रेय तुझेच आहे.'

पंडित भीमसेन जोशी हे कलावंत म्हणून जेवढे मोठे तेवढेच एक गृहस्थ, मित्र म्हणूनही. ते एक संपन्न व्यक्तिमत्त्व आहे. कोणत्याही कलावंताबद्दल कधीही ते अनुदार उद्गार काढीत नाहीत. हे इतर कलावंतांनी शिकण्यासारखे आहे. अनेक तरुण कलावंतांना त्यांनी कलेच्या वाटेवर दिशा दाखवली. त्यांच्या स्वभावात एक विलक्षण मनस्वीपणा आहे. आपले विचार सडेतोडपणे ते मांडतात. त्यांचे बोलणेही अलीकडे परिपक्क झाले आहे. अनुभवाने समृद्ध झाले आहे. गेल्या वर्षी पं. रविशंकरांना भारतरत्न पुरस्कार मिळाल्यावर, वर्तमानपत्रांतून काहींनी कुजबूज सुरू केली. तेव्हा पंडितजी म्हणाले, 'मिळू द्या ना संगीतज्ज्ञांना काही मिळत असेल तर! चांगलीच गोष्ट आहे ही. ' असे त्यांचे उदार मन. भीमसेनजींचे घर म्हणजे एक वस्तुसंग्रहालयच आहे. अनेक सन्मानचिन्हे, पदव्या, भेटी यांनी घर भरले आहे. सौ. वत्सलाबाईंची साथसंगत फार फार सुरेल अशी आहे. आज ऐंशी वर्षांनंतरही भीमसेनजी त्याच ताकदीने आणि जिद्दीने ख्याल मांडत आहेत. संगीताचा विचार मनोमनी घोळतच आहे. त्यांच्या कर्तबगारीच्या खुणा भारताबाहेरही जपानपासून अमेरिकेपर्यंत अनेक वेळा दिसल्या. प्रत्येक भारतीयाला पंडित भीमसेन जोशी यांच्या गाण्याचा अभिमानच वाटेल. एकच खंत वाटते, ज्या चार भारतीयांना भारतरत्न पुरस्कार मिळाला, त्यात दोन वाद्यवादक आणि एक दाक्षिणात्य गानसम्राज्ञी. उरलेली चवथी सुगम संगीत सम्राज्ञी. उत्तरादी शास्त्रीय संगीत गाणारा या योग्यतेचा सरकारला गेल्या पन्नास वर्षांत एकही दिसला नाही का?

'अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन्...'

Tags: भारतीय शास्त्रीय संगीत किराणा घराणे गंगुबाई हनगल भारतरत्न पंडित रविशंकर हिराबाई बडोदेकर पु. ल. देशपांडे गंगुबाई हंगल सवाई गंधर्व महाराष्ट्र भूषण पंडित भीमसेन जोशी श्रीराम पुजारी Bharat Ratna Pandit Ravi Shankar hirabai barodekar P. L. Deshpande Gangubai Hangal Sawai Gandharva Maharashtra Bhushan Pandit Bhimsen Joshi Shri Ram Pujari weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

श्रीराम पुजारी

संगीताचे मर्मज्ञ रसिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके